Home ताज्या घडामोडी तहान लागल्यावर…..

तहान लागल्यावर…..

माधव पांडे

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मिनी लाॅकडाऊन झाले.लाॅकडाऊन म्हणू नका एवढंच!गेल्या आठवडाभर चर्चेचं गु-हाळ चालू होतं. शब्दबदल केला तरी लाॅकडाऊन किंवा कठोर निर्बंधांचे स्वागत करता येत नाही.मात्र उपाय काय? असं म्हणून आपण सारेच येत्या काळात पुन्हा एकदा ‘ठेविले अनंते…’ या संतवचनात परिस्थितीसमोर हतबल होऊन गुमान घरी बसणार आहोत.समाजाचा पुन्हा एकदा ‘ कोंडवाडा’ करण्याची सरकारची हिंमत होत नसली तरी वेळीच काही कठोर निर्णय घेतले नाही तर समाजाचे ‘स्मशान’व्हायला वेळ लागणार नाही.परिस्थिती भयंकर आहे.भयावह आहे.लोकांना होणारा त्रास शब्दांपलिकडचा आहे.स्मशानभूमीत ‘टोकन’ घेऊन ‘अंत्यसंस्कार’करावे लागतील,अश्या दिवसांची कोणी कल्पनाही कोणी केली नसेल.

ही नियती आहे.अशी आपण ऐकमेकांची समजूत काढू.मात्र या परिस्थितीला ताब्यात ठेवण्यासारखं काहीच आपल्या हातात नव्हतं काय? असा गंभीर विचार करायला कोणालाच ‘फुरसद’ नाही.
समाज अस्वस्थ आहे.चिंताक्रांत आहे.मात्र गांभिर्य कुठे आहे?

मित्रहो,
गुढीपाडव्यासारख्या पवित्र दिनी मी हा लेख लिहायला घेतला आहे.माझ्या घरासमोर एक फ्लॅट सिस्टिम बांधणे सुरू आहे.ठेकेदार भरभर कामे आटोपत आहे.त्या बांधकामावर रखवाली करणारे कुटुंब माझ्या नजरेच्या टप्प्यात एका टिनाच्या खोलीत तीन कच्च्या बच्च्यांसह वास्तव्याला आहे.त्यांचा तुटका-फुटका संसार माझ्या घराच्या गॅलरीतून मी दररोज बघतो.किंबहुना तो ‘उघडा’ संसार ‘उघडपणे ‘दिसतो.डोळे आहेत म्हणून आपण बघतो एवढंच!

त्यांचा गुढीपाडवा मी आज निरखून बघितला. बांधकामातील एका बांबुला उंच शिडावर बांधावे तशी उंच गुढी बांधली होती.त्यावर रोजच्याच वापरातला स्टीलचा गडवा आणि गृहलक्ष्मीची ठेवणीतील साडी भारतीय संस्कृतीची ध्वजा फडकवित होती.काळ्या मातीत मिसळल्याने सर्वांगाने काळीशार असलेल्या त्या तीन चिमुरड्यांना त्यांची आई म्हणाली,पुढच्या वर्षी तुम्हाला गोड खाऊ घालेन.यावर्षी काही नाही.आता तर तुमच्या बापाला पगार मिळणार नाही.आज तुमच्यासाठी टरबुज आहे.खा!

तुम्हाला डोळे असतील तर असे अनेक प्रसंग समाजात असंख्य कुटुंबात दिसुन येतील.तुम्ही सुन्न व्हाल.
आसुसलेल्या डोळ्यांना समजुतदारीचे झापडं लावणा-या त्या माऊलीला बघत असताना माझ्या मोबाईलवर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि शुभकामनांचा पाऊस सुरू होता.घरात चार गोड पदार्थ झाले होते.गॅलरीतून दिसणारा देश माझा की, हातातल्या मोबाईलवर क्षणा-क्षणाला सदिच्छांचा वर्षाव
करणारा देश माझा…
माझं मन मला खात होतं.घरातले पदार्थ त्या बच्च्यांना नेवून देण्याची मनाची तयारी केली.लगेच एका मनाने मला रोखले.सोशल डिस्टन्सिंग! राहविल्या गेलं नाही.तेव्हा घरातली काही फळं त्या आशेवर जगणा-या नवभारताला सोपविली.

माझा धर्म मला कुंभमेळ्यात ‘शाही स्नानात’डुबकी मारून पापप्रायश्चित्य करायला सुचवितो.मात्र उपाशी पोटासाठी कुठले ‘शाही स्नान’असेल?

आज लाॅकडाऊनची चर्चा सर्वत्र सुरू आहे.लाॅकडाऊन करा, मात्र गरीबांसाठी काही तरी करा,अशी मागणी सातत्याने होत आहे.गरीबांच्या बँक खात्यात पाच हजार टाका,अशी पुस्तीही जोडल्या जात आहे.वेगवेगळ्या मागण्या आणि निवेदने बघितली की,सगळेच पोळ्या शेकायला बसले आहेत,याची खात्री होते.खरचं गरीबांच्या पदरात काही पडेल?

आम्ही भारतीय मोठे भोळे आहोत.विसराळू आहोत.’हो’ च्या पुढे आणि ‘नाही’ च्या मागे.आम्हाला धर्माचा आणि देशाचा प्रचंड अभिमान आहे.संस्कृती तर आम्हाला भाषणात ‘इंप्रेशन’ मारायला हवीच आहे.एकदा तरी या देशातील लोकांची ‘लाय डिटेक्टर’ कराच.आम्ही किती ढोंगी आहोत याचा वारंवार प्रत्यय येईल.

प्रश्न सोपे आहेत.आम्ही कठीण करतो.आपण सगळ्यांनी समाजाच्या बिघडलेल्या स्वास्थ्यासाठी राजकारण्यांना जबाबदार धरले आहे.
मला प्रश्न विचारू द्या.बंगालमध्ये निवडणुका आहेत.करोनाही आहे.जिंकणार कोण?
महाराष्ट्रात करोनाचे रौद्र रूप आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत जिंकणार कोण?

प्रश्न सोपे आहेत.आणि उत्तरं त्याहून सोपी.आम्हाला प्रश्न कळत नसल्याने आम्ही चुकीची उत्तरे शोधित आहोत.समस्याचं माहिती नाही.तरी समाधान शोधतोय!

सध्या सोशल मीडियावर करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अनेक दुर्दैवी व्हीडीओ बघायला मिळतात.सध्या कोणत्याही वयोगटातला व्यक्ती करोनाचा शिकार होत आहे.अंत्यसंस्काराचे किंवा पीपीई किटमधिल देहांचे व्हीडीओ मन हेलावून सोडतात. कोणत्याही कुटुंबातला व्यक्ती अचानक जगाचा निरोप घेत असेल तर कुटुंबियांचे सांत्वन करायला शब्द नाहीत.मराठवाड्यातील काँग्रेसचे आमदार करोनाचे बळी ठरले.मृत्यूचं थैमान आहे.अशा भयावह परिस्थितीला कोण जबाबदार? असा प्रश्न कोणाच्याच मनात कसा येत नाही?

या देशाचे,समाजाचे प्रश्न आम्हीच निर्माण करतो.जबाबदारी घ्यावी लागेल.’रेमडेसिवीर’या इंजेक्शनच्या अभावी अनेक रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकत आहेत.ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेक रूग्ण दगावले, अश्याही बातम्यांचा मारा सुरू आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत म्हणून रूग्ण दम तोडीत आहेत.

बघा,मी डाॅक्टर नाही.समाज दररोज जे बघत आहे त्यावरून चार मुद्दे स्पष्ट आहेत.करोनावर औषध नाही.लस आहे.हे एकदा स्पष्ट झाले.तरीही सगळी यंत्रणा गोलगोल फिरत आहे.

आपण एक – एक मुद्दा समजून घेऊ.
रेमडेसिवीर इंजेक्शन काय आहे?वाचा.
रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर प्रभावी मानलं जातं.30 जून 2020 पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरायला परवानगी देण्यात आली.करोनाचा संसर्ग फुफ्फुसाला होतो .एच.आर.सी.टी.ही चाचणी करून हा संसर्ग किती वाढला आहे हे तपासलं जातं.त्याचा स्कोअर असतो.25 पैकी 5 पर्यंतचा स्कोअर हा गंभीर मानला जात नाही.पण 6च्या पुढचा स्कोअर आला म्हणजे संसर्ग जास्त आहे .अधिक संसर्ग असणा-या रूग्णांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन दिलं जातं.सध्या 6 कंपन्यांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो.या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात करावा लागतो.तो भारतात उपलब्ध नाही.त्यामुळे कच्च्या मालाच्या आयातीपासून ते उत्पादनाची प्रक्रिया मोठी आहे.या इंजेक्शनबद्दल तुफानी चर्चा आहे.आत्मनिर्भर भारताची स्वप्न पाहणा-या देशाला एका इंजेक्शनसाठी इतकं झगडावं लागतं.कसे होणार आपण आत्मनिर्भर!

आता आॅक्सिजनचे सत्य बघा.नागपूर शहरातील कृत्रिम आॅक्सिजन पुरवठ्याची कमतरता लक्षात घेता नागपूर शहरातच एक आॅक्सिजन प्लांन्ट लावणे आवश्यक आहे.900आॅक्सिजन सिलिंडरची क्षमता असलेला प्लांट लावण्यासाठी 10कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.याप्रकरणी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिलेत.

रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन प्लांन्ट हा 135 कोटीच्या देशासाठी फार मोठा विषय आहे का? एखाद्या भ्रष्ट सरकारी अधिका-याकडे धाड टाकली तरी दहा कोटी रोख मिळतील.
बाकी महाराष्ट्रातील जनतेला कोटींचा हिशोब कसा करायचा ते तर अलिकडे राज्यकर्त्यांनीच शिकविले आहे.

प्रश्न मानसिकतेचा आहे.माध्यमातून वास्तव दाखविल्या जातं.समाजाला उत्तर शोधायचे आहे.अकरा कोटींचा महाराष्ट्र.एक कोटी लोकांचं आरोग्य सांभाळू शकत नाही.
कटू आहे पण सत्य आहे.
आम्ही देश म्हणून कोणत्याचं समस्येकडे बघत नाही.

मी जाणिवपूर्वक खाजगी रूग्णालयात करोनाची लस घेतली.अडीचशे रूपये देऊ शकणा-या प्रत्येकाने खाजगी रूग्णालयातून लस घेतली तर सरकार गरीबांना मोफत लस देऊ शकेल.हा एक विचार आहे.मात्र लगेच महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यांच्या बंगल्यात जाऊन सरकारी कर्मचारी संपूर्ण कुटुंबाचे लसीकरण करीत आहे.या ‘होम डिलिव्हरीचे’चित्र देशाचा विचार करणा-यांचा अपमान करणारे आहे.

एकीकडे गरीबांचं भलं करण्याची भाषा वापरायची.दुसरीकडे अवघ्या दहा कोटीच्या ऑक्सिजन प्लांन्टसाठी लोकांना झुरवत ठेवायचं,ही कसली लोकशाही? आणि कसले हे राजे!

प्रश्न लहान – मोठे असू शकतात.व्यवस्थेची सूत्रे ज्यांच्या हातात आपण सोपविली ती मंडळी प्रश्नांना चिघळवितात.गंभीर करतात.कोणी तरी पक्ष कार्यालयातून इंजेक्शन वाटतात..कोणावर मेहरबानी करीत आहात?आणि कशाची?एका इंजेक्शनची!तळपायाची आग मस्तकात जावी,इतकी गलिच्छ कृती.तरीही माझा देश महान आहे.

या देशात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘टोकन’ घेण्याची परिस्थिती कोणी निर्माण केली?
एक मुद्दा नेहमी पुढे केल्या जातो.करोना वैश्विक संकट आहे.खरं आहे.मात्र या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्ही पवित्र नद्यांमध्ये ‘शाही स्नान’घालत असू,तर दोष कोणाला देणार?

आम्ही भारतीय दांभिक आहोत.स्वार्थी आणि सोयीचं वागणारे आहोत.जी निष्पाप माणसं या जगाला सोडून चालली त्यांना जगण्याचा हक्क नाही,इथंवर आम्ही ऐकत आहोत.

हा लोकशाहीचा देश आहे.एकाही उद्योगपती,श्रीमंत व्यक्ती ,राजकीय नेता,सिनेस्टार,क्रिकेटपटूचा उपचाराविना मृत्यू झाला नाही.सगळ्यांना सगळ्या सुविधा मिळाल्यात,मिळत राहणार!

माझ्या घरासमोर टिनाच्या झोपडीतील त्या भारतीयाला हा देश आरोग्याच्या सुविधा कधी देणार? त्याच्यासाठी कुठला हप्ता जमा करणार ? हा देश गरीबांचा नाही काय?या देशात गरीबांनी जगायचं नाही का? एकदा तरी त्या फाटक्या माणसासाठी योजना आणा,म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदावी लागणार नाही.
9823023003

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments