Home महाराष्ट्र आंबिया संत्रा फळगळ नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सूचना

आंबिया संत्रा फळगळ नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सूचना

अमरावती

अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी संत्रा पीकाची आंबिया बहारातील फळगळ होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नियंत्रण व उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.

आंबिया बहाराची ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या फळगळीस तिसऱ्या अवस्थेतील फळगळ असे संबोधले जाते. ही फळगळ पूर्ण वाढ झालेल्या परंतु अपरिपक्व फळांची असते. त्यामुळे त्याला तोडणीपूर्ण फळगळ असेही म्हणतात. या फळगळीची कारणे व उपाययोजनांबाबत माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

फळगळीची कारणे

पालवीचा अभाव : संत्रा झाडावर नैसर्गिकपणे आवश्यकतेपेक्षा जास्त फुले येत असल्यामुळे फळे टिकून राहण्याकरिता स्पर्धा निर्माण होते आणि जेवढ्या फळांना झाडावर पोसण्याची क्षमता असते तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात व बाकीच्या फळांची गळ होते याला नैसर्गिक गळ म्हणतात. फळाच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे. जी फळे बहाराच्या सुरूवातीलाच पानविरहित फांद्यांवर पोसली जातात, त्यांची वाढ मंदगतीने होऊन ती कमकुवत राहतात. याउलट जी फळे नवतीसोबतच्या फुलापासून तयार होतात, त्यांची वाढ जोमदार होते. साधारणपणे एका फळाची पूर्ण वाढ होण्यास 40 पाने असावी लागतात.

संजीवकाचा असमतोल व नत्राची कमतरता : झाडावर फळे पोसण्यासाठी संजीवकाची गरज असते. या संजीवकाचा अभाव हवामानातील बदलामुळे होतो. तसेच फळाच्या वाढीसाठी नत्राचे अनन्यसाधारण महत्त्व असते. नत्रामुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते तसेच ऑक्झिन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया- अमोनियम या संयुगाची मात्रा फळाच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरित्या युरियाची फवारणी केल्याने वाढवता येते.

अन्नद्रव्याची कमतरता : फळाची योग्य वाढ होण्यासाठी अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होणे आवश्यक आहे. शिफारशीनुसार सेंद्रिय, रासायनिक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना देण्यात येत नाहीत. त्यामुळे फळाची वाढ होत नाही व लहान फळाची गळ होते.

जमिनीतील आर्द्रता व पाण्याचा निचरा : भारी जमिनीतील पाण्याचा निचरा होत नाही. भारी जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असून जमिनीत पाणी मुरण्याचा वेग कमी आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये साचून राहते. जमिनीत पाणी साचल्यामुळे जमिनीतील हवा आणि पाणी याचे संतुलन बिघडते. जमिनीत हवेची जागा पाण्याने घेतल्याने त्याचा परिणाम संत्रा झाडाच्या मुळावर होतो. व मुळाची श्वसनक्रिया मंदावते. तसेच अन्नद्रव्य घेण्याची क्रिया थांबते व मुळे कुजतात. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संत्रा झाडांवरदेखील परिणाम होतो. झाडाची तंतूमय मुळे सडतात. झाडाची पाने व फळे पिवळी होउन गळून पडतात. झाडाची अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावते. संत्रा झाड सुदृढ राहण्याकरिता जमिनीतील हवेमध्ये किमान 10 टक्के प्राणवायुची गरज असते. निचरा न झाल्यामुळे झाडाच्या मुळांना प्राणवायु उपलब्ध होत नाही. त्यामुळे झाडाचे प्रकृतिमान खालावते तसेच पावसाळ्यात कधी कधी पाण्याची पातळी 1 मीटर पर्यंत येते. परिणामी झाडाची पाने कुजतात. या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर गळ होते.

रोगामुळे होणारी फळगळ : बोट्रिओडिप्लोडिआ, कोलिटोट्रिकम व काही अंशी आल्टरनेरिया या बुरशीमुळे संत्रामध्ये फळगळ होते. या बुरशी फळाच्या देठामधून फळामध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळाचे नुकसान करतात. जुन्या वाढलेल्या फांद्या जास्त असतील तर रोग जास्त पसरतो तसेच, काळी माशी, मावा तुडतुडे यांच्या शरीरातील निघालेल्या साखरेसारखा पदार्थावर बुरशी वाढून पेशीक्षय होऊन फळगळ होते. तसेच संत्र्यामध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रादुर्भाव संत्रा झाडावर पावसाळ्यात होतो व रोगाची लक्षणे सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये दिसतात. नंतर या बुरशीचा प्रादुर्भाव संत्रा फळाचे देठ व साल याच्या जोडावर होऊन तेथे काळपट तपकिरी रंगाचे डाग पडतात व तो भाग कुजून फळाची गळ होते .

फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे संत्रा फळावर फळकुजव्या हा रोग येतो. जुलै- ऑगस्ट ध्ये सतत पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो. झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील कोवळया पानावर प्रथम भुरकट किंवा तांबडे ठिपके पडतात व पानगळ होते. झाडावरील कोवळ्या फांद्या कुजतात व अनुकूल हवामानात हा रोग लहान फळावर येऊन फळावर कुजल्यासारखे डाग, चट्टे पडतात व नंतर फळे गळून पडतात. *उपाययोजना* _कृत्रिम जैवसंजिवक नॅफथॅलीन ॲसेटिक ॲसिड (एन. ए.ए.) किंवा 2, 4 डी किंवा जिब्रॅलिक ॲसिड वनस्पतीतील अंतर्गत ऑक्झिन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. बुरशीजन्य रोगामुळे होणारी फळगळ कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाच्या फवारण्यामुळे रोखू शकतात. नत्राची कमतरता युरियाच्या फवारणीमुळे दुर करू शकतो. झाडावर भरपूर पालवी राहावी म्हणून अन्नद्रव्याच्या शिफारसीनुसार वापर करावा. (50 किलो शेणखत, अधिक 7.5 किलो निंबोळी ढेप, 800 ग्रॅम नत्र ( 1740 ग्रॅम युरिया 300 ग्रॅम स्फुरद (1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट ) 600 ग्रॅम पालाश 1000 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यासह 500 ग्रॅम व्हॅम, 100 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू, 100 ग्रॅम अझोस्पिरीलम, 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड). सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास त्वरित पुरवठा करावा_. संत्र्याची जुलै महिन्यातील शिफारशीत खताची मात्रा दिली नसल्यास 260 ग्रॅम युरिया अधिक 170 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड देण्यात यावे. पावसाळ्यात बगिच्यात पाणी साचू देऊ नये. जास्तीचे पाणी काढून देण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने प्रत्येकी दोन ओळीनंतर 30 सें. मी. खोली, 30 सें. मी. खालची रूंदी व 45 सें. मी. वरची रूंदी असलेले चर खोदावेत जेणे करून पाण्याचा निचरा लवकर व प्रभावीपणे होईल. फळगळ कमी करण्याकरीता एन. ए. ए. 1.5 ग्रॅम (15 पी पी एम) किंवा 2,4 –डी 1.5 ग्रॅम (15 पी पी एम) किंवा जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम (15 पी पी एम) +युरिया 1 किलो (1 टक्का ) + 100 ग्रॅम कार्बेडेंझिम 100 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाळ्यात बुरशीमुळे होणारी फळगळ नियंत्रणासाठी झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3 टक्के (30 ग्रॅम 10लीटर पाणी ) किंवा कार्बेडेंझिम 0.1 टक्के (10 ग्रॅम 10 लीटर पाणी ) या बुरशीनाशकाची एक महिन्‍याच्या अंतराने जुलैपासून तीन फवारण्या कराव्यात. गळून पडलेली फळे लवकरात लवकर उचलून दूर फेकून द्यावीत किंवा खड्ड्यात पुरावीत. नॅफथॅलिन ॲसेटीक ॲसिड (एन. ए. ए. ) किंवा 2,4 -डी किंवा जिब्रॅलीक ॲसिड पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे 40- 50 मि.ली. अल्कोहोल किंवा ॲसिटोनमध्ये विरघळून घ्यावे. संत्रा फळगळ नियंत्रणा या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. चवाळे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments