Home मनोरंजन कबूल है?

कबूल है?

माधव पांडे

गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफचा विवाह व निकाह एका हाॅटेलमध्ये पार पडला.

गेली दोन महिने या ‘मॅरेज’ची चर्चा धुमसत होती..वास्तविक रसिका आणि आसिफने 21मे रोजी ‘रजिस्टर मॅरेज ‘केले होते.कायद्याने पती-पत्नी झाल्यावरही या नवदांम्पत्याच्या पालकांना धर्ममान्यतेनुसार ‘मॅरेज’चे धार्मिक विधी करावयाचे होते.प्रसाद आडगांवकर यांना मुलीच्या सालंकृत कन्यादानाची इच्छा होती.त्यांनी परंपरेनुसार धुमधडाक्यात ‘लग्नसोहळा’ आयोजित केला.पत्रिका छापल्यात.पत्रिका सार्वजनिक झाल्यावर समाजातून प्रतिक्रीया यायला लागली.त्यात समाजमाध्यमे जोशात आलीत.माध्यमांनी प्रतिक्रीयांना कथित ‘जनक्षोभ’ समजून या ‘मॅरेज’चे वृत्तांकन केले.धर्ममार्तंडांचा कडवा विरोध वगैरे…सगळं झालं.नाईलाजास्तव मुलीच्या पित्याने पत्रक काढून जाहीर केले की,18जुलैचा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे.या घटनेची दखल अनेकांनी घेतली.

त्यानंतर,विवाह होणारच!अशी गगनभेदी घोषणा झाली.आणि अखेर 22जुलैला कथित छुप्या विरोधाचा ‘अंतरपाट’ दूर सारून रसिका आणि आसिफ पुन्हा एकदा चारचौघांच्या साक्षीने विवाहबद्ध व निकाहमय झालेत.हा सगळा प्रसंग एखाद्या चित्रपटाला शोभावा असा आहे.

आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा विवाहसंस्थेला कथित धारणेच्या खडकावर नेऊन आदळलं आहे.रसिका आणि आसिफच्या ‘मॅरेज’कडे बघतांना समाजाने अनेक अंगभूत मुद्द्यांना कसे जाणीवपूर्वक डावलले,याची चर्चा आपण करू या!

बंधु-भगिनींनो,
रसिका आणि आसिफ यांच्या एकत्रित येण्याच्या निर्णयाला मी ‘मॅरेज’ संबोधतो. क्षमा करा.विवाह किंवा निकाह या व्यवस्थेला ख-या अर्थाने समजून घेतले तर आपणही ‘मॅरेजच’म्हणाल.विवाह किंवा निकाह म्हणणार नाही.या संबोधनाने प्रश्न सुटतील.भावनिकता बाजूला होईल.कोणत्याही धर्माचा हस्तक्षेप असणार नाही.सोबतच रसिका-आसिफच्या निर्णयाला कुठे गालबोट लागणार नाही.इतकं सुस्पष्ट असतांना आपल्यासमोर कायम एकमेकांना चिथावून देणा-या वातावरणाची निर्मिती का केली जाते?

रसिका-आसिफच्या ‘मॅरेज’पूर्वी भारतीय क्रिकेटर शिवम दुबे आणि अंजुम खान यांच्या ‘मॅरेज’ची चर्चा देशाने केली.इथे पात्र बदलतात.रंगमंच तोच आहे…

आपण मुळ मुद्दयाकडे वळूया.हा संवाद वाचतांना आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की,बुद्धीवादी व्हा.विवेकाने विचार करा.स्पष्टच सांगायचं म्हणजे वरवर विचार करू नका.विवाह किंवा निकाह या दोन्ही संस्थांविषयी आदर बाळगा.ज्यांना जी व्यवस्था मान्य आहे त्यांनी ती स्विकारली आहे.

चर्चा गंभीर आहे.गांभिर्याने करूया.रसिका-आसिफच्या घटनेतला एक बिंदू लक्षात घ्या.सामान्यपणे लग्नात पंगती झोडण्यापलिकडे विवाहसंस्थेचं महत्व सर्वसामान्यांना अद्याप पचनी पडलेलं नाही.असं चित्र सर्व धर्मियांमध्ये आहे.प्रत्येक धर्माची निर्मिती मानव कल्याणासाठीच झाल्यामुळे करोडो लोक धर्मोपासक आहेत.आजच्या चर्चेत मला ‘धर्म’ थोडा बाजूला ठेवायचा आहे.धर्माची चर्चा करण्याची ही वेळ नाही.किंबहुना रसिका-आसिफ यांच्या निर्णयात ‘धर्म’महत्वाचा नव्हता.तरीही चर्चेचा बिंदू ‘धर्म’समजल्या गेला.इथेच कुठेतरी चुकत आहे.

कोणाचं काय चुकलंय? याची चिकित्सा करायला प्रत्येकाला आवडतं.मला कोणाचीच चुक दिसत नाही.मला जाणवते एकच,अज्ञान!कायद्याचे,धर्माचे आणि सर्वात महत्वाचे विवाहसंस्थेच्या बदलत्या स्वरूपाचे!

रसिका-आसिफने जीवनभर एकत्रितपणे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांच्या सहमतीने त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 अंतर्गत 21मे ला ‘रजिस्टर मॅरेज’ केले.त्याअर्थी रसिका-आसिफ आता वैवाहिक जीवनाचे जोडीदार झालेत.विषय पूर्णत्वाकडे गेला होता.त्यानंतर रसिकाच्या वडीलांनी जी भूमिका घेतली त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला.रसिका आणि आसिफच्या एकत्र येण्याच्या निर्णयाला समाज मान्यतेची गरज नव्हती.समाज मान्यता घ्यायची नसते तेव्हाच स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 चा लाभ घेण्याची आवश्यकता पडते.हा स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 काय आहे? याचे सविस्तर विवेचन करायची ही जागा नसली तरी कायद्याने निर्माण केलेली धर्मातीत’मॅरेज’व्यवस्था!किती सुटसुटीत आहे,बघा.
अश्या धर्मातीत कायदेशीर व्यवस्थेचा अवलंब केल्यावर पुन्हा परंपरा आणि धार्मिक विधींकडे डोकवायचे? हे न सुटलेलं कोडं आहे.

जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती आयुष्यभर एकमेकांचे जोडीदार होण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतात तेव्हा दोन्ही धर्मांची ‘मॅरेज’ मान्यता वेगवेगळी असतांना ती धर्मव्यवस्था एकत्रित कशी बांधणार?

ऐकायला आणि वाचायला हे खूप छान वाटतं की,त्यांनी मुंडावळ्या बांधून ‘विवाह’ केला आणि काजींच्या उपस्थितीत ‘निकाह’ केला.असं शक्य असतं का? जो विवाह करेल तो निकाह कसा करेल? कायद्याला तरी ही पद्धत’कबूल’ आहे का? आणि एकदा नोंदणी पद्धतीने ‘ मॅरेज ‘ झाल्यानंतर पुन्हा विवाहित दांम्पत्यावर विवाह संस्कार?समजायला जरा अवघड आहे.

खरं म्हणजे मी कायद्याचा विद्यार्थी नाही.या मुद्द्यावर कोणी प्रतिवाद केला तर मी स्वागत करेल.दुरूस्ती सुचविली तर आभारी राहील.प्रश्न तर्काचाही आहेच!

आम्ही कुठेतरी गोंधळलो आहोत.सत्य मान्य करीत नाही.आम्हाला सगळीचं व्यवस्था हवी आहे.आणि व्यवस्थेला सोयीने वाकवायचं आहे.असं कसं होईल?

ज्यांना धर्म मान्य नाही.त्यांचही स्वागत करा.आमचा देश तर ‘धर्मनिरपेक्ष’ आहे. देशात अनेक धर्म आहेत.देशाचा एक असा कोणताही धर्म नाही.आम्ही भारतीय आहोत.कायद्यानुसार आपण आपली वाटचाल करीत आहोत.परंतु हे विधान आदर्श असले तरी पूर्णतः वास्तविक नाही.या सत्याचा स्विकार करा.

विवाहसंस्था आपली ‘करवट’बदलत आहे.ती ‘कट्टर’नाही.त्याचमुळे आज अनेक आंतरधर्मिय,जातीय इतकेच कशाला आंतरराष्ट्रीय ‘मॅरेज’ होत आहेत.या सगळ्यांना ‘मॅरेज’म्हणा.विवाह फक्त हिंदू,बौद्ध,जैन व शीख धर्माची व्यवस्था आहे. इतर धर्मियांमध्ये स्त्री-पुरूष एकत्रित जीवन जगण्याला कुठे ‘करार’ किंवा कुठे ‘अॅग्रीमेंट’ असं स्पष्टपणे लिखित स्वरूपात आहे.हिंदू विवाह संस्था सात जन्माचा दावा करते.या जन्मासाठी तर पक्का वादा आहे!

उदाहरण म्हणून मुस्लिम समुदायाचा विचार करणार असाल तर त्या धर्म व्यवस्थेत ‘निकाह ‘ आहे.कायम स्वरूपी स्त्री-पुरूष जोडीदार म्हणून एकत्र राहणार असतील तर ‘निकाह’ आणि काही विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे अगदी काही आठवड्यांसाठी एकत्र राहणार असतील तर ‘मुताह’.या व्यवस्थेत फरक एवढाच आहे की,’मुताह’मध्ये मुस्लिम स्त्री इतर धर्मियांसोबत जोडीदार म्हणून राहू शकत नाही.प्रत्येक धर्मात स्त्री-पुरूषांच्या सहजीवनाची एक स्वतंत्र व्यवस्था आहे.या व्यवस्थेला त्या -त्या धर्मियांनी स्विकारलं आहे.या व्यवस्थेतील मानवी दोषांवर चर्चा चालू आहे.त्यातून ‘ट्रीपल तलाक’ सारख्या सुधारणावादी कायद्याचा विचार समोर आला.

हे सगळं एकीकडे ठेवा.’मियाँ बीबी राजी तो क्या करेंगा काजी’.प्रेम जडलं आणि विवाह झाला.अशी शेकडो उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.विवाह करणं सोपं आहे.आज विवाह टिकविणं खूप कठीण!

विवाह टिकविण्याची सत्वपरीक्षा बहुतांश प्रकरणात स्त्रीलाच द्यावी लागते.याकडे आपण जाणिवपूर्वक बघितलं पाहिजे.हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहित हिंदू पत्नीला विवाहानंतर लगेच पतीच्या संपत्तीची भागीदारी मिळते मात्र धर्मांतर न करता मुस्लीम साथीदाराच्या ‘बेगम’ला ‘शोहरच्या’ संपत्तीवर अधिकार सांगता येत नाही.असं सांगितल्या जातं.कायद्यात ही बाब तपासून बघायला हवी.रसिकाने धर्मांतर केले नाही,असा तिच्या पित्याचा दावा असल्याने हा मुद्दा महत्वाचा ठरेल.अश्या काही तरतुदींमुळेच विवाहोत्तर गुंता लक्षात येऊ शकतो.

आज विवाह करतांना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात.अलिकडे व्यावसायिक दृष्टीकोनातील विवाहांना समाज मान्यता मिळत आहे.आंतरजातीय विवाहाला जवळपास मान्यता मिळाली असून आंतरधर्मिय विवाहासाठी मोठा कठोर ‘ पडदा’आहे.

नवी पिढी विवाह करतांना जाती- धर्मापेक्षा’पॅकेजवर’लक्ष ठेवून आहे.एकाअर्थी समाज ‘अर्थपूर्ण’बदलत आहे. मात्र आंतरधर्मीय विवाहातून सामाजिक बदलाची जी शक्यता पूर्वसूरींना वाटत होती त्या विपरीत वास्तविकता समोर आली आहे.समाजात जात आणि धर्म आपापल्या सोयीने घट्ट होत असून भींतींना नवं बळ मिळत आहे.

वैयक्तिक स्तरावर सोयीने सगळे निर्णय होत असले तरी सार्वजनिकरित्या जात आणि धर्म अधिकाराची भाषा बोलत आहेत.ही वास्तविकता स्विकारा.प्रश्न समजतील आणि सुटतील.

जागतिकीकरणानंतर अनेक व्यवस्था पोखरल्या गेल्या आहेत.भारताचा विचार करायचा असेल तर ‘युज अॅन्ड थ्रो’च्या संस्कृतीने आपले पाय सगळीकडे पसरायला सुरूवात केली आहे.नातेसंबंध गिळंकृत झाले आहेत.आता फक्त कुठेतरी विवाहसंस्था ‘कगार’वर उभी आहे.मुला-मुलींना विवाह संस्था कळायला जरा ‘जड’वाटतं.त्यांना ‘पार्टनर’ची भाषा लवकर समजते.बाॅलिवुडच्या नट-नट्यांचा सहजीवनाचा’ रिचार्ज’पटकन संपतो.लगेच ‘सीम’ही बदलल्या जातं.वैवाहिक जीवन इतकं सहज असतं का?

आज ख-या अर्थाने विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशनाची खूप गरज आहे.रसिका दिव्यांग आहे.तिचे समुपदेशन झाले असेल ना?

पत्रिकेवरून रक्तगट तपासणीपर्यंतचा टप्पा गाठलेल्या या समाजाने ‘वैज्ञानिक दृष्टीकोनचा’ दावा करणे स्वाभाविक आहे.मात्र सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोन तरूणाईला कोण समजून सांगणार?

अगदी नात्यात लग्न झाल्यावरही वैवाहिक जीवनातील प्रश्न संपले असं होतं नाही.’मॅरेज’कोणत्याही धर्माचे असो,मुलगीच सासरी जाणार!

विवाहोत्तर निर्माण होणा-या प्रश्नांना स्त्रियांनाच सामोरे जावे लागते.बहुतांशवेळी भोगावे लागते.

विवाहोत्सुक मुला-मुलींना उत्तम समुपदेशनाची गरज आहे.घरातील वडीलधारी मंडळी ‘सल्ला’ देऊ शकतात,आता समाजशास्त्रीय ‘समुपदेशनाची’वेळ आली आहे.विवाहोत्तर निर्माण होणारे प्रश्न वेगळे आहेत.ते केवळ जाती-धर्माशी संबंधित नसून थेट व्यक्तीनिष्ठ आहेत.संस्कार,समाज आणि संस्कृती सहजीवनावर परिणाम दर्शवितात काय? यावर विचार केला पाहिजे.

विवाह किंवा निकाह या आनंदोत्सवापलिकडे दोन भिन्न प्रकृतींच्या व्यक्तीसोबतचे ‘सहजीवन’ सुखी करायचे असेल तर आम्हाला नव्या पीढीला नव्याने समजून घ्यावे लागेल. आणि सर्व पातळीवरील वास्तवाचे समुपदेशनातून दर्शन घडवावे लागेल.सहजीवन हा जीवनाचा विलक्षण आनंद आहे.ते ‘आनंदाचं गावं’ आपण नवयुगलांना समजून देऊ शकलो तर समाजाला सगळंच ‘कबुल’असेल!


9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments