Home महाराष्ट्र पर्यायी साहित्याचे प्रणेते :महात्मा जोतीराव फुले

पर्यायी साहित्याचे प्रणेते :
महात्मा जोतीराव फुले

प्रा.डॉ. प्रवीण श्री. बनसोड

‘साहित्य’ हा शब्द केवळ कागदावर लेखन करण्यापुरता मर्यादीत नसून साहित्यामधून विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृती निर्माण होत असते. संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि चिरकाल टिकविण्यासाठी साहित्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रत्येक साहित्यिकाकडे त्याची स्वत:ची अशी एक सांस्कृतिक भूमिका असते. ती त्याच्या लेखनामधून व्यक्त होत असते. साहित्य हे समाजाच्या सांस्कृतिक व्यवहाराचा भाग असतो. समाजाच्या धारणा लेखक जेव्हा साहित्यातून मांडतो, तेव्हा त्याची ती कृती त्याची एकट्याची असत नाही तर ती समूहाची कृती असते. समाजातल्या विपरीत गोष्टींबद्दल साहित्यिकाने आवाज उठवावा, अशी समाजाची धारणा असते कारण साहित्यिक केवळ लेखक-कवी-पत्रकार नसतो तर तो विचारवंतही असतो. त्यामुळे जीवनातील सौंदर्य टिपतांना साहित्यिकाने शोषितांच्या बाजूने उभे राहावे, अशी अपेक्षा करणे गैर नाही.
प्रसिद्ध कादंबरीकार जॉर्ज आर्वेल याने 1948 मध्ये म्हटले होते, “साहित्य आणि कला यांचे स्वातंत्र्य बऱ्याच अंशी लेखक-कलावंताच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. गरज पडल्यास साहित्यिक इतर कुणाप्रमाणेही ठाम पावले उचलू शकतो.”
जॉर्ज आर्वेल यांच्या या मताप्रमाणेच त्यापूर्वीच जोतीराव फुले यांनी साहित्यिकांनी कोणती भूमिका घ्यावी हे स्पष्टपणे सांगितले होते. ‘मराठी ग्रंथकार सभेस पत्र’ यामधून महात्मा फुले यांनी मानसांना गुलामीतून मुक्त करणे हाच वाड्‍मयाचा उद्देश असतो असा विचार मांडला. साहित्यिकाच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्माण होते आणि पुढे त्याच साहित्यातून संस्कृती निर्माण होत असल्यानेच जोतीराव फुले यांनी मानवाच्या शोषणावर आणि त्याच्या शोषणव्यस्थेवर एकही शद्ब न लिहिणाऱ्या तथाकथित साहित्यिकांचा निषेध नोंदविला. 11 जून 1885 रोजी ग्रंथकार सभेस ठणकावून सांगितले की, “आमचे साहित्य आम्ही निर्माण करु आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. आम्हा शुद्रादि अतिशूद्रास काय-काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात, हे त्यांच्या उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारास व मोठ-मोठ्या सभास्थानी आंगातून भाषण करणारांस कोठून कळणार.”

आज तंत्रज्ञानाच्या नाविन्यतेचा स्फोट घडत असतांना ग्रामीण जीवनाची झालेली उलथापालथ, विवेकशून्य गतिमान जीवन आणि सामान्य मानसाच्या जीवनात झालेला बदल मानवी जीवनाला तर्कशून्यतेकडे नेत आहे. आर्थिक-राजकीय सत्तांचा उन्माद आणि तत्त्वशून्य समाजधारणा याबाबत कोणी बोलावे आणि जीवनाचे सौंदर्य कोणी पुन्हा मांडावे ? असे प्रश्न निर्माण होत असतांना साहित्यिकांशिवाय हे कार्य दुसरे कोण करु शकतील. किंबहुना साहित्यिकांनीच हे प्रश्न मांडावे अशी समाजाची अपेक्षा गैर कशी असू शकेल. महात्मा जोतीराव फुले यांनी ही जबाबदारी साहित्यिकांवर सोपविली आहे.
साहित्यिक जी निर्मिती करतात, ती निर्मिती संस्कृतीनिर्माणाचे कार्य करीत असते, अश्यावेळी विवेकाशी, समतेशी, स्वातंत्र्याशी फारकत घेणारे साहित्यिक नेमकी कोणती संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात ? या प्रश्नाचे उत्तर राजकीय-आर्थिक संत्तेच्या प्रभावात आहे. महात्मा जोतीराव फुले यांनी त्यासाठीच सत्यशोधक पर्यायी संस्कृतीचा पुरस्कार करुन साहित्यिकांनी शोषितांच्या बाजूने उभे राहण्याचा पुरस्कार करतात. ज्या-ज्या काळात विवेकशून्य भितीग्रस्तता निर्माण करुन समाजाचे मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रत्येक वेळी साहित्यिकांनीच उन्माद सत्तेला प्रश्न विचारले. महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या चळवळीने जात-धर्म-पुरुषसत्ताक-सरंजामी-भांडवली व्यवस्थेला आपल्या लेखनीतून जाब विचारला आणि पर्यायी संस्कृतीच्या निर्माणाचे स्वप्न पाहिले.
‘लिटररी रेव्हेरिज’ या प्रबंधामध्ये ‘बेलिन्स्कि’ या समिक्षकाने म्हटले आहे, “बहुजन समाजाचे जीवन ज्या साहित्यात प्रतिबिंबित होत असेल व दलित, पिडित आणि शोषित वर्गाच्या गाऱ्हाण्यांना ज्यात वाचा फुटत असेल तेव्हा त्याच्या साहित्यामधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक संस्कृतीव्यवस्था प्रतिबिंबित होत असते. ती संस्कृतीव्यवस्था कुठल्यातरी विचाराशी बांधिल असतेच. लेखक ज्या सांस्कृतिकव्यवस्थेचा स्वीकार करतो ती व्यवस्था त्याच्या लेखनव्यवहाराचा अभिभाज्य घटक बनून येत असते. त्या साहित्यिकाच्या व्यक्तिमत्त्वावर झालेले संस्कार, आणि त्याने स्वीकारलेली विचारव्यवस्था शोषणव्यवस्थेच्या विरोधात असेल तर त्याच्या साहित्याला विवेकाचे रुप प्राप्त होऊन मानवी मूल्याचा जागर घडत असतो. महात्या जोतीराव फुले यांनी साहित्यिकांना विवेकवादी मानवी मूल्यांसाठी साहित्य लिहिण्याचे केलेले आवाहन यासाठीच महत्वाचे ठरते.
भारतीय समाजव्यवस्थेमध्ये परंपरागत रुढीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत झालेले लोकसाहित्य, ओव्या, लोककथा, लोकगीते अजूनही उपेक्षित आहे. लोकगायकांची परंपरा आता
खंडीत झाली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे या लोकसाहित्याला साहित्यिकांनी मूळात साहित्यच मानले नाही. बहुजन समाजाने निर्माण केलेली कला तर हीणविण्याचेच प्रयत्न झाले. बहुजन समाजाच्या जगण्यातील सौंदर्यस्थळे असणाऱ्या साहित्याला आणि साहित्यिकांना अजूनही सामाजिक महत्व प्राप्त झाले नाही, हे वास्तव आहे. सत्यशोधक कवी, लेखकांनी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी जलसे, गाणी यांचा आधार घेतला होता, हे विसरता येत नाही. अश्यावेळी सामान्य कष्टकरी माणसाचे जगणे अधिक सौंदर्यपूर्ण करुन पर्यायी संस्कृतीच्या निर्माणासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक परंपरेची कास साहित्यिकांना धरावी लागेल.


मराठी विभाग प्रमुख
नेहरु महाविद्यालय,
नेरपरसोपंत, जि. यवतमाळ
मो. 9423425129

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments