Home Uncategorized ही धरा कोणाची?

ही धरा कोणाची?

निलेश श्रीकृष्ण कवडे

पुण्यातील कोथरूड मधील दाट लोकवस्तीच्या परिसरात बुधवारी लोकांना रानगव्याचे दर्शन झाले. जंगलात राहणारा रानगवा माणसांच्या वस्तीत शिरल्यामुळे तो बिथरला आणि सैरावैरा पळू लागला. ही गोष्ट वनविभागाला माहीत झाल्यावर त्याला जेरबंद करण्यासाठी विशेष ऑपरेशन सुरू झाले. या ऑपरेशनला जवळजवळ पाच तास लागले. या पाच तासांच्या थरारक ऑपरेशन मध्ये काही प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटलेल्या रानगव्याला अनेक जखमा देखील झाल्या होत्या काही ठिकाणी त्याचे सांडलेले रक्त पाहून मन सुन्न झाले होते. शेवटी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाने रानगव्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळवले. लोकवस्तीत शिरल्यामुळे बिथरलेल्या घाबरलेल्या आणि लोकांनी पाठलाग करून दमलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रानगव्याला माणसांच्या नागरी लोकवस्तीचा आलेला अनुभव त्याच्या जीवावर बेतला. रानगव्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यू वरून मला 'जलीकट्टू' या मल्याळम चित्रपटाची आठवण झाली. जलीकट्टू हा तामिळनाडू राज्यात खेळला जाणारा पारंपारिक खेळ आहे. काहीसा बैलगाड्यांच्या शर्यती प्रमाणे असणाऱ्या या खेळात पोंगल सणाच्या निमित्ताने एक पुष्ट बैल लोकांच्या गर्दीत सोडून दिला जातो. चवताळलेल्या या बैलाला नियंत्रित करण्यासाठी अनेक तरूण प्रयत्न करतात. जो तरुण या बैलावर नियंत्रण मिळवतो तो या खेळांमध्ये यशस्वी घोषित केला जातो. या प्रयत्नात बैल आणि माणसे जखमी होतात. कधी बैल मृत्युमुखी पडतो तर कधी माणसांच्या जीवावर सुद्धा बेतते. म्हणूनच प्राणीमित्र संघटनांनी या खेळावर बंदी आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टानेही या खेळावर बंदी आणली होती त्यामुळे तमिळनाडूत मोठे आंदोलन पेटले होते. हे आंदोलन शांत करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने अध्यादेश आणून या खेळावरील बंदी उठवली होती. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे याच खेळावर आधारित असलेला 'जलीकट्टू' हा मल्याळम भाषेतील चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहे. 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'ने इतर २७ भारतीय चित्रपटातून या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड केली आहे. आठवड्यापूर्वीच अकोला फिल्म क्लब चे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख आणि सचिव विशाल कांबळे यांनी हा चित्रपटअकोला फिल्म क्लबच्या माध्यमातून अकोलेकरांसाठी दाखवला होता. 'जल्लीकट्टू' या चित्रपटाची कथा वार्के आणि अँटनी नामक व्यक्तींवर आधारीत आहे, जे एक कत्तलखाना चालवत असतात. त्याच्या कत्तलखान्यामध्ये म्हशींना ठार मारून त्याचं मांस, कातडं आदी गोष्टींची विक्री होत असते. एक दिवस एक म्हैस कत्तलखान्यातून पळून जाते आणि बेफाम होऊन ती संपूर्ण गावात दहशत माजवते. या म्हशीला पकडण्यासाठी पोलिसांना बोलवले जाते. संपूर्ण गाव तिला पकडण्यासाठी एकत्र येतं. मात्र, ती म्हैस कुणालाही त्याब्यात येत नाही. त्या म्हशीला पकडण्यासाठी आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणारे विविध प्रयत्न या चित्रपटात बघायला मिळतात. ती म्हैस गर्दीतून स्वतःला कशी वाचवते तेही यात पाहायला मिळते. शेवटी म्हैस पकडली गेल्यावर मानवी प्रवृत्तीच्या अघोरी हव्यासाचे वास्तववादी दर्शन या चित्रपटाद्वारे होते. जलीकट्टू या चित्रपटांमध्ये सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका वठवण्यासाठी जीव तोडून अभिनय केला आहे. चित्रपटातील अनेक दृष्ये श्वास रोखून धरायला लावणारी असून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. आपसातील द्वेष, वैर, प्रेम, भूतदया, गावातील राजकारण, मानवी स्वभावाचे विविध पैलू ग्रामीण जीवनातील संदर्भ अशा विविध गोष्टी दिग्दर्शकाने अत्यंत कल्पकतेने चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्या आहेत. जलीकट्टूसाठी दिग्दर्शक पेल्लीसरी यांनी २०१९ मध्ये गोव्यात झालेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळवले होते. चित्रपटाचा प्रीमियर टोरोंटो येथे करण्यात आल्यानंतर केरळमध्ये हा चित्रपट अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला होता. भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा ही तमाम भारतीयांची इच्छा आहे. माणूस या सर्व जीवसृष्टीचा एकमेव राजा आहे आणि ही पृथ्वीच नव्हे तर हे अंतराळही आपलेच आहे या आविर्भावात माणूस आजवर जगत आला आहे. मात्र 'कोरोना' नामक एका विषाणूने समस्त मानव समाजाला फक्त तुम्हीच या जीवसृष्टीचे मालक नाहीत ही जाणीव करून दिली. काही काळासाठी का होईना जग थांबले होते. जलीकट्टू चित्रपटामध्ये दलदलीत फसून गुदमरणाऱ्या म्हैशीचा आणि बुधवारी कोथरूड मधील मानवी दलदलीत फसल्याने झालेला रानगव्याचा मृत्यू ही धरा कोणाची? हा संवेदनशील माणसाला निरुत्तर करणारा प्रश्न अधोरेखित करून जातो…


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
टाकळी जलम पंचायत समिती अकोला
जिल्हा अकोला
मो. 9822367706

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments