Home ताज्या घडामोडी शिक्षण क्षेत्रातील नैतिक अध:पतनाला आम्हीच जबाबदार!

शिक्षण क्षेत्रातील नैतिक अध:पतनाला आम्हीच जबाबदार!

 

 

 डॉ. पवन मांडवकर

जुन्या कागदपत्रांमध्ये 35 वर्षांपूर्वीचे निळ्या रंगाचे चार आण्यांचे एक आंतरदेशीय पत्र सापडले. मा. लेखाधिकारी (अनुदान) यांच्याकडून ते आले होते. मजकूर होता, ‘आपल्या महाविद्यालयाच्या वार्षिक अनुदान तपासणीसाठी मी 25 मार्च रोजी सकाळी एस.टी.ने येत असून आपल्या गावी रिक्षाची सोय नसल्याने व सोबत दप्तर असल्याने बसस्थानकावर एखाद्या शिपायाला पाठविल्यास मी आपला आभारी राहीन.’

मला आठवतं, सगळ्या तपासण्या दरवर्षी नियमित व्हायच्या. येणारा शासकीय अधिकारी एस.टी.ने वेळेवर पोचायचा. आमचा बाबू त्याची जुनी लुना घेऊन बसची वाट बघत आधीच तिथे हजर असायचा. त्या लुनाला मधून मधून पायडल मारत कच्च्या रस्त्यांवरून तपासणी अधिकाऱ्याला बाबू महाविद्यालयात आणायचा. परिसरातील रानटी फुलांचा गुच्छ तयार करून त्याचे स्वागत करायला 2-3 प्राध्यापक तयार असायचे. अधिकाऱ्याने घरून डबा आणलेला असायचा. चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत ‘मी तपासणी अधिकारी आहे’ याची जाणीव करून द्यायचा. एवढेच काय त्याचे शस्त्र असायचे. सायंकाळपर्यंत तो एकटाच तपासणी करायचा. शिक्षक व कर्मचारी तो असेपर्यंत त्याच्या कामाकडे एकटक बघत अदबीने उभे असायचे. लेखापरीक्षण करताना कुठे काही चुकले असेल तर तिथेच दुरुस्त्या करायला लावायचा. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करायचा. काम लवकर आटोपले तर पुढच्या तपासणीच्या गावी रवाना व्हायचा नाहीतर टिनाच्या वर्गखोलीत रात्री मुक्काम करून सकाळची पहिली बस पकडायचा.

बहुतेक अधिकारी असेच प्रामाणिक व कार्यतत्पर असायचे, मग ते विद्यापीठातील असोत की सहसंचालक किंवा उपसंचालक कार्यालयातील. जुन्या आठवणींना उजाळा देणारी पिढी आता निवृत्त झाली आहे. काळ बदलत गेला. पोस्टकार्डापासून तर फोन, मोबाईल, इंटरनेटपर्यंत प्रवास झाला आणि ‘तात्काळ माहिती द्या’ ची भाषा सुरू झाली. शिक्षणाची जबाबदारी सरकारची परंतु सरकारला हे सर्व चालविणे शक्य न झाल्याने खाजगी शाळा-महाविद्यालयांची निर्मिती झाली. शिक्षणाला पवित्र क्षेत्र मानून शिक्षणालाच महत्त्व देणाऱ्यांची जुनी पिढी लयास जाऊन त्यातील राजकीय प्रवेशाने शिक्षण क्षेत्र नासून गेले. संस्था उघडून त्याचे व्यावसायीकरण होण्यापर्यंतच्या प्रवासात शासकीय, प्रशासकीय आणि राजकीय टप्पे अर्थकारणाने भरून गेले. बौद्धिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांऐवजी आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवाराची निवड हे समीकरण उदयास आले. ‘पदभरतीवर बंदी’ हे एक टप्प्याटप्प्याने किंवा निवडणुकांपूर्वी गरजेप्रमाणे उघडावयाच्या तिजोरीचा भाग आहे, हे गेल्या काही वर्षातील भरतीच्या निमित्ताने सामान्य जनतेलाही कळून चुकले आहे. आज सर्वच क्षेत्रात प्रत्येक टप्प्यावर केवळ अर्थकारण भरले आहे हे मान्य; परंतु ज्या क्षेत्रातील प्रत्येक बाब देवीदेवता किंवा महापुरुषांच्या नावाने आपण आरंभ करतो, त्या पवित्र शिक्षण क्षेत्राला नैतिकदृष्ट्या अध:पतनाच्या मार्गावर कोणी आणले, असा प्रश्न जर कोणी केला, तर ते बोट आपल्याचकडे परत परत फिरून दाखविले जात आहे. आपण प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापकच त्याला जबाबदार आहोत; कारण ज्या पिढीचे अध:पतन झाले आहे, ती आपणच घडविलेली आहे.

वर्गावर्गातून बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून शिकवणारे शिक्षक, प्राध्यापक आज कुठे लुप्त झाले? एखाद्या जीव तोडून शिकविणाऱ्या प्राध्यापकाच्या तासिकेला अन्य महाविद्यालयातील विद्यार्थीही शिक्षण ग्रहण करण्यासाठी येऊन बसायचे, तो काळ आता संपला. मोबाईल संस्कृतीने अशा शिक्षकांचाही बळी घेतला. उत्तम शिकविणारा शिक्षक, विद्यार्थी घडविणारा शिक्षक, विनामूल्य शिकवणी घेणारा शिक्षक आणि आपला विद्यार्थी खरंच अभ्यास करतो आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी त्याच्या गावी, त्याच्या घरी अचानक भेट देणारा शिक्षक आज दिसेनासा झाला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संबंध असणारी, त्याच्या सुखदु:खाशी निगडित राहून त्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यापर्यंतच्या प्रवासात त्याला घडविणारी, खऱ्या अर्थाने गुरूस्थानी पुजली जाणारी शिक्षकी पिढीच नष्ट झाली आहे.

पदभरतीसाठी ठरावीक रक्कम दिली म्हणजे आपण सेवानिवृत्तीपर्यंत काही न करताही वेतनाचे हक्कदार झालो, अशी भावना नवनियुक्तांमध्ये निर्माण होत चालली आहे. पदनिश्चिती, रिक्त पदांचा आढावा, बिंदू नामावली, उपसंचालक कार्यालय, विद्यापीठ व आयुक्त कार्यालय मागासवर्ग कक्ष, आरक्षण निर्धारण, प्रत्येक टप्प्यावरील ना हरकत प्रमाणपत्रांची आडकाठी आणि पदाच्या जाहिरातीच्या प्रक्रियेपासून तर निवड समिती, मुलाखती, पदभरती, शिक्षक मान्यता, वेतन सुरू करण्यासाठी दिले जाणारे ना हरकत प्रमाणपत्र, लेखाधिकाऱ्यांची मान्यता आणि प्रत्यक्षात शालार्थ, सेवार्थमधील नोंद आणि हातात येणारे वेतन या सर्व प्रक्रियेत शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य आणि उमेदवारांसह नवनियुक्तांना अर्थकारणालाच प्राधान्य द्यावे लागते. यात काही मंडळी अपवाद आहेत. आजही अनेक व्यक्ती अशा आहेत, की कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपले काम प्रामाणिकपणे करतात. परंतु या चक्रामध्ये भले भले विनाकारण ओढले जातात आणि जो या चक्रापासून दूर राहू इच्छितो, तो बाहेर फेकला जातो. एकदा का विनाकष्टांच्या अर्थप्राप्तीची सवय लागली की ती कर्करोगासारखी असते. कितीही उपचार केले तरी त्यातून बाहेर पडणे कठीण जाते.

गेल्या 35 वर्षांमध्ये असे अनेक अधिकारी, कर्मचारी बघितले की जे कधीही अर्थकारणाच्या मागे लागले नाहीत. 20 वर्षांपूर्वी सहसंचालक कार्यालयातील एका शिपायाच्या ह्दयावर शस्त्रक्रिया करायची होती. विभागातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तत्कालीन सहसंचालकांनी एक पत्र पाठवून मदतीची अपेक्षा केली होती. बहुतांश महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या परीने स्वखुषीने आर्थिक मदत केली होती. त्या शिपायाची शस्त्रक्रिया, औषधोपचार सर्व व्यवस्थित झाले. पुढे त्याला पदोन्नती मिळाली. आयुष्यभर त्याने सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या ह्दयात स्थान दिले. आज तशी माणसेही नाहीत आणि असा प्रसंग आला तर कोणापुढे मदतीची गरजही पडत नाही कारण त्यापेक्षा अधिक कमाई अन्य मार्गाने होते आहे, ही शोकांतिका आहे.

तो काळ आठवतो. एखादे वैद्यकीय बिल मंजुरीच्या पत्रासाठी चार आण्याच्या कांडीच्या पेनाची अपेक्षा करणारा तो कर्मचारीही आणि वेतन बिल सादर करताना दुपारच्या जेवणाच्या सुटीमध्ये चहा नाश्त्याची मागणी करणाऱ्यांचे चेहरेही आठवतात. त्या काळात त्यांना पेन किंवा चहानाश्ता देणे हे योग्य होते की तो गैरमार्गाच्या निर्मितीचा प्रारंभबिंदू होता, हे कोडे अजूनही सुटत नाही.

आज व्यवस्थित कामातही आडकाठी घालण्याची संस्कृती निर्माण झाली आहे. सरळ मार्गाने होणाऱ्या कामासाठी अनेक टेबलवरून तुमची फाईल जाते आणि प्रत्येक टेबल हा अपेक्षेने लाळ घोटत असतो. टेबल मिळविण्यासाठी बोली लागते. कमाईचा टेबल हा शब्दप्रयोग आता सर्रास होऊ लागला आहे. त्यातून अनेकदा अशा कार्यालयांमध्ये 2-3 गट पडतात. या साखळीमध्ये सर्व सामील होतात. गटांकडून कामे तोंडाने मागितली जातात. ‘आम्ही आपले काम कमी वेळात व कमी रकमेत करून देतो’, अशी जाहिरात केली जाते. एकदा फाईल आली की कोणतीही तृटी न निघता साहेबांची सही होऊनच मिळण्याची शाश्वती दिली जाते. साहेबांपासून कोणत्या टेबलवरील कोणाचा किती हिस्सा आहे, याचे तक्तेही पटवून दिले जातात. जो या प्रणालीतून न जाता प्रामाणिक मार्ग स्वीकारतो, तो प्रकियेच्या बाहेर फेकला जातो. त्याचे काम होत नाही.

इतक्या प्रदीर्घ कालावधीत अनेक चांगले अधिकारी आणि कर्मचारी बघितले आणि आजही त्यांचे स्थान ह्दयात कायम आहे. संगणकाचा शोध लागला आणि महाविद्यालयात एक संगणक घेतल्या गेला; पण तो चालवता कोणालाच येत नव्हता. प्लेसमेंटसाठी मा. सहसंचालक आले होते. ‘टाईपरायटरवर टाईप करण्यापेक्षा संगणकावर प्रोफार्मा भरा’, अशी सूचना त्यांनी दिली. आमची अडचण सांगितल्यावर स्वत: सहसंचालकांनी संगणकावर प्रोफार्मा टाईप केला आणि प्रिंट काढून त्यावर त्यांच्या बॅगमधून शिक्का काढून स्वत: मारून दिला व तिथेच सही केली. सोबत आमच्या लिपिकाला शहरात जाऊन लवकर संगणक प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. पुढच्याच महिन्यात पदोन्नतीनंतरचे वेतनही एक नवा पैसाही खर्च न करता सुरू झाले. माझ्या त्या पहिल्या प्लेसमेंटचा तो प्रोफार्मा सहसंचालकांनी टाईप केला आहे, हे आजच्या पिढीला सांगितले तर तोंडात बोटे घालतात. पुढे तो भला माणूस संचालक झाला. असे अनेक अधिकारी, संचालक, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांचेही किस्से आहेत, ज्यांनी ‘माणूस’ म्हणून ह्दयात स्थान मिळवले.

त्याउलट आर्थिक व्यवहारासंबंधी भांडणे करीत त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसमोर झालेल्या कुस्त्याही बघितल्या. बदल्याही बघितल्या आणि पुन्हा वरच्या पातळीवर व्यवहार करून त्याच कार्यालयात तोच टेबल हस्तगत करणारे कर्मचारी-अधिकारीही बघितले. अधिकाऱ्यांच्या थोबाडीत मारून आपला राग व्यक्त करणारे कर्मचारीही बघितले, त्यांच्या आयुष्याची अखेरही बघितली आणि ‘शेवटी तुम्हीही गैरमार्गावर चालणाऱ्यांच्या मार्फत कामे करून घ्यायला लागले’ म्हणून तिथल्या प्रामाणिक ड्रायव्हरचे चार शब्दही ऐकले.

अनेक प्रामाणिक अधिकारीही बघितले ज्यांना विसरता येणार नाही. ‘माणूस’ म्हणून जगायचे आणि हे कार्यालय शासन आणि शिक्षक किंवा कर्मचारी यांच्यामधील दुवा आहे, ही मूळ भावना जपत काम करायचे. तो काळ आज संपुष्टात आला आहे. प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी यांना आज जुन्या पाचशेच्या नोटांप्रमाणे कोणतीच किंमत नाही. कालपरवापर्यंत प्रामाणिकपणे कौतुकास्पद काम करणाऱ्या त्या रुबाबदार तरुण कर्मचाऱ्यांचीही नैतिकता संपुष्टात यावी आणि पाकीट संस्कृतीसोबत सायंकाळच्या पार्ट्यांना प्राधान्य देतानाच या अल्पवयात स्वत:च्या शरीरासोबत मनाचीही अशी अध:पतित अवस्था त्यांनी करून घ्यावी, हे वेदनादायी आहे. कठीण परिस्थितीतून, गरिबीतून अभ्यास करून वर आलेले आणि बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक स्पर्धापरीक्षाही उत्तीर्ण होत नावलौकिक कमविणारे उच्चपदस्थ अधिकारीही या ‘सिस्टिम’चे बळी ठरावे, हे अधिक क्लेषकारक आहे.

कॅससाठी पात्रता नसतानाही कागदपत्रात बसवून पदोन्नती घेणारे आणि देणारेही आपणच आहोत. समितीच्या निमित्ताने खऱ्या गुणवत्तेकडे डोळेझाक करून सह्या करीत पाकीटस्पर्श करणारेही आपणच आहोत. कारण गाडीच्या भाङ्याचे असो की जेवणाचे, समोरच्याचे वेतन प्लेसमेंटनंतर किती वाढणार याची गणिते त्याला समजावणारे आपणच आहोत. प्लेसमेंटनतर दोनही कार्यालयांची मान्यता मिळवणारे, मिळवून देणारे, वेतन सुरू करण्याची प्रक्रिया करणारे, करून देणारे आणि व्हॉट्सअप गृपवर अभिनंदनाचे संदेश पाठविणारेही आपणच आहोत. प्रत्येक टेबलवर वजन लावत लावत आपल्या सहकाऱ्यांप्रमाणेच आपलेही किती नैतिक अध:पतन झाले आहे, हे आपल्यालाही कळले नाही. अशात प्रामाणिक आणि मेहनती शिक्षकांचा निष्कारण बळी जातो. इच्छा नसतानाही या दुर्दैवी पद्धतीचा त्यांना भाग बनावे लागते. ते उत्तम शिक्षक असतात. आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे पार पाडतात. संशोधनात आणि अन्य सर्वच बाबतीत त्यांचे गुण कापण्याची संधी उपलब्ध नसतानाही त्यांना पदोन्नतीसाठी या विचित्र कार्यपद्धतीतून प्रत्येक ठिकाणी रंगीत कागदाचे वजन लावावे लागते. अन्यथा त्यांची फाईल प्रदीर्घ काळासाठी धूळखात पडली राहते व क्वचित त्यांचे सेवापुस्तकही गहाळ होते. नाइलाजास्तव अशी गांधीवादी विचारसरणीची माणसे मग या ‘सिस्टिम’मध्ये खेचल्या जातात, भरडली जातात.

प्रश्न हाच उभा राहतो की पुढच्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना आपण कोणते धडे देत आहोत? हा ‘सिस्टिम’चा दोष आहे, हे सर्वच म्हणतात, पण किमान शिक्षकी पेशाने तरी ही कुबडी घेऊ नये, अशी अपेक्षा असते. ज्या शिक्षकांवर समाज घडविण्याची जबाबदारी आहे, तेच जर नैतिकदृष्‍ट्या अध:पतित होत असतील तर शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तरी दोष का द्यायचा? त्यांना शाळा-महाविद्यालयांतून पुस्तकी शिक्षणाचे धडे देणारे आपणच आहोत; पण तो ‘सिलॅबस’ पूर्ण करताना त्यांना ‘माणूस’ म्हणून जगण्यास आपल्याला शिकवता आले नाही, नैतिक मूल्ये आणि सुसंस्कारांची बीजे आपल्याला त्यांच्यात रुजविता आली नाहीत, हा आपला दोष आहे. म्हणूनच चांगले, प्रामाणिक, कर्तव्यतत्पर राजकारणी, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी आपण घडवू शकलो नाहीत.

असं म्हणतात, गैरमार्गाने किंवा पापातून कमविलेला पैसा पचत नाही. तो आजारपण काढतो किंवा अन्य मार्गाने निघून जातो. आज किती कमाई झाली, हे घरी जाऊन बायकोमुलांपासून लपवून मोजणारे त्यांच्या परिवाराला कितीही ऐश्वर्याच्या गाद्यांवर लोळवत असतील तरी त्या राजमहालात सुखाची झोप मात्र हरवून बसतात. खऱ्या कौटुंबिक सुखापासून वंचित होतात आणि त्याउलट प्रामाणिक कष्टांतून कमविलेला रुपयासुद्धा आपल्या अंगावर सुखी माणसाचा सदरा घालून जातो. पण सुटाबुटाच्या संस्कृतीत तो सदराच आज हरवला आहे. अजूनही त्या जुन्या एसटीतून धक्के खात येणाऱ्या आणि पायडल मारत चालणाऱ्या त्या लुनावर मागे बसून महाविद्यालयात येऊन स्वत:चा घरचा डबा खात तपासणी करून पुढच्या महाविद्यालयाचा मार्ग आक्रमिणाऱ्या आणि पाकीट संस्कृती अवगत नसलेल्या त्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा शोध घेत भिरभिरणारी माझी नजर खोल खोल होत जाते आहे, खोल खोल होत जाते आहे…..

‘शिक्षकी’ पेशा तर दूर राहिला
बाजार माझा मी आज मांडला
‘नैतिकता’ही हरवून गेली
‘माणूस’ शोधण्या मी आसुसलेला…

प्राचार्य, इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ
अध्यक्ष, अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद
माजी सैनिक
pavanmandavkar@yahoo.com
9422867658

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments