Home ताज्या घडामोडी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ

स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ

क्षिप्रा मानकर

आज राजमाता जिजाऊ यांचा 423 वा जन्मोत्सव. त्यानिमीत्ताने त्यांना मानाचा मुजरा. पसरवले शिवसूर्यतेज क्षितिजपटलावर, मिटवूनी परकीय अंधकार.. अवतरला भगव्यासही देण्या प्रेरणा, जगदंबेचा जिजाऊ अवतार.. कोरोनाच्या भिषण महामारीने संपूर्ण जग हादरले असले , थांबले असले तरी सामान्य गृहीणी ते राजकीय, शासकीय, सामाजिक, शैक्षणिक , पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रातील आधुनिक स्त्री शक्ती अविरत कार्य करतच आहे.

चुल , मुल सांभाळत कर्तव्य बजावत आहे . कुठून येत असेल हे आत्मिक बळ, ??कोण देत असेल तीला ही उभारी?? अन् सारं सारं संपत चालले असतांनाही नवनिर्मितीची तीची उमेद का संपूष्टात येत नसेल ?? हे असे अनेक प्रश्न कर्तबगार स्त्रीयांची धडपड बघून समाजाला पडत असतील. उत्तरे शोधायला गेलो तर फार दूर जावे लागत नाही. कारण मुळातच सृजनाची निर्मिती असलेल्या स्त्री शक्तीच्या भोवती ईतिहासातील कर्तृत्वान महानायिकांचा बुलंद परकोट आजही अखंड आहे. मनुवादी संस्कृतीने जखडले असतांनाही, सुलतानशाहीने नेस्तनाबूत करण्याचे ठरवले तरीही प्रत्येक वेळी तीने स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कारच केला. व इतरही महिलांना स्वअस्तित्वाची जाणिव करुन दिली.
जिजाऊ ची लेक म्हणुन तीने अन्याय, अत्याचाराला वाचा फोडली. ती स्वतंत्र झाली. तसेच तीने इतरही महिलांना शिक्षणाची, स्वातंत्र्याची , स्वअस्तित्वाच्या जाणिवेची कवाडं खुली करून दिली. असे असतांनाही आजही समाजात ती सुरक्षित आहे असे नाहीच. कधी जातीपातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली , व्यसनाच्या अधिन होऊन किंवा स्वैराचार म्हणून तीच्यावर अत्याचार होतच आहे. ती पत्नी असो बहीण असो की समाजातील इतर स्त्री. अन्याय, अत्याचार, बलात्कार, विनयभंग करून तीला नेस्तनाबूत करण्याचे किंवा तीच्या कर्तबगारीला संस्कृतीचे खोटे दाखले पाशवी साखळदंडात जेरबंद करण्याचे प्रकार चालूच आहे.
परंतू राख झालेल्या आयुष्यातूनही फिनिक्स पक्षा सारखी भरारी घेण्याच्या तीच्या जिद्दीला सलाम. ती भरारी घेते आहे अन् यशाचे आभाळ कवेतही घेत आहे.
होय आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. जगू तरी ऐटीने अन् मरू तरी ऐटीने. कारण हिर्यावर लाख घाव घाला, कोळश्यात कितीही पेरा तो चमकेलच.. होय आम्ही जिजाऊच्या हिरकणी आहोत.
उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना ज्ञान , चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ माँसाहेब यांना जन्मोत्सवानिमित्ताने मानाचा मुजरा.

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले शंभूछावा
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा.
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे.

स्वराज्य निर्मितीला अडसर निर्माण करणारी सुलतानशाही फोडून काढणार्या छत्रपती शिवरायांच्या नसानसात हिंदवी स्वराज्याचे रक्त सळसळत ठेवण्याचे श्रेय फक्त माँसाहेब जिजाऊ यांनाच जाते.
सिंदखेड वतनाचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाबाईंनी जणू अन्यायाविरोधात लढण्याची निती आईच्या पोटातच शिकून घेतली होती.
राजसी थाटबाट सोडून सर्वसामान्य प्रजेत रमणारी जिजा अवतीभवती चाललेल्या लाचारी व फितुरीने व्यथित होऊन वडिलांकडे तलवारबाजी, दांडपट्टा शिकण्याचा हट्ट करु लागली. ज्या वयात भातुकली च्या खेळात रमायचे असते त्या वयात जिजाऊ नाजूक हातात तलवार व दांडपट्टा घेऊन युद्धनिती शिकत होत्या. धन्य ते आई-वडील लखूजीराजे व म्हाळसाबाई ज्यांनी लेकीला एका लेकाप्रमाणे वाढवले. 1605 मधे शहाजीराजेंसोबत विवाहबद्ध झाल्यावरही त्यांना एकच ध्यास होता तो म्हणजे स्वराज्य निर्मिती. मराठ्यांनी सुलतानशाहीची चाकरी करावी हतबल व्हावे , शत्रूच्या सरदारांनी आया – बहिणीच्या इज्जती वेशीवर टांगतानाचे दृश्य नजरेत पडले त्याचवेळी जिजाऊंनी आई भवानीला साकडं घातलं.. माझ्यापोटी स्वराज्य रक्षक जन्मू दे, स्वराज्य संस्थापक पराक्रमी पुत्र मला होऊ दे, रयतेचा कल्याणकारी राजा घडविण्याचे भाग्य मला लाभू दे.
शिवरायांचा जन्म झाला अन् त्याचक्षणी अखंड महाराष्ट्राच्या पायाभरणीचा संकल्प जिजाऊंनी केला. त्याच भक्कम पायावरती बुलंद महाराष्ट्र उभा झाला.
कर्तृत्वासोबतच राजनिती, समाजशास्त्र , शस्त्रनिपुणता ही सारी शास्त्रे जिजाऊंनी शिवरायांना शिकवली.
शहाजीराजेंच्या पाठी शिवरायांना घडवितांना जिजाऊंनी आई-वडील या दोन्ही भुमिका वठविल्या.
मुघलशाही, आदिलशाही, नीजामशाही नेस्तनाबूत करण्यासाठी मोहिमेवर गेलेल्या शिवरायांच्या पाठीमागे स्वराज्याचा राज्य कारभार समर्थपणे चालवायच्या.. अन् तेच संस्कार त्यांनी लेकी सुनांना शिकवले..म्हणुन तर नवर्यापाठी महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य शाबूत ठेवला. एवढेच नाही तर राजमाता म्हणून त्यांना मिळत असलेले मानधन शिवराई त्या बचत करुन ठेवायच्या. आणि स्वराज्यावरती दुष्काळ असो किंवा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा असो ..तेव्हा स्वतःची जमापूंजी देऊन त्यांनी दोन्ही प्रसंग त्यांनी अत्यंत शिताफीने सांभाळून नेले.
शिवरायांना शेतकर्यांच्या पाठीशी सदोदित उभे राहण्याची हिम्मत दिली. लेकीबाळींचा सन्मान करण्याचे संस्कार दिले. मग गवळ्यांची हिरकणी असो की मुसलमानांची गौहरबानो असो शिवरायांच्या स्वराज्यात सर्व धर्म , जातीपातीच्या स्त्रीया स्वतःला सुरक्षित समजत होत्या. याचे श्रेय जिजाऊ संस्कारालाच. अशी राजमाता पुन्हा होणे नाही.
कर्तृत्व गाजविण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य निर्मिती हे विचार शिवरायांमधे जिजाऊनीच रुजवले. हजारो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या शिवरायांच्या पाठीशी असलेली ढाल म्हणजे आई जिजाऊ.
अखेर शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा साठवून 17 जून 1674 रोजी ही ढाल रयतेला खंबीर ढाल बनवून शिवरायांना व स्वराज्याला पोरकी करत रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी विसावली.
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणूनच माँसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला.
मानवी देह नश्वर असला तरी विचार आचार व संस्कार कधीच मरत नसतात.
स्वराज्याच्या मातीत माँसाहेब जिजाऊंनी पेरलेल्या निर्भिडतेचा, पराक्रमाचा, कष्टांचा, आपुलकीचा, मायेचा अन् खंबीरतेचा वटवृक्ष आजही उभा आहे. त्याच्या शाखा विस्तारल्या आहे.
हो आम्ही पुरोगामी महाराष्ट्राच्या लेकी जिजाऊच्या संस्काराचा, विचारांचा पुरस्कार करतो अन् आमच्या भोवताली असलेल्या अन्याय, अत्याचाराला न घाबरता जिजाऊंनी पायाभरणी केलेला व शिवरायांनी स्थापन केलेल्या या स्वराज्यात महाराष्ट्रातील लेकीबाळींना आमच्यासह उभारी देण्याची, सुरक्षा प्रदान करण्याची हमी देतो.

हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती!!
हीच जिजाऊ जीने घडविले, श्री राजे शिवछत्रपती !!

जय जिजाऊ.

प्रसिद्धी प्रमुख जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र
7875056593

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments