Home ताज्या घडामोडी आयुष्याचा पतंग उडवताना…

आयुष्याचा पतंग उडवताना…

निलेश श्रीकृण कवडे

काल घरी जाताना बाजारात दुकानं रंगबिरंगी पतंगांनी सजलेली दिसली. मांजाची चक्री आणि वेगवेगळ्या रंगाच्या पतंगांपाहून सहज आकाशाकडे डोकावले. आकाशात ऐटीत एक पतंग उडताना दिसली. त्या पतंगाच्या धाग्याने मन भूतकाळात कधी गेले कळलेच नाही. सहसा १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.या दिवशी मकरसंक्रांत सण साजरा केला जातो. १४ जानेवारी जसजशी जवळ येत जायची तसतशी आमची मकरसंक्रांतीची तयारी वेग घ्यायची. मकर संक्रांत सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. बाजारात एकीकडे महिलांची संक्रांती सणाला वाणांची खरेदी करण्यासाठीची लगबग वाढायची तर दुसरीकडे आमची पतंग आणि मांजाची तयारी करण्याची लगबग वाढायची. हल्ली बाजारात तयार मांजा मिळतो. पूर्वी मांजा घरी तयार करावा लागत होता. मांजा तयार करताना खूप मजा यायची. आम्ही मांजा तयार करण्याच्या पद्धतीला 'मांजा सुतणे' हा शब्दप्रयोग करायचो. वेगवेगळ्या भागात या पद्धतीला वेगवेगळी नावे असू शकतील. मांजा सुतण्यासाठी चांगल्या प्रतीचा धागा विकत घ्यावा लागत होता. त्याकाळी वर्धमान आणि बरेली धाग्याची खूप चलती होती. धाग्या सोबत सिरस आणि रंग विकत घ्यावा लागत होता. मांजा सुततांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काचं. त्यावेळी काचांचा चूर विकत मिळायचा मात्र आम्ही वर्षभर सांभाळून ठेवलेले 'गेलेले ट्यूबलाइट' कुटून काच तयार करायचो. ही सर्व पूर्वतयारी झाली की मांजा सुतण्यासाठी आम्ही मोकळे व्हायचो. घरात तिळगुळ बनवण्याची तयारी सुरू असताना आम्ही वेगळ्याच धुंदीत असायचो. आमची धुंद म्हणजे मांजा सुतणे! आम्ही मांजा सुतण्यासाठी खुल्या मैदानात जायचो. मैदानातच एका कोपऱ्यात चूल मांडत होतो. गंजात सिरस शिजवून त्यात रंग टाकून तयार करायचो. एक जण धाग्याचे 'बंडल' पकडायचा दुसरा दाभननी धागा सिरसमध्ये बुडवायचा. दोघे जण कापडाच्या चिमटीत काचा घेऊन ओल्या मांजाला लावायचे दोघे तिघे मांजा गुंडाळण्यासाठी चक्रीत लपेटायला असायचे. या सर्व 'ड्युट्या' आलटून पालटून बदलत राहायच्या. बफ्फल, डुग्गी, गेंडा, रॉकेट, चांद तारा आणि पन्नी अशी काही हटके पतंगीची नावे असायची. आमच्या आवडीनुसार आम्ही पतंग विकत घ्यायचो. विकत आणलेल्या सर्व पतंगांना संक्रांतीच्या आदल्या दिवशी सूत्र बांधत होतो. पतंगाची अवस्था पाहून 'कन्ना' देणे 'धाप' देणे ही पूर्व तयारी करत होतो. उद्देश हाच की, या कामात संक्रांतीला वेळ वाया जाऊ नये. मित्रांमध्ये ज्याच्या घराची गच्ची जास्त उंच तिथे जास्त गर्दी व्हायची. काही मित्र घरच्याच गच्चीला प्राधान्य द्यायचे. तर काही आपल्या सोयीच्या गच्च्या शोधायचे. सकाळी लवकर उठून आम्ही गच्चीवर ताबा घ्यायचो. संक्रांतीला जेवण वगैरे सर्व गच्चीवरच व्हायचे. बहुतांश गच्चीवर संक्रांतीला मोठ्या आवाजात गाणे वाजवले जायचे. कुणाची पतंग कापली रे कापली की वेगवेगळ्या शैलीत आवाज काढून आनंद साजरा करण्याची काही औरच बात होती. एका गच्चीवरचा मित्रांचा गट 'पेचा' करून दुसऱ्या गच्चीवरील मित्रांच्या पतंगा कापण्यासाठी धडपड करायचा. पतंग उडवताना सुद्धा मित्र आपली मैत्री निभावत होते. मित्रांसोबत पतंग कापल्यावर दिवसभर ओरडून-ओरडून संध्याकाळी आवाज बसून जात होता. गच्चीवर पतंग उडवत असताना नजरा केवळ आकाशातल्या पतंगांकडे राहत नव्हत्या. आकाशातील पतंग न्याहाळण्यासाठी आलेले कुणीतरी पाहून मनाचा पतंगही बेभान होऊन जायचा. तर कधी एखाद्या गच्चीवर आपल्याला अपेक्षित असलेली 'ती' आल्यावर आपली पतंग कधी कटली जायची कळतही नव्हते. संक्रांतीच्या सणाला पतंगीच्या गर्दीतही दोन मनांचे धागे सुद्धा जोडल्या जात होते. आपल्याला पतंग उडवताना 'तिने' पाहिल्यावर संक्रांतीसाठी केलेली अवघी धावपळ वसूल व्हायची. इकडे संक्रांतीला मकर राशीत सूर्य प्रवेश करायचा आणि तिकडे अनेक काळजात आप-आपला 'चंद्र' ही भर दिवसा प्रवेश करायचा. रील (चक्री) पकडण्या वरून मित्रांमध्ये क्वचित भांडणेही व्हायची. आलटून पालटून रील (चक्री) पकडून आम्ही सुवर्णमध्य साधायचो. एखादी पतंग एकाच दिशेला वळत असली की, आम्ही तिला विरुद्ध बाजूला 'कन्ना' लावायचो. प्रसंगी ढील देणे, कधी जोरात तर कधी हळू मांजा ओढणे यातून पतंग उडवण्याचे कौशल्य आम्ही आत्मसात केले होते. परिस्थितीशी कसं समायोजन करायचं हे लहानपणी पतंगाने आम्हाला शिकवलं होतं. पतंग कटल्यावर मांजा त्वरित लपेटणे हेही एक कौशल्य असायचे. परिस्थिती आपल्या हातून गेल्यावर त्यातून लवकर सावरणे महत्त्वाचे असते हे पतंगाने शिकवले होते. एक पतंग कटली तर लगेच दुसरी उडवायची. सर्व पतंगा कटल्या तर नवीन पतंग आणून किंवा कटलेल्या पतंगा पकडून पुन्हा आनंदाने पतंग उडवायचो. आयुष्याचा पतंग उडवताना या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे आता समजू लागले आहे. आकाशात पतंग पाहताना जुन्या किती सार्‍या गोष्टी आठवल्यात. या सर्व गोष्टी आठवून मला पतंग उडवायचा मोह झाला आहे. तुम्हालाही हा मोह झाला असेलच ना! चला मग पतंग उडवण्याची तयारी करूया!

अकोला
मो. ९८२२३६७७०६

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments