Home Uncategorized सौ. प्रतिभाताई पाटील-शेखावत यांचे अभिष्टचिंतन – काही आठवणी मेधावी व्यक्तिमत्व

सौ. प्रतिभाताई पाटील-शेखावत यांचे अभिष्टचिंतन – काही आठवणी मेधावी व्यक्तिमत्व

 

सतेज म. केचे
आजही आठवतं 2017 मध्ये महामहीम सौ. प्रतिभाताई पाटील- शेखावत अमरावतीला आल्या आहेत असे कळल्यावरून अमरावती संगीत कलोपासक सभेतर्फे त्यांची सदिच्छाभेट घेण्यासाठी मी, प्राचार्य मु.अ. भोंडे काका, सूरमणी प्रा. सौ. कमलताई भोंडे, प्राचार्य सौ. मीनलताई ठाकरे, प्रा. मुकुल भोंडे असे एकत्र आधी भेटीची वेळ मिळवून त्यांच्या बंगल्यावर गेलो. तेथे आधीच असंख्य लोकांची गर्दी. प्रत्येकाला निदान एक मिनिट त्यांचे दर्शन, वैयक्तिक भेट हवी होती. संध्याकाळची वेळ. दिवसभरात असे शेकडो लोक येऊन गेलेले. इतक्या मंडळींशी संपर्क आल्यावरही कुठेही थकवा किवा कंटाळा न दाखवता अतिशय प्रसन्नपणे, जिव्हाळ्याने त्या प्रत्येकाशी बोलत होत्या.

मी पुढे होऊन पदस्पर्श केला. आता येथे आधी अनुभवलेले राष्ट्रपती भवनासारखे वाकून नमस्कार करण्यावर बंधन नव्हते. त्यामुळे जास्त चांगले वाटले. त्या आपल्याला ओळखतील अशी कोणतीही अपेक्षा मला नव्हती. “मी मधुकर केचेंचा मुलगा” एवढेच बोललो. त्यावर त्यांनी माझ्याकडे बघितले व क्षणात म्हणाल्या – “फार लवकर गेले ते”. आता आश्चर्यचकित होण्याची वेळ माझ्यावर आली. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशाची राष्ट्रप्रमुख म्हणून संपूर्ण पाच वर्षे कार्य केलेली एक महान व अतिमहत्वाची व्यक्ती पंचवीस वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या एका मराठी साहित्यिकाची – आपल्या पतीचे जवळचे मित्र म्हणून अद्यापही आठवण ठेवून आहे आणि त्यांचा मुलगा भेटायला आल्यावर त्याच्या वडिलांच्या अकाली निधनाबाबत सहानुभूतीपूर्वक हळहळ व्यक्त करते ही बाब भारावून टाकणारी होती. केवढा तो जिव्हाळा आणि वयाच्या ८३व्या वर्षीही किती विलक्षण तल्लख बुद्धी व स्मरणशक्ती! मला त्याक्षणी जो आधार वाटला त्याचे मी वर्णनही करू शकत नाही. स्व. डॉ. मधुकर आष्टीकर यांच्या ‘वेदकालीन स्त्रिया’ या ग्रंथात मेधाजनन संस्काराचा उल्लेख आहे. नेमक्या गोष्टी स्मरणात राहणे आणि योग्य वेळेवर त्वरेने त्या आठवणे हा थोर नेत्यांच्या बुद्धीचा विशेष गुणधर्म या ‘मेधा’जागृतीमुळे शक्य असतो आणि अशी व्यक्ती त्यामुळे ‘मेधावी’ म्हणून संबोधली जाते. या अनुभवाने मी थरारून गेलो. डॉ. देविसिन्ह्जी शेखावत हे माझे वडील साहित्यिक स्व. मधुकर केचे यांचे कॉलेजपासूनचे मित्र. त्यासोबतच विदर्भवीर स्व. जांबुवंतराव धोटे, पुढे बिहार आणि केरळ राज्याचे राज्यपाल झालेले महामहीम स्व. रा. सु. गवई, माजी आमदार स्व. श्री. बबनराव मेटकर, माजी कुलगुरू स्व. डॉ. का. गो. देशमुख, स्व. प्राचार्य अण्णासाहेब वैद्य, प्रसिद्ध धन्वंतरी स्व. डॉ. मोतीलालजी राठी, कविवर्य स्व. सुरेश भट, माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख, प्राचार्य प.सी.काणे, प्राचार्य डॉ. सुरेश पाध्ये ही सर्व समकालीन मंडळी. विभिन्न विचारधारा बाळगूनही एकमेकांप्रती स्नेहादर ठेवणारी. पुढे आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात लक्षणीय विधायक कार्य करून नावारूपास आलेली. या सर्वांचे माझ्या वडिलांकडे नेहमी जाणे-येणे , साहित्यिक गप्पा-गोष्टी, हास्य-विनोद, आपसात गमती-जमती इ. चालत. माझ्या अगदी लहानपणी विद्याभारती महाविद्यालयात स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून माझ्या वडिलांचे व्यासपीठावरून भाषण झाल्याचे मला स्मरते. सा. बां. खात्यातली नोकरी सोडून मी जेव्हा तत्कालीन अमरावती विद्यापीठात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो तेव्हा मुलाखत घेणाऱ्या निवड समितीवर डॉ. शेखावत काकाच होते. सन १९८५ पासून त्यांचेकडे नमस्कार करून आशीर्वाद घेण्यासाठी जाण्याचा माझा एकही दसरा आजवर चुकला नाही.

राष्ट्रपती भवनास भेट – अमरावती संगीत कलोपासक सभा व हेमंत नृत्य कला मंदिर

सन २००९ च्या एप्रिल महिन्यात अमरावती संगीत कलोपासक आणि हेमंत नृत्य कला मंदिराच्या सदस्यांनी राष्ट्रपती भवनास भेट दिली. श्री. रावसाहेब शेखावत हे स्वागताध्यक्ष असलेला अमरावती संगीत कलोपासक सभेचा त्रैवार्षिक संगीत–नृत्य-नाट्य महोत्सव नुकताच यशस्वीरीत्या आटोपल्याने सर्वजण खुशीत होते. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाच्या आवारात खास राष्ट्रपतींसाठी नुकत्याच बांधलेल्या प्रेक्षागृहात राष्ट्रीय स्तरावरील अमरावतीच्या शास्त्रीय गायक–कलाकारांचे कार्यक्रम महामहीम राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित करण्याचे प्रा. सुभाष बनसोड (अ.सं.क.सं. चे तत्कालीन अध्यक्ष), प्रा. मणिंदर मोंगा आदि मान्यवर मंडळीनी ठरविले.अनायसे त्यावर्षीच एप्रिल महिन्यात डॉ. देविसिन्ह्जी शेखावत यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या अमृत-महोत्सवी कार्यक्रमातच कलाकार आपली कला सादर करतील असे ठरले. सूरमणी प्रा. कमलताई भोंडे, प्रा. जयश्री वैष्णव, पं. महादेवराव जळीत (व्हायोलीन) या कलाकारांनी अ.सं.क.स तर्फे कार्यक्रम दिले. हेमंत नृत्य मंदिरातर्फे गुरु बोडे यांच्या शिष्यांनी शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले. प्रा. सौ. वसुधा घुरडे, प्रा. सौ. शीतल मेटकर यांचे संचालन होते. जुन्या कसलेल्या कलावंतांनी तर कार्यक्रमात रंग भरलाच पण अगदी लहान-लहान मुलांनी कुठे एक सेकंदाची देखील चूक होऊ न देता नृत्य सादर केले. महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांनी अतिशय प्रसन्न होऊन कलाकारांना वस्त्र, भेटवस्तू इ. देऊन सन्मानित केले. सलग २ दिवस हे कार्यक्रम चालले.

समारोपाच्या वेळी मा. डॉ. देविसिन्ह्जी शेखावत यांच्या अमृत-महोत्सवानिमित्त मान्यवर पाहुण्यांची गौरवपर भाषणे झाली. नागपूरचे ख्यातनाम वक्ते डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनाही ऐकण्याचा योग आला. एका अतिशय भावपूर्ण प्रसंगात स्वतः श्री. रावसाहेब शेखावत आणि घरातील मुले-सुना-नातवंडे यांनी आजी-आजोबांना बाजूला बसवून त्यांच्या सन्मानार्थ खास रचलेले गीत ताला-सुरात गायिले व त्यांना खूष करून टाकले. त्यांनी ऑर्केस्ट्रासोबत केलेला सराव त्यांनी घरातील वडीलधाऱ्यांना तोपर्यंत कळूही दिला नव्हता. त्यामुळे वेळेवर सारे आश्चर्यचकित झाले.या कार्यक्रमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व औपचारिकता बाजूला सारून स्वतः महामहीम सौ. प्रतिभाताई यांनी तेथे स्नेहापोटी इतक्या लांबून आलेल्या पाहुण्यांचे व आप्तस्वकीयांचे आभार प्रदर्शन केले. खूप आपुलकीने त्या बोलल्या. देशातील सर्वोच्च स्थानावरील पदाधिकारी व्यक्तीने आभार-प्रदर्शन केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असणारे आम्ही स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो.

या प्रेक्षागृहाच्या बाजूलाच असलेल्या बंगल्यांमध्ये – ज्यांचेसोबत महिला आहेत अशा आमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अ.सं.क.स. आणि हेमंत नृत्य कला मंदिराचे कार्यकारिणीचे पदाधिकारी (काहीजण सहकुटुंब), कलाकार, इतर जिव्हाळ्याचे लोक असे सारे तेथे सलग तीन दिवस राहिले व त्यांनी राष्ट्रपतींचे पाहुणे म्हणून तेथला पाहुणचार घेतला. काही लोकांची मुक्कामाची व्यवस्था बाहेरही करण्यात आली होती. सर्वांचे जेवण-नाश्ता राष्ट्रपती भवनात तयार होऊन तेथे पोचविण्यात येत होते. प्रत्येक वेळेचा मेन्यू वेगळा असे. एकूण काय – सर्वांचा अंतरात्मा तृप्त.दोन वेळा तर आमच्याकरिता जंगी मेजवानी होती. पण ताईसाहेब स्वतः अतिशय साधे जेवण घेतात. त्यांच्याकरिता वेगळे एकदम साधे – तेला-तुपाचा, मसाल्याचा फारसा स्पर्शही नसलेले, फिकट दिसणारे, बरेचसे पाणीदार सुपाचे प्रकार आणि अगदी थोडे घनपदार्थ असे जेवण वाढून आले. तरुणपणात त्या राष्ट्रीय स्तराच्या टेबल टेनिस खेळाडू होत्या. राष्ट्रपती भवनात देखील त्या रोज नियमितपणे व्यायामशाळेत जात असत. या बाबीची नोंद इंडिअन एक्स्प्रेस सारख्या महत्वाच्या वृत्तपत्रानेही आवर्जून घेतली होती.

अंबा फेस्टिव्हलची सुरुवात
सन १९६२ पासूनच्या राजकीय प्रवासात अनेकदा आमदार, अनेक महामंडळांवर पदाधिकारी, पुढे विविध खात्यांच्या मंत्री, राज्यसभा खासदार, विरोधी पक्ष नेता, राज्यसभा उपसभापती, लोकसभा खासदार अशा अनेक भूमिका पार पाडत दि. ८ नोव्हेंबर २००४ मध्ये सौ. ताईसाहेब प्रथम राजस्थानच्या राज्यपाल म्हणून गेल्या. तेथून २५ जुलै २००७ रोजी थेट राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वतंत्र भारताच्या १२ व्या राष्ट्रपती व पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथविधी झाला.

सौ. ताईसाहेब राष्ट्रपती झाल्या याचा समस्त अमरावतीकरांना अवर्णनीय आनंद झाला होता. प्रत्येकाचे हृदय अभिमानाने भरून आले होते. आपल्या रोजच्या परिचित व्यक्तीच्या इतक्या अनपेक्षित थोरवीच्या अनुभवाने सर्वजण दबकून गेले होते. पण त्यासोबतच शेखावत कुटुंबीय कुठेही अतिरिक्त मोठेपणा न दाखवता आधीच्या परिचयाच्या सर्व स्तरावरील लोकांशी पूर्वीप्रमाणेच संपर्क ठेऊन होते. उलट त्यांची आतिथ्यशीलता अधिक विस्तारली होती. प्रसंगी राष्ट्रपती पदामुळे येणाऱ्या अनेक औपचारिकतेची बंधने बाजूला सारून आपल्या यशात व आनंदात त्यांनी सर्वांनाच आपुलकीने सहभागी करून घेतले होते. समाजजीवनात एरवी असे सहसा आढळत नाही. एकीकडे या कुटुंबाविषयी वाटणारी जवळीक आणि दुसरीकडे त्यांच्या पदाच्या, हुद्द्याच्या मोठेपणाची जाणीव या संमिश्र भावनांमधून प्रत्येकात एक प्रकारची सजगता आली होती.शेखावत कुटुंबाचे जवळचे मित्र प्राचार्य डॉ. सुरेश पाध्ये यांनी लिहिलेल्या लेखांमधून सौ. ताईसाहेब आणि डॉ. शेखावत यांच्या विवाहाच्या व प्रेरणादायी सहजीवन प्रवासाच्या सुरुवातीच्या काळाचा परिचय झालाच होता. आमच्यापैकी अनेक जण त्याकाळात राष्ट्रपती पदाचे सर्वोच्च स्थान, त्यांचे विविध प्रकारचे घटनात्मक अधिकार व कर्तव्ये, त्यांना प्राप्त होणाऱ्या सोई-सुविधा अभ्यासू लागले होते. राष्ट्रीय वृत्तपत्रात छापून येणारे राष्ट्रपती भवनासंबंधीचे अगदी बारीकसारीक वृत्तही आम्ही लक्षपूर्वक वाचू लागलो होतो. त्याकाळात आलेले घटनात्मक पेचप्रसंग सौ. ताईसाहेब ज्या शांतपणे आणि कुशलतेने हाताळत होत्या आणि अनेक प्रकरणात त्यांनी दर्शविलेला मानवीय दृष्टीकोन व सहृदयता यातून त्यांच्याविषयीचा वाटणारा आदर, सन्मान आणि सार्थ अभिमान वाढतच गेला. दै. हिंदुस्थानचे प्रबंध संपादक श्री. विलास मराठे, श्री. नरेश पाटील, श्री. शिवराय कुलकर्णी आणि मित्रमंडळींच्या पुढाकारातून महामहीम सौ. प्रतिभाताईंच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा होणाऱ्या ‘अंबा फेस्टिव्हल’ ची सुरुवात अमरावतीत करण्यात आली.

कृतार्थ सहजीवन
अमरावतीकरांना अभिमान वाटेल असे हे उच्चविद्याविभूषित, संस्कारी आणि दर्जेदार अभिरुचीसंपन्न कुटुंब आहे. शालीन, घरंदाज आणि पाहताक्षणीच आदर निर्माण होईल असे सोज्वळ व्यक्तिमत्व सौ. ताईसाहेबांना उपजतच लाभले आहे. विवाहाच्या वेळीही अगदी तरुण वयात ताईसाहेब विद्यमान आमदार होत्या. अनेक महत्वाच्या समित्यांवर, प्राधिकारीणीवर कार्यरत होत्या. प्रखर, कणखर व्यक्तिमत्वाच्या आणि उच्चविद्याविभूषित आपल्या तरुण पतीच्या अपेक्षा लक्षात घेऊन – पतीनिष्ठा दर्शवित आपल्या पत्नीधर्मास प्राधान्य देऊन त्यांनी संसाराला वेळ देण्यासाठी त्याकाळात आपल्या सर्व पदांचे राजीनामे सादर केले होते.पण थोरांच्या नशिबी सर्वसामान्य संसार नसतात. तत्कालीन आदरणीय, वडिलधाऱ्या नेतेमंडळींनी या दाम्पत्याचे उज्ज्वल भविष्य वेळीच ओळखून सर्व राजीनामे परत घ्यायला लावले. तेव्हा मा. डॉ. देविसिन्ह्जी शेखावत यांनीही ऐन तरुणपणात आपल्या वैयक्तिक, आपल्यापुरत्या कुटुंबाच्या अपेक्षा व व्याख्या बाजूला ठेवून समाजजीवनात प्रवेश केला आणि पुढे नेहमीसाठी सौ. ताईसाहेबांना प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. स्वतः शिक्षणक्षेत्रात नामांकित झाले. अमरावती महानगरपालिकेचे प्रथम महापौर बनून शहर विकासाकरिता अनेक नवीन गोष्टी घडवून आणल्या. कामकाजात नवीन प्रयोग यशस्वी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात लक्ष घातले. इतरही अनेक विधायक कार्ये केलीत. ते आमदारही राहिले. पण मुख्य भर त्यांनी आपल्या धर्मपत्नीच्या जीवनकार्यासाठी एक मजबूत पाया उभारण्यावर दिला. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या यशाचे श्रेय त्याच्या पत्नीलाच नेहमी जाते. ती बाब येथे दुसऱ्या बाजूने खरी ठरली. संपूर्णपणे समाजजीवनाला वाहिलेले तरीही एकमेकांप्रती समर्पित असे सहजीवन जगणारे ऋषितुल्य, तपस्वी असे हे जोडपे. परस्पर स्नेहादराच्या भावनांचे वंगण घालीत, अनेक उतार-चढाव पार करीत संसाररथाच्या या दोन्ही चाकांनी यशस्वी वाटचाल केली.

अभिष्टचिंतन
महामहीम सौ. प्रतिभाताई पाटील शेखावत राष्ट्रपती होण्याचे अमरावती जिल्ह्यास निश्चितपणे काही लाभ झाले. यादी मोठी आहे. पण अमरावतीचे मॉडेल रेल्वे स्टेशन, अचलपूरच्या फिनले मिलचे पुनरुज्जीवन, बडनेरा येथे रेल्वे वाघिणी कारखाना काढण्याची संकल्पना इ. ठळक आहेत. अजूनही खूप गोष्टी पेरल्या गेल्या आहेत. त्याची प्रचीती भविष्यकाळात येईलच. त्याकाळात अमरावती शहर वीजभार नियमनातून जवळपास मुक्त होते. येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कर्मतपस्वी मा. प्रभाकरराव वैद्य यांना प्रदान करण्यात आलेली ‘पद्मश्री’ उपाधी अनेकांना सुखावून गेली. सध्या शहरात महत्वाच्या जागी दर्शनी भागात ठेवलेले युद्धातले रणगाडे, लढाऊ विमान इ. ऐतिहासिक साक्ष देतात की या शहरातील एक महान व्यक्ती कधीकाळी राष्ट्रपती या नात्याने देशाची सर्वोच्च सेनाधिकारी होती.

सौ. ताईसाहेबांना दीर्घायुरारोग्य लाभो हीच मनोमन सदिच्छा!

 

 (मोबाईल क्र. ९४२३१२५२०१)
माजी अध्यक्ष, अमरावती संगीत कलोपासक सभा, अमरावती
(महाराष्ट्र)

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments