गृहकलह

माधव पांडे

मायानगरीचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रातून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला.खुद्द गृहमंत्री पोलिसांना ‘खंडणीचे टार्गेट’ देत असल्याचा दावा या पत्रातून केला आहे.परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्याचे राजकारण पार हादरले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह कसे खोटे बोलत आहेत,याचा खुलासा केला.अलिकडच्या विधानसभा अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन हत्याकांडाचा एखाद्या निष्णांत वकीलाप्रमाणे जोरदार युक्तीवाद केला. त्याच अँगलने शरद पवार यांनी माजी आयुक्तांच्या दाव्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला.परमबीर सिंह ज्या तारखांचा उल्लेख पत्रात करीत आहेत,त्या दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख ‘करोनाग्रस्त’ होते.त्यामुळे त्यांना कोणी भेटू शकत नव्हते,असा दावा शरद पवारांच्या वक्तव्यातून समोर आला.शरदरावांच्या विधानानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या करोनाकाळातील पत्रकार परिषदेचे व्हीडीओ व्हायरल केले.दरम्यान आरोपकर्ते आयपीएस परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून गृहमंत्र्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी,अशी मुख्य मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्र आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे.’उघडा डोळे,बघा नीट’ असं सांगण्याची वेळ निघून गेली आहे. लोकांच्या समजण्या पलिकडचा हा ‘चक्रव्युह’ आहे.कोण खरं? आणि कोण खोटं?या संभ्रमात राज्याची अकरा कोटी जनता त्रस्त झाली आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी वनमंत्री संजय राठोड आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले प्रसंग तुमच्या-माझ्या महान राष्ट्रात वरचेवर घडत असल्याने या ‘गृहकलहाचा’अंत वेळीच झाला नाही तर लोकांच्या संयमाचा बांध फुटण्याची भीती व्यक्त होत आहे.

मित्रहो,
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केला.33 वर्षे पोलीस खात्यात अविरत सेवा देणा-या एका आयपीएस अधिका-याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असेल?याचा विचार अनेकांच्या मनात येतो आहे.खरं सांगायचं तर लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता असून या सगळ्या घटनाक्रमाने सामान्यांच्या मनातील शंकांना बळ मिळाल्याने परिस्थिती खूप जास्त चिंताजनक झाली आहे.परमबीर सिंह यांनी पत्रातून केलेले आरोप खरे की खोटे याबद्दल कोणीच दावा करू शकत नाही.आरोप खरे आहेत तर दोषी कोण सांगा? आरोप जर खोटे असतील तर सरकारवर खोटे आरोप करणा-या सरकारी अधिका-यांवर कोणती कारवाई केली,ते तरी सांगा. जनता सवाल करीत आहे.लोकांना सगळं दिसतं,समजतं!
आपण म्हणू तेच सत्य असा आव कोणीही आणू नये.मुळात गेल्या दोन-तीन महिण्यातील घटनाक्रमांकडे बघा.काय दिसते?सगळी लपवाछपवी चालू आहे.कोणी तरी कोणाला तरी वाचवित आहे,असा समज जनतेत पसरला आहे.कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे काय? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उमटत आहे.पण जाब विचारणार कोणाला?

प्रत्येकच राजकीय पक्ष आपल्या सोयीची भूमिका घेत असतो.यात चुकीचं काही नाही.व्दिभार्या कायदा राज्याच्या समाजिक न्याय मंत्र्याला लागू नाही,असं कुठेतरी लिहलं असेलच.गुन्ह्याचा चोवीस तासात-अठ्ठेचाळीस तासात छडा लावला अश्या बातम्या वाचून पोलीसांचा अभिमान बाळगणारी जनता पूजा चव्हाणच्या आकस्मिक मृत्यूचा अजून शोध का लागला नाही? असा प्रश्न विचारीत असेल तर जनताच गुन्हेगार?मनसुख हिरेनच्या मृत्यूनंतर त्यांच्या सौभाग्यवतीने जीवाचा आकांत करून जगाला सांगितले की,माझ्या पतीची सचिन वाझे या पोलीस अधिका-याने हत्या केली.या तक्रारीनंतर सरकार म्हणते,’सचिन वाझे ओसामा बिन लादेन आहे काय?’

डोकं चक्रावून टाकणा-या सगळ्या घटना आहेत.राजकीय रंगमंचावर काय घडत आहे.किती खोटं,किती खरं यापेक्षा या घटनांचे परिणाम राज्यातील जनतेवर काय होत आहेत? याचा विचार कोण करणार हा खरा प्रश्न आहे.
गृहमंत्री पोलीसांना खंडणी वसूल करायला लावतात,हा राजकीय नेत्यांसाठी केवळ एक आरोप असेल,जनतेसाठी प्रचंड धक्का!आजवर चित्रपटातील अश्या ‘खंडणीखोर ‘ प्रसंगातून प्रेक्षकांचं ‘ मनोरंजन ‘व्हायचं.आता मात्र परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर लोकांच्या ‘मनावर’प्रचंड परिणाम झाला आहे. सर्वसामान्य माणसं या धक्क्यातून पुढील अनेक वर्षे बाहेर पडू शकणार नाहीत.इतका भयानक हा ‘आघात’ आहे.गृहमंत्र्यांवर केलेला आरोप खोटा असेल,तर त्याची चौकशी न्यायमूर्तींच्या निरीक्षणात व्हायला हवी.लोकांचा न्यायालयावर विश्वास आहे.राजकारण्यांवर नाही.पूजा चव्हाणच्या आकस्मिक मृत्यूला राजकारणी सोयीस्करपणे विसरतील,जनता कधी तरी विसरेल? शक्य नाही.

सीतेच्या अग्निपरीक्षेला,द्रौपदीच्या वस्त्रहरणाला,अभिमन्युसाठी लावलेल्या चक्रव्युहाला हा भारतीय समाज शतकानुशतके विसरला नाही.भारतीय मनावर अश्या प्रसंगाचे ‘व्रण’ कायम आहेत.राजकारण्यांना जनतेचे दु:ख काय समजणार?
प्रश्न या घटनांचा नाही.घटना,प्रसंग घडतच जाणार आहेत.त्या घटनांवर आमच्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोण कसा आहे?यावर सामाजिक स्वास्थ अवलंबून असते.आमचा देश अनेक आदर्शांच्या संस्कारातून घडला आहे.पद,पैसा,यापेक्षा प्रतिष्ठेला महत्व देणारा हा सनातनी देश आहे.’ प्राण जाए पर वचन न जाए ‘असा दावा करणारी ही भूमी आहे.आपण कुठे चाललो आहोत?
राजकारण्यांना त्यांचे खेळ खेळू द्या.करू द्या चिवचिवाट..ओरडू द्या बेंबीच्या देठापासून..फेकू द्या चिखल ऐकमेकांवर,फाडू द्या कपडे ऐकमेकांचे…हे सगळं होवू द्या.महाभारतातही यापेक्षा वेगळं काय झालं…अशीच युद्धनीती..अशीच कुटनीती.आज जे घडत आहे.ते सगळं आमच्या ‘डीएनए’मध्ये आहे.हरविला फक्त आम्ही ‘कृष्ण’!
पांडवांचा साथ देणारा,द्रोपदीला वस्त्रे पुरविणारा,नरकासुराच्या तावडीतून सोळा हजार कन्यांना अभय देणारा कृष्ण कुठे आहे? आज ‘कृष्णनीती’
हरविली…शिल्लक फक्त ‘राजनीती’!.

विसरलो आम्ही,हा महाराष्ट्र छत्रपतींचा.राजे!पुन्हा जन्माला या,अशी आर्त विनवणी करणारे आपण सारे मराठमोळे.मात्र राज्य कसे विवेकाने चालवायचे असते,हा छत्रपतींचा आदर्श सोयीस्कर विसरलेले आपले राज्यकर्ते!

या देशाने गांधींना तर पार हद्दपार केले आहे.न्यायबुद्धी तर आम्ही मोडीत काढली आहे. गांधीवादही पार पुसुन टाकला आहे.या देशात जोवर गांधी राहतील तोवरच हा देश राहिल.गांधींनाही ‘रामराज्य’ अपेक्षित होतं,विसरू नका!
एका अर्थाने आम्ही गांधी जीवंत ठेवले आहेत.तुमच्या-माझ्या जीवनात गांधी नसते तर कोण तो वाझे,त्याच्या गाडीत पैसे मोजायची मशीन सापडली असती काय? गांधींनी तर या देशातील जनतेचे दारिद्रय बघून अंगावर कमीत कमी वस्त्रे घातली होती.या गांधींच्या देशात आमचे ‘ऊर्जावान मंत्री’ जनतेच्या करातून उधळलेल्या पैशातून सजविलेल्या राजमहालात ऐश्वर्य भोगण्याचे समर्थन करतांना म्हणाले,’मला राॅयलिश जगायलाआवडते.’
हा देश भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कतृत्वाने पुनित झाला आहे.प्रकांड पंडित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर तळातल्या माणसांसाठी झुंजत राहिले. जगण्यासाठी ‘तळं चवदार’केलं.आम्ही महामानवालाही विसरलो!
मताचं गणित सोडा,तो धंदा राजकारण्यांना करू द्या.समाज माणसांचा असतो,तो टिकवून ठेवा.ज्यांच्यावर आरोप झालेत,ती राजकारणी मंडळी आहेत.मात्र ती सगळी मंडळी फुले-आंबेडकर-शाहुंच्या महाराष्ट्राची शासनकर्ती आहे,हे जास्त दुर्देवी आहे!

जनता कोणत्याही पक्षाची नसते.कधी काळी ‘जनता पक्षा’ला साथ देणारा मतदार पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळला होता. ही फकीर जनता ना मोदींची,ना ममताची!जनता कोणत्याही एका पक्षाला चिटकून राहिली असती,तर या देशात कधीच सत्तांतरे झाली नसती.हजारो वर्षे गुलामगिरी भोगलेला हा देश आहे.गुलामगिरी भारतीयांच्या ‘रक्तात’एकजीव झाली आहे.कोणी आवाज उठविला,तर तो आवाज आत्ताच का? असा प्रश्न करणा-या ‘चोची’ टिव्हीच्या पडद्यावर दिवसरात्र’ चिवचिव’ करतात.प्रश्न समोर आला की, उत्तर शोधायचे नाही.प्रश्नालाच संपवून टाकायचे,कधी कधी प्रश्नकर्त्यालाच!

हे विश्वची माझे घर!असा संदेश कोणी महात्मा या महान भूमीला देऊन गेला.आम्हाला आमचं घर सांभाळता येत नाही…विश्व काय सांभाळणार?आमच्या घराला ‘घरघर’ लागली आहे.’गृहकलह’वाढतो आहे.विस्फोट होण्यापूर्वी ‘गृहशांती’करावी लागेल,अन्यथा राज्य अराजकतेकडे वाटचाल करीत आहे अशी भीती सामान्यांच्या मनात ‘घर’करून बसेल!


9823023003

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments