शिक्षिकेसमोर वाघाची हजेरी


श्रीनाथ वानखडे

दिनांक १७ जुलै वेळ सकाळी साडे सात ते सव्वा आठ स्थळ चिखलदरा पासून अवघ्या पाच किलोमीटर वर पस्तलाई असलेल्या गाव वळणावर.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सहायक शिक्षिका पदावर असलेल्या कु.संगीता सोळंके (इंझळकर) लगबगीने शाळेकडे मार्गक्रमण करत होत्या.गावाजवळ वळण असल्याने झायलो नामक रथावरील सारथी ने गती कमी केलेली होती…आणि अचानक गाडी समोर शेपटी दिसल्याने असलेली गतीहि थांबली.समोरील दृश्य बघताच दोघांच्या चेहऱ्याचा रंग उडाला.निसर्गातील थंड गारव्याच्या आस्वादासाठी खुल्या असलेल्या गाडीच्या काचा क्षणार्धात बंद झाल्या.कारण समोर त्या परिसराची राणी हजर होती.हो हो राणी.अख्या भारतात ‘मेळघाट’ ज्यासाठी सुपरिचित आहे.त्या वाघाची ‘ती’ पट्टराणी होती.

शिक्षिका व त्या वाहनातील सारथी च्या चेहऱ्यावर भल्या सकाळी थंड वातावरणात घाम फुटला होता.पण त्या वाघिणीने त्यांचा रस्ता अडवला नाही किंवा डरकाळी फोडून प्रतिप्रश्नहि केला नाही.त्याला कारणही तसेच होते.कारण त्या दोघींची धडपड एकाच उद्देशाने होती.ती म्हणजे लेकरांसाठी.पुनर्वसनात गेलेले गाव म्हणून पस्तलाई ची खरी ओळख.शिक्षिकेची धडपड तिथे असलेल्या लेकरांचा शैक्षणिक विकासासाठी,तर वाघिणीची धडपड होती तिच्या लेकरांच्या हक्काच्या अधिवासासाठी.

पस्तलाईमधील ९० टक्के आदिवासींनी स्थलांतर करून वडगाव व येवता चा पर्याय स्वीकारला परंतु अजूनही दोन कुटुंबाचे स्थलांतर न झाल्याने त्या गावात चार बालके आहेत.त्यातील तीन बालकांसाठी ती शाळा सुरु आहे.गावाचे पुनर्वसन झाल्याने स्थानिक वनविभागाने तेथे कुरणी गवताची लागवड करून तृणभक्षी प्राण्यांसाठी खाद्य उपलब्ध करून दिले.तृणभक्षी प्राणी (खाद्य)वाढल्याने साहजिकच वाघाने सहकुटुंब आपला बेडा पस्तलाईत वसविला.त्यामुळे वाघिणीने या भागात बछड्याना जन्म दिला.त्यामुळे दोघींचा( शिक्षिका व वाघिणीचा)वावर पस्तलाईत.दोघींची ड्युटीची वेळ एकच असल्याने व कोरोनाच्या ५० टक्के उपस्थितीमुळे भेट तशी दुर्मिळच.पण बछडे गावातच असल्याने त्यांना हळूहळू शाळेची माहिती होत होती. ‘बघ ना ग आई,माणसांची मुले कशी शिकतात,आम्हालाही शिकून मोठं व्हायचं आहे’.त्या संगीताबाईनी मुलांना सांगितलंय ‘शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे’.आई आम्ही तर तुझं दुध नेहमीच पितो मग या माणसांना शिक्षणातून वाघिणीचं दुध कसं मिळणार ? वाघीण उत्तरली अरे बाळांनो ‘ते खरंखुर दुध नव्हे,तर व्यक्ती शिकून मोठा होवून शहाणा होतो.कसं ग आई मला नीट सांगणा…आता कसं सांगू तुला ! बघ या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या दुर्दृष्टीवादी होत्या म्हणून तर त्यांच्या कृपेने आपल्याला हे हक्काचं घर मिळालं.१९७२ मध्ये वन्यजीव संरक्षक कायदा अस्तिवात आणला.त्यांनी जर १९७३ मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत देशात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प उभारल्या नसते तर या माणसांनी हि जागा पण आपल्याला उपलब्ध होवू दिली नसती.देशाबाहेर आजचे राज्यकर्ते सांगतात जंगलासाठी ३३ % जागा आरक्षित असली पाहिजे पण मानवाने आपल्या जंगलावर अतिक्रमण करून सिमेंट ची वसाहत उभी केली.आता हेच बघ ना मेळघाट मधील ३३ गावांचे पुनर्वसन करायचे आहे पण बोटावर मोजण्या ईतक्याच गावांनी आपल्याला गाव(रान)मोकळं करून दिले.आपण जरा का यांच्या राहत्या भागात गेलो तर सर्वत्र आपली बोंबाबोंब करतात.मनात आणलं तर पस्तलाईला क्षणात फस्तलाई करू शकते पण आपण मानवा सारखे स्वार्थी नाही नां. मग त्यांच्यात नि आपल्यात काय फरक ? तसे ईथले आपले आदिवासी बांधव पण आपल्या त्रास देत नाही.तुझ्या बाबांना तर हक्काने ‘कुला’ मामा म्हणतात व आपल्याला देव मानतात.पण हे शहरी माणसे यांना थोडं जरी समजलं, इथे वाघ आहे तर गाडीच्या गाडी भरून पहायला येतात.नुसता नाकात दम करून सोडलाय.आपण थोडं जरी पंजा मारला तर वाघाने हल्ला केला म्हणून वनविभागाला भरपाई मागतात.

ह्या संगीता बाईंचे खूप कौतुक ऐकलय मी.ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले ह्या दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचे द्वार खुले केले म्हणून ह्या मुली शिकायला लागल्या.म्हणूनच मानवाचा विकास पण होत गेला.ह्या संगीता बाई व त्यांचे यजमान सचिन इंजळकर ह्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप छान प्रयत्न केले व करत आहे.मागे ह्यांच्या यजमानांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील इंडस प्रकल्पाद्वारे अनेक शाळाबाह्य व बालमजुरी करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आताही त्यांच्या शाळेतील मुले गणित,विज्ञान व इंग्रजी विषयात तरबेज असल्याचे मी ऐकले आहे.विज्ञानातील प्रयोग मुलांना स्वतः करायला लावतात,मुलं तर फाडफाड इंग्रजी बोलतात.संगीताबाई पण त्यांच्या कामात काही कमी नाही.त्यांनी वडुरा बेडा( नांदगाव तालुक्यातील पारधी वस्ती असलेले गावं ) गावात भटक्या मुलांच्या मागे लागून शालेय प्रवाहात आणले.मुलांना गोडी लागावी म्हणून गुल्हेर च्या माध्यमातून भाषा व गणित शिकवले.मुलांना परिस्थिती अभावी कपडे नसल्याने एकच मळके कपडे घालून यायचे,त्यावर अंघोळ करायचे त्यामुळे त्यांच्या शरीराचा कुबट वास यायचा.बाईंनी त्यांच्यासाठी दुसऱ्या कपड्यांची व्यवस्था केली, मुलांना स्वच्छतेच्या सवई लावल्या. मुलं शाळेत रमली पाहिजे म्हणून गाणे,संगीत विषयक क्लास घेतले.शाळेतील पोकळे सरांनी पण त्यांना भरपूर मदत केली.एवढचं नाही तर गावातील मुली व महिलांना देखील त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.अगदी घट्ट साडी नेसण्यापासून ते शारीरिक स्वच्छते पर्यंत.स्तनदा माता व लहान मुलांच्या आहारासाठी डॉक्टर असलेल्या बहिणीकडून पोषक आहार विषयी बारीकसारीक माहिती येथील पारधी समाजातील महिलांना दिली .त्याची परतफेड म्हणून महिलांनी सुद्धा स्वतः मध्ये आमुलाग्र बदल केला.तुळसी वृंदावन पासून ते आरोग्यविषयक सवयींमध्ये बदल केला.बाईनी शिंगणापूरच्या शाळेत असतांना देखील निर्मळ गुरुजींकडून विविध शैक्षणिक साहित्य व बाहुली नाट्याचे धडे गिरविले.त्याचा वापर आनंददायी शिक्षणासाठी केला. म्हणून तर या बाईना भेटायची खूप दिवसांची तीव्र इच्छा होती पण कोरोनामुळे भेटगाठ टळायची.

आपल्या गावातील शाळेत खिचडी शिजविणाऱ्या गंगूबाई कडून सुद्धा मी संगीता बाई बद्दल खूप ऐकले होते.गंगू बाई रानातील तिच्या मैत्रिणींना काम करतांना ह्या बाईंचे किस्से सांगायची.मी पण शिकारीसाठी गवतामध्ये ऑन ड्युटी असतांना तिच्या ह्या गोष्टी ऐकायची .म्हणून मला पण बाईंची विद्यार्थिनी व्हायची इच्छा आहे.त्याकरीता मुद्दाम मी शनिवार दिवस निवडला होता.तसहि गंगू बाई कडून गावात अस्वल आल्याचे कळल्याने मी माझ्या पिलांना सोडून जास्त दूर कशाला जावू. ‘का गं आई तू बाईंच्या गाडी समोर तब्बल २०-२२ मिनिटं कशाला चालत होती ?’ वाघीण उत्तरली ‘अरे बाळा मी सहज दर्शन देवून गायब झाली असती तर काय फायदा,त्या बाईंचा माझ्यावर विश्वास राहिला असता का ? वाघ दिसला म्हणून दोन्ही शिक्षिका महिना दोन महिना दिसल्या नसत्या(शिवाय कोरोना..).म्हणून मला तिचा विश्वास संपादन करायचा होता. माणसांनी वाघाची कितीही बदनामी केली तरी आम्ही खानदानी वाघिणी आहोत.या जंगलाच्या राणी आहोत.मनात आणलं तर चिखलदऱ्यात बाहेरगावातून येणाऱ्यांचा आम्ही दिवसभर चक्काजाम करू शकतो,पण आमच्या ‘प्रेस्टीज’ला ते शोभत नाही.मला व तुझ्या बाबांना पण थोडे शिक्षणाचे धडे गिरवायचे आहे.जर आमचंही शिक्षण झालं तर आमचे कायदे कानून आम्हाला वाचता येईल.आता हेच बघ ना आपण पस्तलाईतून आमझरीत जातो.तिथे जागतिक स्तराचा ‘स्कायवॉक’ होणार आहे. चिखलदरा नंदनवन आहे मान्य आहे,पण काही नियम आहे का नाही ? आपल्या शिकारीच्या रस्यात जर ‘स्कायवॉक’ उभे राहिले तर गर्दी होणार नाही का ? अगोदरच सरकारने शनिवार रविवार लॉकडाऊन घोषित केल्यावरही हि हौशे ,नवसे,गवसे माणसे परिवारासह मजा करायला येतात कि नाही ? मग ‘स्कायवॉक’ झाल्यावर कोणाकोणाला आवरायचे.आपला पर्यटनाला विरोध नाही,पण लोकं पण साधेसरळ नाही.आता हेच बघना ‘ कोलखास मधील हत्ती दत्तक घेण्याची योजना आखली, पण आपल्या ‘बच्चूभाऊ’ शिवाय कोण्या मर्दाने पुढाकार घेतला का? म्हणूनच मला आपल्याला जंगलाच्या व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी,संरक्षणासाठी मानवाने कोणकोणते नियम बनविले यासाठी साक्षर व्हायचे आहे.मला जंगलाचे शासक या नात्याने शाश्वत विकास करायचा आहे.त्यासाठीच होती शनिवारची माझी बाई समोरील माझी हजेरी.

9422036700

लेखक हे शिक्षण व पर्यावरण विषयाचे अभ्यासक आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments