Home धार्मिक चला सीमोल्लंघन करू या.....

चला सीमोल्लंघन करू या…..

प्रिय वाचकांना विजयादशमी ऊर्फ सोनेरी दसऱ्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा .आपण सर्वांनी covid-19 चे सावट असताना सुद्धा आनंदाने नवरात्रोत्सव साजरा केला .तसेही आपले जीवन आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे.  घातलेली बंधने बाजूला ठेवून आपण सीमोल्लंघनाच्या तयारीला लागलेले आहोतच .याचे प्रतीक म्हणून की काय आपण नवरात्रोत्सव, साध्या स्वरुपात का होईना, पण नक्कीच आनंदात साजरा केला आहे. नऊ दिवस आपण वेगवेगळ्या देवता आणि स्त्री शक्तींची कल्पना आणि आराधना केली . मात्र  आपण चांगल्या गोष्टींची आराधना करत असलो ,तरीही बाहेरच्या जगात आपल्याला काही विरोधाभासांचा सामना बरेचदा करावा लागतो आहेच.  प्रत्यक्ष जीवनात असंही जाणवतं , की हा सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींमधला झगडा आहे.या झगड्यात  आपल्याला  सर्वस्वी विजय मिळवता आला नाही ,तरी स्वतः मधली सकारात्मकता टिकवणं आणि आजूबाजूला सकारात्मकतेचा प्रसार प्रचार करणं ,एवढं तर करायला हवंच. पण यासाठी सुद्धा पुरेसं बळ लागतंच की नाही ?हे बळ कुठून मिळवायचं ? त्यासाठीच ही नवरात्राची ,नऊ दिवसांच्या देवींची – शक्तींची अखंड आराधना .आणि या आराधनेचा पूर्णाहुतीचा कार्यक्रम म्हणजे सीमोल्लंघन !अर्थात विजयादशमी!
भारतात वेगवेगळ्या प्रांतात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो . जसा कोकणात रावणदहन हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम तसेच म्हैसूरला हत्तींची सजावट करून त्यांची मिरवणूक काढणे आणि फुलांनी सगळे शहर श्रृंगारणे हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव.अनेक ठिकाणी हा दिवस शस्त्रपूजेसाठी महत्वाचा  मानला आहे,तर काही ठिकाणी घरोघरीच्या कुळाचारांसाठी याला महत्व आहे.व्यापारी या दिवशी वहीखात्यांची पूजा करतात,तर विद्यार्थी पाटीपूजा,पुस्तकपूजा करतात.
रामायणाच्या पौराणिक कथांनुसार या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला. तर महाभारतानुसार याच दिवशी अर्जुनाने शमी वृक्षावर लपवून ठेवलेली आपली शस्त्रे परत मिळवली .विजयादशमी संदर्भातली आणखीन एक कथा म्हणजे वरतंतू ऋषींकडून विद्या प्राप्त केल्यानंतर त्यांचा शिष्य कौत्स याने त्यांना विचारले ,की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ?  कौत्साची परीक्षा बघण्याकरता वरतंतू ऋषींनी सांगितले की, मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत .हे ऐकून कौत्स गांगरून गेला. त्याला कोणीतरी सल्ला दिला की  तू रघुराजाकडे जा. रघुराजा तुला मदत करेल .पण नेमकं त्याचवेळी रघुराजाने प्रचंड महायज्ञ केला होता आणि त्याचा खजिना रिकामा झाला होता. कौत्स आपल्याकडे काही मागतो आहे आणि ते देणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून त्याने कौत्साला तीन दिवसांची मुदत मागितली .आणि या तीन दिवसात इंद्रावर स्वारी करण्याचा निश्चय केला .त्यानी इंद्राकडून लुटून आणलेल्या कोट्यावधी सुवर्णमुद्रा कौत्साच्या ताब्यात दिल्या .मात्र कौत्साने त्यातील फक्त चौदा कोटी सुवर्ण मुद्रा काढून गुरूंच्या स्वाधीन केल्या आणि उरलेल्याचा ढीग रचून शमी वृक्षाच्या पायथ्याशी ठेवला .स्वतःला त्या सोन्याचा मोह नसल्यामुळे त्याने त्या गावातील नागरिकांना वर्दी दिली की ज्यांना हवं त्यांनी तिथे येऊन ते सोनं लुटून न्यावं.  नागरिकांनी ते विजयादशमीच्या दिवशी लुटून आपल्या घरी नेलं .त्याचंच प्रतीक म्हणून आपण शमीवृक्षाची पानं एकमेकांना सोनं म्हणून देतो.
या असंख्य प्रकारच्या कथा आपण पूर्वीपासून वाचत ऐकत आलो आहोत. पौराणिक कथांची सत्यासत्यता तपासण्याऐवजी मला त्यातला बोध नेहमीच महत्वाचा वाटत आला आहे .या सगळ्या कथाआपल्याला प्रयत्नवादाकडे घेऊन जातात ,असंही मला नेहमी वाटत आलं आहे .त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा,’ राम की शक्ति पूजा ‘ हे हिंदी महाकाव्य विजयादशमीच्या संदर्भात  वाचनात आलं तेव्हा, अचानक जाणवलं की या कथेला तर प्रयत्नवादाचा शिरोमणीच म्हटलं पाहिजे . आजच्या सदरहू लेखाच्या शीर्षकासाठी जी ओळ निवडली आहे, ती याच महाकाव्यातील आहे. हिंदीतील श्रेष्ठ साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’  यांच्या ‘राम की शक्तिपूजा ‘ या काव्यातील ओळी अशा  आहेत-
शक्ति की करो मौलिक कल्पना,
            आराधन का दृढ़ आराधन से दो उत्तर
जवळपास साडेतीनशे ओळींची रचना असलेल्या या दीर्घ काव्यात राम रावण युध्दप्रसंगी रामाने नऊ दिवस केलेल्या शक्तीपूजेचे अर्थात देवीपूजेचे वर्णन आहे.  या कथेत, रावणाशी युद्ध करतांना पहिल्या दिवशी पराभूत झालेलं रामाचं सैन्य आपापल्या शिबिरात परतत होतं. घनदाट अंधकार दाटून आला होता. अमावस्येची रात्र होती .बाजूला समुद्र गर्जत होता .आणि श्रीराम स्वतः देखील विचारात पडलेले होते की त्यांनी वापरलेली सर्व अस्त्र-शस्त्रे आज निरुपयोगी का  ठरली ? राम, लक्ष्मण ,हनुमान ,जांबवंत सगळे मिळून अशी चर्चा करताना त्यांना कळलं की देवी ‘शक्ती’ ही रावणाला प्रसन्न आहे आणि ती रावणाकडून युद्धात उतरल्यामुळे रामाची सर्व  शस्त्रास्त्रे निरुपयोगी ठरत आहेत. या कवितेत निर्माण केलेले वातावरण; अंधाराचे -समुद्र गर्जनेचे -निराशेचे साम्राज्य ,आपल्याला रामाची मनोवस्था स्पष्ट करून सांगते .मात्र एक ओळ निर्देश करुन जाते की या निराश अंधाऱ्या वातावरणात शिबिरातल्या शेकडो मशाली मात्र  जळत होत्या.  अंधार हे निराशेचं ;समुद्रगर्जना हे भयाचं ;तर जळती मशाल हे सकारात्मक बुद्धीचं प्रतीक म्हणून या कवितेत येतात.मशाली जळत होत्या , याचा अर्थ राम अजूनही सकारात्मक विचारसरणीने, आपल्या बुद्धीचा उपयोग करत होता .
मला हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या आपण सुद्धा अशाच वातावरणातून जात नाही आहोत का ? आपल्या अंतरातला राम सुद्धा निराशेच्या अंध:काराने वेढलेला आणि नकारात्मक परिस्थितीच्या गर्जनेने त्रासलेला नाही का ? मात्र कथेतल्या रामाच्या शिबिरात मशाली जळत होत्या ,त्याच मशालींचा उजेड आपल्या अंत:करणात सुद्धा पोहोचायला हवा आहे. याच तर विजयादशमीच्या खऱ्या शुभेच्छा आहेत.
शक्तीपूजेच्या कथेत  जांबवंताने रामाला समजावलं, की जर रावणाने शक्तीची पूजा बांधली आहे, तिला प्रसन्न करून घेतलं आहे, आणि रावण हा जर आपला शत्रू आहे, तर आपल्यालाही त्याच शक्तीची आराधना करणे भाग आहे. रामाला पडलेला प्रश्न हा आहे,की ,रावणाची बाजू अन्याय कारक आहे, हे माहीत असूनही देवी शक्ती रावणाला प्रसन्न का झाली असेल? याचे उत्तर असे की शक्ती ही शेवटी शक्ती आहे, जो आराधना करेल त्याला ती प्रसन्न होते, हे निर्विवाद आहे. रामाच्या लक्षात आलं की  आपल्यालाही शक्तीची आराधना करणे भाग आहे .रावणवधासाठी रामाने देवीची वाळूची मूर्ती करून ,एकशेआठ कमळांची व्यवस्था करून, शक्तीची पूजा मंत्र उच्चारांसह बांधली.
अन्यायाच्या बाजूने शक्ती उभी कशी? आपल्यालासुद्धा आजच्या वातावरणात कित्येक संदर्भात  हाच प्रश्न पडतो की नाही? प्रश्न पर्यावरणाचा असो,रोगप्रसाराचा असो ,भ्रष्टाचाराचा असो किंवा राजकारणाचा. आपल्यालाही उत्तरं मिळवण्यासाठी  शक्तीपूजेकडे वळावं लागणार आहे. कमळपुष्प आणि मंत्रोच्चारांऐवजी आपल्याला वैज्ञानिक संशोधनाचे अखंड प्रयत्न करून मानव संहारक अशा जिवाणूच्या प्रसार प्रचाराला पायबंद घालून आपलं जीवन पुन्हा सुरळीत करायचं आहे .आपल्याला भोवताली चाललेल्या चुकीच्या अनेक गोष्टींशी झगडायचं आहे. मानवतेच्या ,पर्यावरणाच्या, सकारात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी त्या त्या प्रकारच्या शक्तींच्या आराधनेचे मंत्रोच्चार करावे लागणार आहेत.
सूर्यकांत त्रिपाठी निराला यांच्या या महाकाव्य रचनेत शेवटच्या भागात असा उल्लेख आहे की ,रामाला  एकशेसातच कमळांची व्यवस्था करता आली आणि शेवटचे  नीलकमल वाहिल्याशिवाय शक्तीची आराधना पूर्ण होणार नव्हती. काही केल्या हे कमळ मिळत नव्हते .त्यावेळी डोळे मिटून त्यांनी स्वतःशी विचार केला , की आता काय करता येईल ? त्यावेळी त्यांना आठवले , की लहानपणी आई त्यांना ‘ राजीवलोचन ‘ या नावाने हाक मारीत असे .क्षणार्धात रामाच्या लक्षात आलं की आपला डोळा हा कमळाप्रमाणे दिसत असल्याचा उल्लेख आईने लहानपणापासून अनेकदा केला होता. शक्तीची आराधना पूर्ण करण्यासाठी नीलकमल मिळत नसेल तर  स्वतःचा डोळाच अर्पण करण्याचा निश्चय रामाने केला . उजव्या हातात स्वतःचं  लवलवत्या पात्याचं  तळपतं खड्ग उचललं आणि डाव्या डोळ्यावर टेकवलं  देखील. परंतु ही रामाची सत्वपरीक्षा देवी  शक्तीने बघितली होती आणि रामाची ही तयारी बघून शक्तीने प्रसन्न होऊन रामाला विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. तोच हा विजयादशमीचा दिवस.
किती पराकोटीचे प्रयत्न आपण करायला हवेत ,त्याचा परिपाठ या कथेच्या शेवटच्या भागाने घालून दिला आहे ,हे इथे आपल्या लक्षात येईल.
या कथेत असाही उल्लेख आहे की ही पूजा बांधण्यासाठी पौरोहित्य करायला रामाकडे कोणी उपलब्ध नव्हतं आणि चौकशी करताना त्याला कळलं की या शक्ती पूजेचे पौरोहित्य करू शकेल असा एकच योग्य माणूस पृथ्वीवर आहेस आणि तो म्हणजे रावण! रावण आपला शत्रू !त्याला त्याच्यावरच विजय मिळवण्यासाठी कसे पाचारण करायचे? पण आपल्या मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन रामाने रावणाला विनंती केली आणि आमंत्रित केले .रावणाने देखील या आमंत्रणाचा स्वीकार करून रामाच्या शक्ती पूजेचे पौरोहित्य स्वीकारले!
मला तर नक्की इथे असा संदेश जाणवला की, आपण आपल्यावरचे संकट निवारण करताना, ज्याला आपला शत्रू मानतो त्याच्याकडूनही  मदत घेण्यात कमीपणा मानू नये.  कुठल्या देशाकडे  आपण  शत्रू म्हणून पाहतो यापेक्षा त्या देशाने विकसित केलेल्या प्रणालीचा फायदा आपल्याला होणार असेल तर ती मदत आपण लगेच घेतली पाहिजे .   तीच गोष्ट आपली शस्त्रास्त्र व्यवस्था ,आपली अर्थव्यवस्था ,आपले पर्यावरण या सगळ्यांच्या संदर्भात सारखीच लागू आहे . ज्यात अखिल मानवजातीचा फायदा आहे तिथे इतर मतभेद विसरून आधी विधायक कार्य हाती घेणं गरजेचं आहे. जी गोष्ट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर लागू आहे तीच आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हेच स्वतःतील रामाला जागृत करणं आहे. स्वतःच्या बुद्धीची मशाल तेवती ठेवणं यालाच म्हटलं आहे. मान्य आहे की वातावरणात निराशा आहे ,मान्य आहे की नकारात्मकतेचा सूर प्रबळ होत आहे .तरीही स्वतःच्या अंतरंगात असलेल्या रामाने जर शक्तीची आराधना सोडली नाही,  तर सकारात्मकतेचा विजय निश्चित आहे .म्हणूनच आजच्या मूहूर्तावर मला या ओळी प्रकर्षाने आठवल्या असाव्यात.
शक्ति की करो मौलिक कल्पना,
            आराधन का दृढ़ आराधन से दो उत्तर
त्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा इथवर गाठणे किंवा ही प्रयत्नांची सीमा ओलांडणे हेच तर खरे सीमोल्लंघन आहे .

प्रा. डॉ. स्वाती दामोदरे

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments