Home ताज्या घडामोडी एक गुच्छ कौतुकाचा!

एक गुच्छ कौतुकाचा!

माधव पांडे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक परिघात उल्लेखनिय सेवा देणा-या विद्यापीठाच्या अधिकारी – कर्मचा-यांना महाराष्ट्र दिनी ‘ उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’प्रदान केला.कोणत्याही व्यवस्थेत चांगले कार्य करणा-या प्रत्येकालाच ‘अवाॅर्ड’हवा-हवासा असतो.बहुतांश लोक उत्तम कामंही करतात.मात्र पात्रता आणि निकष या दंडकांसमोर अनेकांच्या कार्यावर ‘मोहोर’उमटतं नाही.आयुष्यभर चांगलं काम करून कोणी आपली साधी दखलही घेतली नाही,असा निराशेचा सूर अनेकांच्या ‘सेवापंचकात’ असतो.मात्र काही व्यक्ती असं काही कार्य करतात की,त्या कार्यमग्न विभूतींना पुरस्कार मिळण्यापूर्वीच त्यांच्या कार्याची समाजाने दखल घेतलेली असते.

विद्यापीठाने यावर्षी प्रशासकीय स्तरावरील पुरस्कारासाठी चांगले कार्य करणा-या काही अधिकारी-कर्मचा-यांची निवड केली.या पुरस्काराच्या यादीत एक चकाकतं नावं लोकांसमोर आलं.विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डाॅ.मोना चिमोटे यांना यावर्षीचा शिक्षक गटात ‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला.विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका असा लौकीक असणा-या डाॅ.मोना चिमोटेंच्या पुरस्कारात अनेक ज्ञानार्थी शिक्षकांचा सन्मान झाल्याची भावना दडली आहे.

मित्रहो,
विविध क्षेत्रात अनेक चांगल्या व्यक्ती सातत्याने कार्यरत आहेत.सेवा क्षेत्रात निस्पृहतेने कार्य करणारे सेवाव्रती समाजाच्या ‘गळ्यातील ताईत’बनतात. मात्र नोकरदारांच्या कार्यांची समाज पटकन दखल घेत नाही.’सर्व्हिस’ या शब्दाचा मराठीत अर्थ ‘सेवा ‘ असला तरी नोकरीत आपण समाजसेवा करतो,असा दावा करता येणार नाही.अगदी आय.ए.एस पासून चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांपर्यंत कोणालाही आपण समाजाची सेवा करीत आहोत असा भ्रम बाळगण्याचा हक्क नाही.पगार मिळतो म्हणून आपण कामं करतो,अशी रोखठोक भूमिका अनेक जण घेतांना दिसतात.यात चुकीचं तरी काय?

लोकप्रतिनिधींना ‘जनसेवक ‘ही उपाधी आहे.नगरसेवक या पदाला ‘काॅर्पोरेटर’ हाच शब्द अधिक वस्तुस्थितीदर्शक आहे.नोकरदारांमध्ये सेवा वगैरे भ्रम आहे. गेल्या वर्षेभरात महागाई भत्ता वाढला नाही म्हणून आतल्या आत कुजबुज सुरू आहे.देशातील करोडो विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडाले,यावर कोणी काही बोलतांना दिसत नाही.

समाजाच्या मनात नेमकं काय आहे ओळखा.तुम्ही सुज्ञ आहात.सगळ्यांना सगळं समजतं.समाजाच्या सर्वच व्यवस्थांमध्ये एक दांभिकता आली आहे.दिसतं तसं नसतं.काही क्षेत्रांना पवित्र क्षेत्रांचा दर्जाही दिल्या जातो.मात्र तिर्थक्षेत्रीही लोकांची निराशा होते.माणसाच्या आतला माणूस मुर्च्छित झाला आहे.त्यामुळे आपली व्यवस्था डळमळत असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो.समाजाने बघावं कुणाकडे? समाजाच्या नजरेतून कुणी सुटत नाही.काही व्यक्ती आपल्या कामातून सतत समाजाचा विचार करीत जातात.अश्यांना कोणत्या तरी टप्प्यावर ‘पुरस्कृत’ ठरविले जाते.

उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मानित झालेल्या डाॅ.मोना चिमोटेंचे अभिनंदन करण्यासाठी मी हा शब्दगुच्छ घेऊन उभा आहे.शिक्षिकेसमोर उभं राहून त्यांना वंदन करण्याचे भाग्य ज्या विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही भाग्यवानच!
अमरावती विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख अशी लांबलचक ओळख असलेल्या डाॅ.मोना चिमोटे यांना कोण ओळखत नाही?अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचे शैक्षणिक संदर्भ डाॅ.मोना चिमोटेंना जवळून ओळखतात.अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या सहधर्मचारिणी ही ओळख खाजगी समजुया.

मुळात माणसाची ओळख निर्माण होते म्हणजे काय?लोकं तुम्हाला नावाने ओळखतात यापेक्षा तुमच्या कामाने ओळखत असतील तर तुम्ही जिंकलात!

डाॅ.मोना चिमोटें यांच्या अध्यापन व साहित्य क्षेत्रातील संचारामुळे त्यांना नवी स्वतंत्र ओळख मिळाली आहे.विद्यापीठात मराठी विषय शिकविण्याचे निमित्त्य असेल,मात्र त्यांच्यातील शिक्षिका अव्दितीय आहे.

डाॅ.मोना चिमोटेंच्या वर्गात बसून शिकण्याचे भाग्य मला मिळाले नाही.विद्यार्थ्यांचं शिक्षकांप्रती विलक्षण प्रेम असतं.विद्यार्थीच शिक्षकांचे खरे प्रचारक असतात.मॅड्म वर्गात कसं शिकवितात हे बघण्याची मला कधी संधी मिळाली नाही.तरीसुद्धा मी खात्रीने सांगू शकतो की,डाॅ.मोना चिमोटे उत्तम शिक्षिका आहेत.शिक्षकांचे शिकविणं एका बंदिस्त वर्गात असलं तरी जीवंत समाजाची तिथे उपस्थिती असते,ही गोष्ट अनेकांच्या नजरेतून सुटून जाते.

जगात मातृभाषा शिकविणा-या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना विशेष ‘ममत्व’ असते.
मला आठवतं, व्ही.एम.व्ही काॅलेजमध्ये मी मराठीच्या पदव्युत्तर वर्गाला शिकत असतांना डाॅ.सुशीला पाटील व डाॅ.विजया डबीर या दोन विदुषी आमच्या वर्गाला शिकवित होत्या.डाॅ.सुशीला पाटील मॅड्म शिकवितांना वर्गात एक निरव शांतता असायची.त्यांची अध्यापनशैली देव्हा-यातील निरंजनी सारखी होती.अगदी या उलट डाॅ.विजया डबीर मॅड्म यांच्या अध्यापनात प्रचंड ऊर्जा आणि सळसळतं तारूण्य ओतप्रोत भरलेलं असायचं.साहित्य जीवंत होवून धो-धो कोसळायचं.डाॅ.सुशीला पाटील आणि डाॅ.विजया डबीर या दोन्ही प्राध्यापिकांची स्वतंत्र अध्यापनशैली होती.डाॅ.पाटील मॅड्म यांच्या मार्गदर्शनाखाली मला एका मासिकाचे संपादन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या राठीनगरातील घरीही बरेचदा जायला व्हायचं. डाॅ.सुशीला पाटील मॅड्म यांच्याप्रती माझ्या मनात प्रचंड आदर होता आणि आजही आहे.मात्र मला सतत डाॅ.विजया डबीर यांचा शिष्य होण्याचं स्वप्न पडतं असे.डाॅ.विजया डबीर यांना वर्गात ज्यांनी शिकवितांना ऐकलं आणि बघितलं असेल तो विद्यार्थी धन्य झाला.मी तर कृतकृत्यच आहे!

आपल्या जगण्यावर,विचारांवर शिक्षकांचा खूप प्रभाव असतो.डाॅ.विजया डबीर यांचं शिकविणं समजून देणं नव्हतं.अलिकडच्या भाषेत ‘शेअरींग’होतं.माझ्या मनी ते तुझ्या मनी इतके जवळ त्यांचे शब्द पोहचायचे.त्यांची जीवनशैली त्यांच्या अध्यापनशैलीची ओळख होती.एक शिक्षक म्हणून डाॅ.विजया डबीर माझा आदर्श आहेत.आज अश्या उत्तमोत्तम शिक्षकांना समाज ‘मुकतांना’ दिसतो. कदाचित त्यामुळे समाज’मुक’आहे.

डाॅ.मोना चिमोटे यांनी महाराष्ट्र टाईम्स मध्ये लिहिलेल्या ‘सगुण-निर्गुण’या स्तंभ लेखनात डाॅ.सुशीला पाटील यांच्या चिंतनाचा प्रभाव दिसून येतो.डाॅ.मोना चिमोटेंच्या अध्यापनशैलीत प्रचंड ऊर्जा,सकारात्मकता आणि वास्तवाला स्विकारणारे समाजभान सहज बघता येते. मला माहित नाही, मात्र डाॅ.विजया डबीर यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब डाॅ.मोना चिमोटेंच्या अध्यापनशैलीत विद्यार्थी बघत असतील.

खरं म्हणजे शिक्षक म्हणून जगतांना कोणत्याच मर्यांदा नसतात.बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या अगदी जवळचा ‘मित्र’ म्हणून शिक्षकांकडे बघितले जाते.प्राध्यापिका असो वा शाळेतील शिक्षिका यांचे कार्यक्षेत्र सातत्याने वाढत जात आहे.समाजासमोर नवनविन प्रश्न येत आहेत.मुलींच्या शिक्षणाचे सातत्य आणि स्त्रीजीवन हे दोन्ही विषय परस्पर पुरक आहेत.क्रमिक अभ्यासक्रमापलिकडे जाऊन ज्या शिक्षिकांचा समाजात व वर्गात वावर आहे,त्या सगळ्यांना समाजातील अस्वस्थता टिपता येते.मोना चिमोटे विविध व्यासपीठांवरून बोलतांना अश्या सगळ्या विषयातील त्यांचे अनुभव सातत्याने मांडत आल्या आहेत.

शिक्षकांची सेवा सरकारी नजरेत अत्यावश्यक नसेल.तरीही समाजासाठी चांगले शिक्षक असणं ‘ अत्यावश्यक ‘आहे.विषय ज्ञान आणि पांडित्य या पलिकडे जाऊन ज्यांच्यासाठी हा ‘ज्ञानयज्ञ’ सुरू आहे,त्या घटकांशी तुमचं असलेलं नातं, हिच शिक्षकांची खरी ओळख आहे.शिक्षक समाजाशी आपलं नातं सांगतो. एका बाजुने शिक्षकांनी समाजासाठी उत्तम प्रयत्न केले तर दुस-या बाजूने विद्यार्थी तुमच्याशी नातं सांगतात.अशा शिक्षकांना मग कुठे तरी ‘विद्यार्थीप्रिय’ही पदवी मिळते.विद्यार्थ्यांचं विद्यापीठ वेगळं असतं.त्यांच्या नजरेत ‘सन्मानाचा’दीक्षांत समारोह तुम्ही दररोज बघू शकता.

डाॅ.मोना चिमोटे यांना समाजमनाची नाड गवसली आहे.विद्यार्थ्यांना ‘समाजभान’ येण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नरत आहेत.शिक्षकांचे प्रयत्न दर्शनिय असतात,प्रदर्शनिय नाहीत!फार खोलवर प्रयत्न सुरू असतात.मानवी मनाशी नातं जोडायचं असतं.

शिक्षकांना पुरस्कार असेच मिळत नाहीत.त्यांना पहिले आपल्या नजरेत ‘पुरस्कृत’व्हावं लागतं.त्यानंतर कुठल्या तरी व्यासपीठावर त्यांचा गौरव होतो!

डाॅ.मोना चिमोटे यांचा साहित्य क्षेत्राशी उत्तम समन्वय आणि सुसंवाद आहे.विदर्भ साहित्य संघात त्यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून विनम्र असलं पाहिजे,या विधानाचे मूर्त रूप त्यांच्यात बघता येईल.

अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून डाॅ.मोना चिमोटे जबाबदारी सांभाळत आहेत.समाजातील अनेक उपक्रमांत त्यांची हार्दिक उपस्थिती आहे.जगण्यात एक रसिकता जोपासत प्रचंड ऊर्जेने दिवसरात्र कुठेतरी नियोजन सुरू आहे.धावपळ सुरू आहे.फोना-फोनी,मॅसेज,हारगुच्छे,स्वागत आणि नवनविन उपक्रम.त्यांचं रोजचं जगणं एक उत्सव आहे.प्रचंड आशावादी,सकारात्मक तरी महत्वाकांक्षेची कुठेही किनार नसलेली प्रसन्नवदनी ही थोर शिक्षिका सध्या एका पुस्तकाचे लिखाण करीत आहे.हा माझा अंदाज आहे.वाचतं-लिहतं झाल्यावर माणुस जगणं शिकतो.कधी दुस-याला जगविणं शिकवितो.शिक्षक तर कायम शिकतच असतो.

डाॅ.मोना चिमोटे यांच्या अध्यापन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यांची विद्यापीठाने दखल घेतली.उद्या सरकारही घेईल.यापुढील अनेक पुरस्कार त्यांच्या नावाची वाट बघत आहेत.हा प्रवास असाच पुढे जाईल.

डाॅ.मोना चिमोटेंना प्रदान केलेल्या पुरस्काराने या वाटेवरील पांथिकांना आता जरा बळ येईल.त्यांच्या यशात आपला वाटा शोधला जाईल.यशाचे असे वाटेकरीच ‘पुरस्काराचं’मूल्य वाढवित असतात.ज्या अनेक उत्तम शिक्षकांना व्यवस्थेने पुरस्कृत केले नसेल त्यांनाही डाॅ.मोना चिमोटे यांच्या ‘पुरस्कारात’ आपला पुरस्कार दिसेल.एक गुच्छ त्या महान विभूतींसाठीही असेल!!


9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments