Home Uncategorized "दशसूत्री चे अक्षर अक्षर वेद नवा बोले..."

“दशसूत्री चे अक्षर अक्षर वेद नवा बोले…”

 

 

 

 

निलेश श्रीकृष्ण कवडे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतातील या ओळीं ऐकल्यावर मी नकळत भूतकाळात गेलो. मोठ्या राजकीय महानाट्यानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदी निवड झाल्यावर विधानसभेत मागील वर्षी आपल्या पहिल्याच भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्माच्या मुद्यावर संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा संदर्भ दिला होता “गाडगेबाबा म्हणायचे, धर्म सांगायचा नसतो, जगायचा असतो. गाडगेबाबा म्हणायचे, धर्म ग्रंथांत नसतो, जीवनात असतो. गाडगे बाबांच्या दशसूत्रीत महाराष्ट्राच्या खऱ्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मला दिसली. ही दशसूत्री राज्य कसे चालवायचे यासाठी दीपस्तंभ आहे. गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयात बोर्डवर लावणार” असं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या विधानसभेतील पहिल्या भाषणात म्हणाले होते. त्यांनी आपली घोषणा पूर्ण देखील केली.

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा अत्यंत जवळचा संबंध राहिला आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्यांने आपापल्या परीने गाडगेबाबा यांचा विचार पुढे नेला. स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली होती. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे करून ग्रामविकासाचा पाया मजबूत केला होता. संत गाडगेबाबा हयात असतांना त्यांचे मुंबई राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असलेले सौख्य सर्वश्रुत होते. एकदा संत गाडगेबाबा आपल्या अनुयायांना सोबत पंढरपूर येथे धर्मशाळेचे बांधकाम काम करण्यात व्यस्त होते. बाबा कामात व्यस्त असताना सुद्धा गाडगे बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी जमली असताना अचानक तिथे तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे आगमन झाले. गाडगेबाबांचा वेश पाहून बाळासाहेब खेर यांना वाटले की कोणीतरी साधूच्या वेशात लोकांना फसवत आहे. तेव्हा बाळासाहेब खेर यांनी गाडगेबाबा यांना खूप खडे बोल सुनावले. फाटक्या चिंध्या घालून धर्माच्या नावावर हे काय थोतांड माजवले आहे अशाने कुठे देव भेटत असतो काय? गाडगेबाबा यांनी त्यावर काहीही उत्तर न देता पुढे धर्मशाळेचे बांधकाम झाल्यानंतर त्यांनी बाळासाहेब खेर यांची भेट घेऊन सदर धर्मशाळा लोकांच्या सेवेत देण्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत विचारणा केली असता बाळासाहेब खेर यांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांना अत्यंत खराब वाटले त्यांनी गाडगेबाबांना क्षमा मागितली. या घटनेनंतर बाळासाहेब खेर यांच्या मनात गाडगेबाबांबद्दल चा आदर खूप वाढला.

बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर गाडगे बाबा आणि बाळासाहेब खेर यांची देहू येथे भेट झाली असता, गाडगे बाबा बाळासाहेब खेर यांना म्हणाले, ” इतका खर्च तुम्ही करता या इंद्रायणी नदीवर पूल बांधण्याचा इतकासा खर्च नाही करणार?” तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ” अवश्य करू बाबा आणखी काही काम असेल तर सांगा” तेव्हा संत गाडगेबाबा यांनी संत तुकाराम यांचे अभंग गाथा सरकारी खर्चातून आपण याबाबत आणि ती स्वस्त किमतीला गरिबांना उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी या दोन्ही गोष्टी ची पूर्तता केली. इंद्रायणी नदी वर सुंदर फुल बांधला आणि संत तुकाराम महाराजांची दहा रुपये किमतीची गाथाही छापली. भाऊराव पाटलांनी बायकोच्या अंगावरचं सोनंनाणं विकून उभ्या केलेल्या या संस्थेवर एकदा आर्थिक अडचण आली. सरकारने आर्थिक बंधनं लादली. सरकारकडून मिळणारं अनुदान बंद झालं. भाऊरावांनी बाबांना आपली अडचण सांगितली. बाबांचं टाळकंच फिरलं. बाबा कोणत्याच सरकारचे नव्हते. कोणत्याच पक्षाचे नव्हते. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याशी बाबांचे संबंध चांगले होते. पण असं कळल्यावर बाबांनी बाळासाहेबांनाही चार गोष्टी ऐकवायला मागेपुढे पाहिलं नाही. बाबा मुंबईला आले. त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की, हे सरकार गरीबांचं की श्रीमंतांचं? गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून तुम्ही काय मिळवताय? बाळासाहेबांनी या साऱ्या प्रकाराचा अंदाज घेतला. गाडगेबाबांच्या शिष्टाईनंतर रयत शिक्षण संस्थेला मिळणारी ग्रँट तर परत सुरू झाली. पण जेवढ्या महिन्याची मिळाली नव्हती, तिचा अनुशेषही भरून मिळाला.

एकदा नाशिकला काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने बाळासाहेब खेर झाले आता त्यांनी बाबांची भेट घेतल्यावर नाशिक आणि पंचवटी येथील उघड्या गटारांमुळे घाणीमुळे होत असलेल्या त्रासाबाबत बाळासाहेब खेर यांना अवगत केले असता त्यांनी नाशिक नगरपालिकेला विशेष अनुदान देऊन भूमिका गटारे बांधून घेतली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बाळासाहेब खेर यांना एकदा तुरुंगवास भोगावा लागला होता. बाळासाहेब खेर यांच्या अनेक सोबत्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणे पसंत केले मात्र बाळासाहेब खेर यांनी थेट गाडगेबाबांची भेट घेणे पसंत केले. यावर त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “बाबा लोक पंढरपुरास जातात पांडुरंगाचे दर्शन घेतात माझा पांडुरंग चिंध्या पांघरून गोरगरिबांच्या साठी आश्रमात हिंडतो आहे म्हणून जेलमधून सुटताच मी त्याच्या दर्शनास आलो आहे” मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना गाडगेबाबा यांच्यात समाजाचे पालकत्व घेऊन राब राब राबणाऱ्या आगळ्या वेगळ्या पांडुरंगाचे दर्शन झाले होते. आणि आजच्या घडीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी आरूढ झाल्याबरोबर उद्धव ठाकरे यांना गाडगे बाबांच्या दशसूत्रीत महाराष्ट्राच्या खऱ्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मला दिसली असल्याचे ते विधानसभेत जाहीररीत्या सांगतात तेव्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतातील “दशसूत्री चे अक्षर अक्षर वेद नवा बोले…” ही अनुभुती माझ्यासारख्या सामान्य माणसाला येते. वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

अकोला
मो. ९८२२३६७७०६

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments