Home ताज्या घडामोडी प्रश्न तिचा!

प्रश्न तिचा!

माधव पांडे

परळीच्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीने गेल्या आठ फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली.पूजाच्या आत्महत्येला पोलिस दफ्तरी आकस्मिक मृत्यू असं नोंदविल्या गेले.पूजाच्या मृत्यूची या जगाला’ खबर’ असण्याचं काही कारण नव्हतं.मात्र चार दिवसातच पूजा चव्हाण हे नाव माध्यमांमध्ये ‘मोठी खबर ‘ठरली.आता दिवसभर पूजाच्या मृत्यूप्रकरणाचे असले -नसले सगळे पैलू प्रसारमाध्यमे रंगवून सांगत आहेत.दाखवित आहेत.पूजा चव्हाण या तरूणीची महाराष्ट्राला तिच्या मृत्यूनंतर ओळख व्हावी,हे दुर्देव! पूजाला सर्वसामान्य प्रवाहातले लोक जरी ओळखत नसले तरी ‘टिकटाॅक’च्या दुनियेतील हजारो रसिक,प्रेक्षक पूजाचे दिवाने होते.एकाअर्थी पूजा कलावंत होती.तिच्या मृत्यूने आमच्यातला एक कलावंत आम्ही गमविलाय!
पूजाच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांकडून आगळी-वेगळी चर्चा सुरू झाली.दरम्यान तब्बल अकरा-बारा ऑडिओ क्लिप बाहेर आल्यात.दोन-तीन व्यक्तींमधिल फोनवरील संभाषण या क्लिपमधून ऐकायला यायला लागलं.त्यानंतर पूजाच्या मृत्यूला कोणी तरी जबाबदार आहे,असा दबक्या आवाजातला आरोप व्हायला लागला.भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संशयित मंत्र्यांचे नाव घ्यायला सुरूवात केली.त्यानंतर माध्यमं अब्रुनुकसानीच्या दाव्याला ठोकर मारत संबंधित मंत्र्यांचा संदर्भ देत,असे कळते की….इथंपासून कथित आरोपांबाबत…इथंवर चोवीस तास बातम्या द्यायला लागलेत.महाविकास आघाडी सरकारमधिल वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आहे,असा आरोप केल्या जात आहे.अद्यापही हा आरोपच आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘तपास चालू आहे!’हे ठेवणीतलं उत्तर देऊन या विषयाच्या गांभिर्याला अधिक संशयास्पद केले.वनमंत्री संजय राठोड पूजाच्या आत्महत्येनंतर ‘नाॅट रिचेबल’ झालेत.गेली आठ दिवस या प्रकरणावर महाराष्ट्रात प्रचंड चर्चा असून या निमित्याने समाजाची’ दांभिकता’ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला कायद्याच्या नजरेतून बघायचे असेल तर पूजा,तिच्या फ्लॅटवरील विलास चव्हाण नावाचा कथित भाऊ,अरूण राठोड हा केअर टेकर कम मित्र,आणि ज्याचा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये आहे ती व्यक्ती.या चार व्यक्तीभोवती या संपूर्ण घटनाक्रम ‘गरगर ‘फिरत आहे.पूजाने मृत्यूपुर्वी कोणतीही ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली नाही.त्यामुळे पूजाची हत्या,आत्महत्या की अपघात यापैकी कोणत्याच मुद्यावर आज आपल्याला निश्चित होता येणार नाही.पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना असे सांगितले की, पोल्ट्रीफाॅर्मच्या कर्जाचे तिच्यावर टेंशन होते,त्यातून तिने आत्महत्या केली असेल,अशी शक्यता बोलून दाखविली. इंस्टाग्रामवर पूजाच्या लहान बहिणीने,पूजा आत्महत्या करूच शकत नाही.ती महाराष्ट्राची ‘वाघीण’ होती,असा दावा करून जर तिने आत्महत्या केली असेल तर तेवढंच मोठं कारणंही असेल,अशी शंका उत्पन्न करणारी सूचक पोस्ट लिहिली आहे.अरूण राठोड वनकर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.अरूणचे पोलिसांनी बयान घेतले. बयानानंतर अरूणचे घर चोरांनी फोडल्याचे वृत्त प्रकाशित झाले.विलास चव्हाण,अरूण राठोड पूजाचे नातेवाईक नाहीत,असं चव्हाण कुटुंबियातील इतर सदस्य सांगत आहेत.पूजाच्या आजी-आजोबांनी या आकस्मिक मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी,अशी मागणी केली आहे.
या प्रकरणातील घटनाक्रम दाखवितांना दर दहा मिनिटांनी प्रत्येक चॅनल एक प्रश्न विचारत आहे ,मंत्री संजय राठोड कुठेयं? हा प्रश्न विचारून होत नाही तोच, लगेच दुस-या बातमीत गुरूवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या मंदिरात समाजबांधव आणि समाज धर्मगुरूंच्या उपस्थितीत संजय राठोड आपली भूमिका मांडतील,असं सांगून मोकळे आहेत.पुन्हा अवघ्या काही मिनिटातच संजय राठोड कुठंय? असा प्रश्न लावून धरतात.

मित्रहो,पूजा चव्हाण या 22 वर्षिय तरूणीच्या आकस्मिक मृत्यूनंतर ज्या पद्धतीने समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमातून चर्चा चाललेली आहे,त्यात ‘पूजा चव्हाण ‘कुठे आहे?जिचा बळी गेला,ती कुठेयं? पूजाच्या मृत्यूला कोण जबाबदार याची चर्चा होण्याऐवजी संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी सगळी शक्ती लावल्या जात आहे.कदाचित उद्या संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला,तर पूजाला खरोखर न्याय मिळेल काय?विचार करा. कॅबिनेट मंत्री संजय राठोड ‘नाॅट रिचेबल ‘ आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रीया देतांना शिवसेना नेते,सामनाचे संपादक खा.संजय राऊत यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला,संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर का येतील? खा.संजय राऊतांच्या उत्तराने समाधानी न झालेल्या पत्रकारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्री संजय राठोड नाॅट रिचेबल असल्याबाबचा प्रश्न विचारला तेव्हा,गृहमंत्री म्हणाले, नाॅट रिचेबल असणे हा संजय राठोडांचा वैयक्तिक प्रश्न आहे.धनंजय मुंडे प्रकरणात खा.राऊत म्हणाले होते,करूणा शर्मा हा मुंडेंचा वैयक्तिक प्रश्न आहे.शरदराव पवार यांनी मुंडेना सांभाळून घेतांना फार महत्वाचे विधान केले होते.पवारसाहेब म्हणाले,बदनामी करून कोणाला आयुष्यातून उठविणे योग्य होणार नाही.पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही असंच म्हणाले,बदनामी करून कोणाला आयुष्यातून उठविणे योग्य नाही.संजय राठोड अडचणीत येत आहेत बघून राठोडांच्याच अधिपत्याखालील बंजारा समाजनेत्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची तक्रार केली.पूजाला न्याय तर मिळाला पाहिजे मात्र समाजाची बदनामी नको,अशी भूमिका बंजारा समाजातील काही नेतेमंडळी मांडतांना दिसत आहेत.
पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो…या सगळ्यात पूजा कुठेयं?तिच्या प्रश्नांवर आपण सगळे गप्प कसे? मुग गिळून का बसलो आहोत? प्रश्न विचारा स्वतःला.कदाचित आपल्याला ‘नैतिकता’ हा शब्द उच्चारण्याची लाज वाटू शकते.
एका तरूण मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो.ही घटना अनेकांच्या नजरेत सामान्य आहे.देशात अनेक तरूण मुलींचे संशयास्पद मृत्यू होतात.एका रिपोर्ट नुसार,भारतात दर 59 मिनिटांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, प्रत्येक 34 मिनिटात वासनांध पुरूषाला ‘स्त्री’ बळी पडते,बलात्काराची शिकार होते.प्रत्येक 12 व्या मिनिटाला एका महिलेला शारीरिक अत्याचाराला तोंड द्यावे लागते.आमच्या देशात स्त्रियांच्या संरक्षणासाठी तब्बल 42 कायदे आहेत.अलिकडेच महाराष्ट्राने गाजावाजा केलेला ‘शक्ती’कायदा जोडला तर 43 कायदे पूजाला वाचवू शकले नाहीत.करूणा शर्माला अपहरण केलेली तिची पोटची मुलं तिला भेटू शकली नाहीत.एवढ्यावरच या 43 कायद्याची उपयुक्तता थांबली नाही तर याच स्त्री संरक्षणाच्या 43 कायद्याने रेणु शर्माला ‘विवेकबुद्धी’ प्रदान केली,त्यातून तिने मंत्र्याविरोधातील बलात्काराची तक्रार सामंजस्यपणे मागे घेतली.

देशाच्या संसदेपासून,ग्रामपंचायती पर्यंत सर्वत्र,सर्वदूर ‘संजय’ आहेत.
कोणा- कोणाचा राजीनामा मागणार आहात तुम्ही?

या देशात स्त्रियांच्या प्रश्नांवर कोणीच का बोलत नाही.स्त्री हा प्रत्येक पुरूषाचा ‘वैयक्तिक प्रश्न’ आहे.कधी काळी राजे-महाराजांची खाजगी मालमत्ता,शतकानुशतके पुरूषांची जहाँगिरी,नरासाठी उपभोगाची वस्तू…मृत्यूनंतर पूजा कशी वाईट होती,तिच्या चारित्र्यावरही या पुरूषी समाजाने आपल्या बरबटलेल्या हाताने शिंतोडे उडविले.
पाच मुलींचा हतबल बाप पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे कारण ‘कर्ज’ सांगत असेल,तर त्याचे काही चुकत आहे काय?या समाजात मुली जन्माला आल्यात की,बाप कर्जबाजारीच होणार!कधी चारित्र्याचं,कधी सुरक्षिततेचं कर्ज!! आपल्या देशात मुलीच्या बापावर समाजाचं ॠण नसतं,असतं कर्ज!!
पाच मुलींचा बापही कुठेतरी वंशाचा दिवाच शोधत होता ना…पुन्हा एकदा एका पुरूषाच्या जन्माची तो वाट बघत असेल ना…आणि पूजा सारख्या वाघिणीने समाजासमोर डरकाळी फोडली,बापाला पोटापाण्यासाठी कर्ज काढून व्यवसाय उभा करून दिला.तरी बाप समाजाच्या कर्जातून म्हणतो,ती कर्जाने गेली…

प्रश्न ‘तिचा ‘आहे.हा समाज जोवर ‘तिचा’ विचार करणार नाही,तोवर पूजाला न्याय मिळणार नाही.

जाता जाता- समाजातील प्रत्येकच संवेदनशिल व्यक्तीला पूजाच्या आकस्मिक मृत्यूचं प्रचंड दु:ख झालं आहे.तिच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांची पक्ष,सरकार,सत्ता सांभाळणारी वक्तव्ये बघितली,वाचली की, आपण सगळे पूजाच्या अगदी जवळ जातो.तिच्या बद्दल मनात विलक्षण सहानुभूती निर्माण होते. कधी न बघितलेली पूजा तुमच्या- माझ्या घरातली एक सदस्य होऊन जाते.मनात घर करून बसते.हा लेख मी 16 फेब्रुवारीला लिहायला घेतलाय. राज्याचे लोकप्रिय गृहमंत्री राहिलेले, राष्ट्रवादीचे नेते स्व: आर.आर.पाटील’आबा’ यांचा आज पुण्यस्मरण दिवस.मुंबईतील डान्सबार बंद करून ‘बारबालांच्या’ही सन्मानपूर्वक जगण्याचा विचार करणारे आबा कुठे आणि आत्ताचे आमचे नेते कुठे?

16 फेब्रुवारी 2015ला आबा या जगाला सोडून गेलेत.कदाचित या राज्याची नैतिकता,स्त्रीदाक्षिण्य आणि महिलांचा सन्मान,सुरक्षाही ते घेऊ गेले असावेत… म्हणून तर आता विद्यमान राज्यकर्त्यांकडे यातलं काही नाही!


9823023003
madhavpande101@gmail.com

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments