Home Health & Fitness आत्मनिर्भरतेची लस

आत्मनिर्भरतेची लस

माधव पांडे

देशाच्या औषध महानियंत्रक यंत्रणेने (डीजीसीआय)सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ची ‘कोव्हॅक्सिन’या करोनावरील दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मंजूरी दिली. डीजीसीआयच्या घोषणेनंतर करोनाने त्रस्त झालेल्या भयभीत भारतीयांना दिलासा मिळण्याची शक्यताआहे.करोनामुळे जगभर लाखो बळी जात असतांना मृत्यूच्या जबड्यातून वाचविणारे ब्रम्हास्त्र गवसले,अशी जनमानसाची संमिश्र भावना आहे. दोन लसींना मान्यता देण्याच्या डीजीसीआयच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ‘मेड इन इंडिया’लसीबद्दल शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या योगदानाबद्दल देशाला अभिमान असल्याचे म्हटले.देशातील करोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरू होईल,अशी घोषणा मोंदींनी करताच ‘ स्वदेशी लस ब्रम्हास्त्राला’ निरस्त्र करण्यासाठी विरोधीपक्षांकडून विविध अस्त्रे सोडायला सुरूवात झाली. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री,समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ‘भाजपची लस’आपण घेणार नाही,अशी घोषणा केली.काँग्रेस नेते शशी थरूर,जयराम रमेश,पी.चिदंबरम आणि खुद्द राहूल गांधी यांनीसुद्धा लसींच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली. केंद्रात विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसी नेत्यांची वक्तव्ये एकाअर्थी सरकारच्या चुकीच्या धोरणावर,कृतीवर बोट ठेवण्याचे कर्तव्य पार पाडत आहे.त्याअर्थी काँग्रेस नेत्यांनी सरकारवर केलेल्या टीकेला स्विकारणे सरकारला सोयीचे नसले तरी, काँग्रेसनेत्यांच्या टीकेतून देशहित साधले जात आहे काय? याचा विचार करायला हवा.
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’या करोनावरील दोन भारतीय लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्यानंतर मुख्यतःभारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीवर राजकीय नेत्यांचा व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांचा आक्षेप आहे.’कोव्हॅक्सिन’या लसीबद्दल राजकीय नेत्यांना कोणता आक्षेप आहे,हे जाणून घेण्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या आक्षेपी मतांना बघणे महत्वाचे ठरते.’इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’चे संपादक डाॅ.अमर जेसानी यांनी असे म्हटले आहे की,’एकीकडे भारत बायोटेकला तिस-या टप्प्यातील चाचणीसाठी स्वयंसेवक मिळालेले नाहीत,असे असतांनाच लसीला मंजूरी मिळणे धक्कादायक आहे.सार्वजनिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ,संशोधक आणि स्टॅफोर्डशायर विद्यापीठाचे व्हिजिटिंग प्रोफेसर डाॅ.जे.एन.राव यांना असे वाटते की,लसींना मंजूरी देण्यापूर्वी ‘भारत बायोटेक’च्या तिस-या टप्प्यातील चाचणीच्या किमान प्रारंभीच्या निकालांची प्रतीक्षा करणे आवश्यक होते.महामारी चालू आहे,लस गरजेची आहे.मात्र लसीवर लोकांचा पूर्ण विश्वास असणेही तेवढेच महत्वाचे आहे.आक्षेपाच्या याच रेषेला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्सचे माजी अध्यक्ष डाॅ.आनंद भान यांनी अधिक स्पष्टपणे अधोरेखित केले. करोनाच्या महामारीविरोधात जगाची कडवी झुंज चालू असतांना केवळ रशिया आणि चीन या दोनच देशांनी लसीच्या गुणकारकतेविषयीची माहिती प्रसिद्ध न करताच तिला मंजुरी दिली आहे.नियामक प्रक्रियेबाबत विश्वास निर्माण करणे ही महत्वाची बाब आहे.मात्र सद्यस्थितीत अनेक रूग्णचिकित्सकांना लसींच्या परिणामकारकतेबद्दल खात्री नाही.नेमकी कोणती लस कार्यक्षम आहे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.डाॅ.भान पुढे जाऊन असे म्हणतात की,लसीला ज्या पद्धतीने मंजुरी देण्यात आली,त्या प्रक्रियेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये विश्वासार्हता नाही.तसेच मंजुरीसंदर्भातील भाषेचा वापरही सर्जनशील लिखाणाप्रमाणे असून ती कायद्यावर आधारित असल्याचे दिसत नाही.
डाॅ.अमर जेसानी,डाॅ.जे.एन.राव आणि डाॅ.आनंद भान यांनी कोविशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींबद्दल आपले मत नोंदविले आहे.ही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मते आहे.प्रत्येकच नव्या संशोधनानंतर तज्ज्ञ आपली मतं मांडतात.अनुभव शेअर करतात.मर्यादा व शक्तीस्थळे सांगतात.संशोधकांच्या कष्टाची माती व्हावी,या हेतूने तज्ज्ञ आपली मते मांडत नसतात.वैद्यकीय क्षेत्रात कायम संशोधन चालूच असतात,यापुढेही होत राहतील.कोणत्याही संशोधनाच्या मर्यादा जशा आहेत तशीच त्याची उपयुक्तताही असते.डाॅ.अमर जेसानी,प्रोफेसर डाॅ.जे.एन.राव किंवा डाॅ.आनंद भान यांची करोना लसीबाबतची मते ‘केवळ मानवी कल्याण’ या नजरेतूनच असतील.त्यांच्या मतांना आक्षेप,टीका किंवा आग्रह वा दुराग्रह या चष्म्यातून बघण्याची आवश्यक्ता नसतांना आपल्या देशातील राजकीय नेते तज्ज्ञांच्या मतांना ‘मसाला’समजून राजकारणात ‘पोळी शेकण्याची’ तयारी करीत आहेत.अखिलेश यादव यांनी लसीवर प्रतिक्रिया देण्याची खूप घाई केली.नरेंद्र मोदींना या लस निर्मिती कार्यक्रमातून जे साधायचे होते ते यादवांच्या विरोधामुळे साधले.पंतप्रधान मोदी म्हणाले,’मेड इन इंडिया’.अखिलेश म्हणाले,’ही भाजपची लस’राजकारण सगळेच करतात.मोदींनी लस संशोधकांचे कौतुक केले.विरोधक मोदींवर निशाणा लावत आहेत.ही लस भाजपची निर्मिती आहे,असे सांगून काँग्रेससह सर्वच विरोधीपक्ष पुन्हा एकदा चुकले. करोनावर लस शोधणारे संशोधक मानवी कल्याणासाठी झटले,इतका प्राथमिक अंदाज जरी आमच्या राजकीय नेत्यांना आला असता तर देशाने या नेत्यांची तारीफच केली असती.मात्र झाले उलटे!
सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची’कोव्हॅक्सिन’या दोन्ही लसींना भारत सरकारच्या औषध महानियंत्रक यंत्रणेने मंजूरी दिली.वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा आक्षेप हा वैद्यकशास्त्रांच्या दंडकाबद्दल आहे.राजकारण्यांचा आक्षेप,टीका वेगळ्या मुद्द्यांवर व वेगळ्या नजरेतून आहे.वैद्यकीयक्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेल्या सूचना,घेतलेला आक्षेप करोनाची लस अधिक उपयुक्त ठरण्यात कारणीभूत ठरू शकते.मात्र राजकारणी ज्या पद्धतीने टीका करीत आहेत,लसीवर अविश्वास दर्शवित आहेत,त्याचा दुरगामी परिणाम देशावर होणार आहे.भारत सरकारने दोन लसींना परवानगी दिली असतांना मात्र
विरोधी पक्षाने हैद्राबादच्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’वर जोरदार टीका केली. भारत बायोटेकवर टीका झाल्यानंतर भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एल्ला यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले की,आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.त्यामुळे यावर कोणीही राजकारण करू नये.
आपल्या देशातील सर्वपक्षिय राजकारणी सर्वगुण संपन्न आहेत.मानवी जीवनातील सर्व क्षेत्रात राजकारण्यांचा स्वैर संचार आहे.हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टरांनी रूग्णांवर कसे व कोणते उपचार करावे,याचे ‘डोज’ राजकारणी डाॅक्टरांना कायम देत असतात.गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्याच विषयात तोंड खुपसण्याचा राजकीय नेत्यांचा आवडता’ छंद’ जनतेला भारी पडत आला आहे.
करोनाची लस आल्यानंतर देशातील करोना संकट संपले,असे होणार नाही.135 कोटींचा देश.अर्ध्या लोकांना जरी लस द्यायची असेल तरी एक-दोन वर्षे लसीकरण कार्यक्रम चालू शकतो.दळणवळणाचे अपुरे जाळे,शीतगृहाची कमतरता,आरोग्य अधिका-यांची मर्यादित संख्या,आरोग्य कर्मचा-यांची रिक्त पदे ,अंधश्रद्धा,अफवांचा बाजार,औषधांचा काळाबाजार अश्या सगळ्या समस्यांना तोंड देत देशात लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाईल.’कोविशील्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’या लसी करोनापासून भारतीयांची मुक्तता करतील,असा जनतेला असलेला विश्वास राजकीय नेत्यांच्या टीकेनंतर कमी होतांना दिसत आहे.सीरमचे अदर पुनावाला यांनी तर खुप स्पष्टपणे सांगितले की,प्रत्येकच लसीचे साईड इफेक्ट असतात.करोनाच्या लसीचे साईड इफेक्ट असतीलच.लसीचे साईड इफेक्ट समजायलाही काही वेळ जाऊ द्यावा लागेल.भारत बायोटेकने भारतासह,ब्रिटन व इतर 12 देशात क्लिनिकल टेस्ट घेतल्या आहेत.यापुढेही लसीच्या टेस्ट, संशोधन चालूच राहणार आहे.तरीही आज आपल्या देशाला लसीची आवश्यक्ता आहे.या सत्याला आपण स्विकार केला पाहिजे.करोनाशी लढणा-या दोन लसी भारतात उत्पादित झाल्यात देशवासियांना गर्व आहे.हा देशाभिमान काँग्रेस नेत्यांमध्ये का दिसत नाही?पंतप्रधान मोदींच्या शब्दांकडे लक्ष द्या.’स्वदेशी लस’!.कधी काळी या देशाला स्वराज्य,स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, परदेशी वस्तूंचा बहिष्कार ही चतु:सूत्री देणारे बाळ गंगाधर टिळक काँग्रेसचे जहाल नेते होते.पुण्याचे होते.
अख्ख्या जगाला लस पुरविण्याची क्षमता असलेल्या लस उत्पादक कंपन्या भारतीय आहेत,ही आपल्या देशाची ओळख नव्या पीढीची छाती फुगविणारी आहे.हा देश अनेक वस्तूंच्या उत्पादनांसाठी परकीयांकडे आशेने बघत असतांना महामारीला संपविणारी ‘लस ‘भारतीय कंपन्यांनी तयार केली.लस उत्पादक भारतीय कंपन्या,संशोधक यांचा आपल्याला अभिमान आहे.लस किती टक्के यशस्वी होते,यावर कंपन्यांचे यश अवलंबून असले तरी स्वदेशी कंपन्यांनी देशासाठी ‘आत्मनिर्भर लस’तयार करून आपला जगात झेंडा गाडला,याचं भारतीयांना कायम कौतुक राहिल!!

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments