Home महाराष्ट्र सोमेश्वरभाऊ पुसतकर -One Man Organization !

सोमेश्वरभाऊ पुसतकर –
One Man Organization !

अतुल विडूळकर

भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं त्यांच्याशी माझंच काय, कुणाचंच नव्हतं. सर्व औपचारिकता आणि व्यावहारिक आकडेमोडीच्या पलीकडे जाऊन माणसं जोडणे हा त्यांचा स्वभाव होता. या स्वभावाच्या आड न कधी विचारसरणी-पक्ष-संघटना आली ना कधी जात-धर्म !

टेक्नीकली ते राजकीय व्यक्ती असले त्यांचं व्यक्तिमत्व राजकारणी माणसाचं अजिबात नव्हतं. त्यामुळे पक्षभेद आणि विचारांच्या पलीकडे जाऊन माणसांना शक्य तितकी मदत करत राहणे इतकं साधं सोपं त्यांचं पोलिटिकल इंजिनिअरिंग होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ शिवसेनेचे नाही, तर अमरावती आणि विदर्भाच्या सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अडचणींवर मात करून उभारीसाठी मनापासून मदत करणारे त्यांचे हात पाठीवर नाही म्हणून माझ्यासारख्या अनेकांचा हक्काचा आधार निघून गेला आहे.

कोणत्याही आमदार, खासदारापेक्षा मोठा लोकसंग्रह आणि लोकप्रेम मिळवणारे ते कार्यकर्ते होते. राजकारण आणि व्यवसायात एका विशिष्ट टप्प्यापर्यंत प्रगती केल्यावर काही लोकांमध्ये एक माणुसघाणेपणा येतो. अहंकाराचा वारा लागतो. ‘व्हीआयपी कॉम्प्लेक्स सिंड्रोम’ची बाधा होते. मीपणाची हलकीशी दुर्गंधी माणसाच्या भोवतीचा ऑरा प्रदूषित करते. या सर्व विकारांपासून त्यांनी स्वतःचे मन-बुद्धी-आत्मा दूर ठेवला. पण, एका साधारण माणसाचा इतका असाधारण उमदेपणा नियती खिलाडीवृत्तीने घेईलच असं नाही. तिथेच घात झाला आणि एका गंभीर शारीरिक आजाराने नियतीच्या लहरीपणालाच साथ दिली आणि सोमेश्वरभाऊ कायमचे निघून गेले.

कुठेतरी वाचलं होतं की, ‘काही काही दुःखाना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलवत नाही’. हा भार गेले वर्षभर सोमेश्वरभाऊंचे कुटुंब, मुलगा-मुलगी, मित्र आणि कार्यकर्ते सहन करत आहेत. मला खात्री आहे, अनेक आव्हानांचा भार सहजी पेलणारे आमचे भाऊ ‘श्रद्धांजली’ या शब्दांचा भार सहन करू शकणार नाहीत.

त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. पण, मोठ्या माणसाबद्दल लिहिताना, त्यांच्याशी असलेले आपले व्यक्तिगत सबंध सांगताना त्यांच्या मोठेपणाचे, त्यांच्या ग्लॅमरचे चार दोन थेंब स्वतःवर उडवून घेण्याचा धोका असतो. ही मोठी निसरडी वाट आहे. या वाटेवर पाय घसरला तर ते भाऊंनाही आवडणार नाही. दुसरं असं की, अमरावती आणि पूर्ण विदर्भात तुम्हाला अनेक नेते, कार्यकर्ते, सामान्य लोक मिळतील की ज्यांचे भाऊंशी खूप जवळचे, आत्मीयतेचे सबंध आहेत. यापैकी प्रत्येकालाच असं वाटतं की, इतरांपेक्षा त्यांचे भाऊंशी सबंध अधिक जवळचे होते. हेच भाऊंच्या लोकप्रेमाचे वैशिष्ट्य आहे.

भाऊंच्या आठवणींना कृतिशील अभिवादन म्हणून आज ‘लोक प्रतिष्ठाण’च्या वतीने ‘नानक रोटी ट्रस्ट’ला ‘सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येत आहे. हा कार्यक्रम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडोटोरियममध्ये दुपारी एक वाजता सुरू होईल.

कहने को है बातें कई,
सुनने को है कहानियाँ नई,
कहने सुनने मे वक्त ज़ाया ना हो जाए
चलो आँखो से ही याद कर लेते है !!

2 ऑगस्ट 2021

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments