Home देश राष्ट्र आणि धर्म

राष्ट्र आणि धर्म

 

माधव पांडे

अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावरून विमान आकाशात झेपावताच विमानावर बसलेले दोन युवक खाली पडतात.. एखाद्या बस,ट्रेनला लटकावे तसे लोकं विमानाला लटकले आहेत… बुरखा घातलेली एक अम्मी युद्धजन्य परिस्थितीतून आपल्या तान्हुल्याचा तरी जीव वाचवावा म्हणून अमेरिकन सैनिकाकडे त्या पोटच्या गोळ्याला सोपवित आहे अशी ह्दय पिळवटून टाकणारी दृष्ये जगभर बघितल्या गेलीत.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावर ‘देशोधडीला’ लागलेला हा देश लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.तुमच्या-माझ्या मनात काहूर उठलयं.अफगाणींचा धर्म कोणता हे कोणाला लक्षात घेण्याची गरज वाटली नाही.मनात ओरखडा पडला तो माणुसकीच्या शिरच्छेदाचा!

जगात इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा भारतासाठी अफगाणिस्तान महत्वाचा देश आहे.सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीने पुन्हा एकदा ‘ राष्ट्राय स्वाहा ‘ या विचारावर आपण केंद्रीत होत आहोत..आजची चर्चा राष्ट्र आणि धर्म यांच्या सहसंबंधावर करूया!

मित्रहो,

आपण सगळेच अफगाणिस्तानच्या भूमीवरील मानवतेच्या हत्या-यांची घुसखोरी बघत आहोत.प्रश्न आंतरराष्ट्रीय असला तरी आपण संवेदनशीलतेने या घटनांकडे बघितलं पाहिजे.जगाच्या 650 कोटी लोकसंख्येपैकी भारतातील 135 कोटी जनता या सगळ्या घटनांचे चांगले-वाईट परिणाम भोगणार आहे.आज प्रश्न त्यांचा असला तरी शेजारच्याचे घर जळत असतांना आपण गंमत म्हणून कसं बघू शकतो? एक दिवस आपल्याही घराला आच लागेल.

भारतावर परकीयांनी आक्रमण करणं आता इतकं सोपं राहिलं नाही.मात्र स्वकीयांमधील तालिबानी आपल्याला हुडकून काढावे लागतील.भारताची भूमिका स्पष्ट आहे.मानवतेच्या हत्या-यांपासून जगाला धोका आहेच.हिंसाचाराला जग मान्यता देत नाही..तरीही जो – तो आपल्या डावावर!अफगाणिस्तानमध्ये आता घडत चाललेल्या घटनांकडे बघा.

कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्र मोठं असतं,हा स्पष्ट संदेश विश्वात घुमत आहे.

अफगाणिस्तानात सध्या काय घडत आहे,का घडत आहे?याची सगळी वृत्तमालिका दाखविल्या जात आहे.टी.व्ही,सोशल मीडिया अफगाणिस्तानची लक्तरं जगभर मांडत आहेत.तालिबान्यांनी सत्ता खेचून आणली आहे.त्या सगळ्या प्रसंगावर नव्याने प्रकाशझोत टाकता येईल.मात्र आजच्या संवादात तुमच्या-माझ्या मनातील प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊ या!

अफगाणिस्तानशी आपलं थेट नातं आहे.सुमारे 5500 वर्षांपूर्वी गांधारवर राजा सुबल राज्य करीत होते. गांधार म्हणजे सध्याचा अफगाणिस्तानातील कंदहार प्रांत.राजा सुबल यांच्या मुलीचे नाव गांधारी.गांधारीचा विवाह हस्तिनापूरचा राजकुमार धृतराष्ट्राशी झाला होता.गांधारीचा शकुनी हा भाऊ.वडिलांच्या मृत्यूनंतर गांधारचे संपूर्ण राज्य शकुनीच्या हाती आले.जेव्हा भीष्माने राजा सुबलच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश केला होता,तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी कौरव आणि पांडवांना आपापसात लढवून संपूर्ण हस्तिनापूर नष्ट करण्याचा कट याच भूमीत रचला गेला होता.

महाभारतात लिहिलयं,100 पुत्रांना गमविल्यावर गांधारीने युद्धास जबाबदार ठरलेल्या षडयंत्री शकुनीला शाप दिला,’गांधार राजा ,ज्याने माझ्या 100 पुत्रांची हत्या केली ,त्या तुझ्या राज्यात कधीही शांतता राहणार नाही’

कथा पौराणिक आहे.असा शाप वगैरे काही नसतं,असं म्हणणारा माझा समाज आहे.आणि खरं ही आहे.तुमच्या- माझ्या समाजात पांडव आहेत ,तसे कौरवंही! किमान हे तर प्रत्येकाला मान्य असेल!

आपला डीएनए ओळखा. महाभारत झालं नाही असं म्हणणारा एक वर्ग असू शकतो.परंतु समाजात तालिबानी प्रवृत्ती आहेत,हे कसं अमान्य कराल?

मी या घटनेला धर्मापलिकडे बघू इच्छितो.हा प्रकृतीचा संघर्ष आहे.प्रवृत्तींचा आणि वृत्तींचाही!

आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.मात्र आपल्या देशात धर्म आहे.तशी धर्मांधताही !सत्य स्विकारू या.मात्र आपल्या देशाचा एक वेगळा स्वतंत्र धर्म आहे.राष्ट्रधर्म!

‘ वंदे मातरम् ‘चा धर्म!संसदेत वंदे मातरम् आम्ही म्हणणार नाही,अशाही प्रवृत्तींचा हा देश आहे.हा देश भारत मातेचा आहे.सगळ्यांना पोटात सामावून घेणा-या आईचा. लेकरू चुकलं तर कान पकडणा-या जननीचा!

अफगाणिस्तानच्या घटनेनंतर भारतीयांच्या विचारकोषात काही संदर्भ घट्ट होतील.

महाभारतातील वर्णनानुसार,कौरव-पांडव युद्धात कौरवांचा विनाश झाला.त्यानंतर कौरवांचे शेकडो वंशज अफगाणिस्तानात मामा शकुनी यांच्या गांधार प्रांतात गेले. तेथून पुढे हळूहळू इराक आणि सौदी अरेबियामध्ये स्थायिक झालेत.दुनिया गोल है भैय्या!

खरं म्हणजे अफगाणिस्तानशी भारतीयांचं खूप घट्ट नातं आहे.पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की,अफगाणिस्तानमध्ये केशरची शेती केली जात होती.गांधार या शब्दाचा अर्थ गंध म्हणजेच सुगंधित जमीन. गांधार हे शंकराचं एक नाव आहे.शिव सहस्त्रनामामध्ये याचा उल्लेख आहे.गांधार या शब्दाचा संदर्भ उत्तर रामायण आणि महाभारतात आहे.

महाभारताच्या काळानंतर हळूहळू अफगाणिस्तानमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार सुरू झाला.मुस्लीम शासकांनी या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याआधी येथे मौर्यांचं राज्य होतं.11 व्या शतकामध्ये महमूद गजनवीने याठिकाणी सत्ता स्थापन केली तेथून गांधारचे नाव कांधार झालं.

एकेकाळी आर्थिक,सांस्कृतिक,शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न व प्रगत अफगाणिस्तानात सोव्हियत युद्धानंतर अनेक वर्षे गृहयुद्ध चालू राहिले.यात या देशाचे प्रचंड नुकसान झाले.

1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबानी सत्ता होती.2001साली नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला.येथे अध्यक्षीय प्रजासत्ताक स्थापन झाले.अफगाणिस्तानाची संसद भारताने बांधली आणि एक मोठा बंधाराही बांधला.शिक्षण आणि तांत्रिक सहाय्यही भारताने भरभरून दिले आहे.

11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयाॅर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता.त्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष तालिबानकडे वेधलं गेलं.9/11 च्या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या धरतीवरून पूर्णत्वास नेलं होतं.त्यानंतर अत्यंत नियोजनबद्धपणे अफगाणिस्तानमधून तालिबानला सत्तेतून हटविण्यात आलं आणि अल-कायदालाही बाहेर हुसकाविलं.

गेल्या वीस वर्षात अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्याचे 2300 सैनिक शहीद झालेत.20हजार सैनिक जखमी झालेत.ब्रिटनचे 450 सैनिक धारातिर्थी पडले.इतर देशांच्या शेकडो सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.याचवेळी 60 हजार अफगाणी सैनिक ठार झालेत.दीड लाख नागरिक मृत्यूमुखी पडले.

चालू वर्षात अमेरिका आणि ब्रिटनने हळूहळू आपले सैन्य माघारी बोलावण्याची कार्यवाही सुरू केली. त्यानंतर तालिबानींचा अफगानिस्तानवरचा फास घट्ट झाला..आता तर सगळंच पराधीन झालयं..

या सगळ्या घटना तुमच्या-माझ्याशी एक नातं सांगत आहेत.तालिबानी समजून घ्यायचे असेल तर अहमद रशीद यांची ‘तालिबान’ ‘जिहाद’ आणि ‘डिसेंट इन्टु केआॅस ‘ ही तीन पुस्तके डोळ्यासमोरून घाला.

तालिबानी शासनव्यवस्था शरीया कायद्यानुसार चालते असा दावा आहे.शरीया कायदा हा एक धार्मिक कायदा आहे, जो इस्लामिक परंपरेचा भाग आहे..मात्र याकडे अधिक सखोल बघाल तर सध्याही अफगाणिस्तानमध्ये इस्लामी प्रजासत्ताकच होते.इथे धर्माचे अधिष्ठान तर होते मात्र सत्ता प्रजेची होती.

2001 पूर्वी अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता होती तेव्हा तेथील महिलांना भयंकर त्रास सहन करावा लागला.महिलांना कोणत्याही जवळच्या नातेवाईकांशिवाय घराबाहेर जाता येत नव्हते.स्त्रियांना घराबाहेर जातांना नेहमी बुरखा घालावा लागे.घट्ट कपडे घातल्यास तिला सार्वजनिक ठिकाणी मारलं जायचं.पुरूषांना महिलांच्या चालण्याचा-पावलांचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून महिलांनी हाय हिल्स सँडल्स घालू नयेत ,असा दंडक होता.महिलांनी घराच्या बाल्कनी किंवा खिडकीत उभे राहण्यावर बंदी होती. स्त्रियांना इतकी अमानवीय वागणुक होती…आता कदाचित त्यात भरच पडेल…

आता पुढे काय होईल? या विचारात जग पडलयं. चीन,रशिया आणि पाकिस्तान तालिबानी राजवटीला समर्थन देतील.भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पंतप्रधान मोदींनी सुचकपणे सांगितले की,अशा सत्ता जास्त काळ टिकत नसतात.

धर्म की राष्ट्र? की राष्ट्रधर्म? याची निवड करण्यात अफगाणी चुकलेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे विधान लक्षात घ्या,ते म्हणाले ‘ अमेरिकेने कोट्यावधी डाॅलर अफगाणी सैन्यावर खर्च केलेत.ते सैनिक कुठायं?

जगात दुस-याच्या भरवश्यावर टिकता येत नसतं.आत्मनिर्भर व्हावं लागतं..माझा देश आत्मनिर्भर होतो आहे काय? आम्ही कोणासमोर झुकणार नाही ना कोणाला झुकविणार!हाच आमचा धर्म आणि हाच आमचा राष्ट्रधर्म !


9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments