Home ताज्या घडामोडी सत्यशोधक समाज : आजचीही गरज

सत्यशोधक समाज : आजचीही गरज

 

 

डॉ प्रवीण बनसोड

महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या गंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरूद्ध महान सत्य कोणते?
असा प्रश्न उपस्थित करून म. फुल्यांनी म्हटले आहे,:-

◆स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरूष यांचे हक्क सारखे आहेत.

◆मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही.

◆राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय.

◆प्रत्येकाला स्वमताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे.

◆शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्याची थोरवीच सिद्ध होते.

◆सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय.

◆या विश्र्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे.

◆एवढेच नव्हे, तर भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही; कारण तो सर्व विश्र्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही.

◆बायबल मध्ये येशू क्रिस्तांनी माणसाने माणसाशी कसे वागावे, यासंबंधी केलेला उपदेश माणसाने अंमलात आणला, तर मनुष्यजातीचे जीवन पूर्ण सफल झाले असे समजावे ’’.

महात्मा फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे.

त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग्र चर्चा केली आहे. ‘‘शुद्ध सत्य हे धर्मगंथात किंवा ऋषी, गुरू, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही; ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीत वास करते. निसर्गातील सत्य व नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करून देणारी बुद्धी (रीझन) मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानेच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे.निर्मिकाने – मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे; तो म्हणजे बुद्धी होय’’

महात्मा फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुद्धीवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाहीत.

कार्य व उपक्रम :
सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी महात्मा फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली.मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या गंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरूवातीस महात्मा जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरूवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिक रीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सदय:स्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.(पुण्यात आता असे होत नाही)

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे.

(१) निर्मिक एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही.

(२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही.

(३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.

(४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही.

(५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही.

(६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.

(७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि

(८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.

सर्व सभासदांनी सत्याचा प्रसार व सद्विचार लोकांत प्रसृत करून मानवी हक्क व कर्तव्ये यांचा प्रसार-प्रचार वृत्तपत्रे-
व्याख्यानांव्दारे करावा. म. फुल्यांनी दलितांना, स्त्रियांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम प्राधान्याने हाती घेतला. शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावे आणि सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला.

●विदयेची महती त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या गंथात चपखल शब्दांत वर्णन केली आहे. ते म्हणतात,
“विदयेविना मति गेली;
मतिविना नीति गेली;
नीतिविना गति गेली;
गतिविना वित्त गेले;
वित्ताविना शूद्र खचले;
इतके अनर्थ एका अविद्येने केले!

●“अज्ञानगस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच त्यांनी मुलींसाठीही शाळा काढल्या. त्यासाठी सावित्रीमाईंनी पुढाकार घेऊन अध्यापनही केले. ज्ञानवृद्घिकारक उपायांना बळकटी देण्यासाठी त्यांनी गरीब व होतकरू विदयार्थ्यांना विदयावेतने व हुशार विदयार्थ्यांना बक्षिसे ठेवली. निबंधलेखन व वक्तृत्वस्पर्धा यांना उत्तेजन दिले. वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे एक सहकारी कृ. पां. भालेकर यांनी वसतिगृह स्थापून परगावच्या गरीब विदयार्थ्यांची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था केली. *महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात (१८८२) सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. पाझरणीच्या सिद्धांताला (Theory of Perculation) ला कडाडून विरोध केला. त्यासाठी लोकहितकारक असे उपायही सुचविले.

●सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

●दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली.

●शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला.

●दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला.

●नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली.

●तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला.

●जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला.

●तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला.

●शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले.

●एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी ते, विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले.

●महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतून समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या उपकमाला काही अंशी यश लाभले.

●महाराष्ट्राबरोबरच बृहन्महाराष्ट्रातील काही शहरांतून महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या, लोकशिक्षणाच्या चळवळीला वेग आला.

●मधे काही काळ, विशेषतः म. फुले यांच्या मृत्यूनंतर (१८९०) तसेच भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्यानंतर (१९४७) सत्यशोधक चळवळ खूपच मंदावली, उपेक्षित राहिली; मात्र शंकरराव मोरे, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, दिनकरराव जवळकर, लोकशाहीर पिराजीराव सरनाईक प्रभृती व त्यांचे खंदेबल्लळ सहकारी यांनी सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित केली, गतिमान केली आणि खेड्यापाड्यांतल्या, तळागळातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचा आणि रूजविण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी ती उभ्या महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला.

●भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रचंड रणसंग्रामात, सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम राहिला. त्यामुळे सत्यशोधक चळवळ विस्कळीत झाली;

●तशीच स्वातंत्र्योत्तर काळात, ‘ ”आता स्वातंत्र्य प्राप्त झालं, उद्दिष्ट साध्य झालं; म्हणजे दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाची निकड उरली नाही’’ अशी बव्हंशी बहुजन समाजाने समजूत करून घेतली. समोरची उद्दिष्टेही वेगवेगळी झाली. शिवाय मोठया प्रमानात बाह्मणेतर समाज विविध राजकीय पक्षांत विभागला गेला. अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळे सत्यशोधक चळवळ थंडावल्यासारखी वाटत असली तरी सत्यशोधक हा विचार चिरंतन आहे

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments