रतनभेट

माधव पांडे

गेल्या आठवड्यात टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा पुण्यात कोथरूडमधील वूडलँड सोसायटीत राहणा-या ‘इनामदार’ या टाटा समुहातील माजी कर्मचा-याच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलेत.रतन टाटांच्या भेटीची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर ट्विटर युझरने टाटांच्या मोठ्या मनाचं भरभरून कौतूक केलं.बातमी अजून जशी फुलली तसे सर्वच स्तरावरून रतन टाटांनी दिलेल्या भेटीचे उत्सुकतापूर्वक स्वागत झाले. एका मालकाने आपल्या एका माजी कर्मचा-याची केलेली विचारपूस हा बातमीचा विषय असू शकत नाही.मालक आपला धंदा बघतात.याही प्रसंगाला असं बघायला काय हरकत आहे? परंतु समाजमन ओळखा.टाटांचा आपला थेट संबंध नसला तरी आपण ‘टाटाचं मीठ’ खातो.मीठाला जागले पाहिजे.

मित्रहो, आपण आज ‘रतनभेट’ वर चर्चा करूया.उद्योगधंदा उत्तम कसा चालवावा यासाठी विविध विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत.श्रीमंताची मुलं विदेशात जाऊन ‘बिझनेस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतात.भावी उद्योगपतींना ‘लेबर मॅनेजमेंट’उत्तम शिकविल्या जाते.कर्मचा-यांशी कसे संबंध राखले पाहिजे,यासाठी खास वर्कशाॅप घेतल्या जातात. उद्योगाच्या समस्यांचे सखोल निराकरण करणा-या तज्ज्ञ मंडळींची ‘काॅर्पोरेट जगतात ‘मागणी आहे.अश्याच रचनेतून ‘एका माजी कर्मचा-याच्या घरी भेट,त्याच्या प्रकृतीची विचारपूस..वगैरे..वगैरे…’असा काहीसा हा इव्हेंट होता,असं समजायला काय हरकत आहे? नाही!असं समजता येणार नाही.टाटा उद्योग समुहाला अश्या बाजारू प्रसिद्धीची गरज नाही.83वर्षीय रतन टाटांना आयुष्यात कधी फिल्मी सिता-यांसोबत चमकावं वाटलं नाही.रतन टाटा कायम भारतीयांच्या मनातील ‘नभांगणाचे तारे ‘राहिले आहेत.
रतन टाटांच्या टाटा कंपनीबद्दल खूप बोलता येईल.लिहिता येईल.लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं ‘टाटायन’ वाचले, तर टाटा समजून घ्यायला मदतच होईल.तरीही आपल्याला’रतन टाटा ‘ नव्याने समजून घ्यायला हवेत.
रतन टाटा यांनी उद्योगक्षेत्रात दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल जग भरभरून बोलतं.भारतीय उद्योग जगताची खरीओळख ‘टाटा ‘आहेत,असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.तरीही टाटा आम्हाला समजून घ्यावे लागतील.
माणूस माणसाला भेटतो,बोलतो.विचारपूस करतो.ही केवळ वाक्ये नाहीत.ही अनुभूती आहे.या ह्दयीचे त्या ह्दयी!
वूडलँड सोसायटीत हार्मनी इमारतीमध्ये राहणारे श्रीयुत इनामदार टाटा कंपनीत काही वर्षापूर्वी काम करीत होते.त्यांनी पुढे टाटा कंपनी सोडली,ते अन्य कंपनीत सेवा देत राहिले.दरम्यान गेल्या दोन वर्षापासून इनामदारांची प्रकृती ढासळली.इनामदार आजारी आहेत,ही नोंद टाटांच्या स्मरण नोंदवहीत नोंदविल्या गेली असेल. 83 वर्षीय रतन टाटा मुंबईहून पुण्यात खास इनामदारांच्या भेटीला आले.कोणालाही या भेटीचा सुगावा लागणार नाही,याची संपूर्ण काळजी घेत रतन टाटांनी इनामदारांची भेट घेतली.इनामदारांनी टाटांकडे काहीही मागितले नाही.तरी जगविख्यात उद्योगपतीला इनामदारांच्या घरातील ‘अर्थव्यवस्था’लक्षात आली.भेटीदरम्यान रतन टाटा म्हणाले,इनामदारांच्या कुटुंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण करू.खुद्द टाटा बोलले.इनामदारांच्या घरात जे काही गोड-धोड केलं होतं,ते प्रसन्न वदनाने स्विकारून आजारपणामुळे इनामदारांच्या घरात आलेली मरगळ रतन टाटांनी एका झटक्यात दूर सारली.इनामदार कुटुंबियांसाठी टाटांची भेट ‘रतन’भेट ठरली.
दरम्यान वूडलँन्ड सोसायटीमध्ये प्रत्यक्ष रतन टाटा आलेत,हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त सोसायटीच्या अध्यक्षांनी साधला. वूडलँन्ड सोसायटीचे अध्यक्ष अभिजित मकाशीर यांनी सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समजून टाटांच्या परतीच्या प्रवासात सोसायटी पार्किंगमध्येच सुकन्या अदिश्री सोबत टाटांची भेट घेतली. टाटांना काही बोलण्याचा आग्रह करताच रतन टाटा क्षणार्धात म्हणाले,’ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा,विचलित होऊ नका ‘मकाशीरांना टाटांचे विधान ‘कानमंत्र’ वाटला.लगेच त्यांनी टाटांसोबतच्या भेटीचे ट्विट केले.त्यानंतर पुण्याला आणि पर्यायाने जगाला कळले की, एका माजी कर्मचा-याच्या प्रकृतीची चौकशी करायला खुद्द रतन टाटा कर्मचा-याच्या घरी आलेत.त्यानंतर लाईक आणि अभिनंदनाचे तुषार उडायला लागले.तोवर रतन टाटा मुंबईत आपल्या ध्येयाशी निगडीत कामात गढून गेले होते.
रतन टाटा यांनी कर्मचा-यांची घरी जाऊन घेतलेली ही पहिलीच भेट नव्हती. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला.त्यावेळी हल्ल्याची झळ पोहचलेल्या 80 कर्मचा-यांची रतन टाटांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.रतन टाटांची ‘संवेदनशीलता’जेवढी कौतुकास्पद आहे त्यापेक्षा जास्त त्यांच्यातील ‘ मानवता ‘श्रेष्ठ आहे.रतन टाटांनी इनामदारांची जी मदत केली,तशी मदत अन्य कोणताही संवेदशील उद्योगपती करेलही,मात्र टाटांनी मदत करतांना ‘या हाताचे त्या हाताला’ कळू दिले नाही,याच कृतीला ‘खरी मदत’ म्हणता येईल.आमच्यातील अनेक मंडळी मंदिरांना देणगी देतात.दाते महानच असतात.मात्र देवाच्या व्दारी दात्याच्या नावाची संगमरवर फर्शी लावल्याशिवाय ‘हा महान दाता’ देणगी सोडत नाही.दावा असा केला जातो की,परमेश्वरचं सगळं देतो.आध्यात्म सोडा.आमच्यात किती रतन टाटा आहेत. शोधा!आम्हाला समाजाचं देणं लागतं,ही भावनाच क्षीण होत चालली असतांना टाटांची ‘रतनभेट’ ही नव्याने आमची मानवीमूल्यांशी भेट घडवून देत आहे,असे म्हणता येईल. कंपनीत काम करणारा प्रत्येकजण हा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे,ही टाटांची भूमिका आणि भावना या प्रसंगातून अधोरेखित झाली. आपल्यातला प्रत्येकजण उपजिविकेसाठी कुठेतरी चाकरी करणार,कोणीतरी नोकरी धरणार.कोणी मालक असेल,कोणी नोकर.प्रत्येकाची क्षमता आहे,त्यानुसार जिविका ठरणार. प्रत्येकाला ‘पोटासाठी’काम करावं लागतं.कामाचं स्वरूप वेगवेगळं असतं.उद्योगक्षेत्रात तर पैसाच ‘देव’! तेथे दातृत्व हा ‘घाट्याचा सौदा ‘.तरीही रतन टाटा समाजाच्या तथाकथित धारणेत ‘व्यवहारी ‘का नाहीत?
मनुष्याचं आयुष्य पूर्ण शंभरवर्षे समजले तरी आता टाटांच्या आयुष्यात किती वर्षे शिल्लक असतील.तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात,या वाक्याची आठवण करून देणारा पुण्याचा प्रसंग आहे.प्रसिद्धी,नाव यासाठी हपापलेला माझा-तुमचा कृत्रिम समाज टाटांच्या वागणुकीतून काय शिकणार आहे?संस्कार पुस्तकातून शिकता येत नाहीत.कृती हाच संस्कार. रतन टाटांची एका माजी सहका-यासोबतची एक सहज भेटही नव्या पीढीचा आदर्श ठरू शकते.रतन टाटा अत्यंत व्यस्त असतांना तब्बल पाऊणतास आपल्या माजी कर्मचा-याच्या घरी गप्पांमध्ये घालवितात.तुम्ही -आम्ही अगदी हटके सांगतो.वेळच नाही.खूप बीझी आहे मी!
टाटांनी ही भेट गुप्त ठेवली होती.सोसायटीच्या प्रसिद्धी परान्मुख अध्यक्षांच्या समयसुचकतेने ही भेट जगजाहिर झाली. अन्यथा ही ‘रतनभेट’ कोणालाच माहित झाली नसती.तरी एक विचार करा.
रतन टाटांना फक्त आणि फक्त इनामदारांना दिलासा द्यायचा होता.बळ द्यायचे होते. भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे,एवढंच सांगायचं होते.आणि रतन टाटांनी तसे केलेही!इनामदार कुटुंबियांनी टाटांची ह्दयस्थ भेट अनुभवली.प्रचंड मोठा वटवृक्ष एका इवल्याशा रोपाची काळजी घेतो. माझ्या मनात प्रश्न येतो.आम्ही आमच्या घरातल्या,कुटुंबातल्या,परिवारातल्या आजारी,थकलेल्या व्यक्तींची इतक्या संवेदनशिलतेने अशी काळजी घेतो? टाटा करीत असलेली भरभरून मदत सोडा, आपण स्वत:हून फुल नाही तर फुलाची पाकळी समाजाला देतो? शंभर टक्के नाही,मात्र बहुतांश मंडळी आजारी नातेवाईकांना भेटायला जातांना’कर्तव्यपरायणता’हा भाव घेऊन जातात.’मरण’ आणि ‘तोरण’ जपलं की नातं टिकतं,इतका सोपा फाॅम्युॅला आपण सगळ्यांनी शोधला आहे.कोणी मदत मागेल,या भीतीने असंख्य माणसे आपल्या घराची,मनाची दारं बंद करून ठेवतात.स्वतःचं भलं झालं की,अनेकजण ‘कृतज्ञता’ या शब्दालाही ओळख दाखवित नाही. माणसं माणसासारखी वागत नाही.अलिकडच्या दशकात समाज मुखवट्यांचा बाजार झाला आहे.नातेवाईक,मित्र,आप्त ही नामावली असून ‘नात्यांमधला श्वास ‘ स्वार्थीवृत्तीने गुदमरायला लागला आहे.माणसांना माणसांचीच ‘अॅलर्जी’झाली आहे.अश्या बुरसटलेल्या,कोत्या समाजात ‘टाटा’ राहतात.टाटांचा आणि माझा-तुमचा चालण्याचा ‘रस्ता’ एकच आहे.फक्त ‘मार्ग ‘वेगळा आहे. ध्येय वेगळी आहे.आपल्यातली बहुसंख्य मंडळी ‘ लक्ष्मीभक्त ‘ आहेत.टाटा प्रत्यक्ष ‘ लक्ष्मीपुत्र ‘ असतांना इतके विनम्र कसे? तुम्ही -आम्ही धावत आहोत.माहित नाही,कुठे जायचे? मिळेल त्या मार्गाने,जमेल तसे’जमवायचे’आहे.टाटांना ‘ ‘ ‘ ‘द्यायचं ‘आहे.आपण ‘टाटा’ होऊ शकणार नाही का? मोठ्या माणसांना उगाच मोठेपण येत नसतं. पैसा,साम्राज्य,सत्ता माणसाला मोठं करीत नाही.माणूस मोठा होतो,तोच मुळी जगाच्या नजरेतील अत्यंत सामान्य गोष्ट सुद्धा अतिशय संवेदनशील आणि मानवीमूल्यांतून केलेल्या कामामुळे!जे काम रतन टाटा कायम करीत असतात.आम्हाला रतन टाटांचं कौतुक असायलाच पाहिजे.मात्र पुण्याच्या भेटीत रतन टाटा सहज बोलून गेले,ध्येयाकडे लक्ष द्या,विचलित होऊ नका!आता फक्त ध्येय ठरवा.टाटांसारखं ध्येय बाळगलं तर आपण कधीच विचलित होणार नाही!!

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments