दलदल

माधव पांडे

25 मार्चला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मेळघाटातील हरिसाल येथिल शासकीय निवासस्थानात वनपरिरक्षक अधिकारी दीपाली चव्हाण या बत्तीस वर्षीय तरूणीने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हाॅल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केली.दीपालीने आत्महत्या करण्यापूर्वी पतीसह अनेकांशी फोनवर संवाद साधला होता.मृत्यूपूर्वी तिने तीन पत्रे लिहून ठेवलीत.त्या तीन पत्रांना ‘वाचू शकणारे डोळे’ मी शोधत आहे.
आम्ही साक्षर असल्याने आम्हाला पत्रातील ‘अक्षरओळख’ होईलही,मात्र आमच्या व्यवस्थेकडे ना ह्दय आहे ,ना संवेदना!त्यामुळे दीपालीच्या पत्रातून व्यक्त होणारा भाव समजण्यासाठी कायदा नव्हे तुमच्यातला’ माणूस’ जीवंत असायला हवा.जीवंत माणसांसाठी आजचा हा संवाद आहे.

मित्रहो,
आरएफओ दीपाली चव्हाण या कर्तबगार महिला वन अधिका-याच्या मृत्यूनंतर सभोवतालचं जग हळहळत आहे.तिने आत्महत्या करायला नको होती,अनेक पर्याय उपलब्ध होते.टोकाचा निर्णय घेऊ नये…..असे अनेक सल्ले,समुपदेशन आज समोर येत आहेत.एका अर्थी बरोबरही आहे.दीपालीने असे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी मानवी चेह-यातला ‘नारीभक्षक ‘ डीएफओ विनोद शिवकुमार याचाच ‘गेम’ करायला हवा होता.’गोली मारो भेजे मे!’असं काही तरी करायला हवं होतं…अश्या अनेक प्रतिक्रीया सोशल मीडियावर भरभरून वाहत आहेत.अश्रूंच्या प्रवाहाला आता अनेक वाटा दिसत आहेत.

दीपालीने आत्महत्या का केली हे समजून घ्यायचे असेल तर पुन्हा एकदा दीपालीच्या अंतिम क्षणी तिच्या मनातले भाव टिपा.क्षणभर मनाने हरिसालला पोहचा…..तारीख 25 मार्च.सायंकाळी पाच वाजता..आता तुम्ही शासकीय निवासस्थानी पोहचलात.जमलं तर दीपाली व्हा.ती भरभर पत्रे लिहीत आहे.मनातलं काय सांगू आणि काय नको.असं सगळं तिला होऊन गेलं आहे.इहलोकाचा मुक्काम संपला,आता नव्या मुक्कामावर तिला जायचं होतं.तिने एक पत्र लिहिले,खात्याच्या वरिष्ठांच्या नावाने.रेड्डी साहेब.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,मेळघाट व्याघ्र प्रकल्प,अमरावती.किती मोठं पद.भावसे.हा मानाचा बिल्लाही!तिच्या नजरेतील खात्याच्या सर्वोच्च अधिका-याला उद्देशून तिने पत्र लिहिले.भावना आणि विचार एकत्र बांधुन सुचेल त्या शब्दांत कधी कृतज्ञता तर कधी दुर्लंक्ष केल्याची खंत या पत्रातून ती लिहिती झाली …तिला काही सुचत नव्हतं.तिचे डोळे अश्रुंनी डबडबलेले!मन भरून आलं होतं.उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने दिलेल्या भयंकर त्रासाला तिला एका ‘समरीत’ लिहून काढायचे होते.तिने प्रशासनाविरोधात हिंमत एकवटली.रेड्डी साहेबांचे कुठेतरी आभारही मानले आणि पुन्हा आपला मोर्चा विनोद शिवकुमारकडे वळविला.या पत्राला खूप काळजीपूर्वक वाचा.तुमचं काळीज चिरून जाईल.दीपालीने शिवकुमारच्या क्रुरकर्मांचा पाढा वाचतांना अनेक घटना उध्दृत केल्यात.एका परिच्छेदात तिने स्त्रीजीवनाच्या भयंकर दु:खाला हात घातला.मातृत्व हिरावून घेण्याच्या प्रसंगाला तिने संयमी शब्दांत लिहिले.ती रेड्डींना लिहिते,
“ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यांवरून फिरविण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही”

ही सगळी वेदना तिने कधी आईच्या कुशीत तर कधी नव-याच्या मिठीत विसावल्यावर व्यक्त केली.त्या सगळ्या प्रसंगांना ती पुन्हा-पुन्हा आठविते.शब्द आणि वेदना दोन्हीही अनावर झाल्यात. कागदावर शाईसोबत तिचे अश्रूही उमटत होते.त्या पत्राला प्रचंड भावनिक आधार असतांना शब्दांचे बुडबुडे ठरावे,असा पत्राचा वापर एस.एस.रेड्डींनी स्वत:च्या बचावासाठी केला आहे.दीपालीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या पत्रातून तिला शिवकुमारला धडा शिकवायचा होता,हे तर स्पष्टच दिसत आहे.
रेड्डींना लिहिलेल्या पत्राने तिच्या त्रासाचा आवेग कमी झाल्यावर तिने अजून दोन पत्रे लिहिलीत.त्या पत्रांना फक्त नातं समजणारा व्यक्तीचं वाचू शकतो.दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांना पत्र लिहिलंय.

खरं म्हणजे,आत्महत्येचा विचार मनात पक्का झाल्यावर,तिने पतीला फोन केला होता.शेवटचं बघायचंय तुला…असं ती म्हणाली.त्या वाक्यानंतरच राजेशच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तातडीने सासुबाईंना फोन लावला.तुफान वेगाने धावाधाव केली.हरिसालमधिल दीपालीचे सहकारी, वनकर्मचारी त्वरेने सरकारी बंगल्यात पोहचले,तोवर सगळं संपलेलं होतं.रक्ताच्या थारोळ्यात ‘महाराष्ट्र कन्या’ गतप्राण झाली होती.

पतीशी संवाद करतांना,पुन्हा एकदा शिवकुमारच्या त्रासाची तिला जाणीव झाली.शिवकुमारने केलेला अपमान तिच्या डोक्यात गेला होता.माणुस जगतो कशासाठी? असा प्रश्न तिला सतावत होता.लोक तिला ‘लेडी सिंघम’ म्हणायचे.एकदा डिंक तस्करांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी तिने वाघिणीसारखी झडप मारली होती.मध्यप्रदेशात जाऊन तिने तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या.या पराक्रमानंतर ती ‘लेडी सिंघम’म्हणून नावलौकिकास आली.स्त्री स्वकतृत्वाने,पराक्रमाने आपला झेंडा गाडते,ही कल्पनाच सहन न होणा-या ‘पुरूषी’ अधिका-याने आपला ‘पराक्रम’ दाखविणे चालूच ठेवले.अखेर दीप विझला!

प्रिय नवरोबा,
अशी लाडीक सुरूवात करणा-या दीपालीचा आवाज तुम्ही ऐका.शिवकुमार अत्यंत असभ्य भाषेत आरएफओ दीपालीला झापत आहे.ओरडत आहे.खोटे आरोप लावित आहे.धमकावित आहे.दम भरत आहे.तरीही ही स्त्री नमतं घेत सर.. सर.. करीत आहे.हे सगळं तिला नव-याशी अखेरचा संवाद साधतांना पुन्हा – पुन्हा आठवत आहे.मला कायम तुझ्याच मिठीत राहायचे होते,हे मनातलं स्वप्न नव-याला सांगून ती निरोप घेणार,तोच तिला आपला संसार आठवतो.
ती म्हणते,माझं मंगळसूत्र व तू दिलेला हार माझी आठवण म्हणून तू तुझ्या जवळ ठेव.पतीचा निरोप घेतांना तिचा अश्रूंचा बांध फुटतो.ती घाय मोकलून रडते.ती म्हणते,’लव्ह यु सो मच’.पुढच्या जन्मी आपण पुन्हा नव्याने सुरूवात करू…नव्या उमेदिची पालवी तिच्या मनात अंकुरतांना ‘पोटातला अंकुर’ अधिका-याच्या त्रासाने गळून पडल्याचे दु:ख ती पदोपदी कधी शब्दांत तर कधी अर्थात व्यक्त करते.या जगाचा निरोप घेतांना तिला आठवते, जन्मदात्री!आई!

आपल्या मृत्यूनंतर थकविलेला पगार,दागिने आईला द्यावे,अशी ती इच्छा व्यक्त करते.वडील आणि भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर आई शकुंतला चव्हाण यांचा आधार असलेली दीपाली अत्यंत दु:खी ह्दयाने,हतबल परिस्थितीत,निराशेच्या खाईत या जगाचा निरोप घेते.आईची काळजी उरात ठेवून!!

या तीनही पत्रांना वाचायला काळीज पाहिजे.मृत्यूपूर्वी माणूस काय विचार करीत असेल,याचा एक अंदाज या पत्रातून येतो.मात्र एका महिला अधिका-याच्या जीवनात पराकोटीची निराशा निर्माण व्हावी,अशी परिस्थिती तुमच्या-माझ्या समाजात आहे,याचं अपराधीपण मला अस्वस्थ करीत आहे.आपल्यातल्या अनेकांचा दीपालीच्या मृत्यूनंतर ‘डोळा’, लागला नसेल.माझ्या – तुमच्या समाजात किती दीपालींचा बळी जाणार?

तीनही पत्रे आत्महत्येचे कारण स्पष्ट करीत आहेत.डीएफओ विनोद शिवकुमार हा क्रूर अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाणच्या आत्महत्येस कारणीभूत आहे.पत्रात हे स्पष्ट दिसते.कोणी तरी म्हणालं,एस.एस.रेड्डीही दीपालीच्या आत्महत्येस जबाबदार आहेत.भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात आवाज बुलंद केला.रेड्डींना सहआरोपी करा,ही चित्रा वाघ यांनी मागणी केली आहे.सकृतदर्शनी रेड्डींच अधिक जबाबदार आहेत.त्यामुळे त्यांची चौकशी होऊन कठोर शासन व्हायला हवे.रेड्डींचे निलंबन झाले,अटक कधी होणार? असा खडा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला केला आहे.भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ही मागणी न्यायपूर्ण आहे.

दीपालीच्या दुर्देवी मृत्यूला विनोद शिवकुमार किंवा एस.एस.रेड्डींचं जबाबदार आहेत काय? आम्ही कोणीच जबाबदार नाही?
ऐकमेकांकडे बोटे दाखविण्याची आमची प्राचीन परंपरा कधीतरी मोडीत काढा.जबाबदारी घ्या.राज्याच्या महिला व बाल विकास खात्याच्या कॅबिनेटमंत्री अॅड.यशोमतीताई ठाकूर अमरावतीच्या पालकमंत्री आहेत. अमरावती जिल्ह्यातील एका महिला अधिका-याने वरिष्ठांच्या त्रासापायी आत्महत्या केली ,याची ‘सरकार’म्हणून जबाबदारी घेण्याचा मोठेपणा यशोमतीताईंनी दाखविला पाहिजे.राजीनामा नका देऊ,दोन अश्रू द्या!!

जिल्ह्याच्या खासदार अभिनेत्री नवनित राणा यांना तर दीपाली चव्हाण भेटल्या होत्या.शिवकुमारांचे ‘तांडव’ त्यांना सांगितले होते.खा.नवनित राणांनी ‘भूमिका’ घेतली असती तर दीपाली आज जगात असती. मंत्री यशोमतीताई आणि खा. नवनित राणा यांच्यावर जबाबदारी निश्चित करून आपण सारे नव्याने शोक- सांत्वन करायला मोकळे आहोत.आम्ही काहीच जबाबदारी घेणार नाही?

दीपाली मूळ रत्नागिरी जवळील खेडची!तिचे वडील जनार्दन चव्हाण दापोली कृषी विद्यापीठात कृषी अधिकारी होते.वडीलांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसात भावाचे आजारपणात निधन झाले.थोरली बहिण प्रेरणा हिचा विवाह साता-यातील कुलदीप पवार यांच्याशी झालेला.दोन्ही मुलींचे लग्न झाल्यावर आई एकटीच दापोलीला राहत होती.दोन्ही मुलींनी आईला साता-यातील व्यंकटपुरा येथे घर घेऊन दिले.मोठ्या मुलीच्या घराजवळ आई राहत होती.पत्रात शेवटी सगळे आर्थिक लाभ आईला द्या,असं दीपाली सांगून गेली.
दीपाली चव्हाण-मोहिते अमरावतीकरांची सून होती.आम्हाला आमचं सत्व सांभाळता आलं नाही आणि सूनही नाही!
या जिल्ह्यात दीपालीला न्याय मिळू शकला नाही.जिल्ह्याने सल्ले खूप दिलेत,आधार दिला नाही.

दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतर सरकारी कागदपत्रांचा खेळ सुरू आहे.रेड्डी महोदयांनी तर सरकार दरबारी सादर केलेल्या खुलास्यात दीपालीचा आपल्यावर किती विश्वास होता,याचे दाखले दिले आहेत.दीपालीने भावनेच्या भरात लिहिलेले शब्द रेड्डींना अभय देत आहेत.

या समाजात अनेक दीपाली आहेत.प्रशासनात अनेक शिवकुमार….ही दलदल आहे.दीपाली म्हणाली होती,”मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. याच दलदलीत मी अडकतच चालले आहे.”
मेळघाट ही एक दलदल आहे,असं दीपाली का म्हणाली असेल?

महिलांसाठी आपला समाज एक ‘दलदल’आहे.इथे सत्ता काही मर्दांची आहे.त्यांचे ‘पौरूषत्व’ कायम स्त्रियांवर अधिकार गाजविण्यात सिद्ध झाले आहे.प्रशासनात पुरूषांचा बोलबाला आहे.सगळे सगळ्यांना ‘सांभाळून’ घेतात.एकाकी पडते फक्त स्त्री!

समाजातील प्रत्येकच जाती-धर्मातील स्त्री ही पिचलेली आहे.तिला कायम ‘नजरेत’ आणि ‘नजरेखाली’ ठेवल्या जाते.घरी असलेला पुरूष कार्यालयातही ‘पुरूष’ च असतो.उलटपक्षी अधिका-याच्या खुर्चीत तर त्याच्यातला ‘राक्षसही’ जागा होतो.आज शिक्षणातून पुढे आलेल्या नवं तरूणी शासकीय सेवेत आपली पावलं टाकीत आहेत.कायद्याने तर स्वरक्षणासाठी दीपालीच्या कमरेला पिस्तूलही दिलं होतं.मात्र वरिष्ठांच्या ‘नजरांसाठी’ कोणतंही ‘अंजन’कायद्याकडे नाही.फार्स ठरलेल्या विशाखा समित्यांच कौतुक संपलं असेल तर, चार पावलं पुढे चला.या राज्याला महिला आयोग नाही.महिलांचा लैंगिक छळ झाला तरच दखल घ्यायची आहे काय? मानसिक छळाचं काय? या समाजात असभ्य लोकांची टोळी ‘की पोस्ट’वर उड्या मारीत असते.घरातला पुरूषी अहंकार कार्यालयात प्रसवितो.असे अहंकारी ‘नामर्द’, समाजातल्या दीपालीचे जगणे मुश्कील करून टाकतात.या व्यवस्थेला ‘दलदल’करून टाकतात.दीपालीने आत्मसन्मानाने जगण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते.नव-यासोबत ती वरिष्ठ अधिका-याला भेटली होती.महिला खासदाराला आपबिती सांगितली होती.यापेक्षा ती अधिक काय करू शकत होती?तिने सगळे प्रयत्न केले.तिची ‘हार्ड डिस्क’फुल्ल झाली होती.अवघा तिशीतला जीव कोमेजुन गेला होता.अखेर तो संपला.

दीपालीच्या मृत्यूला विनोद शिवकुमार,एस.एस.रेड्डी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आपण सारे!जबाबदारी घ्यावी लागेल.आपल्या सगळ्यांचा गुन्हा पोलिस कस्टडीचा नसेलही कदाचित,मात्र आपण आपल्याच नजरेत पडलो आहोत!!


9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments