Home Reviews परिवर्तनवादी विचारसंग्रह- सतीश जामोदकर यांचा "ओबीसींच्या बावन्नकविता"

परिवर्तनवादी विचारसंग्रह- सतीश जामोदकर यांचा “ओबीसींच्या बावन्नकविता”

प्रा.डॉ.प्रवीण बनसोड

एकोणविसाव्या शतकात सत्यशोधक चळवळीने सामाजिक जागृती घडविण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रयोग केले.त्यामध्ये वैचारिक साहित्याबरोबरच काव्य,अखंड,जलसे,शाहिरी, पोवाडे यांचा फार मोठा भाग होता.१८७७ च्या भयंकर दुष्काळावर केवळ सत्यशोधक कृष्णराव भालेकर यांनीच काव्यलेखन केले. दुष्काळाच्या परिस्थितीत विषन्न झालेल्या समाजाचे चित्रण करणारे ते एकमेव मराठी कवी आहेत.सत्यशोधक चळवळीने शेतकऱ्यांच्या शोषणाचे दर्शन पोवाडे व लावण्यांमधून घडविले.शेतकरी शेतमजुरांचे अज्ञान, दारिद्र्य,कर्ज,व्रतवैकल्ये, धर्मभोळेपणा अशी आशयसूत्रे सत्यशोधक चळवळीच्या वाड़मयातून आली आहेत. त्यामध्ये पं.धोंडीराम नामदेव कुंभार,गोपाळ बाबा वलंगकर, ज्ञानगिरी महाराज,कृष्णराव भालेकर यांनी काव्यलेखन करून समाजमन चेतविले. यांशिवाय मुकुंदराव पाटील यांनी 'कुलकर्णी लिलामृत' आणि 'शेटजी प्रताप' ही खंडकाव्य लिहून शेतकऱ्यांचे शोषण जगासमोर मांडले.त्यामुळे १८७० ते १९३० या कालखंडात मोठ्या प्रमाणात सामाजिक कविता व इतर साहित्याचे दालन खुले झाले. मराठी साहित्यविश्व सत्यशोधक साहित्यामुळे अधिक व्यापक बनले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुसंख्य शेतकरी समुदायातील मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी, माळी यांसारख्या घटकांना 'इतर मागासवर्गीय-ओबीसी' अशी संवैधानिक ओळख दिली.हजारो जातसमुहामध्ये विभागलेला मुळात कृषीकर्मे करणारा बलुतेदार 'ओबीसी' नावाच्या एका माळेत गुंफला गेला. वास्तविक ही ओबीसींच्या हक्क अधिकारांची फेरमांडणी होती.परंतु आपल्या संवैधानिक हक्क अधिकारांची पुरेशी माहिती नसल्यामुळे संवैधानिक हक्क अधिकारापासून वंचित राहिलेल्या 'ओबीसी'

अजूनही काल्पनिक विश्र्वातच जगतो,ही बाब सामाजिक भान असलेल्या कवी सतीश जामोदकर यांना अस्वस्थ करते.त्यांच्या या अस्वस्थतेतून निर्माण झालेले विचारकाव्य म्हणजेच ‘ओबीसींच्या बावन्न कविता’ हे होय.
सतीश जामोदकर हे सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते.विविध आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याने त्यांची नाळ मातीशी जुळलेली आहे.त्यामुळे शेती आणि शेतकरी आधारलेली समाजव्यवस्था यांचे नीट आकलन त्यांना आहे.भारतीय समाजामध्ये इतर मागासवर्गीय या नावाने संवैधानिक ‌ओळख असणारा,१९३१च्या जनगणनेनुसार सर्वाधिक जनसंख्या असणारा परंतु हजारो जातसमूहामध्ये विभागला गेलेला ओबीसी समूह स्वतःचे स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय जपून आहे. विशेषतः शेतीवर गुजराण करणारा ओबीसी बदलत्या सामाजिक -आर्थिक बदलांमध्ये टिकून राहण्यासाठी धडपडत आहे,त्याच्या या संघर्षाचे चित्रण ‘ओबीसींच्या बावन्न कविता’ मधून मांडण्यात आले आहे.
” ही कथा ओबीसीची
देशाच्या लोकसंख्येत ५२%असलेल्यांची..”
आणि—
“ओबीसी माळी,तेली,कुणबी,
न्हावी,धोबी,
लोहार,सुतार,सोनार
काही नारू काही कारू
अठरा अलुतेदार
बारा बलुतेदार
पाठीचा कणा नसलेले
वाकलेले,झुकलेले
कायमच भेदरलेले..”

अशी ओळख करून देऊन ओबीसींच्या मानसिक दडपणाची ग्वाही कवी देतात. कधी जातीच्या तर कधी धर्माच्या मानसिक दडपणाखाली वावरणारा ओबीसी आपले मानसिक जोखड कधी झुगारणार आहे? असा प्रश्न विचारतांना कवी पुढे लिहिता
“…मूळ प्रश्नावरून भरकटलेले
स्वतःच्या समस्याच
माहित नसणारे
गावात सैरभैर
गणगण फिरणारे
दंगा-दंगल,जाळ-पोळ
मारा मारीत
अंगावर गुन्हे
नोंदवून घेणारे..”
गाव गाड्याच्या राजकारणात फुशारकी मारत फिरणाऱ्या गावपुढाऱ्यांना पध्दतशीर वापरून घेतले जाते,त्यासाठी अस्मितेचे पाणी आणि भावनेचे ताक पाजले जाते,परंतु ओबीसी मानसिक गुलामीत असल्याने खोटी अस्मिता आणि दिखावू भावनिकता यामध्ये अलगत अडकतो,याचे मनस्वी दुःख कवीला वाटते— "ओबीसी फसतात मंडलचे, कमंडलने केलेल्या एन्काऊंटरात.." किंवा

“ओबीसींना माहित नसतो
मंडल आयोग
त्यातील तरतुद घटनेतील ३४०वे कलमाचा
हुकमी एक्का..”
लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक जनसंख्या असूनही धार्मिक सत्ता ओबीसींच्या मन-मेंदू-मनगटावर राज्य करीत आहे,त्यामुळेच मंडल आयोगाच्या तरतुदी आणि भारतीय संविधानातील कलमांपासून ओबीसी अनभिज्ञ असल्याचे वास्तव कवी मांडतात.
बदललेल्या जागतिकीकरण आणि खाजगिकरणाच्या चक्रव्यूहात समाजमन फासलेले असतांना लोकसंख्येने मोठ्या प्रमाणात असणारा आणि शेतीवर उदरनिर्वाह असणारा ओबीसी समूह अधिकच फसत चालला होता.१९९०पासून आलेल्या खाऊजा धोरणामुळे शेती आणि शेतीपूरक कुटिरोद्योग रसातळाला गेल्याने ओबीसी सुद्धा अधिकच त्रस्त झाला.परंतु आपल्या समस्येचे उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून न शोधता पुनर्जन्म, नशिब,देव-धर्म यात शोधण्यात ओबीसी मश्गूल झाला.जो समूह आपल्या समस्यांची उत्तरे पुनर्जन्मात शोधतो,तो भविष्यात गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही,ही अतिशय महत्त्वाची गोष्ट बहुसंख्य ओबीसींना अजूनही कळत नाही,यांचे दुःख कवी सतीश जामोदकरांना आहे,म्हणून ते म्हणतात—
“ओबीसी वाचत नाही
महात्मा फुलेंचा ‘गुलामगिरी’
त्याला आवडते
वरच्यांची शिरजोरी.
तो असतो सदैव
अवताराच्या शोधात.
करेल त्याच्या
कुणीतरी उद्धार..” जर आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य हवे असेल तर त्यासाठी गुलामीची सवय सोडून मन-मेंदू-मनगट बळकट करावे लागतील, असा संदेश महात्मा फुले यांनी दिला.त्यांचे अनुपालन सर्व ओबीसी-बहुजनांनी करावे, अशी रास्त अपेक्षा कवी सतीश जामोदकर आपल्या कवितांमधून करतात. 'ओबीसींच्या बावन्न कविता' हा कवितासंग्रह स्वत्व विसरलेल्या बहुजनांना मस्तक घडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा एक भाग असून कवी सतीश जामोदकरांनी समतामुलक समाजनिर्मितीचा केलेला पुनरुच्चार महत्त्वाचा प्रयत्न आहे.त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा.

मराठी विभागप्रमुख नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंत मो:-9423425129

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments