Home ताज्या घडामोडी पेटलेल्या स्मशानातील हळवा कोरोना

पेटलेल्या स्मशानातील हळवा कोरोना

धनंजय पाठक

शुक्रवारी मी सहस्त्रबुध्दे सरांच्या अंतेष्टीसाठी स्मशानात गेलो होतो, आमच्या विलासराव मराठेंचे ते सासरे होते.आज हार्टअटॅकने गेले.
स्मशानात आज विचित्र चित्र दिसलं. गॅसदाहीनी बंद असल्याने कोरोनाबळींना चक्क आपल्या रेग्युलर ओट्यांवर सध्या जाळत आहेत. मी ज्या ठीकाणी उभा होतो त्याच्या मागेच एक चिता रचली होती. सरांना सरणावर ठेवले जात असल्याने मी कदाचित एकचित्ताने तिकडे बघत होतो, आजूबाजूस माझे लक्ष नव्हते . तेव्हढ्यात एक स्कुलव्हॅन डायरेक्ट आत येऊन माझ्या मागे थांबली .त्यातून दोघेजण उतरले व त्यांनी व्हॅनमधून एक प्रेत ओढून तिथे तयार असलेल्या चितेवर टाकले. तोपर्यंत माझे लक्ष नव्हतेच. दोघेतिघे आमच्या सोबतचे माझ्याजवळ उभे होते ,ते दोघेही गायब झाले होते. त्यातील एकाने अस्वस्थपणे माझ्या हाताला धरून ओढल्याचेही आठवते पण मला सरांचा चेहरा बघायचा असल्याने मी तिथून हलण्याच्या मनस्थितीत नव्हतो, मला ११-१२ वीला सरांनी गणित शिकवले होते.
हे सर्व सुरू असतांना मला कुणी आवाज देऊन म्हणाले साहेब थोडं बाजूला सरकता का ?
. मी त्याच्याकडे बघितलं व नखनिखांत शहारलो. पीपीई किट चढवलेला एकजण माझ्यापासून अगदी दोन फुटांवर उभा राहून जरा बाजूला सरकायला सांगत होता. माझी त्रासिक नजर त्याने ओळखली अन् सहजपणे माझ्या मागे रचून असलेल्या चितेकडे बोट दाखविले. मी मागे वळून बघितले तर त्या चितेवर प्लॅस्टिकमध्ये रॅप केलेले प्रेत दिसले . मग काय ……माझी पुढे झालेली हालचाल माझ्या नियंत्रणात नव्हती . कुठली तरी अनामिक शक्ति माझ्या शरीरात कार्यरत झाली व मी शक्तिमान सिरीयलनधील शक्तिमान सारखा किंवा शक्तिमान फटाक्यासारखा भिंगरीगत तिथून जो ग़ायब झालो की स्मशानातील आडव्या विश्राम शेडमागील ओट्यावर जे झाडांचे पार आहेत तिथे बसलेलो मी काही क्षणांमध्ये स्वत:ला सापडलो. छातीचा अगदी भाता झाला होता. तिथून आधी मी जिथे उभा होतो तिकडे चोरागत बघायला लागलो. आपण स्मशानात शिरल्यावर उजव्या हाताला प्रेतं जाळायचं कवेलू शेड आहे जुनं ,त्या शेड व स्मशानाच्या भिंतीच्या मध्ये जी खुली पट्टी आहे त्या पट्टीच्या अगदी तोंडावर कोरोनाबळीचं प्रेत जळत होतं. नियमित स्मशानात गॅस दाहीनीच्या दिशेकडून आणखी चार-पाच पीपीई किटधारक आले . त्यांचा गलबला स्मशानात उपस्थितांनधील माझ्यासारखे उगीचच अंग चोरून चोरून भेदरलेल्या चेहऱ्याने बघत होते. पीपीईकीटधाऱ्यांचे वर्तन मात्र अगदी योद्ध्यांप्रमाणे निर्भिड होते. त्यांनी हसत – खिदळत ,
ओट्यांच्या पहिल्या रांगेतील चौथा ओटा ज्याला आजूबाजूस लोखंडी गार्ड आहेत त्या ओट्यावर लाकडाची दहाबारा खोंडं आणून टाकली.त्यावर तुराट्या टाकून थोड्या गोवऱ्या ओतल्या व सरणावर राॅकेल शिंपडले. तितक्यात त्यांच्यातील दोघांनी आणखी एक प्लॅस्टीकची लंबोटकी बॅग आणून चितेवर ठेवली व एकाने पेटत्या तुराट्यांनी चितेला अग्नी दिला. पीपीई कीटधारी थोडे निवांत झाले . मग गुटख्याच्या पुड्या तोंडात ओतणे, तंबाखू मळून हास्यविनोदाच्या संगतीने तोंडात भरणे झाले . थोड्याच वेळात स्मशानात चिता रचणारे जे चांडाळ आहेत ,जे चेहऱ्याने आपल्याही ओळखीचे झाले आहेत त्यांच्यापैकी एकाला बोलावून त्यांनी पेटत्या चितेची जबाबदारी त्याच्यावर सोपविली व ते पीपीई योद्धे पुढील मोहीमेवर रवाना झाले.
हा प्रकार माझ्यासकट सर्व कोरोनाफोबियाग्रस्त भयचकीत नजरेने बघत होतो. आश्चर्य हे की पीपीई योद्ध्यांचे पीपीई कीट केवळ नावापुरते होते.कीटच्या टोप्या पाठीवर फेकलेल्या, कीटची अर्ध्यापेक्षा जास्त चेन उघडी , चेहऱ्याला ना मास्क ना सॅनेटायझरचा सोस , अगदीच बेमुर्वत निर्धास्त . मनांत विचार आला की अख्ख्या जगाला ऑक्सिजनवर आणणाऱ्या ‘कोरोना ‘ ची यांना काहीच का भिती नाही की हे मृत्युंजय आहेत ? कुठल्या अमरत्वाचा डोस घेऊन आलेयत हे ?.
मन विचारचक्रात गुंतलेले असतांनाच आमच्या बरोबरची मंडळी स्मशानातून निघती झाल्याने मीही निघालो.
आतापर्यंत कोरोनाबळीची चिता बांबूने ढोसत असलेला चांडाळ विलासरावांजवळ बक्षीसी मागायला आला. सरांचीही चिता त्याने रचली होती. त्याला पाहून विलासरावांशी बोलत असलेलो मी नकळतपणे दोन पावले मागे सरलो. विलासदादांनी त्याला शंभर रूपये दिले. खुश होऊन तो निघाला तसे मी न राहवून अगदी पिळवटून त्याला विचारले ,दादा ही कोरोनावाल्यांची प्रेते तुम्ही किती सहजपणे जाळताय ; तो नुसताच हसला. माझी पिळवट त्याला कळली असावी योद्ध्याच्या अंगावर नावापुरते तरी पीपीई कीट होते, हा तर पठ्ठा चक्क बनियनवर होता. मास्कचं तर यांना वावडच.मी पुढे विचारले , किती दिवसांपासून हे करताय ; उत्तर आले ‘सालभर झालं सायेब’;म्हटलं तुमच्यापैकी कुणी कोरोनाग्रस्त ? माझा प्रश्न संपायच्या आत तो म्हणाला पीरबावाच्या दयेनं एकबी नाई सायेब. आम्हा दोघांनाही स्तंभित करून तो रामराम करीत चालता झाला.
कोरोनापासून दुर पळणाऱ्या अगणित लोकांना सुसाटपणे विषाख्तं डंख मारत सुटलेला कोरोना स्मशानातील ह्या लोकांना का ग्रासू शकला नाही ?
की लाखोंना मारणारा निर्दयी कोरोना चौफेर पेटलेल्या स्मशानात स्वत:ही हळवा होतो ?

अमरावती

मो 9423623841

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments