Home ताज्या घडामोडी 'ईडी'शी सामना

‘ईडी’शी सामना

माधव पांडे

शिवसेनेचे फायरब्रँन्ड नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी) ने नोटीस पाठविल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला धक्का बसला आहे.खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या नोटीसवर सविस्तर प्रतिक्रीया दिली.काही उत्साही शिवसैनिकांनी ईडीच्या मुंबई कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालय’असे फलक लावले.ईडीची कारवाई भाजप नेत्यांच्या इशा-यावर होते,असे राऊतांचे म्हणणेआहे.श्रीमती वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप खासदार राऊतांनी केला.आज या विषयावर देशभर चर्चा सुरू आहे.ईडीची नोटीस ही इतकी भयंकर कारवाई आहे की,राज्य सरकारचे ‘संजय’ हादरून गेलेत.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला की,’मै नंगा हू,मुझसे पंगा मत लेना!’खा.राऊतांचा हा नविन परिचय महाराष्ट्राला झाला.खा.राऊत स्वतःला शिवसैनिक समजत असल्याने त्यांनी कोणाला तरी ‘बघून’ घेण्याचा जाहिर इशारा दिला आहे.ती व्यक्ती कोण? याबाबत मात्र राऊतांनी मौन पाळले आहे.मै ऐसा हूँ..मै वैसा हूँ…असं जाहिरपणे सांगण्याची ज्या राजकीय नेत्यावर ‘वेळ’ येते,तेव्हा नक्की समजा त्यांची ‘वेळ’आली आहे.सत्तेच्या वर्तुळातील ‘चाणक्य’ समजल्या जाणा-या खासदार राऊतांचा संताप प्रगट झाला.भाजप नेत्यांविरोधात त्यांनी अस्पष्ट आरोप केले आहेत.खरं म्हणजे ‘रोखठोक’लिहणारे राऊत आता संदिग्ध का बोलत आहेत? ते म्हणाले,भाजपच्या भ्रष्ट 120 नेत्यांच्या नावांची यादी आपल्याकडे असून आपण ती ईडीला देणार आहोत.खा.राऊतांना रोखलं कोणी? असा प्रश्न जनता विचारत आहे.अवघ्या महिण्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश घेणारे एकनाथराव खडसे असं जाहिरपणे म्हणाले होते की,’मला जर ‘ईडीची ‘नोटीस पाठवाल तर मी ‘सीडी’बाहेर काढेल’.एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस मिळाली आहे,नेत्यांच्या नजरेतील महाराष्ट्रातील ‘दुधखुळी,’जनता एकनाथरावांच्या ‘सीडी’ची वाट बघत आहे.खा.संजय राऊत यांनी सुद्धा त्यांच्याकडे असलेली भ्रष्ट नेत्यांचे कारनामे ‘ईडी’कडे द्यावीत.पण असं होईल काय? सगळे नेते ‘जर-तर’ ची भाषा बोलत आहेत.केंद्र सरकारच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेली ‘ईडी’ ही स्वायत्तसंस्था आहे.देशातील कोट्यावधींच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करणारी ही संस्था नावापुरती स्वायत्त असून ईडीवर पंतप्रधान,गृहमंत्र्यांचं संपूर्ण नियंत्रण असते.यात लपविण्यासारखं आणि आरोप करण्यासारखं काय आहे?ईडीची स्थापनाच देशातील कुबेर उद्योगपती आणि मस्तवाल राजकारण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी झाली आहे.अशा संस्थाच देशाची लोकशाही टिकवून ठेवित आहेत.त्यामुळे ईडीचे करावे तितके कौतुक कमी आहे.
मित्रहो,आज जरा वेगळा विचार करू या.खा.संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची आलेली नोटीस देशासमोरील सर्वात महत्वाचा प्रश्न नाही.तरीही देशातील सर्व न्यूज चॅनल्सवर ही बातमी ‘सुर्खियो’मे आहे.मूळात खा.राऊत यांच्या सहचारिणींना आलेली नोटीस ही शंभर टक्के राजकीय व्देषातून केलेली कृती आहे.यात नाकारण्यासारखे काय आहे? राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापण्यात खा.राऊत यांची महत्वाची उघड भूमिका होती.सत्ता स्थापनेनंतरही सामनातून जाहिरपणे मोदींवर आरोपांची सरबत्ती चालूच होती.खा.राऊत असं सगळं करीत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसतील,अशी अपेक्षा आहे काय? नक्कीच नाही.खा.राऊत यांना ईडी नोटीसची कल्पना होती.तरीही त्यांनी’ तोफ’ चालूच ठेवली.त्यांच्या हिंमतीची दाद दिली पाहिजे.मात्र आता प्रत्यक्षात ईडी ची नोटीस आल्यावर संजय राऊत अस्वस्थ का झालेत?संतापले का?ईडीची नोटीस म्हणजे ‘ब्रम्हवाक्य’ नाही.असं खुद्द राऊतच म्हणालेत.तरीही इशारे,बघून घेण्याची धमकी..इतकं सगळं कशासाठी?जनता बघत आहे.’कोण नंगा आणि कोणाशी पंगा’!.
महाराष्ट्रात ज्या नेत्यांना ‘शक्तीस्थळे’ म्हणता येईल,त्यामध्ये खा.संजय राऊतांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.अलिकडेच अभिनेत्री कंगणा राणावतचा’आशियाना’ज्या ताकदीने तोडला,त्याकडे बघता राऊतांशी कोणी ‘पंगा’ घेऊ शकत नाही.तरीही खा.संजय राऊत यांना धमकीची भाषा का वापरावी लागत आहे? विचार करा.
आपण आहोत त्यापेक्षा अधिक शक्तीशाली असण्याचा आव आणणं अनेकांना अडचणीत आणतं.एकनाथरावांना तर चार वर्षे ‘ शक्तीपाताचा’ अनुभव होता.तरीही त्यांना ‘सीडी’ची धमकी देण्याचा मोह आवरला नाही.जनता दुधखुळी असू शकते राजकारणी नाही.खासदार राऊत आणि एकनाथराव खडसेंनी ईडी नोटीसमागे केंद्रातील,राज्यातील भाजप नेते असल्याचे म्हटले जात आहे.कदाचित खरचंही असेल.एकनाथराव टोकणं आहे,असं राऊतांना कोणीतरी म्हणालं होतं.काही आमदारांची फाईल तयार आहे,असं बोलल्या जातं,ती चर्चाही खरी असण्याची शक्यता आहे. एकवेळ सगळं खरं असलं तरीही शरदराव पवार सोडून कोणत्याच नेत्याबद्दल जनतेला फार आपुलकी नाही,या सत्याचा राजकीय नेते स्विकार करीत नाही,ही खरी गंमत आहे.
जनतेसाठी ‘ईडी’सारखी संस्था महत्वपूर्ण आहे.मी जरा वेगळा विचार करतो.तुम्हाला हा विचार आवडला तर स्विकारा.लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय नेते आणि उद्योगपतींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.उद्योगपती कायम सत्तेच्या बाजूने असतात.मात्र याच उद्योगपतींच्या भरवश्यावर नेते करोडोची माया जमवितात.खा.राऊत म्हणाले,माझे कुटुंबिय मध्यमवर्गिय आहे.संजय राऊत यांनी 24मे 2016रोजी निवडणूक आयोगाकडे संपत्ती विवरण सादर केले आहे.विवरणानुसार संजय राऊत यांच्याकडे 6कोटी 56लाख 67हजार 999 एवढी संपत्ती आहे तर वर्षा राऊत यांच्याकडे 7कोटी 62लाख 12हजार 621एवढी माया आहे.दोघांची एकत्रितपणे 14कोटी 18लाख 80हजार 620रूपये ही 2016 ची घोषित संपत्ती आहे.आता 2021आलं आहे.विचार करा.ही आकडेवारी इंटरनेटच्या एका संकेतस्थळावर आहे.वाचकांनी ही माहिती खरी-खोटी तपासून घ्यावी.मात्र जर ही माहिती खरी असेल तर 14कोटी संपत्ती असलेला व्यक्ती मध्यमवर्गिय असू शकतो,यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.प्रश्न खा.राऊत यांच्या सहचारिणीला आलेल्या ईडी नोटीसचा नाही.प्रश्न आहे इथल्या जनतेचा.ही नोटीस कोणामुळे आली यापेक्षा कशामुळे आली यावर आपण विचार करणार आहोत की नाही?भाजपच्या नेत्यांचे आरोप राजकीय आहेत,असं समजू..किंवा राजकीय हेतूने खा.राऊतांची ही बदनामी सुरू आहे,असा विश्वास ठेवू.तरीही काही प्रश्नांची उत्तरे जनतेने शोधली पाहिजेत.पंजाब – महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह(पीएमसी)बँकेत करोडोंचा कथित घोटाळा झाला आहे.या घोटाळा प्रकरणी मुंबई भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंग यांचे पुत्र रजनीत सिंग याला आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली आहे.पीएमसी बँक घोटाळ्यातील एक मुख्य आरोपी असलेल्या एचडीआईएलने पीएमसी बँकेचे 5हजार 400कोटी चोरले असल्याचा आरोप आहे.एचडीआईएल चे वधावन बंधुंकडे ही रक्कम आल्याचे सांगितले जाते.एचडीआयएल आणि प्रवीण राऊत परिवाराचे कोट्यावधी रूपयांचे आर्थिक संबंध आहेत.व्यवहार आहेत.प्रवीण राऊत यांच्या बँक खात्यात एचडीआयएलशी कोट्यावधी रूपयांचे व्यवहार झालेत.प्रवीण राऊत यांनी या व्यवहारातील काही रक्कम त्याची पत्नी माधुरी राऊत हिच्या खात्यात वळती केली.माधुरी राऊत हिच्या बँक खात्यातील 54लाख रूपये ही रक्कम खा.संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात वळती झाली,असा तपास संस्थेला संशय आहे.या आर्थिक व्यवहाराला कर्ज दाखविल्या गेले.ईडी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या 54 लाखाची चौकशी करीत आहे.प्रकरण जुने आहे.54 लाखाची ही ‘स्टोरी’अजून ‘स्टोरीच’ आहे.सत्य कोणालाच माहित नाही.54लाख रूपये ही रक्कम खा.राऊतांनी शपथपत्रातून जाहिर केली आहे.यात काहीही लपवालपवी झालेली नाही.तरीही ईडीच्या नोटीसनंतर खा.राऊत प्रचंड संतापले आहेत,यामागे फक्त एकच मुद्दा दिसत आहे की,खा.संजय राऊत यांचे प्रवीण राऊत यांच्यासोबत कोणते आणि कसे आर्थिक संबंध आहेत?याची चौकशी ईडीला करायची आहे.
ईडी ला संशय आहे,किंवा सर्वत्र सांगितले जात तसे व्यवहार खा.राऊत आणि प्रवीण राऊत किंवा अन्य व्यक्तीसोबत झाले असतील? लोकांना अजून नक्की काही माहित नाही.खरं-खोटं व्हायचं आहे.सध्या तरी हवेतले बाण आहेत.कदाचित हा फास आहे.तरीही काही लोकांना खात्री वाटत आहे,कोणत्या आधारे? देशातील राजकीय नेत्यांसाठी 54 लाख ही अतिशय शुल्लक गोष्ट आहे.काही नेत्यांचा 54 लाख दररोजचा खर्च असू शकतो.आपले नेते ब-यापैकी ‘वधावन’बंधूंचे’बंधू’असतात.त्यामुळे चौकशी तर झालीच पाहिजे.कंगणा राणावतचे अतिक्रमण चुकीच्या पद्धतीने,बदला घ्यायच्या हेतूने पाडण्यात आले.कायद्याला अव्हेरून तोडफोड झाली.माननीय उच्च न्यायालयाने कंगणाला न्याय दिला.जर खा.राऊतांवर ईडी कडून अन्याय झाला तर न्यायालयात नक्की न्याय होईल.खा.राऊत,एकनाथराव खडसे किंवा कोणत्याही राजकीय नेत्यांना जर ईडी नोटीस पाठवून त्यांची चौकशी करीत असेल,तर ईडीचे स्वागत केले पाहिजे.पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत राजकीय नेत्यांचा पैसा नव्हता.देशातील सर्वसामान्य गरीब जनतेचा पैसा बँकेत जमा होता. बँकचं बुडाली.अशा बँका आपसूकपणे बुडत नाही.सर्वसामान्यांची आयुष्यभराची कमाई एका रात्रीत उडवून नेणा-या एचडीआयएलच्या वधावन बंधूंना कोणाचे तरी छत्र लाभल्याशिवाय असे ‘स्कँम’होत नाहीत.
सहकारी किंवा सरकारी बँकांमध्ये अब्जो रूपयांचे घोटाळे होण्याची आपल्या देशाची परंपरा राहिली आहे.लाॅकडाऊनमध्ये शेअर बाजार बंद असतांना हंसल मेहता यांची ‘स्कॅम 1992:द हर्षद मेहता स्टोरी’ही वेबसीरीज सोनी लाइव्हवर रिलीज झाली.प्रेक्षकांना ही वेब सीरीज इतकी आवडली की,आयएमडीबी ने जाहिर केलेल्या भारतातील पहिल्या 10वेब सीरीजमध्ये भारतीयांची सर्वात आवडती वेब सीरीज ‘स्कॅम 1992:द हर्षद मेहता स्टोरी’ही आहे.1992साली झालेल्या एका महाघोटाळ्यामुळे शेअर बाजारात भूकंप आला होता.त्याचा मुख्य सूत्रधार होता शेअरदलाल हर्षद मेहता.टाईम्स आॅफ इंडियाची पत्रकार सुचेता दलाल हिने हर्षद मेहताच्या महाघोटाळ्याला प्रकाशात आणले.आज पुन्हा एका बँक घोटाळ्यातील एक सूत्र कुठेतरी संपादकापर्यंत आणल्या जात आहे किंवा,आले आहे.सत्य अजून बाहेर यायचे आहे.जोवर सत्य बाहेर येत नाही तोवर खा.राऊतांना ईडीशी सामना करायचा आहे,हे नक्क.

9823023003

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments