Home Uncategorized ग्लोबल शिक्षक

ग्लोबल शिक्षक

माधव पांडे

3 डिसेंबरला राज्यातील पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर कोण निवडून जाणार याची राजकीय पक्ष व शिक्षकांना उत्कंठा लागलेली असतांना लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणारा यावर्षीचा ‘ग्लोबल टीचर ‘पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहिर केला.अभिनेते स्टीफन फ्राय यांच्या घोषणेनंतर भारतातील शिक्षकांना अत्यानंद झाला आहे.भारत ‘विश्वगुरू’ होण्यासाठी सिद्ध होत आहे.रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांकडे बघण्याचा समाजाचा व शासनाचा दृष्टीकोन बदलेल काय? यावर आता चर्चा व्हायला हवी.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडी या लहान गावातील 29 विद्यार्थ्यांना शिकविणा-या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला थेट ‘ग्लोबल शिक्षक’ म्हणून मान्यता मिळते,या अतिशय धक्कादायक वाटणा-या घटनेकडे समाज कसा बघतो,यावरच शालेय शिक्षण क्षेत्राचे भविष्य अवलंबून आहे.
भारतीय परंपरेनुसार जोवर व्यक्तीचे जगात कौतुक होत नाही तोवर आम्ही आमच्या माणसांना महत्व देत नाही.स्वामी विवेकानंदांच्या शिकागो मधिल भाषणातील पहिल्या दोन ओळी भारतीयांना मुखपाठ आहेत.शिकागोच्या भाषणानंतर विवेकानंदांना समजून घ्यावं,असं भारतीयांना वाटू लागले.शिकागोला जाण्यापूर्वी विवेकानंद भारतात आपला विचार मांडतच होते, मात्र त्यांच्या विचाराला आम्ही ‘महत्व ‘दिले नाही.’मान्यता ‘तर फार दूर राहिली. ग्लोबल शिक्षकाचा पुरस्कार जाहिर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रणजितसिंग डिसले यांचा मंत्रालयात सत्कार केला.मुख्यमंत्री म्हणाले,डिसले सरांच्या कल्पना घेऊन शालेय शिक्षणाचा आराखडा तयार करण्याचे मी निर्देश देत आहे.खरं म्हणजे,राजकीय नेते हिच भाषा बोलणार.राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य पुरस्काराचा सन्मान करणारे असले तरी शिक्षण क्षेत्राला अश्या वरवरच्या कौतुकाची भूक नाही,ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
रणजितसिंह डिसले यांना यावर्षीचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहिर होण्यापूर्वी गेल्या नऊ वर्षात त्यांना तब्बल 12 आंतरराष्ट्रीय आणि 7राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.वयाच्या अवघ्या 28व्यावर्षी मायक्रोसाॅफ्टची फेलोशिप मिळविणारे ते सर्वात तरूण प्राथमिक शिक्षक ठरलेत.पुरस्काराने त्यांच घर भरलेलं आहे.शाळेच्या अंगणात त्यांनी केलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.आधुनिक जगाच्या मांडणीत शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा सुयोग्य पद्धतीने वापर केला तर शिक्षण सर्वांसाठी खुलं होवू शकतं, विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरू शकतं असा ‘मूलमंत्र’ डिसले सरांच्या कार्यातून समोर आला आहे.प्रयोगशिल शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचरचा पुरस्कार जाहिर झाल्याने शासनाला नव्याने शालेय शिक्षणपद्धतीचा विचार करावा लागेल अशी शक्यता आता निर्माण होतांना दिसत आहे.शालेय शिक्षणाला या निमित्याने महत्व प्राप्त होईल,अशी भाबडी आशाही बाळगायला हरकत नाही.पण खरचं असं होईल?

मित्रहो,दुष्काळी भाग असलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका लहान गावातला जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक जगातला ‘सर्वात्कृष्ट शिक्षक’ कसा होऊ शकतो? असा प्रश्न आमच्या राज्यकर्त्यांना पडला असेल. प्राथमिक शिक्षकाला मिळालेली जागतिक प्रतिष्ठा राजकीय नेत्यांना सतावत असेल.एवढा मोठा सन्मान जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला मिळतो,ही गोष्टही नेत्यांना पचायला जड जात असेल.असं लिहिण्यामागे रणजितसिंह डिसले यांनीच अनुभवातून व्यक्त केलेले विचार आहेत.पुरस्काराची बातमी वाचतांना शिक्षकाला बसलेले चटकेही बघा.सगळं चित्र स्पष्ट होईल.जमिनीशी नातं सांगणारा हा शिक्षक म्हणतो,शिक्षणाची ध्येय – धोरणे राजकीय नेत्यांना,मंत्र्यांना ठरवू देऊ नका.डिसले सरांच्या या आग्रही मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो.रणजितसिंह डिसले सर म्हणाले,केवळ पाठ्यक्रम पूर्ण करण्याची शिक्षकांना सक्ती नसावी.विविध उपक्रम करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असायलाच हवे,असा आग्रह त्यांनी धरला.डिसले सरांच्या या मुद्द्यावर सरकार बोलणार आहे काय? तर उत्तर असेल,नाही.सरकार या विषयावर मौन पाळेल.डिसले सरांच्या कुठल्यातरी उपक्रमाची ‘काॅपी’ करून एखादा ‘सरकारी आराखडा’ तयार होईल आणि पुन्हा एकदा शिक्षकांच्या माथी ‘नवोपक्रम ‘म्हणून जबरदस्तीने तो ‘शासकीय प्रकल्प’ थोपविल्या जाईल.अशा प्रकारे डिसले सरांच्या उपक्रमांची इतिश्री होईल.या पलिकडे जाऊन विचार करण्याचं भान आम्हाला आलं तरच भारताने ‘विश्वगुरू’ होण्याची स्वप्ने बघावीत.
शिक्षणक्षेत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची अत्यंत दयनिय स्थिती आहे.सर्वात कमी पगार आणि सर्वाधिक जबाबदा-या असं या सेवेचं स्वरूप आहे.आता तर नविन बदली धोरणानूसार शिक्षकांच्या दरवर्षी बदल्या होतात.सतत अस्थिर असलेल्या या क्षेत्राकडून समाजाच्या प्रचंड अपेक्षा आहेत.जिल्हा ते गाव प्रत्येक पातळीवरील पुढा-यांचा,नेत्यांचा शिक्षकांना पदोपदी जाच होतो.इतक्या बिकट परिस्थितीतही राज्यात सर्वाधिक ‘तंत्रस्नेही शिक्षक’ जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक आहेत.मेळघाटातील कीर्रर्र जंगलात दहा-बारा किलोमिटर पायपीट करून शाळेला पोहचणा-या प्राथमिक शिक्षिका जीवावर उदार होऊन आपले अध्यापनाचे कार्य करीत आहेत.त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी ‘डिसले’ सर असतात.फक्त समाजाला ‘दिसत’ नाहीत.

जिल्हापरिषदेचे बहुतांश शिक्षक प्रचंड मेहनती,शिक्षणाशी प्रामाणिक आहेत. असे असून सुद्धा गावगाड्याच्या राजकारणात जिल्हा परिषद शिक्षकांचाच बळी दिल्या जातो.आपला समाज दांभिक आहे.त्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवर समाजाने,सरकारने गांभिर्याने विचार केला पाहिजे.शालेय व्यवस्थापन खाजगी असो वा शासकीय.प्रत्येक ठिकाणी शिक्षकांची प्रचंड कुचंबना केली जाते. शिक्षकांना शिकविण्याचे,उपक्रम करण्याचे स्वातंत्र्य आहे काय?उत्तर शोधा.स्वातंत्र्य नाही.असेच अनुभवास येईल.
महाराष्ट्रातील बहुतांश खाजगी शाळा राजकीय नेत्यांच्या आहेत.जिल्हा परिषदेत तर फक्त राजकारणच ! अशा परिस्थितीत शिक्षण क्षेत्र राजकीय ‘हस्तक्षेपाशिवाय मुक्त ‘कसे राहिल?अनेक शाळांमध्ये सुडबुद्धीने व हेतुपुरस्सर शिक्षकांना त्रास दिला जातो.व्यवस्थापनाच्या डोळ्यांना न दबणा-या शिक्षकांचा बरोबर हिशोब केल्या जातो.पूर्वी शाळा शिक्षकांच्या नावाने ओळखल्या जायच्या आज राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत.अलिकडेच झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत संस्थाध्यक्ष असलेल्या एका उमेदवाराने त्यांच्या संस्थेतल्या शिक्षकांना प्रचारासाठी कसे ‘जुंपले’ होते याच्या कहाण्या ‘दरदरून’ बाहेर येत आहेत.राजकीय चेह-याशिवाय शिक्षणसंस्था चालूच शकत नाही,अश्या भ्रमात आपल्या देशातल्या शिक्षणसंस्था वाटचाल करीत आहेत.शिक्षकांच्या पदभरती पलिकडे शिक्षणसंस्था आपले कार्य विस्तारायला तयार नाहीत.समाज शिकला पाहिजे.देशाला उत्तम नागरिकांची गरज आहे.समाजात उत्तम नागरिक असतील तर देशात शांतता नांदेल,देश प्रगती करेल.यासाठी शिक्षकांना शिकविण्याचं स्वातंत्र्य द्या.त्यांना प्रतिष्ठा द्या अशी आर्त विनवणी डिसले सर करीत आहेत.शिक्षणातून देश घडू शकतो हा वैश्विक विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून अशांत देशासाठी ‘पीस आर्मी ‘ही कल्पना डिसले सर राबवित आहेत.आपल्या देशाच्या प्राथमिक शिक्षकाला ग्लोबल पुरस्कार मिळाल्याने यापुढे समाज शिक्षकांबद्दल सन्मान राखेल,अशी अपेक्षा आहे.शिक्षक हा देणारा असतो.श्रेष्ठ दाता आहे.तब्बल सात कोटीचा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले सरांनी पुरस्काराची निम्मी रक्कम साडे तीन कोटी रूपये या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या इतर 9 शिक्षकांना त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देण्याचे जाहिर केले.तर आपल्या देशातील शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनविण्यासाठी 30टक्के रक्कम वापरण्याचा मानस डिसले सरांनी व्यक्त केला आहे.उर्वरित रक्कम 2030 पर्यंत विविध देशातील 50 हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार करण्यात खर्ची घालण्यात येणार आहे.पुरस्काराच्या सात कोटी रक्कमेचं वितरण बघितल्यावर शिक्षकांच्या ‘पगारावर डोळा’ ठेवणा-या समाजाच्या ‘डोळ्यात’ या निमित्याने ‘अंजन’ घातल्या गेले आहे.
रणजितसिंह डिसले यांनी 2020 पुढील शिक्षणाची रूपरेषा देशासमोर सादर केली.यापुढील शिक्षण तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहे.शिक्षक तंत्रस्नेही होतील.शिक्षकांच्या ज्ञानाचा विश्वात्मक वापर केल्या जाईल.प्रत्येक गावात डिसले सर दिसायला लागतील.मात्र असं सगळं होण्यासाठी राजकीय हस्तक्षेप रोखल्या जाईल काय?गंमत बघा.डिसले सरांनी ‘क्यू आर कोडचा’ प्रयोग करून नवी वहीवाट शोधली.क्यू आर कोडच्या माध्यमातून विद्यार्थी पाठ-कविता अधिक सविस्तर समजून घेऊ लागले.एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत डिसले सर म्हणाले,शाळेत मुलं येत नव्हती तेव्हा सुरूवातीला मी लॅपटाॅपवर विद्यार्थ्यांना सिनेमा दाखवित होतो.प्रसंग लक्षात घ्या.डिसले सरांच्या या प्रयोगाला कोणाचा आक्षेप नसेल .परंतू प्रत्यक्षात हाच प्रयोग इतर कोणी शिक्षकांनी केला तर मुख्याध्यापक नोटीसचं अस्त्र वापरतील.विद्यार्थ्यांना अध्यापनाच्यावेळी सिनेमा दाखविला म्हणून व्यवस्थापन जाब विचारेल.आज अध्यापनात तंत्रज्ञान वापराचं कदाचित कौतुकही केल्या जाईल.मात्र शाळेत मोबाईलवर बंदी घालणारे शासनाचे अनेक जीआर,परिपत्रके शिक्षकांनी बघितली आहेत.अनेक शाळांमध्ये अजूनही शिक्षकांचे मोबाईल मुख्याध्यापकांच्या कक्षात जप्त असतात.केंद्र शासनाच्या एका योजनेतून अनेक शाळांना संगणक प्रयोगशाळा मिळाल्या.या संगणक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना संगणक शिकवायला एका मानधन तत्वावरील शिक्षकाची नियुक्ती शासनाने केली होती.अवघ्या एका वर्षातच शासनाने संगणक शिक्षकांना हद्दपार केले.संगणक प्रयोगशाळा बंद पडल्या.काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकदाही संगणक हाताळायला मिळाले नाहीत.तर काही ठिकाणी शाळेचे संगणक ‘बंगल्यावर’ गेले.डिसले सरांच्या उपक्रमाचा मूळ गाभा तंत्रज्ञानातून ‘अध्ययन अनुभूती’ आहे.या दिशेने किती शाळा प्रयत्नरत आहेत?वास्तविकता भयानक आहे.लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांच्या शब्दात सांगायचे असेल तर असे म्हणावे लागेल की,शिक्षण कशाशी खातात हे किती लोकांना कळलं? मूळात विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणं ही आमची सगळ्यांची राष्ट्रीय जबाबदारी आहे.शिक्षणाचा प्रवाह सतत बदलत असतो.अध्यापन पद्धती बदलत आहेत.ज्ञानरचनावादाने शिक्षकांची भूमिकाच बदलेली आहे.असं सगळं असतांना अजूनही आमचे शिक्षणक्षेत्र ‘डेली नोटस्’मध्येच अडकले आहे.डिसले सरांनी एक किस्सा सांगितला.त्यांना वरिष्ठ अधिका-यांनी शाळेची माहिती मागितली.तेव्हा सरांनी अधिका-यांना माहितीचा ई-मेल केला.पलिकडून अधिकारी म्हणाले,ई-मेल चालणार नाही.लिखित स्वरूपात चार प्रतीत माहिती द्या.आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.त्यापूर्वी जबाबदार घटकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.आपल्या शहरात,गावात प्रत्येक शाळेत ‘डिसले’ सर आहेत.पण ते ‘दिसत’नाही.जिल्हा परिषदेची शाळा असो वा खाजगी व्यवस्थापनाची.प्रत्येक ठिकाणी शिक्षक कसा पिचल्या जाईल,यासाठी सगळे नियम व अटी बनविल्या जातात.शिक्षकांना सन्मान द्या या एका मागणीतच शिक्षकांच्या स्वातंत्र्याचा गर्भितार्थ लपला आहे.शिक्षकांना अध्यापन,उपक्रमाचे स्वातंत्र्य दिल्या गेले तर प्रत्येक शाळेत डिसले सर दिसायला लागतील.मात्र असं होतांना दिसेल काय?
समाज सरंजामशाही प्रवृत्तीचा आहे.ज्ञान अन्यायाविरोधात बंड करते.बहुतांश ठिकाणी सत्तासूत्र ताब्यात असलेली मंडळी विवेकहीन आहेत.शिक्षकीधर्म ही नोकरी नसून तो शिक्षक विलक्षण दाता आहे,या नजरेने यापुढे तरी समाजाने बघितले पाहिजे.समाजाने आपली दृष्टी व व्यवहार बदलला तर भारतीय शिक्षक जगाचं नेतृत्व करेल हे नक्की!

 

                                                                                                                        अमरावती
                                                                                                                  9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments