Home Uncategorized डॉ. विष्णुकांत मौर्य: एक महान वैज्ञानिक व संवेदनशील व्यक्तिमत्व

डॉ. विष्णुकांत मौर्य: एक महान वैज्ञानिक व संवेदनशील व्यक्तिमत्व

 

अँड. उर्वी केचे यावलीकर

नुकतीच स्टैनफोर्ड विद्यापीठाने जगातील सर्वोत्तम दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली आहे. यात डॉ. विष्णुकांत शिवप्रसाद मौर्य, प्राचार्य, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद (माजी प्राचार्य, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावती); यांनी आपल्या सखोल संशोधनातून आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवून या प्रतिष्टीत यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत समाविष्ट होणारे ते एकमेव प्राध्यापक आहेत.

श्री विष्णुकांत मौर्य हे मूळचे मध्यप्रदेशचे. त्यांचे शालेय शिक्षण शासकीय आर. एन. ए. विद्यालय, पिपारीया येथे झाले. १९८३ साली ते डॉक्टर हरिसिंग गौर विश्वविद्यालय, मध्यप्रदेश येथून सुवर्ण पदक पटकावत एम. फार्म. झाले.पुढे १९८३ सालीच ते एन.डी.एम.व्ही.पी. समाज महाविद्यालय फार्मसी, औरंगाबाद येथे (Lecturer & Asst. Professor) अध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी शिकवण्या बरोबरच फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट आणि इन्स्ट्रुमेंटल अँनालिसीस या मध्ये संशोधन केले. ते तेथे २००२ पर्यंत म्हणजे १९ वर्ष कार्यरत होते. याच दरम्यान १९९६ ते २००० पर्यंत ते एस.जी.एस.आय.टी. इंदौर येथे रिसर्च स्कॉलर होते. या दरम्यान त्यांनी त्वचेच्या माँलीक्युलर मोडेलिंग आणि टी.डी.डी.एस. च्या विकासावर संशोधन केले.त्या नंतर ते शासकीय महाविद्याल फार्मसी, औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले. त्यांच्या २००२ ते २०११ या जवळपास 9 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अध्यापन आणि महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यासोबतच नॅनोटेक्नोलॉजी आणि दंत उत्पादनाचा विकास या विषयांमध्ये संशोधन केले. २०११ मध्ये ते शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावती येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले आणि २०१५ पर्यंत ते अमरावती मध्ये कार्यरत होते. या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अध्यापन आणि प्रशासनासोबतच औषधनिर्माण, आण्विक मॉडेलिंग, इंस्ट्रूमेंटल अ‍ॅनालिसिस आणि कॉम्प्यूटर एडेड लर्निंग मटेरियल डेव्हलपमेंट या मध्ये संशोधन केले. पुढे ते परत ऑगस्ट २०१५ मध्ये औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले. आणि सध्या संस्था प्रशासनासोबतच, फार्मा शिक्षणासाठी धोरण तयार करणे, संशोधन माहिती आणि विश्लेषण, संशोधन आणि प्रशासनात संगणक अनुप्रयोग या विषयांमध्ये कार्य आणि संशोधन करीत आहेत.

श्री. मौर्य यांना ३२ वर्षाचा शैक्षणिक अनुभव आहे. एक वर्षाचा इंडस्ट्री अनुभव आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांचे ३५ शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाखाणल्या गेले आहेत. ते आयपीए, आयएसटीई, सीएसआय, एपीटीआय, एसीपीआय अश्या अनेक संघटनांशी सल्गनीत आहेत. तसेच त्यांना सन्मानाचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा करिअर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

अमरावती मधल्या त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या परिचयाचा योग आला. माझे वडील श्री सतेज मधुकर केचे यांचे मित्र श्री. दिलीप जनार्दन चौधरी, श्री. ब्रिजमोहन नेमीचंदजी कट्टा. व श्री. प्रफुल्ल औघड यांचा माध्यमातून ही भेट झाली. या नंतर अनेकदा भेटीचा योग आला आणि श्री. मौर्य यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत गेले.त्यांच्या सोबत अनेकदा पारिवारिक सहलींना जायचा योग आला. मालखेड, मुक्तागीरी अश्या अनेक ठिकाणी सहली झाल्या. तसेच त्यांनी दोन वेळेला चांगापूर देवस्थानात मोठ्या प्रेमाने आप्तस्वकीयांसाठी भोजन समारंभ सुद्धा आयोजित केला होता. त्यांच्या प्रखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे लोक लवकरच प्रभावित होत त्यामुळे फार कमी काळातच त्यांचे अनेक मित्र सबंध तयार झाले होते. ते अनेक वेळा अनेक ठिकाणी अश्या जेवणाच्या मेजवानींचे आयोजन करायचे. त्यांचा तो छंदच होता असे म्हणायला हरकत नाही. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमांचे निमित्त ते कधीच सांगत नसत.

एवढ्या मोठ्या पदावर असलेला व्यक्ति पण अहंकाराचा लवलेशही कधी त्यांच्यात दिसला नाही. त्या वेळेला विदार्थी दशेत असेलेले आम्ही म्हणजे चि. ऋषिकेश औघड, डॉ. कु. पल्लवी औघड, डॉ. श्री. भूषण कट्टा, चि. मंदार चौधरी आणि मी यांच्या सोबत अगदी खेळीमेळीने ते मिसळायचे. ते अतिशय कुटुंबवस्तल आहेत आणि आम्हाला त्यांच्या अपत्यासारखेच समजायचे. त्यांचा धाक होता पण कोणतीही नवीन योजना साकारायची झाल्यास नेहमी सर्वप्रथम त्यांचेच समर्थन आम्हास राहायचे. त्यांनी नेहमी नवीन विचारांना प्रोत्साहनच दिले आणि कार्य सिद्धीस जाई पर्यंत सर्व प्रकारची मदत केली.सहलींसोबतच त्यांच्या सोबत ट्रेकला जाण्याचा पण योग आला. तेंव्हा त्यांनी खटकालीचा अतिशय खडतर ट्रेक अगदी सहजरित्या पूर्ण केला. ते स्वतः एक उत्तम टेबल टेनिसपटू सुद्धा आहेत. महाविद्यालयाच्या कामानिमित्य त्यांना नेहमी दौऱ्यावर राहावे लागे पण कधी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही की कधी त्यांनी प्रकृतीची समस्या सांगितली नाही. त्यांची कर्तव्यदक्षता आणि काम करण्याची चिकाटी खरच वाखाण्याजोगी आहे.

त्यांच्या पत्नी सौ. अलका विष्णुकांत मौर्य या पदवीधर तर आहेतच सोबतच अतिशय कर्तव्यदक्ष आणि सुगरण गृहिणी आहेत. शालेय जीवनात त्या स्वतः एक उत्कृष्ट हॉकी पटू राहिल्या आहेत. त्या स्वभावाने सुद्धा अगदी लाघवी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलगा अभ्युदय आणि आमच्यात कधी फरक केला नाही. त्यांचे सौ. वसुधा केचे, सौ. लतादेवी कट्टा, सौ. नीता औघड आणि सौ. उल्का चौधरी यांच्या सोबत सलोख्याचे बंध तयार झाले. आणि या सर्व गृहसम्राज्ञींनी एकत्र येऊन अनेकदा त्यांच्या हातच्या स्वादिष्ट पदार्थांच्या मेजवान्या आम्हास खाऊ घातल्या.

त्यांचा मुलगा चि. अभ्युदय विष्णुकांत मौर्य हा लहानपणीपासूनच फार हुशार. एकुलता एक असूनही लाडावलेपणाचा अंशही कधी त्याच्यात नव्हता. पण वडिलांसारखाच जिद्दी आणि चिकाटी असलेला. आपला पहिला पगार वडलांच्या शेवटच्या पगारापेक्षा जास्त राहणार हे त्याने लहानपणीच ठरविले होते. आणि त्या प्रमाणे त्याने परिश्रमही घेतले. त्याने त्याचे अभियांत्रिकी शिक्षण फार चांगल्या रीतीने पूर्ण केले. त्यामुळे त्याची योग्यता लक्षात घेऊन लगेच एका बहुराष्ट्रीय कंपनीने त्याला उचलून घेतले. काही वर्ष काम भारतात केल्या नंतर सध्या आता अभ्युदय परदेशात पुढील उच्चशिक्षणासाठी गेला आहे.अभ्युदय हा सुद्धा त्याच्या वडिलांसारखा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. त्याने नेहमीच कौटुंबिक समारंभामध्ये उत्साहाने भाग घेतला आहे. त्याने एकदा माझे वडील श्री. सतेज केचे आणि आई सौ. वसुधा यांच्या लग्नाचा वाढदिवसाचे इतक्या खुबीने आयोजन केले होते की जणू काही पुन्हा त्यांचे लग्नच लागले. आजही तो प्रसंग आठवला की उर आनंदाने भरून येतो.

२०१९ मध्ये माझे लग्न झाल्या नंतर माझ्या यजमानांच्या नौकरी निमित्य आम्ही औरंगाबाद मध्ये स्थायिक झालो. तेंव्हा आमच्या सर्वांच्या आवडीचे मौर्य काका, लग्नाला येऊ न शकल्यामुळे काही सामान द्यायच्या निमित्याने मला भेटायला आले. त्यांनी माझे सासरे डॉ. श्री. पंडितराज यावलीकर, सासू सौ. रेखादेवी यावलीकर आणि पती श्री. सुदेश यावलीकर यांच्या सोबत फार आपुलकीने ओळख करून घेतली आणि गप्पा मारत फार छान वेळ आमच्या सोबत घालविला. घरी परतांना माझा सुखी संसार पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मला औरंगाबाद मध्ये एक हक्काचे माहेर मिळाले.त्या नंतर अनेकदा औरंगाबाद येथे त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. तेथे पाहायला मिळाले की सौ. अलका काकू या काकांप्रती फार कर्तव्यपरायण आहेत आणि काकांनी घरात अश्या अनेक सोयी करून ठेवल्या आहेत की काकूंना त्रास कमी व्हावा. त्यांचा आपसामधील हा ऋणानुबंध पाहून, आम्हा नवीन उभयतांना वैवाहिक जीवनाच्या सुरवातीलाच खरच फार चांगली प्रेरणा मिळाली.त्यांचे नेहमीच त्यांच्या जवळच्या लोकांच्या कार्यावर लक्ष असते. माझे महिलांच्या कायदेशीर अधिकारांच्या क्षेत्रातील कार्य पाहून त्यांनी मला, त्यांच्या शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद येथे जागतिक महिला दिनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केले. त्या दिवशी ते स्वतः प्रशासकीय कामानिमित्त दौऱ्यावर होते. पण त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मयुरा काळे यांनी कोणताही अडथळा न येता तो कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला.त्यांच्या महाविद्यालयाच्या शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्याच्या मनात त्यांचे प्राचार्य श्री. मौर्य यांच्या विषयी आदरभाव जाणवला. त्यांचे प्रशासन कौशल्य सुद्धा या वेळेस पाहण्यास मिळाले की ते स्वतः उपस्थित नसतांना सुद्धा त्यांनी महाविद्यालयाची कोणतीही कामे अडू दिली नव्हती. कामाचे समायोजन आणि विभागणी इतक्या व्यवस्थितरित्या केले होते की प्रत्येक व्यक्ति आपली कामे सुरळीतपणे करीत होता.

या अनेक वर्षात डॉ. श्री विष्णुकांत शिवप्रसाद मौर्य यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू पाहण्यास मिळाले. पण प्रामुख्याने त्यांनी व्यासंगी आणि अभ्यासू वैज्ञानिक, कुशल प्रशासक, आदर्श शिक्षक, स्पष्टवक्ता मित्र, खंबीर पिता आणि एक प्रेमळ पती या सर्व भूमिका त्यांनी अगदी समर्थपणे पार पाडल्या आहेत. ते खरच एक अष्टपैलू आणि अलौकिक व्यक्तिमत्व आहेत. आणि या पुढेही ते औषध निर्माण शास्त्राच्या संशोधनात अनेक उच्चांक प्रस्थापित करतील यात मला थोडीही शंका नाही आहे.

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments