वाघीण

माधव पांडे

अखेर रविवारी राज्याचे वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.8 फेब्रुवारीला पुण्यात पूजा चव्हाण या तरूणीचा अकस्मात मृत्यू झाला.पूजाच्या मृत्यूपश्चात सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स् व्हायरल झाल्यात. पूजाच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक फोटोही समाजमाध्यमांतून लोकांपर्यंत झपाट्याने पोहचले.लोकांमध्ये वेगाने उमटत जाणा-या प्रतिक्रीयांचा अंदाज घेत राज्यातला विरोधी पक्ष भाजप सावध भूमिका घेतांना दिसला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वप्रथम या गुढ प्रकरणाच्या फुग्याला टाचणी लावली.ठाकरे सरकार ‘ राठोडगिरी’ खपवून घेणार काय? अशी सूचक मात्र उपरोधिक टिका आमदार भातखळकरांनी केली.पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात ‘राठोडगिरी’ हा शब्द भातखळकरांनी माध्यमांना दिल्यावर प्रसारमाध्यमे खुली झालीत.तरीही कोणी थेट बोलत नव्हतं.राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर थेट आरोप करण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती.तेव्हा या प्रकरणातला ‘ सन्नाटा ‘ भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तोडला.12फेब्रुवारीला चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केलेत.पोलिसांनी स्यु – मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोडवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.इतकं बोलून चित्रा वाघ थांबल्या नाहीत,त्या म्हणाल्या” संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा! “
चित्रा वाघ वनमंत्र्यांसमोर थेट ‘वाघीणी’ सारख्या लढायला सिद्ध झाल्यात.वाघांचा पक्ष समजल्या जाणा-या ‘ शिवसेनेलाही’ त्यांनी ललकारलं.25 फेब्रुवारीला पुण्यात झंझावाती पत्रकार परिषद घेतली.महिलांचा प्रश्न कसा लावून धरायचा,याचा वस्तूपाठच त्या पत्रकार परिषदेतून चित्रा वाघ यांनी महिलांना घालून दिला.
त्यानंतर अवघ्या दोन दिवसात 27 फेब्रुवारीला नाशिकला पत्रकार परिषद घेऊन संजय राठोडांच्या राजीनामा पत्रावरील ओळीच लिहायला घेतल्यात.चित्रा वाघ यांची नाशिकची पत्रकार परिषद ही एका राजकीय नेत्याची पत्रकार परिषद नव्हती.या पत्रकार परिषदेतील चित्रा वाघ यांच्या प्रत्येक वाक्याकडे जरा बारकाईने बघा.सगळं समजेल. चित्रा वाघ यांच्या स्पष्ट,पारदर्शक,आग्रही तरीही तारतम्य ठेवलेल्या झंझावाती वक्तव्याने राज्य शासन हादरले.त्यानंतर लगेच काही तासात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली.वनमंत्र्यांचा राजीनामा स्विकारल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिल्यावर “वाघीणीने वनमंत्र्याचा फडशा पाडला! ” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रीया जनतेतून आली.लोकांच्या नजरेत चित्रा वाघ नामसाधर्म्याने नव्हे तर कतृत्वाने ‘वाघीण’ सिद्ध झाल्यात.त्यांच्या राजकीय प्रवासाची रेषा आता अधिक ताकदीची झाली आहे.

मित्रहो,
वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यायला भाग पाडणा-या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे अभिनंदन करण्यासाठी आजचा संवाद करतो आहे. चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर केलेल्या आरोपांची स्वतः जबाबदारी घेतलीआहे. किंबहूना त्यांनी जबाबदारीनेच आरोप केले असतील.कोणते आरोप केले,कसे आरोप केले,कोणत्या पुराव्याच्या आधारे केलेत याची चर्चा करण्यासाठी हा संवाद निश्चितच नाही.मंत्री संजय राठोड राजकारणी आहेत तर चित्रा वाघ राजकीय पक्षाच्या पदाधिकारी!त्यामुळे या प्रकरणात बोलल्या गेलेले सगळेच खरे असेल,असा दावा करता येणार नाही.भाजपने आखलेल्या व्युहरचनेला अंतिमतः चित्रा वाघ यांनी यशस्वी केले.शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन दाखविला. मंत्री राठोडांचा राजीनामा भाजपसाठी मोठे यश आहे.मात्र शिवसेनेचा ‘ गेम ‘ करता आला,याचा भाजपला निश्चितच अधिक आनंद आहे.राजकारणात असे ‘गेम’ होणारच!या सगळ्या घटनाक्रमाकडे तटस्थ होवून बघा.अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.कोणी कितीही ‘ चाणक्य ‘ असल्याचा दावा करो,परिस्थिती अनेकांना जमिनीवर आणते.

राजकारणातील कटकारस्थानांची चर्चा तर होत राहिल.मात्र महाविकास आघाडीतील मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा मंत्री बदनामीसह मंत्रिमंडळातून हद्दपार करणं सोपं काम नाही.चित्रा वाघ यांना जमलं.इतकं अवघड काम कसं साधलं? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत दिलं.वीस वर्षे राष्ट्रवादीत साहेबांच्या तालिमीत आपण तयार झालो आहोत अशी कबुली देत शरद पवार आपले बाप असल्याचा दावा केल्याने दुस-याच दिवशी राठोडांचा राजीनामा झाला असावा,असा अंदाज व्यक्त होत आहे.कदाचित असं झालंही असेल.मात्र सगळं विसरा.लक्षात घ्या,राष्ट्रवादीचं दूध प्यायलेली ‘ वाघीण ‘ आता शिवसेनेला भारी पडत आहे. राजकारण्यांचा ‘डाव’ असा असतो.महाराष्ट्र बघतो आहे.

नाशिकच्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतांना चित्रा वाघ यांचे शब्द पुन्हा एकदा जरा काळजीपूर्वक ऐका.सभ्यता,सुसंस्कृतपणा यासोबत प्रसंगाचेभान व राजकीय चातुर्य त्यांनी इतकं चपखलपणे दाखविलं की,क्षणार्धात अनेकांना असे वाटले की,राज्यातील महिलांचा बुलंद आवाज यापुढे चित्रा वाघ असतील.शब्दांचा अत्यंत संयमाने तरीही विलक्षण ताकदीने वापर कसा केला पाहिजे,हे जगाला त्या पत्रकार परिषदेतून दिसले.प्रत्येक शब्दात ‘ प्रहार ‘होता मात्र टार्गेट फिक्स!

महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नांसाठी मृणाल गोरे,प्रमिला दंडवते,अहिल्या रांगणेकर यांनी अनेक दशके रान उठविले.नंतरच्या काळात या रणरागिणींचा आवाज क्षीण झाला.
2019च्या एका सर्व्हेनुसार राज्यात सर्वाधिक लोकप्रिय महिला नेत्यांमध्ये खा. सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे,खा.प्रीतम मुंडे,कांचन कुल,आ.नीलम गो-हे,आ.प्रणिती शिंदे,मंत्री यशोमती ठाकूर,रूपाली चाकणकर,आ.अदिती तटकरे आणि चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती.संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ महिला नेत्यांमध्ये अग्रस्थानी आल्याअसून राज्यातील घरा-घरात त्या पोहचल्या आहेत. त्यांच्यातील आक्रमकता महिलांना बळ देणारी आहे.

महिलांच्या प्रश्नांवर समाज कायम उदासीन आहे . बहुतांश प्रकरणात स्त्रियांवर अत्याचार करणारा नराधम पुरूष लपविल्या जातो.समाजाची सगळी सूत्रे पुरूषांच्या हातात एकवटलीअसल्याने स्त्रीयांना न्याय देणारी व्यवस्था ‘ पुरूषी’ हातात बंदिस्त आहे. आपण माणूस म्हणून विचार करणार असू तर आज राज्यातील राजकीय पक्षांकडे एकदा नजर टाका.महाविकास आघाडीकडे बघा.सत्तेची सूत्र,सत्तेचे चाणक्य,सत्तेचे दावेदार…सगळेच तर पुरूष आहेत.अशा कोंडलेल्या वातावरणात,भयाच्या जंगलात एक वाघीण आपली ‘गगणभेदी’ गर्जना करीत आहे ही गोष्ट हा पुरूषी समाज पचवू शकत नाही.

12 फेब्रुवारीला चित्रा वाघ यांनी राठोडांचे थेट नाव घेतल्यावर राज्यातील गृहखाते जागे झाले.चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर 5 जुलै 2016 च्या प्रकरणी 12 फेब्रुवारी 2021 ला गुन्हा दाखल झाला.पतीवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर चित्रा वाघ आता घरात बसतील अशी सरकारची अपेक्षा होती.मात्र त्या लढल्या.बोलल्या आणि पेटूनही उठल्या!

समाजात स्त्री बोलते,आवाज उठविते म्हणजे पापच करीत आहे,असा समज करून घेणारी व देणारी पुरूषांची झुंड चित्रा ताईंच्या मागे लागली.चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ या दांम्पत्यांचा हातात हात घातलेला फोटो कोणी तरी विकृताने माॅर्फ केला.किशोर वाघ यांच्या जागी संजय राठोड यांचा चेहरा चिकटविला.माॅर्फ केलेला फोटो समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाला.अनेकांच्या चेह-यावर हसू फुटलं. स्त्रीच्या चारित्र्यहननाची विकृत इच्छा कोणीतरी पूर्ण करून घेतली. त्यानंतरही ‘वाघीण’ डगमगली नाही.गुरगुरत राहिली.पंजे मारत राहिली.अखेर शिकारीचा फडशा पाडूनच ती थांबली…पण शांत झाली नाही.ती आतून पेटलेली…ती राजकारणी असेलही..कदाचित सगळा अभिनय जमला असेल तिला.तरीही ती राज्यातील साडे पाच कोटी महिलांचा बुलंद आवाज झाली .

आज महिलांच्या प्रश्नांवर बोलतो कोण? पूजा चव्हाण परळीची होती.माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा.प्रीतम मुंडे या भगिणींच्या मतदारसंघातली. या प्रश्नावर थेट भिडण्याची जी संधी चित्रा वाघ यांना होती,तीच संधी पंकजा आणि खा. प्रीतम मुंडे यांना होती.काय झालं पुढे…
संजय राठोडांच्या राजीनाम्याचे श्रेय चित्रा वाघ यांना गेल्याचे दिसताच पंकजा मुंडेंना जाग आली.काल पंकजा मुंडे म्हणाल्या,धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे..लोकांना राजकारणातलं फारसं कळत नसलं तरी नेत्यांची भाषा जनता ओळखून आहे.

देशातील अर्धी लोकसंख्या महिलांची असतांना त्यांच्या प्रश्नांसाठी मुठभरही लोकं नाहीत.स्त्रीयांचे प्रश्न वेगळे आहेत.आपल्या समाज रचनेत महिलांच्या प्रश्नांना कोठेही स्थान नाही.महिला बोलत आहे,ही गोष्ट आजही समाज पचवू शकत नाही.स्त्रियांसाठी कोणीही आवाज उठविला की, त्या आवाजाला दाबून तरी टाकायचे, नाही तर वस्त्रहरण तरी करायचे!हा समाज ‘ पुरूषी ‘ आहे.समाज चालविणारी पुरूषांची टोळी कायम एका मस्तीत जगत आली आहे.कोणी न्यायी तर कोणी चाणक्यच्या भूमिकेत आहे.पण आहेत सगळे पुरूषच!ते नर आहेत म्हणून त्यांची वागणूक इतकी हिंसक आहे असं समजू नका.ते पुरूष आहेत आणि त्यांचा जयजयकार करणारा जमावही पुरूषांचाच!! या समाजाने सावित्रीला छळले,तिच्या लेकीला कसे सोडतील? तरीही’ ती ‘ वाघीण ‘ समोर येत असेल तर या जंगलातील कागदी वाघांना शेपूट टाकावेचं लागेल!!

9823023003

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments