Home विदर्भ शिक्षकांचे 'दान'

शिक्षकांचे ‘दान’

 

 

 

 

 

  • माधव पांडे

आयुष्यभर ‘ज्ञानदान ‘ करणारे शिक्षक येत्या एक डिसेंबरला शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत ‘मतदान’ करणार आहेत.दर सहा वर्षाने होणा-या या निवडणूकीतून विधानपरिषदेवर शिक्षकांचा प्रतिनिधी निवडून जातो.शासकीय आणि खाजगी क्षेत्रात अनेक खाती,विभाग असतांना संविधानाने शिक्षकांचा’आमदार’ विधानपरिषदेत असावा,अशी तरतूद केली. संविधानकर्त्यांची शिक्षकांप्रती असलेली विलक्षण आपुलकी या व्यवस्थेतून दिसून येते.आज विधानपरिषदेत शिक्षक आमदार म्हणून “गैरशिक्षक” आमदारांची हजेरी शिक्षकांना हटकत असून येत्या एक डिसेंबरच्या मतदानातून ‘शिक्षक’ विरूद्ध ‘गैरशिक्षक ‘अशी लढाई रंगणार काय?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर राजकीय पक्षांची ‘करडी नजर’ आहे.यापूर्वीच्या निवडणूकीत ‘बारीक नजर ‘होती.या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे डाॅ.नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करून शिक्षक संघटनांना खुले आव्हान दिले आहे.भाजपच्या या पवित्र्यानंतर गेली सहा वर्ष विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत देशपांडे यांना शिवसेनेने अधिकृतपणे उमेदवारी जाहिर केली.स्वाभाविकपणे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी श्रीकांत देशपांडे यांना पाठिंबा दिला.काल मंगळवारी यवतमाळमध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड,खा.भावना गवळी,खा.हेमंत पाटील,आ.डाॅ.वजाहत मिर्झा,आ.माणिकराव ठाकरे,अॅड.शिवाजीराव मोघे,आ.इंद्रनिल नाईक,आ.ख्वाजा बेग,आ.विश्वास नांदेकर यांच्यासह डझनभर नेतेमंडळी श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारसभेत उतरली आहेत.आता ही निवडणूक शिक्षकांची राहिली नसून राजकीय नेत्यांची झाल्याची जोरदार टीका शिक्षकांमधून ऐकायला मिळत आहे.अश्या या सगळ्या परिस्थितीत कोण निवडून येणार? हा कळीचा प्रश्न विचारायला उत्सुक असलेल्या माझ्या मित्रांना आज ऐवढंच सांगता येईल की,प्रचारात श्रीकांत देशपांडेंनी जोरदार आघाडी घेतली असून मतांच्या आघाडीबाबत पुढच्या आठवड्यात नक्की ‘भाष्य’ करता येईल.मात्र वरवर दिसणारी शिक्षक संघटना विरूद्ध राजकीय पक्ष यांची धुसफुस खरोखरच्या लढाईत परिवर्तित होते काय? हे बघण्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. ‘ आग ‘कुठेतरी लागली आहे,हे नक्की!

 

देशात केवळ सहा राज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे.बिहार,कर्नाटक,तेलंगणा,उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात विधान परिषद आहे.आंध्रप्रदेश सरकारने विधानपरिषद बर्खास्तीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होण्यापूर्वी तेथे विधान परिषद अस्तित्वात होती.विधानसभेच्या एक तृतीअंश सदस्य असलेल्या विधानपरिषदेत 1/12 सदस्य शिक्षक मतदार संघातून,1/12सदस्य पदवीधर मतदार संघातून,1/12 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून व अन्य सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात.वरिष्ठ सभागृह संबोधल्या जाणा-या विधानपरिषदेच्या सदस्यांना विधानसभेएवढेच अधिकार असतात.सध्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.1 डिसेंबरला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात पदविधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होत आहेत.’आत्मनिर्भर भाजप’ संकल्पनेअंतर्गत उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील पदविधर आणि शिक्षक मतदार संघातील भाजप उमेदवार दिल्लीतून जाहिर झालेत.या घटनाक्रमाने शिक्षक संघटना भानावर आल्यात.मात्र या नव्या घडामोडीची कल्पना अद्याप शिक्षकांना नसल्याने शिक्षकांना ‘वास्तवाचे भान ‘आले आहे काय?असा प्रश्न संघटनांच्या नेत्यांना पडला आहे.उत्तर प्रदेशमध्ये होणा-या शिक्षक मतदार संघातील निवडणुकांकडे एक नजर टाका.लगेच लक्षात येईल.परिस्थिती किती झपाट्याने बदलत आहे.सहारनपूर-मेरठ शिक्षक मतदार संघात गेल्या 48 वर्षाचे रेकाॅर्ड तोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सहारनपूर-मेरठ शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात माध्यमिक शिक्षक संघाचे वर्चस्व आहे.या मतदार संघातून शिक्षक संघाचे नेते ओमप्रकाश शर्मा कायम निवडून आले आहेत.पदवीधर मतदार संघात यापूर्वी राजकीय पक्षांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षकांच्या एकजुटीने त्याला प्रखर विरोध केला.मात्र आता शिक्षकांच्या विरोधाला न जुमानता हजारो नविन पदविधरांची नोंदणी करण्यात आली असून येथे आता पदविधर मतदारसंघाची निवडणूक शिक्षकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.शिक्षक मतदार संघातली निवडणूक राजकीय पक्षांच्या खिश्यात गेली.उत्तरप्रदेशात असं सगळं घडत असतांना,अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात यापेक्षा वेगळं काय घडत आहे? प्रश्न विचारा स्वतःला.
भारतीय जनता पक्ष सर्वच राजकीय संस्थांवर ताबा घ्यायला निघाली आहे,असा आरोप सर्वत्र केल्या जातो.लोकसभेत मंजूर झालेले विधेयक राज्यसभेत समर्थकांअभावी अनेकदा अडचणीत येते.असाच अनुभव राज्यात विधानसभेतही वारंवार आल्याने विधानपरिषदेत सर्वच सदस्य सरकार समर्थक किंवा ‘सरकारी बंदे ‘ असायला हवेत,या विचारातून यापूर्वी पदविधर मतदार संघावर भाजपने आपला शिक्का मारला तर आता शिक्षक मतदार संघात थेट उमेदवार देऊन शिक्षकांच्या घरातली निवडणूक ‘घोडेबाजारात ‘ लिलावासाठी आणल्याची बोचरी टीका होत आहे.मात्र या टीकेत काही तथ्य आहे काय? याचा सापेक्षाने कोणीही विचार करतांना दिसत नाही.कदाचित या नकारात्मक भूमिकेतूनच शिक्षकांचा प्रतिनिधी आता राजकीय पक्षांचा मांडलिक ठरण्याची शक्यता आणि भीती जास्त आहे.
मित्रहो,आज आपण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची चर्चा करीत आहोत.शिक्षकांसारखा संवेदनशील आणि सामाजिक घटक आपली राजकीय मतं कधी लपवून ठेवित नाही.अनेक शिक्षक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,पदाधिकारी किंवा आमदार,खासदारही होते,आहेत.शिक्षकांना राजकारणाचं वावडं नाही.मात्र शिक्षक व्यवसाय नसून ‘धर्म’ आहे असा म्हणणारा आणि तसं मानणारा शिक्षकांचा मोठा वर्ग शिक्षक मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या थेट ‘उमेदवारीने’ ‘नाउमेद’ झाला आहे.महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षण खाजगी संस्थांवर अवलंबून आहे. शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देशमुख,कर्मवीर भाऊराव पाटील या थोर नेत्यांनी ज्ञानगंगा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहचविली.त्यामुळे राज्यात बहुतांश माध्यमिक शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत.याच खाजगी व्यवस्थापन शाळांच्या अनेक प्रश्नांतून शिक्षक संघटनांचा जन्म झाला.शिक्षक नेते दि.ह.सहस्त्रबुद्धे यांनी विदर्भातील शिक्षकांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना स्वातंत्र्यपूर्व काळात 1940मध्ये स्थापन केली.त्यानंतर ‘ नसेल मागायची भीक तर मास्तरकी शिक ‘ असं समाजाकडून हिणवल्या जाणा-या शिक्षकी व्यवसायाला समाजात विलक्षण प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये शिक्षक आमदार स्व.हटवार सर,आमदार.ना.बा.सपाटे,आ.प्र.य.दातार,आ.दिवाकरराव जोशी,आ.यु.व्ही.डायगव्हाणे,आ.लंके,आ.बाबासाहेब सोमवंशी,आ.वसंतराव मालधुरे,आ.दिवाकरराव पांडे,आ.वसंतराव खोटरे यांनी संघटनेच्या माध्यमातून तूफानी प्रयत्न केले.आज शिक्षकांच्या चांगल्या पगारावर समाजाचा डोळा आहे.मात्र शिक्षकांना ‘आर्थिक आत्मनिर्भर’ करण्यात शिक्षक संघटना व त्यांच्या नेत्यांचे प्रचंड योगदान राहिले आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या शिक्षकांच्या दोन वेगवेगळ्या विचारधारेच्या मात्र शिक्षक हिताशी कटिबद्ध असलेल्या संघटनांचा अनेक वर्षे सरकारवर दबाव आणि प्रशासनात जबरदस्त दबदबा होता.अलिकडे सरकारला संघटनांचा दबाव नकोसा झाला आहे.त्यातूनच ‘सरकारी नेते’ निवडून येण्याची तजवीज होत आहे.ही या सगळ्या तात्विक विचारांची,त्यागाची एक निर्मळ बाजू आहे.आ.प्र.य.दातार यांनी शिक्षकांचा सेवाग्रंथ असलेल्या ‘स्कूल कोड’वर इतकी उत्तम पुस्तक निर्मिती केली की,शिक्षकांना सेवासातत्य व सेवानिर्भयता या पुस्तकांतून मिळाले आहेत.आता ही शिक्षकांची नेते मंडळी गेली कुठे? शिक्षक संघटनांच्या प्रयत्नातून सातवा वेतन आयोग घेणारा शिक्षक आज मतदान कोणाला करतो आहे,याकडे नजर टाकली तर या विषयाची दूसरी बाजू उघडी पडायला लागते.

 

2014च्या निवडणूकीत प्रा.श्रीकांत देशपांडे शिक्षक मतदार संघातून निवडून आले.त्याक्षणी शिक्षक संघटनांच्या पुण्याईला ओहोटी लागली.श्रीकांत देशपांडे कोणत्याही माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेत शिकवित नव्हते.शिक्षक नेते म्हणून त्यांची ओळख नव्हती.मात्र त्यांना शिक्षक मतदार संघाची चांगली ओळख होती.संवेदनशील आणि पटकन विश्वास टाकणारे शिक्षक बंधू-भगिनींच्या वाढदिवसाचे निमित्त करून श्रीकांतजींनी अर्धी लढाई जिंकल्याचं शिक्षकच सांगतात.गेल्या सहा वर्षात शिक्षकांचे कोणते आणि किती प्रश्न आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सोडविले,याची गोळाबेरीज शिक्षकांकडे आहे.पदवीधर मतदार संघात प्रा.बी.टी.देशमुख यांचा पराभव करून भाजपचे डाॅ.रणजित पाटील निवडून आल्यावर पदवीधरांच्या हातात ‘कमळ’ आलं.आता हा प्रयोग शिक्षक मतदार संघात होत आहे.शिक्षकांच्या हातात ‘कमळ’ येईल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ नेते रमेश चांदूरकरांना बोलतं केलं.गेल्या दोन टर्म मध्ये रमेश चांदूरकरांना म.रा.शि. परिषद तिकीट देणार,अशी हवा होती.मात्र वेळेवर वेगळ्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.रमेश चांदूरकरांना यावर्षी म.रा.शि.पची उमेदवारी पक्की होती.दिल्यात जमा होती.मात्र चांदूरकरांनी उमेदवारी नाकारली.उमेदवारी का नाकारू नये? असा प्रतिप्रश्न त्यांनीच मला केला.आजवर पदविधर मतदार संघातील निवडणूकीत शिक्षक परिषदेने भाजपच्या उमेदवाराला मदत करायची आणि शिक्षक मतदार संघात भाजपने परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा.असा अलिखित करार असतांना यावेळी भाजपने करार मोडला.त्यामुळे आपण ही उमेदवारी नाकारली,असं स्पष्ट सांगायला मृदुस्वभावी रमेश चांदूरकर यावेळी मागे आले नाही.भाजपवर इतकी चर्चा चालू असतांना मी आतापर्यंत भाजपचे उमेदवार डाॅ.नितीन धांडे यांचा उल्लेखही केला नाही.वाचकांना उत्सुकता असेल की,डाॅ.धांडे यांच्याबद्दल माझं काय मतं असेल.खरं लिहायचं असेल तर असं म्हणता येईल की,शिक्षक मतदार संघातील निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढाई नाही.उद्या प्रा.श्रीकांत देशपांडे विजयी झाले तरी तो विजय महाविकास आघाडीचा नसेल.शिक्षक आघाडीचा असेल!इतकी स्पष्ट ही निवडणूक आहे.डाॅ.नितीन धांडे ‘निवडणूकीचे उमेदवार’ आहेत.त्यांच्या उमेदवारीने प्रा.देशपांडेंसमोर चांगलेच आव्हान उभे ठाकले आहे…अगदीच अलिकडच्या भाषेत… ” मुमकीन है “…परंतु डाॅ.नितीन धांडे विधानसभेचा चेहरा आहे.त्यांना विधानसभेचा राजयोग आहे,लिहून ठेवा!
राजकीय पक्षाच्या थेट उमेदवारीने शिक्षक संघटना अस्वस्थ झाल्या आहेत,हादरल्या नाहीत.शिक्षकांची निवडणूक फार वेगळी आहे.या निवडणूकीत प्राधान्यक्रम आहे.बोली भाषेत फर्स्ट,सेकंड प्रिफरंन्स व्होट.सध्या 14उमेदवारांची दखल घ्यावी अशी नावे समोर आली आहेत.महाविकास आघाडीचे प्रा.श्रीकांत देशपांडे यांची थेट लढत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे यांच्याशी होऊ शकते.आजच्या या ‘भाष्य’मध्ये शिक्षकांच्या मनात असलेली राजकीय पक्षाच्या उमेदवारीची चर्चा व चिंता व्यक्त होत आहे,त्यामागिल सूर या थेट लढाईतून बाहेर येऊ शकतो.विदर्भ माध्यमिक संघाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण बरडे या लढतीला आकार देत आहे.प्रकाश काळबांडे ‘निवडणुकीचे उमेदवार’ भासतात. ‘शिक्षक नेते ‘ही शिक्षकांच्या मनातली जागा अद्याप ‘रिती ‘आहे. वास्तविक ही निवडणूक श्रावण बरडे या दमदार शिक्षक नेत्याने लढली असती तर विमाशिच्या इतिहासात एका सुवर्णपानाची तजवीज झाली असती.मात्र बरडे सर आता ‘किंग मेकरच्या’ भूमिकेत आहेत.या निवडणूकीत पाच जिल्ह्यातील34600 शिक्षक मतदार भाग घेत आहेत.प्रकाश काळबांडेंच्या पाठिशी संघटना उभी असतांनाच विजुक्टाचे अविनाश बोरडे जोरदार समर्थन मिळवित आहेत.विजुक्टा,आयटीआय,आणि नूटा यांच्या मतांची बेरीज साडेसहा हजार आहे.यातील किती मतदार ‘अविनाशी’ ठरतील,याची माहिती तर तीन डिसेंबरलाच होईल.या आभासी रणसंग्रामात सौ.संगिता सचिंद्र शिंदे-बोंडे आणि शेखर भोयर या नावांची चर्चा करणं अपरिहार्य आहे.प्रत्येक ‘जी आर ‘आपल्या मागणीनंतरच आला,असा दोन्हीही मान्यवरांचा प्रचार असतो.भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या भगिनी संगिता शिंदे- बोंडे यांच्या निवासस्थानी श्रीकांत देशपांडे यांची भाऊबीज पार पडली.खाजगी भाऊबीजचे फोटो वर्तमानपत्रात छापून आलेत.या ‘बातमी’मागिल ‘बात’ विचारू नका.हा निवडणूकीतील डावपेचाचा भाग असू शकतो. एक मतदार एकाच मतपत्रिकेत अनेक किंवा सर्वंच उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊ शकतो.संगिता मॅड्मच्या मतदारांना प्राधान्यक्रम ठरवितांना अश्या बातम्यांची मदत होऊ शकते.विमाशिचे प्रकाश काळबांडे यांच्या उमेदवारीसोबतच म.रा.शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकिले यांच्याही उमेदवारीला महत्व द्यावं लागेल.गेल्या निवडणूकीत शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला लढतीचीही मते मिळाली नाही.या निवडणूकीत शिक्षक परिषदेच्या निष्ठावंत मतदारांची नव्याने माहिती होईल,अशी आशा रमेश चांदूरकरांनी बोलून दाखविली.या निवडणूकीत अल्पसंख्यांक समुदायातील शिक्षकांची मोठी संख्या असून गेल्या निवडणूकीत अल्पसंख्यांक शिक्षकांनी श्रीकांत देशपांडेंना चांगले समर्थन दिले होते,यावेळी यापेक्षा वेगळं काही होणार नाही,असा दावा केल्या जात आहे. ही निवडणूक शिक्षकांनी शिक्षकांच्या हितासाठी करायला हवी.विमाशिचे महत्वाचे पदाधिकारी दिलीप कडू यांना उमेदवारी देण्याची संधी विमाशि संघाने गमावली.या निवडणूकीत शिक्षकांशी थेट नाड जोडलेला नेता निवडणूकीत आपली मूद्रा उमटवितो.राजकीय पक्षासारखंच शिक्षक संघटना सुद्धा तिकीट वाटपाचे निकष ठरवितात.या निकषात दिलीप कडू कुठेतरी कमी पडले असावेत.श्रीकांत देशपांडे यांना ख-या अर्थाने थेट लढत देण्याची ताकद असलेला शिक्षक नेता म्हणून दिलीप कडूंचे नाव घेतल्या जातं.भाजपानेही संस्थाप्रमुखाऐवजी शिक्षक नेत्यांची निवड करायला हवी होती.मागिल निवडणूकीत श्री
शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष अॅड.अरूण शेळके यांनी आपले नशिब अजमावून बघितले.शिक्षकांनी संस्थाप्रमुख नाकारले.
विनाअनुदानित शाळांमधिल शिक्षकांचे प्रश्न गंभीर आहे.वीस-चाळीस टक्क्यांच्या वेतनावर शिक्षक उदर निर्वाह करीत आहेत.दिव्यांग विद्यार्थांना अध्यापन करणा-या विशेष शिक्षकांचे दोन-दोन वर्ष पगार होत नाहीत.नोकरी पूर्णवेळ,मात्र पगार नाही.आश्रमशाळांचे प्रश्न थिजले आहेत.शिक्षकांचा संपूर्ण सेवेत फक्त दोनदा ‘चेतक बदल’ होतो.वरिष्ठ आणि निवड श्रेणी.या दोन ‘अभूतपूर्व’ श्रेणीबदलासाठी शिक्षक ‘चातक’ पक्षाप्रमाणे वाट बघतात.सेवेत बारा वर्षानी विशेष प्रशिक्षण दिल्यावर शंभर रूपये लाभाची वरिष्ठ श्रेणी शिक्षकांच्या पदरी पडते.तर 24वर्षांनी दिली जाणारी ‘निवडश्रेणी’ किचकट तरतुदींमुळे अनेकांना मिळूच शकत नाही.शिक्षक संघटनांनी शिक्षकांना सेवासातत्य आणि सेवासंरक्षण मिळून दिले.मात्र अनेक खाजगी व्यवस्थापनांकडून शिक्षकांचे ‘आर्थिक शोषण’ खुलेआम सुरू आहे.टक्केवारीचे फलक बाकी आहे.या विषयावर अद्याप आवाज उठविणे बाकी आहे.शाळा चालविणे शिक्षकांची जबाबदारी आहे,अशी सोयीची भूमिका घेऊन अनेक व्यवस्थापन शिक्षकांना अक्षरशः पिळत आहेत.असे’ पिळदार ‘संस्थानिक कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत,याचा शोध नव्याने घेण्याची गरज आहे. शिक्षकांना वेतन मिळाले म्हणजे प्रश्न सुटले अशी सरकारची भूमिका आहे.आज सरकारशी प्रामाणिकपणे दोन हात करण्याची तयारी कोणाचीच नाही.नागपूरचे म.रा. शिक्षक परिषदेचेआमदार नागो गाणार यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे.नागो गाणार नोकरीत असतांना शाळा व्यवस्थापनाने दुस-याच वर्षी त्यांना बडतर्फ केले होते.त्यानंतर संघर्षातून गाणार घडले.त्यामुळे अगदी अमरावती विभागातील शिक्षकही गाणारांचं ‘गुणगाण’ गातात.आज नागो गाणारांसारखे शिक्षकांसाठी प्रामाणिकपणे लढणारे किती आमदार आहेत? 1 डिसेंबरला शिक्षक आपलं मताचं दान कोणाला देणार यावरच यापुढील काळातील शिक्षकांची परिस्थिती ठरणार आहे.शिक्षक दीन की ‘दाता’…हे तर लवकरच कळेल..

9823023003

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments