Home ताज्या घडामोडी परस्पर सहमतीने!

परस्पर सहमतीने!

 

माधव पांडे

‘पुरोगामी’ महाराष्ट्राचे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार रेणू शर्मा या महिलेने मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.ठाकरे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याने बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेकडून झाल्यावर या प्रकरणाकडे सुरूवातीपासून राजकीय हेतूने बघितल्या गेले.त्यानंतर एक-एक पत्ते पिसावे असा घटनाक्रम घडत गेला.आता या प्रकरणातून जे प्रश्न समाजासमोर उभे झाले आहेत,ते परस्पर सहमतीचे आणि परस्परांच्या सहमतीचे! आपण आज या विषयावर बोलुया.
मित्रहो,राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत.महाराष्ट्राला रेणू शर्मा यांचा झाकलेला चेहरा दिसण्यापूर्वी हळूच एक नाव माहित झालं.करूणा धनंजय मुंडे.या नावाचं फेसबुकवर अकाऊंट आहे.त्यानंतर सगळ्यांच्या नजरा करूणा शर्मा या नावाकडे वळल्या.आता करूणा शर्मा कोण?या प्रश्नाचे उत्तरही लगेच मिळाले.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्याबरोबर काही तासातच खुद्द मुंडेंनी या प्रकरणावरील पडदा उठविण्याचा प्रयत्न केला,असं म्हणता येईल.फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट टाकून देशभरातील जनतेला त्यांची बाजू कळावी,अशी सोय त्यांनी करून घेतली.मुंडेंची फेसबुक पोस्ट ज्यांनी खूप बारकाईने वाचली असेल,त्या प्रत्येकाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील. विवाहसंस्था,व्यभिचार,नैतिकमूल्ये व वारसाहक्क या बिंदूभोवती या प्रकरणातील पात्रे फिरतांना दिसतात.धनंजय मुंडे राज्याचे कॅबिनेटमंत्री आहेत,ही बाब क्षणभर विसरून या सगळ्या ‘नाट्याकडे’वेगळ्या टृष्टीकोनातून आणि उद्भवलेल्या सामाजिक प्रश्नांतून बघता येईल काय?किंबहूना बघायलाच पाहिजे.रेणू शर्मा या महिलेने मंत्री मुंडेंवर लावलेले आरोप किती खरे,किती खोटे याची शहानिशा पोलिसांनी करायची असली तरी सत्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार न्यायासनालाच असल्याने इतर कोणीही या प्रकरणात कोणाचीही बाजू घेऊ नये.हा प्रश्न नैतिकतेचा आहे,असे ज्यांना वाटते त्यांनी तर या विषयी अजिबात बोलू नये आणि ज्यांना या विषयाला ‘परस्पर संमतीने’बघायचे आहे,ते उद्भवलेल्या सामाजिक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बांधिल असतील.
धनंजय मुंडे असो वा कोणताही नागरिक.देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांच्या निकालातून स्पष्टपणे आदेश दिले आहेत की,कोणत्याही पिडीत महिलेने जर कोणावरही बलात्काराचा आरोप केला असेल तर तत्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी.या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले आहेत,ते या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्यांच्यासाठी पोलिसांनी वेगळी सवलत देणे ही नक्कीच भारतीय संविधानाच्या पाईकांना शोभणारी गोष्ट नाही.एका मंत्र्याची जगभर शोभा होत असतांना पक्ष नेतृत्वाने हात बांधून बसणे,केवळ विसंगतच नाही तर नेतृत्वाचे महत्व कमी करणारे आहे.मुंडेंच्या प्रकरणातील राजकीय पापुद्रे काढण्याचे कसब ब-याच मंडळीकडे असल्याने या अतिशय गंभीर व संवेदशिल प्रकरणाला आपण शंभर टक्के राजकीय बाब म्हणून मान्यता देणे चुकीचे ठरेल.मुंडे मंत्री आहेत,म्हणून त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करून कोणाला तरी आपले हिशोब चुकते करायचे असतील,तर करू द्या.मात्र याही विषयात ‘परस्पर संमती’ दिसून आलेली आहे.
रेणू शर्माने आरोप केल्यानंतर खळबळ उडाली.मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले.त्यांचे नवसाचे मंत्रीपद जाते की काय? अशी परिस्थिती निर्माण होत असतांना भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कृष्णा हेगडे,मनसे नेते मनीष धुरी व रेणू शर्माचा माजी प्रियकर रिझवान शेख मुंडेंच्या मदतीला धावून आलेत.या तिन्ही विभूतींनी एका सुरात सांगितले की,तक्रारकर्ती रेणू शर्मा ही ‘ब्लॅकमेलर’ आहे.माध्यमांनी रेणूचा हिशोब करायला सुरूवात केली.रेणू शर्माची ‘पिडिता ते ब्लॅकमेलर’अशी प्रतिमा समाजासमोर आणण्यात मुंडेंचे हितचिंतक ब-याच अंशी यशस्वी झालेत.अवघ्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांनी ‘हे प्रकरण गंभीर आहे’असे निरिक्षण नोंदविले होते.त्यानंतर दोन दिवसात कृष्णा हेगडे,मनीष धुरी आणि रिझवान शेख यांच्या कथित बयानबाजीने जाणता राजाही गोंधळात पडला.शरदराव म्हणाले,’कोणी कसेही आरोप करून कोणत्याही नेत्याला सत्तेतून बाहेर काढावे,ही परंपरा पडता कामा नये!’शरदराव पवार योग्यच बोलले.राजकीय परंपरेबाबत त्यांचे भाष्य अचूक आहे.मात्र ‘परस्पर संबंधावर ‘त्यांनी सूचक मौन पाळले आहे.
धनंजय मुंडे या प्रकरणाला दोन बाजू आहेत.पहिली बाजू रेणू शर्माने जगासमोर आणली.तिने धनंजय मुंडेवर केलेले बलात्काराचे आरोप.रेणू शर्माने धनंजय मुंडेवर अत्यंत गंभीर आरोप केले नसते तर कदाचित कधीच मुंडेचे ‘दुसरे कुटुंब’ समाजासमोर आले नसते.परंतु असं ‘दुसरं अख्ख कुटुंबच’झाकून ठेवता येतं?
आजच्या या संवादात मला रेणू शर्माने केलेल्या आरोपाबाबत अजिबात चर्चा करायची नाही.तिच्या आरोपाची चौकशी आज ना उद्या पोलिसांना करावीच लागेल.न्यायदेवतेसमोर या प्रकरणाचा खल होईल व न्यायमूर्ती त्यावर आपला निर्णय देतील.या प्रकरणात अजून बरंच काही घडू शकते. प्रकाशात आलेल्या नाट्यमय गुंत्यातील एका बिंदूकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो,’परस्पर सहमती!’
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा हिने आरोप केल्यावर समाजमाध्यमातून या आरोपांची कागदपत्रे व्हायरल झालीत.त्यानंतर मुंडेंनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट केली.मुंडेंची पोस्ट वाचा.ही पोस्ट कायदेपंडितांच्या सल्ल्याने लिहल्या गेली आहे.त्याचमुळे ही पोस्ट ‘भावनिक’ नसून ‘कायदेशीर उत्तर’ आहे.कायद्याचे अल्प ज्ञान ठेवणाराही या पोस्टकडे कायद्याच्याच नजरेतून बघेल.मुंडेंनी’ करूणा शर्मा ‘ सोबतचे ‘संबंध’मान्य केलेत,मात्र ‘ ‘ नातं ‘स्पष्टपणे नाकारले आहे.पोस्टमध्ये धनंजय मुंडे लिहितात,

” करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो.ही बाब माझे कुटुंबिय,पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती.सदर परस्पर संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली.सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे.शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे.माझे कुटुंबिय,पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबिय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे…..”
पोस्ट मोठी आहे.फेसबुक व अन्य माध्यमावर ही पोस्ट आहे.वाचा.मला मंत्री मुंडेंचा राग आलेला नाही,मुंडेमधील ‘पौरूषत्वाची’ घृणा आली आहे.
ज्या स्त्रीसोबतच्या प्रणयातून अपत्यप्राप्ती होते,त्या अपत्यांना धनंजय मुंडे स्विकारतात,मात्र त्या अपत्यांच्या मातेला झिडकारतात,हा मुंडेंचा जसा ‘पुरूषार्थी’पवित्रा आहे,तेव्हाच पुरोगामी महाराष्ट्राला कलंक आहे. रेणू शर्माने केलेले आरोप कायदेपंडितांच्या सल्ल्याने धनंजय मुंडेंना व्यवस्थित नाकारता येतीलही,कदाचित सगळंच पुर्ववत होईल.किंबहूना असेच काही तरी होण्याचीच शक्यता अधिक आहे.उद्या कायद्याच्या लढाईत मुंडेंचे ‘निर्दोषत्व’ सिद्ध झाले तरीही ,धनंजय मुंडेंनी समाजासमोर उभ्या केलेल्या प्रश्नांचे उत्तर समाजाला शोधावे लागेल.
मुंडेंचा दोष काय? असा प्रश्न विचाराल,तर मुंडेनी जगाला पुन्हा एकदा सांगितले की,मी ‘पुरूष’ आहे,’माणूस ‘नाही!मुंडेवरील आरोपानंतर चॅनलच्या पत्रकारांनी मुंडेंच्या मतदारसंघात ‘परळीत’ नागरिकांची प्रतिक्रीया जाणून घेतली.विशेषतः महिलांच्या प्रतिक्रीया दाखविल्या गेल्यात.टिव्हीवर त्या निष्कपट माऊली म्हणाल्यात,’धनंजय मुंडे आमचा दादा आहे….प्रश्न ‘दादांचा’ नसून ‘दादल्या’चा आहे.
मुंडेच्या प्रकरणातून एक गोष्ट जनतेला खूप स्पष्टपणे समजली की,राजरोसपणे विवाहबाह्य संबंध ठेवता येतात. विवाहबाह्य संबंधातून अपत्ये जरी झालीत तरीही मूळ कुटुंब त्या मुलांना सामावून घेते.हा ‘मॅसेज’या प्रकरणातून ठसठशीतपणे समाजात गेला आहे.विवाहबाह्य संबंधाच्या समर्थनार्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाचा भारतीय दंडविधानाचे कलम 377 रद्द ठरविणारा निकाल समाजाच्या पुढ्यात मांडल्या जातो. विवाहबाह्य संबंधासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचा.17डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने भादंवि कलम 497 संदर्भात निरीक्षण नोंदवितांना असे म्हटले आहे की,’परस्परांच्या संमतीने ठेवलेले विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही’ या निकालाला डोळ्यासमोर ठेऊन मुंडेंची पोस्ट वाचा.मुंडेंनी नाते कबूल केले असे जे जनतेला वाटते तो ‘ कबूलनामा’ नसून मुंडेंची ‘कायदेशीर सोय ‘ उघड झाली आहे.या निकालाच्या आधारे कोणताही पुरूष वा स्त्री ‘परस्परांच्या सहमतीने’ विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात.मात्र व्दिभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नूसार पहिली पत्नी घरात असतांना पुरूषाला दुस-या स्त्रीशी ‘घरठाव ‘ करता येणार नाही.दोन्ही कायदे आमच्याच कायदेमंडळाने केलेले आहेत.धनंजय मुंडे राज्याचे ‘सामाजिक न्याय ‘ मंत्री आहेत,ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे.उपरोक्त कायद्याच्या तरतूदी विषयाचा संदर्भ म्हणून मी नोंदविल्या आहेत.मी कायद्याचा अभ्यासक किंवा विद्यार्थी नाही.समाजात नामवंत कायदेपंडित आहेत.मान्यवरांनी या संदर्भात जर काही दुरूस्ती सुचविली किंवा माझं म्हणणे संपूर्णतः फेटाळले तर मी स्वागतच करेल.मात्र त्यातून जनतेत गेलेला ‘संदेश’पुसता येईल काय? हा खरा प्रश्न आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार आपल्या देशातील विवाहित स्त्री – पुरूष’परस्परांच्या संमतीने’विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात.पुरूष मंडळी ‘परस्त्रीशी’संग तर करतील,मात्र व्दिभार्या कायद्यातील दंडकामुळे परस्त्रीशी ‘विवाह ‘करणार नाही.’परस्त्री संगातून ‘अपत्यप्राप्ती झाली तरी पुरूष अडचणीत येणार नाही.पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पुरूषाला बळ मिळेल.माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की,’स्त्री – पुरूषाचे संबंध कायदेशीर किंवा बेकायदेशीर असू शकतात,पण कोणतेच मूल बेकायदेशीर नसते.’याच निकालाचा फायदा करूणा शर्माची मुलगी शिवाली आणि मुलगा शिव यांना होत असल्याचे दिसत आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाचा 17डिसेंबर 2019चा निर्णय किंवा व्दिभार्या प्रतिबंधक कायदा 1946 मध्ये परिस्थितीच्या बळी ठरलेल्या ‘करूणा शर्मां’ना कुठे स्थान आहे? रेणूच्या आरोपावर तिची सख्खी मोठी बहिण ‘करूणा’ गप्प आहे,तर करूणाच्या संसारिक अस्तित्वावर धनंजय मुंडेंची सहचारिणी राजश्री मुंडे मौन पाळून आहेत.व्दिभार्या प्रतिबंध कायद्यातील तरतूदीनुसार धर्मपत्नीने नव-याच्या दुस-या स्त्रीची तक्रार केली तर सगळा गेम खत्म…
सौ.राजश्री धनंजय मुंडे यांना सगळं अवगत आहे,हे मुंडेंनी पोस्टमध्ये लिहले आहे मात्र वैष्णवी,जान्हवी,आणि आदिश्री या तीन गोज-या मुलींची आई असणा-या राजश्री मुंडेंना धनंजयरावांचे ‘परस्त्री संबंध’ मान्य आहेत,त्यांची सहमती आहे.हा विचार कुठून आला असेल? धनंजय मुंडेंनी त्यांची धर्मपत्नी राजश्री मुंडे यांची परस्पर संमती घेतली असण्याची शक्यता वाटते?सावित्रीची लेक स्वतःच्या संसारात परस्त्रीच्या अस्तित्वाला मान्यता देईल या भाबळ्या कल्पनेत आपण आहोत काय?या प्रकरणात ‘राजश्री’ यांची बाजू ‘एक करूण कहाणी’आहे. समाजाला स्त्रीयांबद्दल ‘करूणा’नसावी?या प्रकरणातून करूणाविरहित ‘स्त्री ‘ हे भयावह दु:ख’ भारतीय स्त्रीयांच्या पदरी समाजाने घातले आहे.लिव्ह इन रिलेशनशिप असू द्या किंवा माननीय न्यायालयाचे न्याय निवाडे.समाजाने व्यवस्थेचा आदर राखलाच पाहिजे.मात्र ‘करूणेचे काय’? मुंडेंच्या पोस्टला आता एकदा भावनिक नात्यातून वाचा.मुंडे पहिल्याच वाक्यात लिहितात,”करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत….!” धर्मपत्नीपासून तीन अपत्ये संसारात असतांना तुमच्या वासना तृप्तीतून अधिक दोन अपत्यांना जन्म देणारी,2003 पासून तुम्ही जिच्याशी ‘संग’ करता,ती स्त्री अचानक एका पुरूषासाठी ‘एक महिला’होऊन जाते…..
या मानसिकतेची किव येते.चीड येते.’स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे’ या वाक्याची आठवण करून देणारी ही ‘करूण कहाणी’ आहे.
छत्रपती शाहू,फुले,आंबेडकरांचा वारसा सांगणा-या माझ्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्याची प्रेयसी,अर्धांगिणी,दोन अपत्यांची माता,पत्नी या नात्याबद्दल हिन भावना, धारणा व कृती राहत असेल तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सावित्रीआई फुले आणि ज्योतीराव फुल्यांनी जन्माला यायला हवे!

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments