Home ताज्या घडामोडी शंकराचार्य!

शंकराचार्य!

 

 

 

माधव पांडे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 37 व्या दीक्षांत समारोहात शंकरबाबा पापळकर यांना मानद डी.लिट.या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. भारताचे माजी राष्ट्रपती आर.व्यंकटरमण,सुविख्यात गायिका आशा भोसले,गांधीवादी नेत्या निर्मलाताई देशपांडे या जागतिक स्तरावर चमकलेल्या नावांच्या प्रभावळीत शंकरबाबा पापळकर या ‘फकीरा’ला स्थान मिळाल्याने जगाला आश्चर्य आणि मातीतल्या माणसांना आभाळाएवढा आनंद झाला आहे.
शंकरबाबा आपल्या 123 चिल्याबाल्यांसह धारणी रोड वरील वझ्झर फाट्यावर विसावले आहेत.गेल्या 31 वर्षांची पापळकरांची तपोसाधना शंकरराव ते शंकरबाबा या नावातल्या बदलाची नसून संसारी ते संन्यासी या भूमिकेतील अलौकीक त्यागाची आहे. संपादक शंकर पापळकर अशी अक्षरे उमटविलेले ‘ देवकी नंदन गोपाला’ हे मासिक 1990 पूर्वी अमरावतीची परिक्रमा करीत होते.संत गाडगेबाबांच्या कार्यांचा
प्रसार आणि प्रचार एवढाच ध्यास या संपादकाने घेतला होता.
जुन्या उमरावतीच्या परकोटात अंबागेटमध्ये एक प्रिंटींग प्रेस होती.त्या प्रिटींग प्रेसमध्ये ‘देवकी नंदन गोपाला’ छापले जायचे.जुन्या पद्धतीने खिळ्यांची अक्षर जुळवणी झालेल्या मासिकाच्या कागदावरील मजकुरांचे संशोधन करण्यासाठी अनेकदा ही ‘अक्षरयात्रा’ आमच्या बुधवा-यातील घरात येऊन पोहचायची.तिथेच त्या अक्षरांचे शब्द आणि शब्दांची वाक्ये व्हायची.शंकरराव पापळकर हाडाचे संपादक होते. गाडगेबाबांचा विचार लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे या ध्यासाने पेटलेले शंकरराव आमच्या कुटुंबाचे कायम सदस्य होते आणि आहेत.
परवा डी.लिट जाहिर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला,शंकरबाबा म्हणाले,तुझ्या बाबांचे आणि काकांचे आशीर्वाद आहेत!
माणूस मोठा झाला,कीर्तीवंत झाला की,त्याच्याशी आपलं नातं सांगण्याचा प्रघात आहे.समाजमान्यता अशाच ओळखींवर,नात्यांवर टिकून असते.मात्र जगाच्या नजरेत अनैतिक,अनौरस,अनाथ,टाकलेले,सोडून दिलेले जे जीव आहेत,त्याचं या जगात कोण आहे? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या संवेदना जीवंत आहेत.तुम्ही माणूस म्हणून जगण्यास पात्र आहात.

मित्रहो,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.मुरलीधर चांदेकर यांनी थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी देण्याचा निर्णय घोषित केला.समाजजीवनात राहणा-या प्रत्येकाला या निर्णयाचा आनंद झाला.ज्येष्ठ पत्रकार,गझलकार अनिल जाधव म्हणाले,शंकरबाबांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना मानद डी.लिट.पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेऊन अमरावती विद्यापीठाने ख-या अर्थाने आपले ‘संत गाडगेबाबा’ हे नाव सार्थक केले आहे.
शंकरबाबा पापळकर यांच्या सन्मानाच्या निमित्याने प्रख्यात शिक्षणतज्ञ,माजी कुलगुरू डाॅ.के.एम.कुळकर्णी यांनी गौरोवोद्गार काढले आहेत.सर्व स्तरावर मान्यता असलेला हा ‘अवलिया’ समाजाने आज अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.मात्र शंकरबाबांना जी मंडळी जवळून ओळखते ती म्हणतील,इतका विनम्र माणूस आम्ही कुठे बघितला नाही.

शंकरराव पापळकर कोण आहेत? त्यांच्याबद्दल नव्या पिढीला काहीही माहिती नाही.त्यांच्या कार्यांचा विद्यापीठाने गौरव केला असला तरी त्यांचा ‘आत्मा’ ज्या गोष्टींसाठी तुटत आहे,तो आवाज आजही सरकार दरबारी ‘मुकबधीर’आहे.आत्म्याचा आवाज ऐकायला,’सरकार ‘नव्हे ‘संवेदना’ हव्यात.तुमच्या-माझ्या देहात ‘ आत्मा ‘ असेल मात्र शंकररावांच्या जगण्यात ‘आत्मीयता ‘आहे.
रस्त्यावर,कचरा कुंडीत फेकलेला हाडामासांचा जीव या ‘आत्म्याला’ आपला वाटला.त्या जीवांना’जीवदान’ मिळालं. जगण्यांचं बळ दिल्या गेलं..अन्न,वस्त्र सगळं दिलं.हा ‘महात्मा’ एवढं करून थांबला नाही तर त्या निराधार,अनाथ,दिव्यांग बालकांना आपलं नावंही दिलं.आज 123मुला-मुलींच्या जगण्याच्या ‘सात-बारावर’ शंकरबाबा पापळकर या ‘बापाचे’ नाव आहे.लोकं सगळं देतील, स्वतःचं नाव कुणालाही देणार नाहीत.दुस-याला आपलं समजणं आणि खरचं सर्वार्थाने आपलेपण जपणं यातला जो फरक आहे,तो आणि तेवढाच फरक शंकरबाबा आणि आपल्यात आहे.बाकी तर सगळं सारखंच असतं!

मोह,माया,संसार कोणाला सुटला आहे.मी बघितलेले शंकरराव गृहस्थ होते.गृहस्थाश्रमाचा त्यांनी निरोप घेतलेला नव्हता .त्या दिवसातील शंकरराव आणि आज 123जीवांसोबत ‘मानवतेचा संसार’ थाटलेले शंकरबाबा किती अद्भूत प्रवास आहे.’अलौकिक’ हा शब्द अश्याच महात्म्यांसाठी असतो.
गेल्या तीस-पस्तीस वर्षात अनेकदा माझी शंकरबाबांसोबत भेट झाली.वडीलांप्रमाणे मी लिहिता झालो हे बघुन त्यांना माझा अभिमान वाटे.माझ्या अनेक स्तंभलेखनावर त्यांचा आवर्जून फोन येतो.गडगड हसत हा ‘ॠषी ‘ माझ्याच लेखातल्या काही ओळी पुन्हा-पुन्हा वाचतो.एखाद्या निरागस मुलाप्रमाणे!जोरदार,दमदार हास्याचा धबधबा पुन्हा-पुन्हा कोसळतो.अशा संवादानंतर दिवस प्रसन्न होऊन जातो.एका लेखकाला अजुन काय हवं असतं?

शंकरबाबा मला एकदा म्हणाले,दाजीसाहेबांचं जे झालं,ते माझं होऊ देऊ नका! असं बोलतांना त्यांचा आवाज खूप खोलवर गेला होता.कातरला होता.त्यांना काय म्हणायचं आहे,हे माझ्या लक्षात आलं होतं.पद्मश्री डाॅ. दाजीसाहेब पटवर्धन यांच्या कुष्ठरोग्यांच्या सेवेतील प्रसंग ह्दयाला चटका लावून जाणारे आहेत.

महाराष्ट्रातल्या नामवंत संपादकांमध्ये शंकरबाबांची उठबस आहे.मात्र शंकरराव प्रज्ञावंतांच्या कायम पायाशी बसतात.गाडगेबाबा कसे जगले असतील,याचा अंदाज घ्यायचा असेल तर नव्या पिढीला शंकरबाबांकडे बघावे लागेल.

विकऐंड्ला अनेक मंडळी चिखलद-याची ‘वाट ‘धरतात. चिखलद-याचा ‘घाट ‘उतरतांना कोणाला तरी वझ्झरफाटा दिसतो.शंकरबाबांचे नाव अनेकांच्या कानी असल्याने उत्सुकतेपोटी अनेक मंडळी स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद अनाथांच्या बालगृहाला भेट देतात.हा पिकनिक स्पाॅट नाही.ही मानवांची वस्ती आहे,असं अगदी सुरूवातीलाच लोकांना जाणवतं.कौतुक संपतं आणि वास्तव डोळ्यासमोर येतं.123 दिव्यांग जीव आणि त्या अभयारण्यातला हा एक ॠषी, शंकरबाबा!
123जीवांना आपलसं करणारा,त्यांना जगविणारा,हा महात्मा.येथे वसला आहे.

1990च्या सुमारास शंकरराव पापळकरांनी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वादाने स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद अनाथांच्या बालगृहाची स्थापना केली.सुरूवातीला जग हरविलेल्या चार मुला-मुलींचा सांभाळ करीत या जागेवर मानवतेचे नंदनवन फुलले.काळ लोटला,वर्षे गेलीत.तुमच्या-माझ्या समाजाने अनौरस ठरविलेल्या अनेक जीवांना येथे छत्र मिळाले.त्यांच फाटलेलं आभाळ शंकरबाबांच्या पदरात शिवल्या गेलं.वझ्झरला जसा ‘ बाप’ आहे,तशी या मुलांना ‘माय ‘ आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगाची ‘माऊली’ झाल्यात.शंकरराव दिव्यांगांची माऊली!
वझ्झरचे स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद अनाथांचे बालगृह ‘ तीर्थश्रेत्र ‘आहे.येथे शंकराचार्य राहतात.या वझ्झरपीठातून वेदांना नव्हे वेदनांना समजून घेतल्या जाते.वेदनांवर विजय मिळविणारी नवी ब्रम्हसृष्टी वझ्झरला उभी झाली आहे.श्रृंगेरी,करवीर पीठांनाही विचार करावयाला लावणा-या या वझ्झरपीठाने धर्माचा अद्भूत संदेश जगाला दिला आहे.लोक धर्मातून सेवेकडे वळतात येथे ‘सेवेतून धर्म’ जगासमोर येतो.वझ्झरचे शंकराचार्य ‘फकीर ‘आहेत.शरीर झाकण्यापुरतं वस्त्र आणि खांद्यावर घोंगडी!हा अवलिया आहे.आश्रमातल्या दिव्यांग वधूच्या लग्नात हा आभाळाएवढा बाप बेभान नाचतो,सभ्य लोकांच्या सभेत अनेक उर्दू शेर ऐकवितो.लहानातल्या लहान माणसाच्या पाया पडतो.खूप वेदना झाल्यात की,प्रभाकरराव वैद्य यांच्या कुशीत विसावत धो-धो रडतो.शेगावीच्या शिवशंकर भाऊंच्या ॠणासमोर नतमस्तक होतो.मी गेल्यावर या जीवांचं काय होणार…या चिंतेने गहिवरतो.आर्त विनवणी करतो…काही क्षणात घनघोर हसतो.अश्रू लपवितो.दिव्यांग मुलां-मुलींसाठी काही तरी करा,म्हणून सरकारचे पाय धरतो..पुन्हा समाजाकडे येतो.
हा ‘मौला’ वरचे – वर अमरावतीत,मुंबईत, नागपूरात दिसतो!हा महात्मा 123 जीवांच्या काळजीने पोखरतो.आता मी म्हातारा झालोय,आता मुलींची लग्नं या बापाकडून होणार नाही म्हणून हतबल होऊन खाली बसतो..क्षणार्धात हा ‘ सांब ‘ पुन्हा उठतो.लेकीसाठी वरसंशोधन करतो.याच्या जीवाला शांती नाही.समाजाने फेकलेलं विष हा ‘नीलकंठ’ गटागटा पिऊन टाकतो.गाडगेबाबांसारखं या बाबांच्या नावाचा 7/12 कोरा आहे.मात्र 123जीवांची संपत्ती घेऊन हा ‘शंकराचार्य’ या जगाला नवा ‘जीवनमंत्र’ देत आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा लवकरच दीक्षांत समारंभ होईल.या समारंभात शंकरबाबा पापळकर यांना ‘डाॅक्टरेट’ दिल्या जाईल.आठवी नापास व्यक्ती समोर डाॅ.शंकरराव पापळकर लिहिल्या जाईल..मात्र असं होणार नाही.डाॅक्टरेट मिळेलही..जग ‘आचार्य ‘ म्हणेलही.मात्र लोकांच्या मनावर कोरल्या जाईल…शंकराचार्य… वझ्झरपीठाचे शंकराचार्य!

9823023003

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments