Home ताज्या घडामोडी तर्कवादाचा गौरव!

तर्कवादाचा गौरव!

 

 

माधव पांडे

नाशिक येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ थोर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या गळ्यात पडल्याने तमाम मराठीजणांस आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.समाजाच्या सर्व क्षेत्रात राजकारण थैमान घालत असतांना साहित्यिकांच्या व्यासपीठावर थेट अंतराळाला मराठी माणसाच्या अंगणात आणणारा ‘किमयागार’ आता अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारणार आहे. जयंत नारळीकरांची सर्वसंमतीने अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल साहित्यिक व साहित्य संस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभारच मानायला हवेत.गेल्या काही दशकातील संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडपद्धती बघता जयंतरावांची अध्यक्षपदासाठी झालेली निवड ही एक अंधश्रद्धा वाटावी,इतकी असामान्य घटना आहे.खरं म्हणजे,1975 मध्ये कराडला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गा भागवत यांनी संमेलनात जयंतरावांचा गौरवपूर्ण उल्लेख करून मराठीतील विज्ञानकथांची विशेष दखल घेतली होती.दुर्गाबाईंच्या कौतुकानंतर आता 45 वर्षांनी जयंतरावांची अध्यक्षपदी निवड झाली आहे . आम्हाला आमच्यातील सर्वज्ञाची ओळख व्हायला तब्बल
45 वर्षे लागलीत.ही आमची दूरदृष्टी!नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता जयंत नारळीकर असतील.मात्र तत्पूर्वी भारत सरकारने 1965 मध्ये पद्मभूषण व 2004 मध्ये पद्मविभूषण देऊन नारळीकरांच्या कार्याचा गौरव केला आहे.दोन डझनाहून जास्त पुस्तके मराठी समाजाला अर्पित केल्यानंतर मराठी माणसांमध्ये कोणती व कशी विज्ञाननिष्ठा निर्माण झाली,याचा विचार येत्या वर्षभरात विविध व्यासपीठांवरून झाला तर जयंत नारळीकरांची अध्यक्षपदावर झालेली निवड सार्थकी लागली,असे म्हणता येईल.
जयंत नारळीकर, डाॅ.बाळ फोंडके,निरंजन घाटे या मोजक्याच नामवंत संशोधकांनी मराठी माणसांचे विज्ञानाच्या परिसावर प्रबोधन करण्याचे कार्य आजवर केले आहे.समाजाची दृष्टी ‘तर्कशुद्ध’ झाली पाहिजे,हा आग्रह धरणारी ही मांदियाळी! खरं म्हणजे,जयंत नारळीकर ज्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल त्या प्रत्येकाला त्यांच्या कार्यातली शितलता आणि ध्येयाप्रती असलेली दृढता प्रत्ययास आली असेल.
‘यक्षाची देणगी’ पासून सुरू झालेला लेखन प्रवास ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मकथनापर्यंत कधी येऊन पोहचला ते मराठी वाचकांच्या लक्षातच आले नाही.जयंत नारळीकरांनी प्रत्येक पिढीला वैज्ञानिक दृष्टी मिळावी,यासाठी मातृभाषेतून आपला लेखनप्रवास सुरू केला व अद्यापही चालूच आहे.मी शास्त्रज्ञ कसा झालो?,गणित आणि विज्ञान युगायुगांची जुगलबंदी,सूर्याचा प्रकोप,विज्ञान आणि वैज्ञानिक,याला जीवन ऐसे नाव,व्हायरस,वामन परत न आला,अभयारण्य,आकाशाशी जडले नाते,अंतराळातील स्फोट,अंतराळ आणि विज्ञान,विज्ञान विश्वातील वेधक आणि वेचक,प्रेषित,गणितातल्या गमतीजमती,नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान,समग्र जयंत नारळीकर,चला जाऊ-अवकाश सफरीला,अंतराळातील भस्मासूर,टाइम मशीनची किमया यासारख्या पुस्तक-कादंबरीतून जयंतराव मराठी मनात कायम घर करून बसले.
लेखक जेव्हा आपले लिखाण समाजाला अर्पित करतो तेव्हा समाज त्या लेखनातून आपला जीवनविचार घडवित जातो.नारळीकरांच्या लेखनानंतर किमान महाराष्ट्राचे तरी चित्र काय आहे? बघुया!
संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांच्या मराठी मातीत किती जणांना उत्तम विज्ञानदृष्टी लाभली आहे,याचे मोजदाद करण्याचे धाडस करता येईल काय? जयंत नारळीकर यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेली निवड आम्हाला अभिमानास्पद असली तरी नारळीकरांनी ज्या मूल्यांसाठी व विज्ञानासाठी आपले आयुष्य दिले,त्याची समाजाने दखल घेतली काय? हा खरा चिंतनाचा विषय आहे.साहित्य संमेलनाचे सन्मानाचे अध्यक्षपद नारळीकरांना देणे आणि त्यांचा विचार समाजाने स्विकारणे या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक वाटत असल्या तरी वेगवेगळ्या आहेत.खरं म्हणजे,नारळीकर समजायला सहज आहेत.त्यांनी ज्या सोप्याभाषेत विज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले त्याकडे बघता नारळीकरांचा विचार आम्ही जगण्यात स्विकारणे अशक्य नव्हते,मात्र तसे झालेच,याची खात्री देता येत नाही.वास्तविक जयंत नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्म नाकारत नाही.त्यामुळेच महाराष्ट्राला नारळीकर आपल्या जवळचे वाटतात.समाजातील अंधश्रद्धा संपवायची म्हणजे सनातन्यांविरोधात युद्ध पुकारले पाहिजे ही संघर्षाची भूमिका अनेकांनी स्विकारली.मात्र नारळीकरांनी समाज विज्ञाननिष्ठ कसा होईल,यासाठी जोरकस प्रयत्न केल्याचे लक्षात येते.या भूमिकेतून जयंतरावांच्या विचाराचे मोठेपण ठसठसीतपणे उठून दिसते.
आम्ही भारतीय ‘उत्सवप्रिय’ आहोत.आम्हाला कोणाला तरी ‘उत्सवमुर्ती ‘करावयाचे असते.उत्सवमुर्ती आपला मानबिंदू असला पाहिजे,असा आग्रह नसल्याने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर अनेकांनी दावे केलेत.काही मान्यवर त्यांचा दावा सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेतही!प्रश्न साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा नसून समाजाच्या ‘विवेकाचा’ आहे.साहित्यिक संस्थांनी समाजमान्य नावाचा पुरस्कार करून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिलेही,तरी वाचक किंवा समाजाचे चालक म्हणून आपल्यातील कोणाचीच विचार आणि आचारधर्माच्या जबाबदारीतून सुटका नाही,ही बाब लक्षात घ्यायला हवी.समाजाने धर्म आणि धर्माचे अस्तित्व स्विकारल्यानंतर ‘धर्मनिरपेक्षतेचे’ ढोल उगाच आम्ही बडवित आहोत.परवा नागपूरात एका श्रेष्ठ साहित्यिकाने सरस्वतीची प्रतिमा व्यासपीठावर असल्याने आपण पुरस्कार स्विकारणार नाही,अशी भूमिका घेतली. साहित्यातील योगदानाचा गौरव करणारा पुरस्कार असल्याने ‘प्रतिकांमध्ये’ त्या महान साहित्यिकाने अडकून पडायला नको होते,पुरस्कार घ्यायला हवा होता.असा आग्रही युक्तीवाद ‘पुरस्कार वापसी’ वादंगानंतर साहित्य संस्थेशी संबंधित पदाधिकारी व कार्यकत्यांकडून होत आहे.तर दुस-या बाजूने आपण आयुष्यभर विद्येच्या प्रतिकांविरोधात भूमिका घेतल्याने आपल्याला अश्या व्यासपीठावरून पुरस्कार घेणे संयुक्तिक वाटले नाही,अशी संदिग्ध भूमिका सत्कारमुर्तींकडून मांडण्यात आली.वास्तविक संबंधित साहित्य संस्थेला आपण पुरस्कार घेण्यास तयार आहोत असे लेखी अभिवचन देऊन वेळेवर पुरस्कारास नकार दिल्याने कुठेतरी वैचारिक गोंधळ उडाला आहे की काय? अशी साहित्यप्रेमींच्या मनात शंका निर्माण झाली आहे.आपला देश लोकशाहीप्रधान असल्याने प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आणि स्वातंत्र्य आहे.या घटनाक्रमातून कुठे काही चुकतंय काय?याची पुसटशी शंका मराठी मनात उमटली आहे.आमचा वैचारिक गोंधळच आजपर्यंत स्वामी विवेकानंद,स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजून घेण्यात कमी पडला आहे.भारतीय जसे बोलतात तसे वागत नाहीत.एकीकडे धर्माचा पुरस्कार करतात,तेव्हाच दांभिकतेलाच धर्म समजून ढोंगाची पुजा बांधतात.जयंत नारळीकर समाजसुधारक नसले तरी त्यांनी समाजाला विज्ञानदृष्टी देण्याचे महानकार्य केले आहे.नारळीकरांनी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला मात्र आपण नारळीकरांना स्विकारले काय? या प्रश्नाचे उत्तर शोधाल तर हाती निराशा येईल.आपण सगळे आपल्या प्राचीन संस्कृतीशी नातं सांगतो.मात्र कालबाह्य गोष्टींना एका फटक्यात तोडण्याची आमची तयारी नसते.तशी अपेक्षाही आपण करीत नाही.भारतीय तत्वज्ञानाने विज्ञानाचा पुरस्कारच नव्हे तर आग्रह धरलेला असतांना आपले वर्तन बघितले तर आपण कुठे निघालो आहोत याचा विचार करणे भाग पडते.पतंजलींच्या ग्रंथातून आयुर्वेदाचा खजिना आमच्याकडे असल्याने आम्ही विज्ञानवादी आहोत,एवढं सांगण्याचा हक्क आम्हाला मिळतो.परंतु आमच्या चालीरिती आणि तथाकथित परंपरा पतंजली सूत्रविरोधात आहेत,असं म्हणण्याचं धाडस कोणीतरी करायला हवे.वास्तविक भारतीय संस्कृतीचे पोवाडे गाणारे आपण सारे पक्के ढोंगी व दांभिक आहोत याची प्रचिती वारंवार येत असते.
अलिकडे करोना महामारीने विश्वाची अवैज्ञानिक दृष्टी समोर आली आहे.आजचे जग आधुनिक असले तरी विज्ञाननिष्ठ नाही,या वास्तवाला आपण सामोरे गेलो आहोत.करोनाचा प्रकोप वाढला आणि हजारोंचा बळी जात असतांना अमेरिकेतील तथाकथित बुद्धिवादी साधी ‘मुखपट्टी’ लावायला तयार नव्हते.हिच परिस्थिती युरोपातही!जगभराचा अंदाज घेतला तर करोना संकटात आपण विज्ञानावर भरवसा ठेवून आपले किती आचरण करतो,याचा पदोपदी अनुभव आला.भारतात यापेक्षा वेगळे काय होते?आपल्या देशात करोनाचा शिरकाव झाला तेव्हा व नंतर करोनाचा फैलाव वाढला तेव्हाही अनेक विद्वान करोना हा भ्रम असल्याचे छातीठोकपणे सांगत सुटले. दुर्देवाने ज्या कथित वैद्यकीय तज्ञांनी करोनाची भिती ‘षडयंत्र’ असल्याचे म्हटले होते,त्यांचाही या महामारीत बळी गेला आहे.
आपल्या देशात अंधश्रद्धेचे थैमान करोनापेक्षा भयानक आहे.चॅनल्सवरून देशभर भरभरून वाहणारे बाबांचे दरबार बघितले की,भारतीयांची ‘ढोंगी’ याच एकाच शब्दात ओळख होऊ शकते.आपल्या देशात निरक्षरता जेवढे नुकसान करीत नाही त्यापेक्षा कितीतरी पट अंधश्रद्धा समाजाला विकलांग करीत आहे.करोनाच्या आपत्तीत धर्माचरणाची उर्मी असणा-या तथाकथित भक्त आणि बाबांनी करोना लस तयार करण्याचे कौशल्य अंगी बाळगले असते तर समस्त मानवजात त्यांची आभारी राहिली असती.ईश्वर सर्वत्र आहे,हा सर्वधर्मियांच्या प्रवक्तांचा संदेश समाजातील सर्व धर्माचे ठेकेदार सोयीस्करपणे विसरतात.धार्मिकता आणि आध्यात्म या दोन्ही गोष्टी परस्परसुसंगत असायला हव्यात.मात्र अलिकडच्या शतकात दोन्ही गोष्टी केवळ भिन्नच नव्हे तर ऐकमेकांच्या अस्तित्वाला शह देणा-या ठरत आहे.विज्ञानाच्या प्रसारातून मानवी हित साधल्या जाऊ शकते,ही गोष्ट भारतीयांना मान्य आहे.मात्र भौतिक सुख प्राप्तीसाठी आम्हाला विज्ञान हवे आहे,जीवनचरणासाठी नव्हे!
आपल्या देशात अनेक अनिष्ठ रूढी-परंपरांनी मानवी जीवन गोंधळाचे आणि असह्य केले आहे.समाजाच्या अंधश्रद्धापुरक वर्तनाचा वाईट परिणाम सर्वाधिक भारतीय स्त्री भोगत आहे. देशातील सर्व धर्मियांमधिल स्त्री अवैज्ञानिक विचाराची कायम बळी ठरली आहे.या सगळ्या मुद्द्यांवर सकलपणे विचार होऊन येणा-या प्रत्येक पीढीसाठी ‘आत्मनिर्भर’ भारतात अंधश्रद्धा निर्मुलनासोबत ‘विज्ञाननिष्ठ’ समाज आम्हाला घडवावा लागेल.
परवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुण्यात जयंत नारळीकरांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.सत्काराच्या वेळी बोलतांना नारळीकर म्हणाले,युवकांच्या मनात विज्ञानाविषयी ओढ निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेल.हा नारळीकरांचा ‘प्रयत्नवाद ‘ नव्याने सफल होईल काय? याकडे समाजाचे लक्ष लागलेले असेल.

9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments