Home Uncategorized स्पेस

स्पेस

 

माधव पांडे

महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढल्यास भाजपसाठी मोठी’स्पेस’ मोकळी होईल.भाजप ती ‘स्पेस’व्यापल्याशिवाय राहणार नाही. असं वक्तव्य नाशिकमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपप्रवेश मुहूर्तावर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना केले. भाजपच्या नव्या वाटचालीचा मार्ग सांगतांना’ स्पेस’ची कल्पना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मांडली.महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसात कोसळेल या गर्जनेला तब्बल वर्षभराचा काळ लोटल्यानंतर आता भाजप नेतृत्वाला नवी ‘ स्पेस’ दिसायला लागली आहे.’मी पुन्हा येणार’ ही ‘घनघोर’घोषणा,केंद्रातील सत्तेची जबरदस्त ताकद,त्यानंतर राजभवनातला ‘सकाळचा’ चमत्कार,नंतर..नंतर ‘ शक्य आहे सत्तापरिवर्तन’ आणि आता ‘असं होऊ शकते’ इथंवर राज्याचे भाजप नेतृत्व आले आहे.सामान्यांच्या भाषेत ‘ विमान जमिनीवर उतरत आहे’ सत्ता अजब चीज आहे.भल्याभल्यांना ‘जमीन’दाखविते.भाजप नेत्यांना ‘जमीन’ शोधावी लागत आहे.बदलत्या वातावरणात ‘जर असे झाले तर असे होईल’ अशा वाक्यरचने भोवती भाजप नेत्यांची रणनिती घिरट्या घालतआहे.पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे,असं लोक बोलायला लागले आहेत.भाजपचे सगळे ‘चाणक्य’ सरकार पाडण्याच्या नव्या-नव्या तारखा जाहिर करीत असतात.मध्यप्रदेशात कमलनाथांना सत्तेतून ‘अनाथ’ केल्यावर राजस्थान जिंकूच,असा आत्मविश्वास भरभरून वाहू लागला होता.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपची व्यूहरचना लक्षात घेऊन वसुंधरा राजें सिधिंयांना आपल्याकडे वळते करून घेतले.त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राजस्थानमध्ये सत्तांतर करणे अवघड गेले.मध्यंतरी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे सरकार पाडतील,अशी शक्यता व्यक्त केली.त्या वक्तव्यानंतर मुंबईत मोठी हलचल झाली.केंद्रिय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या ‘चढाईवर’ आहेत.तिथली लढाई ‘हातघाईवर’ आली आहे.बिहारच्या निवडणूकीत सर्वाधिक जागा मिळवून भाजपाला सत्ता मिळाली.आता भाजप ‘ मिशन बंगाल’ राबवित आहे.पुढीलवर्षी होणा-या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीनंतर पुन्हा महाराष्ट्रात सत्ता बदलाचा प्रयोग केला जाईल,अशी शक्यता राजकीय जाणकारांना वाटते.दरम्यान मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडी सोबत निवडणुक लढवेल,अशी एकतर्फी घोषणा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.मधा-मधात यापुढील सर्वच निवडणुका महाविकास आघाडीतील तीन पक्ष सोबत लढवतील,अशी वक्तव्ये अनेक नेते करीत असतात.राज्यात मागिल महिण्यात झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा झालेला विजय हा भाजपच्या पराभवापेक्षा महाविकास आघाडीला जनतेने दिलेला कौल आहे,असा प्रचार सुरू झाला.अशा सगळ्या वातावरणात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांकडून खरोखरचं यापुढील निवडणूका एकत्र लढविल्या जातील,असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडीच्या वतीने एकच उमेदवार देऊन पुढील सर्व निवडणूकीत भाजपला चारीमुंड्याचित करणे शक्य आहे काय? यावर राजकारणात खल सुरू आहे.परंतु असं शक्य आहे? राजकारणात असं होत असतं काय? याची चर्चा आज आपण करूया!

मित्रहो, देशाचं राजकारण तापलं आहे.दिल्लीत शेतकरी प्रचंड थंडीत गारठला आहे.आंदोलन पेटत आहे.पंजाबमधील अनेक अडते व्यापा-यांच्या घरी,दुकानांवर आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत.कोणतीही गोष्ट सहज नसते.शेतक-यांच्या आंदोलनाला हवा देणारे ‘अडते’आहेत.केंद्र सरकारने अडत्यांना ‘अडकित्त्यात’अडकविलं.शेतक-यांच्या मागण्या बरोबर की चूक,शेतकरी आंदोलन समर्थनिय की सरकारची भूमिका बरोबर.लोकांना भूमिका घ्यायला फार कष्ट होत आहे.लोकांचा गोंधळ उडत आहे.पंजाब,हरियाणा राज्यातील शेतक-यांना नविन तीन कृषी कायद्याचा जाच वाटत असतांना देशातील इतर राज्यातील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यापलिकडे शांत आहेत.या सगळ्यात कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का बसत असतांना मोदी शेतकरी हिताविरोधात भुमिका घ्यायला धजावतील? विचार करा.
मोदींच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरी बिहार नंतर आता बंगालही मोदींच्या ताब्यात असेल,असं अनेकांना वाटते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आसनच नव्हे तर राजकारण धोक्यात आले आहे.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की,केंद्र सरकारचा पश्चिम बंगाल सरकारमध्ये थेट हस्तक्षेप होत असून केंद्र सरकारकडून ममता बॅनर्जीं सरकारची कधीही बरखास्ती होवू शकते.ही शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ममता दिदींच्या मदतीला धावले आहेत.प्रसंगी कलकत्त्यात जावून शरद पवार सरकार वाचविण्याचा फाॅर्म्युला दिदींना सूचवू शकतात.महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार स्थापन करून आता बंगालमध्ये पवार साहेब मोदी विरोधात आघाडी उभारतील,असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

किती वेगवेगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोरून जात आहेत.पंजाब,हरियाणा,मध्यप्रदेश,राजस्थान,बिहार आणि आता पश्चिम बंगाल या राज्यातील राजकारणाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.सगळेच नेते मोदींच्या विरोधात रणशिंग फुंकण्याच्या गप्पा मारतात प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळं आहे.देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडे एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीवर विश्वास ठेवला तर ‘गोलमाल है भाई गोलमाल है’याची प्रचिती महाराष्ट्राला येत आहे.फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं की,गेल्या वर्षी राष्ट्रवादी सोबत भाजपचे सरकार स्थापन करण्याचे ठरले होते.फडणवीसांच्या या दाव्यावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मात्र ज्याअर्थी पहाटे शपथविधीचा सोहळा पार पडला,त्याअर्थी फडणवीसांवर विश्वास ठेवायला हरकत नसावी.

आता महाराष्ट्रात काय होऊ शकते,याचे तर्क लावल्या जात आहेत.उद्धव ठाकरे सरकार पडेल.पाडल्या जाईल,कोणता पक्ष फुटेल..वगैरे..वगैरे…एक गोष्ट स्पष्ट आहे.सध्या काही बदल होत नाही.शिवसेनेसोबत भाजप आणि राष्ट्रवादीचा हिशोब चुकता झाल्याशिवाय या सरकारला पाडण्याची चूक कोणीही करणार नाही.मुंबई महानगर पालिकेची निवडणुक पुढील वर्षी होऊ घातली आहे.मुंबईतील मेट्रोचा तमाशा महाराष्ट्र बघत आहे. उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत.’होय,मी मुंबईसाठी अहंकारी आहे!’असंही ते चिडून बोलले.त्यांच्या स्वरातून हतबलता बाहेर आली.मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे.ही निवडणूक भाजपसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.भाजप मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे.यापेक्षा फार काही वेगळं भाजपच्या बाजूने घडणार नाही.मात्र महाविकास आघाडीकडून एकास -एक उमेदवार द्यायचा ठरविला तर शिवसेनेची मोठी गोची होणे नक्की आहे. मुंबई काॅग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहिरपणे असे म्हटले की,मुंबई महानगर पालिकेच्या 277 जागा काँग्रेसने स्वतंत्रपणे लढवाव्यात.अशा घोषणा दबाव तयार करण्यासाठी असल्या तरी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्यता जास्त आहे.महाविकास आघाडीच्या कारभाराने त्रस्त होणारी जनता सरकारविरोधी भूमिका घ्यायला तयार झाली तर सरकारविरोधी मतं भाजपच्या पारड्यात जातील.हा एक पैलू.तर दुस-या बाजूला महाविकास आघाडीतील घटकपक्षातील इच्छुकांना आवरणं येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला शक्य होणार नाही.तीन पक्षाचा एकच उमेदवार निश्चित झाले तर काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेनेतील इच्छुक महत्वाकांक्षी व निवडुन येण्याची शक्यता असलेले उमेदवार भाजपच्या गळाला लागतील,या तर्कातून भाजपला चांगली ‘स्पेस’ मिळेल.मात्र या तर्काला नाकारणारेही अनेक जाणकार आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्यानं कुठलीही स्पेस निर्माण होण्याची शक्यताच नाही.असा विचार करणारा प्रवाह जोरात आहे. आघाडी सरकार तब्बल पंधरा वर्षे सत्तेत होते.मग तेव्हा स्पेस कुठे होती? असा प्रश्न विचारला जात आहे.1999ला चार वर्षे राज्य चालविणारे युती सरकार गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली,तेव्हा सत्ता स्थापन करतांना एकूण 8पक्ष सहभागी झाले होते.तेव्हाही प्रचंड रूसवे-फुगवे होत असत,पण ते सरकार त्यांनी चालवून दाखवलं.याही वेळी असंच होईल,असं माणनारा मोठा गट राजकारणात आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी आघाडी सरकार चांगलं चालविलं,सरकार पुर्णवेळ टिकविलं.त्यानंतरही दोनदा आघाडी सरकार आलं.त्यात भाजपसाठी कुठेही स्पेस नव्हती.असा विचार करणारे लोक ‘मोदींच्या जादूला’नाकारत आहेत.या विषयाला दोन्ही मजबूत बाजू असल्या तरी ‘स्पेस’ कायम आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments