Home Uncategorized तन-मन-धन से....

तन-मन-धन से….

 

माधव पांडे

सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येला आता पंधरा दिवस लोटली आहेत तरी समाजमनाची अस्वस्थता कायम आहे.मानवीसेवेचा वसा घेतलेल्या आमटे कुटुंबिंयातील एका महत्वाच्या सदस्याचा इतका धक्कादायक मृत्यू महाराष्ट्र पचवू शकला नाही.डाॅ.शीतल यांच्या आत्महत्येनंतर मिडीयातून वेगवेगळ्या पैलूने चर्चा झाली.डाॅ.शीतल यांनी आत्महत्या कशी केली इथंपासून आमटे कुटुंबियांतील वाद-विवादावर अनेक वृत्तपत्रांचे रकाने खर्ची पडले.असं होणंही स्वाभाविक होतं.वैद्यकिय क्षेत्रातली संवेदनशील समाजभान असलेली कर्तृत्ववान व्यक्ती अचानक आनंदवनचा आणि करजगींचा संसार सोडून स्वर्गलोक गाठते,ही घटनाच मानवी संवेदना गारठून टाकणारी आहे.या घटनेने प्रत्येक संवेदनशील माणूस हादरून गेला आहे.डाॅ.शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या का केली असेल? या प्रश्नाचा शोध सगळे घेत आहेत.पोलिस आपल्या पद्धतीने तपास करीत आहेत.कदाचित संबंधितांची बयाने नोंदविल्यावर कुठल्या तरी निष्कर्षावर तपास अधिकारी येतील.काळाच्या ओघात कुठेतरी,कधीतरी डाॅ.शीतल यांच्या आत्महत्येचं कारण समाजाला कळेलही!मात्र त्या महत्प्रयासाने लावलेल्या शोधात मानवी मनाचे विश्लेषण दुर्मिळ असेल.खरं म्हणजे,डाॅ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येवर इतके व्हीडीओ,लेख समाजमाध्यमात आले की,या विषयावर मला काही वेगळा प्रकाश टाकण्याची आवश्यक्ता वाटत नाही.तसंही कोणत्याही आत्महत्येनंतर त्या अकल्पित मृत्यूचं कारण शोधूनही आपण त्या व्यक्तीला या जगात परत आणू शकत नाही.कुठे घातपात झाला असेल किंवा आत्महत्येला कोणी जबाबदार असेल तर अश्या प्रकरणाची चौकशी अर्थपूर्ण आणि महत्वाची ठरते.याही प्रकरणात त्या दिशेनेही चौकशी होईलच.तरीही आत्महत्या करणा-या व्यक्तिशिवाय कोणीही घडलेल्या अकाली मृत्यूचं कारण ठोसपणे सांगू शकत नाही.या अर्थी डाॅ.शीतल यांच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य करणं कदाचित आमटे कुटुंबिय किंवा खुद्द डाॅ.शीतल यांच्यावर अन्याय करणारं ठरेल.वेदनेला कुठलाही तर्क नसतो,भाषा नसते.समाजमन हादरवून टाकणा-या अशा घटनांचे विश्लेषण वेगळ्या अर्थाने करता आले तर कदाचित आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे सापडतील.
मित्रहो,डाॅ.शीतल आमटे- करजगी यांच्या दुर्देवी आत्महत्या घटनेवर मला कुठलंही विधान करायचं नाही.त्या घटनेचे अनेक पैलू आणि पदर आहेत.काही उघड आणि काही छूपे असतील.जगासमोर येणारी प्रत्येक गोष्ट सत्य नसते आणि संपूर्ण सत्य जगासमोर येईल याची शाश्वती नसते.आज आपल्याला मानवी धारणेवर बोलता आलं तर बघुया!

गेली पंधरा दिवस डाॅ.शीतल यांच्या आत्महत्येसंदर्भात आपण सगळ्यांनी अनेक लेख वाचले असतील.व्हीडीओ बघितले असतील.या सगळ्यांमध्ये दोन बिंदूवर लक्ष वेधल्या जातं.संस्था आणि कुटुंब.संस्थापक आणि वारसदार.या मुद्द्यांवर हा सगळा घटनाक्रम फिरत आहे.या संवादातून वाचकांनी आमटे कुटुंबियांतील नात्यांमधिल गुंतागुंत दुर्लक्षित करावी,असं मला प्रामाणिकपणे वाटते.प्रत्येकच घरात वाद असतात.वाद नाही असं घर नाही.त्यामुळे आपण सगळ्या ‘त्रयस्थांनी’ या घटनांकडे सामाजिक व मानवीय दृष्टीकोनातून बघणं आवश्यक आहे.कौटुंबिक घटनाक्रमांची जुळवणूक करण्यास आपण सगळे ‘परकिय ‘ठरू.त्यामुळे अशा दुर्देवी घटनांकडे वेगळ्याच दृष्टीने बघता येईल काय? याचा मी प्रयत्न करीत आहे.
महारोगी सेवा समिती ही मानवी कल्याणाची अव्दितीय संस्था आहे.विविध क्षेत्रातही अशा काही संस्था कार्यरत आहेत.संस्थापक संस्था स्थापन करतात.अशा संस्थांना त्याच भावनेने भारावलेले वारसदार मिळाले नाहीत तर भविष्यात अनेक प्रश्न तयार होतात.संस्थापकाचा विचार किती उदात्त आणि व्यापक आहे,यावर त्या संस्थेचे भविष्य अवलंबून असते.

लाॅकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी ‘डाऊन’ होत असतांना आता अलिकडे माझ्या पुढ्यात एक पुस्तक आलं.त्या पुस्तकाला चाळतांना माझ्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं मला मिळू शकतील असं वाटत आहे.या संवादातून वाचक त्या पुस्तकाला चाळतील तर कदाचित ‘सामाजिक संदर्भ’ नव्याने उजळून निघतील.
अमरावती महानगर पालिकेत प्राथमिक- माध्यमिक शिक्षक,शाळा निरीक्षक अशा जबाबदा-या पार पाडत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करणारे श्री.गंगाधर बालाजी टप्पे यांच्या ‘श्री गुरूदेव पुष्पांजली’या पुस्तकाकडे मला आपले लक्ष वेधायचे आहे.अखिल भारतीय श्री.गुरूदेव सेवा मंडळ ,गुरूकुंज आश्रम,मोझरी या संस्थेचे जीवन प्रचारक श्री.गंगाधर टप्पे यांनी लाॅकडाऊनच्या काळात ‘श्री.गुरूदेव पुष्पांजली’ या पुस्तकाची बांधणी केली.इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या विदुषीने लाॅकडाऊनच्या काळात विश्वाला एका भयानक मानसिक अवस्थेतून जावे लागेल,याचा इशारा दिला होता.त्या थोर लेखिकेचं म्हणणं खरंही होतं.मात्र भारत ही संतांची भूमी.या मातीत वेगळाचं सुगंध असल्याने सगळी घरं-दारं बंद असतांना एका ॠषीप्रमाणे गंगाधर टप्पे सरांनी एकटाकी ‘श्री गुरूदेवांची पुष्पांजली लिहिली’.या पुस्तकातील प्रत्येक पान ख-या अर्थाने भक्तीचा सुगंध देणारं आहे.त्याचवेळी समाजमनाचा विचार करणा-या प्रत्येकाला नवा संदर्भ देणारं ठरेल.’श्री.गुरूदेव पुष्पांजली’या पुस्तकातून राष्ट्रसंतांच्या जीवनावर नव्याने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.या लेखनकार्यांमागे राष्ट्रसंतांविषयीची अपारश्रद्धा पदोपदी प्रस्तूत होत असतांना कुठेतरी राष्ट्रसंतांच्या तन-मन-धन से,सदा सुखी हो..भारत देश हमारा या भूमिकेचा आग्रही पुरस्कार आहे.या पुस्तकात तब्बल 27 अध्यायवजा प्रकरणे आहेत.हे पुस्तक क्षणभर कथा आहे तर नववाचकांसाठी हा ऐतिहासिक दस्तावेज आहे.या पुस्तकात राष्ट्रसंतांसंदर्भात अनेक घटना,संदर्भ भरभरून दिले आहेत.राष्ट्रसंतांसोबत आयुष्य वेचणा-या काही महानुभावांची माहिती वाचकांना खूप काही देऊन जाते.या पुस्तकातून राष्ट्रसंतांविषयी लेखकाचा दृष्टीकोण रसाळपणे समोर येत असतांना विवेकाने शब्द बांधले आहेत.भक्त अंध असतात आणि भक्ती अंधांची माता.या धारणेला या पुस्तकातून छेद गेला आहे.
श्री.गंगाधर टप्पे यांनी लिहलेल्या पुस्तकाचं खास कौतुक करावं,यासाठी मी हा संवाद करीत आहे.मुळात आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे.त्या प्रश्नातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण तपासून घेतला पाहिजे.श्री.गंगाधर टप्पे यांना लाॅकडाऊनमध्ये प्रचंड अस्वस्थता आली.लाॅकडाऊनमध्ये अनेक लोक अस्वस्थ होते.त्या बंदिस्त काळात कौटुंबिक हिसेंची सर्वाधिक प्रकरणे घडलीत. माणूस – माणसापासून तुटल्याबरोबर प्रचंड बैचेन झाला.त्याला जगणं असह्य वाटलं.त्याच्या डोक्याचा ताबा कोणीतरी घेतला,असा भास माणसाला व्हायला लागला.अश्या गुदमरलेल्या अवस्थेत गंगाधर टप्पेंना राष्ट्रसंतांची भजने,काव्य आणि चरित्र मन शांत करायला पूरेपुर उपयोगी पडली.या सगळ्या घटनाक्रमात राष्ट्रसंतांचे विचार समाजमनात किती खोलवर रूजले आहे,याचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.
आज समाजाचे वाचन कमी झाले आहे,अशी सर्वत्र ओरड ऐकायला मिळते.या आरडाओरडीत तथ्यही आहे.आम्ही पुस्तक वाचत नाही,माणसं कुठून वाचणार? राष्ट्रसंतांच्या जीवनाचा धावता आढावा घेता येणार नाही.परंतु या धावत्या जगात राष्ट्रसंतांचे अनुयायी समाज समृद्ध करीत आहेत.
राष्ट्रसंतांनी मोझरीला गुरूदेव आश्रमाची उभारणी केली.जगातल्या प्रत्येकच महापुरूषाने आपला विचार प्रसारित करण्यासाठी प्रचारक नेमले.त्या प्रचारकांच्या माध्यमातून विचार समाजात रूजल्या गेले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘विचारांच विद्यापीठ’ होतं.राष्ट्रसंतांचा विचार परंपरागत धारणे पलिकडचा होता.अशा विचारांची ही पुष्पांजली समाजाला फुलवत जाणार आहे.
आपण वाचत आहात या सगळ्या वाक्यांमधून राष्ट्रसंतांची महती आपल्यासमोर उभी झाली असेल.माझ्या चार शब्दांनी राष्ट्रसंतांचा सन्मान वाढला असं नव्हे तर समाजात राष्ट्रसंत इतके विरघळून गेले आहेत की,अनेकांच्या जीवनाचा सुगंध फक्त राष्ट्रसंतांच्या विचाराने आला आहे.इथंवर सगळं ठीक आहे.राष्ट्रसंतांनी समाधी घेतल्यानंतर राष्ट्रसंत कुठे आहेत? या प्रश्नाचं उत्तरं सोपं आहे.लाखो गुरूदेव भक्तांमध्ये राष्ट्रसंत वसत आहेत.कोणत्याही महात्म्याच्या विचारांचं यश त्यांच्या अनुयायांच्या कृतीतून व्यक्त होत असते.राष्ट्रसंत आजही लोकांच्या जगण्यात आहेत.यात राष्ट्रसंतांच्या विचाराचे गमक दडलेलं आहे.ही एक बाजू आहे.
दुस-या बाजूने विचार करूया. राष्ट्रसंतांनंतर त्यांचा वारसदार कोण? असा प्रश्न विचाराल तर कदाचित मला नावं घेता येणार नाही.पुस्तकात याचा खुलासा होवू शकतो.कोणत्याही महापुरूषाचा वारसदार कोण असावा,यासाठी महापुरूषाच्या हयातीत किंवा पश्चात उभा संघर्ष पेटल्याची असंख्य उदाहरणे आहेत.विचारांचा वारसा’ विचारच’ असेल.’व्यक्ती’ कसा असेल?समाजसेवेचा वारसा कोण चालवित आहे यापेक्षा ‘समाजसेवा’ हा विचार किती लोकांनी स्विकारला हे जास्त महत्वाचे नाही काय? अनेक धर्मगुरूंनी आपला वारसा अनुयायातूनच समोर केला.जगभरातील महान विचारवंत,चिंतकांनी ‘व्यक्ती’हा वारसा अमान्य केला आहे.आम्ही अजूनही जन्माने प्राप्त वारसालाच मान्यता देतो.येथेच प्रश्न निर्माण होतात.गुंता वाढतो.हक्क सांगितल्या जातो.सेवेचं मूल्य ठरवितो.व्यक्ती पलिकडे जाऊन विचार शिल्लक राहणार नसतील तर त्या विचाराचा पुर्नःविचार झाला पाहिजे.काळाच्या ओघात लोकं कार्याला विसरतील म्हणून रक्ताच्या नात्यांना वारसा मान्य करणं,ही समाजाची चूक आहे.अशाच चुकांमधून काही प्रश्न तयार झालीत.त्या प्रश्नांची समाजाने नव्याने उत्तरे शोधली पाहिजेत.
राष्ट्रसंतांनंतर त्यांच्या विचाराने भारलेल्या अनुयायांनी राज्यात संस्था चालविल्यात.अधामधात या संस्थांच्या कारभाराबद्दल जनतेला वर्तमानपत्रातून काही वेगळंही कळतं.त्यातून व्यवस्थेचे दोष समोर येतात.एक गोष्ट स्पष्ट आहे,समाजाला संस्था विचार देत असली तरी संस्थेला मात्र ‘विचारचं’ घडवू शकतात.
आज कोणतीही संस्था ‘वादातीत’ राहिली नाही.प्रत्येक संस्थेत वाद आहेत.विविध प्रकृतीची माणसं एकत्र येणार म्हटल्यावर वाद होणार.यात नविन काही नाही.या वादांचं उदात्तीकरण करायचे असेल तर लोकशाहीला मते-मतांतरे मान्य आहेत,असं म्हणता येईल.राष्ट्रसंतांच्या विचाराने भारलेल्या संस्थेत कदाचित वाद असतीलही..परंतू विचारही आहे.समाजातील राष्ट्रसंतांच्या आध्यात्मिक शक्तीचा दबाव संस्थेला राष्ट्रसंतांच्या विचारापासून दूर घेऊन जाऊ शकला नाही.या सगळ्यांमागे एक महत्वाची गोष्ट दडून बसली आहे.राष्ट्रसंतांनी वैचारिक अनुयायी तयार केलेत.लाखो भक्त आपसूक झाले.मात्र विचार प्रसारित करणारे वैचारिक अनुयायी जाणिवपूर्वक तयार करावे लागतात.राष्ट्रसंतांनी डोळसपणे समाजाला पुढे नेण्यासाठी अनुयायी घडविले.त्याच मांदियाळीतील गंगाधरराव टप्पे यांच्या शब्दात पुन्हा ‘राष्ट्रसंत’ बोलत आहेत.वारसाचा प्रश्न वैचारिक स्तरावर सोडविल्या गेल्यामुळे राष्ट्रसंतांच्या अनुयायी व भक्तांमध्ये गोंधळ नाही.गाडगेबाबांचा वारस कोण? असा प्रश्न कोणी विचारू शकत नाही.गाडगेबाबांचे कार्य पुढे नेणारे शंकरबाबा पापडकर गाडगेबाबांचे खरे अनुयायी आहेत,असं मी म्हणत असेल तर कोणी आक्षेप घेणार नाही,याची मला खात्री आहे.कालचा थोर समाजसेवीचा अकाली मृत्यू कुठेतरी रक्तांच्या वारसाचा गुंता होता काय? या कल्पनेने माझ्या मनाचा थरकाप उडतो आहे.

                                                                                                                  9823023003

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments