Home Uncategorized साडी चोळी आणि भेटवस्तूंची निवडणूक

साडी चोळी आणि भेटवस्तूंची निवडणूक

 

 

सुषमा योगेश कोठीकर

सगळ्यात सुज्ञ मतदार वर्ग म्हणून समजली जाणारी शिक्षक आमदार निवडणूक यावेळी वेगळ्या रुपात बघायला मिळत आहे. बुद्धिजीवी मतदाराला सुद्धा घोळात घेण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांकडून केला जात आहे ह्याचा नवल तर वाटतंच आहे सोबत त्यांची कीव सुद्धा येत आहे. साडी चोळी आणि पैशाचं पाकीट जणू काही लग्नाचा आहेर देत आहेत उमेदवार मंडळी.पर्स काय चांदीचा मुलामा दिलेली भांडी काय बस हेच बघायचं राहिलं होतं आम्हा शिक्षकांना आता.साडीचोळीवर मत परिवर्तन करून निवडून येणारा उमेदवार खरंच आम्हाला न्याय देऊ शकेल का हा विचार सद् सद्विवेक बुद्धीने करण्याची गरज आज आली आहे.ज्याने साडी दिली,पैशाचं पाकीट दिलं त्याला एकं नंबरच व्होट देण्याची मानसिकता अनेक मतदार शिक्षक बंधू भगिनींची झाली आहे ही बाब धक्कादायक आहे.अरे तुम्ही काय त्या उमेदवारांच्या घरी मागायला गेले होते ह्या वस्तू?त्यांनी स्वतः तुम्हाला घरपोच पाठविल्या आणि तुम्ही क्षणिक मोहाला बळी पडून आपलं अमूल्य मतं त्या उमेदवाराला द्यायला निघालात जो तुम्हाला चिल्लर सारखा खरेदी करायला निघाला.जर असं असेल तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे समाजाला दिशा देणारा शिक्षक शिक्षिका असे भ्रमित होऊन वागतील तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय संस्कार देणार हा विचार करणे गरजेचे आहे.लाखो रुपय पगार कमावणारे आपण अश्या क्षुद्र राजकारणाला बळी पडतोय ह्याची खंत वाटतेय.
यावर्षीच्या अमरावती शिक्षक मतदार निवडणूक चांगली रंगली आहे ह्यात शंका नाही.राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी ह्या रिंगणात उडी घेतल्याने ही निवडणूक शिक्षक संघटना आणि राजकीय पक्ष ह्यांच्यात चांगलीच चढाओढ करणारी ठरणार आहे.राजकीय पक्षाने सुरू केलेल्या ह्या नवा पायंडा सुखकर आहे ह्यात तिळमात्र शंका नाही.ह्या निवणुकीच स्वरूप यावर्षी पुर्णतः बदलल्याचं चित्र समोर उभ आहे संघटना आणि राजकीय पक्ष ह्यांच्यात चांगलीच झुंज होणार ही खात्री आहे.वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या शिक्षकांच्या समस्यांना हवा तो न्याय कधी मिळालाच नाही.त्याला जबाबदार कोणाला धरावं आपण निवडून दिलेले आमदार फक्त आमदार होण्यासाठी निवडणूक लढवतात आणि नंतर शिक्षकांना विसरून जातात हेच सुरू आहे.कारण सभागृहात शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी जे पाठबळ त्याला हवं आहे ते पाठबळ मिळत नाही एकट्याचा आवाज वर पोहचत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या समस्या आणि त्यासाठी दिलेली गंजीभर निवेदनेकचऱ्याच्या डब्यात जातात.संघटनांमध्ये एकी नाही केवळ राजकारण करण्यासाठी सगळे एकत्र येतात.ह्या सगळ्यात शिक्षकांच्या समस्यांना हवा तो न्याय कधी मिळालाच नाही.यावर्षी तर उमेदवारांनी वेगळीच शक्कल लढवत आमिष देत मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.त्यांच्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळतंय असं चित्र देखील बाहेर दिसतं आहे.सोबतच नेहमीप्रमाणे जात आणि धर्म हा विषय आहेच.ठराविक गट हा एका उमेदवाराच्या पाठीशी आहे असं जाहीरपणे सांगितल्या जातंय मग तो उमेदवार त्या योग्यतेचा आहे किंवा नाही हे बघितल्या जाणार नाही.फक्त जातीचं लेबल लावून तो आपली भाकरी भाजणार हे चित्र स्पष्ट दिसतंय. शिक्षक मतदाराने किमान धर्मनिरपेक्ष राहून वोट करण्याची गरज आहे पण इथे देखील जात धर्म वरचढ ठरतो ही खंत आहे.आम्हा शिक्षकांना बालबुद्धि समजून अनेक लोक नको राजकारण आमच्यासोबत करत आहेत आणि आम्ही ते झेलत आहोत हे चित्र बदलण्याची आज गरज आहे.मैं बडा मैं बडा ह्या नादात शिक्षक किती छोटा बनवल्या जातोय हे विसरत चाललो आहे आम्ही.पेनाच्या एका रेषेने एखाद्या उमेदवाराच भविष्य बदलवण्याची ताकद आपल्यात आहे हे विसरून फक्त आमिषाला बळी पडत आम्ही आमचा आत्मसन्मान गहाण ठेवल्यागत साडी चोळी पैशाचा आहेर गोड करून घेत आहोत.
परंतु आता बदल घडविण्याची वेळ आहे. निवडणुकीच्या ह्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी खरा,न्याय देणारा,आवाज उठवणारा,पाठबळ असलेला उमेदवार निवडून देण्याची गरज आहे.ज्याला मोठं पाठबळ आहे जो सभागृहात बहुमताने आपले शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेण्याची क्षमता ठेवेल असा उमेदवार निवडून देण्याची ही आपली गरज आहे.परिवर्तन हा निसर्ग नियम आहे आणि तो नियम आपणही पाळला पाहिजे जो आपल्यासाठी काही करत नाही स्वतःच्या धुंदीत राहतो असा उमेदवार निवडून देण्यात अर्थ नाही.जे उमेदवार आपल्याला साडी ,पैसा आणि वस्तूचे आमिष देत आहेत ते तर मुळीच आपला आमदार बनण्याच्या योग्यतेचे नाहीत.हे उमेदवार आपल्याला लाच देत आहे आणि ती आपण स्वीकारून जर वोट दिलं तर भारत भूमीचे गुरू म्हणवून घेण्याची आपली लायकी राहणार नाही.संतांच्या ह्या भूमीत संस्कार आणि शिक्षण देणारा शिक्षक गुरू जर असा क्षणिक मोहाला बळी पडला तर भावी पिढ्या आपल्याला दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत.आपण आपल्याच विद्यार्थ्यांच्या नजरेत नजर टाकून बघू शकणार नाही.जे पालक आपल्या लेकरांना विश्वासाने आपल्या पदरात संस्कार घडविण्यासाठी टाकतात त्यांचा आपल्यावरचा विश्वास उडून जाईल.दिखावा करणारे उमेदवार,भ्रष्ट उमेदवार,नौटंकी करणारे उमेदवार आणि ह्या सगळ्यात खरा उमेदवार ओळखण्याची गरज आज आहे.आपण सगळे बुद्धिजीवी आहोत,समाजाला दिशा देणारे आहोत,हाडामासाच्या जिवंत पिढीला आकार देणारे शिल्पकार आहोत,आपला खडू फळा आपलं अस्त्र आहे,सरस्वतीची आगाध कृपादृष्टी आपल्यावर आहे म्हणून आपण या क्षेत्रात अग्रेसर आहोत.समाज आणि पिढी घडविण्यात आपलं अनन्यसाधारण असं महत्व असताना कुणी येऊन आपल्याला लाच देत असेल तर आपण त्याच्या कानशिलात लावण्याची धमक ठेवून आपल्यात खरा शिक्षक जागृत करण्याची वेळ आली आहे.एक शिक्षिका म्हणून मी आपणास आवाहन करते की आपल्यातल्या शिक्षकाला ह्या क्षुद्र राजकारणात आणि भ्रष्टाचारात जिवंत ठेवून मतदान करा.तुमच्या घरात अश्या काही वस्तू उमेदवारांकडून आल्या असतील तर त्याला आग लावा ,त्याच्या तोंडावर मारून फेका कारण एवढ्या कमी पैशात तो आपल्याला आणि आपल्या ज्ञानाला स्वतःकडे गहाण ठेवून घेतो आहे.शिक्षक मतदार बंधू भगिनींनो हीच वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची,परिवर्तन घडवून आणण्याची डोळे उघडे ठेवून मतदान करा दमदार उमेदवार निवडून द्या जो आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय देईल.


सहायक शिक्षिका
सरस्वती विद्यालय अमरावती

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments