Home Uncategorized अस्तित्व

अस्तित्व

 

आदित्य रविंद्र जोशी 

पूण्यावरून आम्ही जेम्व्हा गुहागरला गेलो होतो. तिथे आम्ही हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा , एका घरीच राहिलो . राहण्याची व्यवस्था उत्तम होती. २-३ दिवसात गुहागर बीच , गोपालगड , लाईट होऊस पाहून झालं होतं. तिथे जवळच हेदवी ला गणपतीचं मंदिर असल्याचं समजलं आणि ते पहायला आम्ही निघालो . मी , माझी बायको आणि मुलगी . हेदवीला अतिशय सुंदर मंदिर आहे. आमचं दर्शन घेऊन झालं , थोडे फोटो काढले , थोडा वेळ तिथे घालवून आम्ही परत गुहागरकडे निघालो . एव्हाना आम्हाला भूकी लागली होती . दुपारचे २-२:३० वाजले असतील. आम्ही कुठे एखादं हॉटेल किंवा खानावळ दिसते का बघत होतो , इतक्यात एका वळणावर किंचित उतारावेर डावीकडे एक पाटी दिसली. ” इथे घरगुती शाकाहारी जेवण मिळेल”.
मी कार बाजूला घेतली . आणि तिथे दिसणाऱ्या फाटकातून आत वळलो . तो एक मोठा वाडा होता. भलं मोठं आंगण होतं . थोडं पुढे जाऊन गाडी पार्क केली आणि आम्ही उतरलो . ” या , आत या ” , त्या वाड्याच्या पडवीतून आवाज आला . आम्ही उन्हात असल्याने आम्हाला आतलं नीट दिसत नव्हतं .
आम्ही पुढे गेलो आणि ३ पायऱ्या चढून आतमध्ये गेलो. साधारण सत्तरेक वर्षाचे गृहस्थ तिथे एक पलंगावर , भिंतीला तक्क्या लावून टेकून बसले होते .मोठं नाक , त्यावर टेकलेला जाड तपकिरी रंगाच्या फ्रेमचा चस्मा, घारे – थकलेले डोळे , पांढरे झालेले विरळ कल्ले आणि बाकी टक्कल ,गालावर नव्याने यायला सुरवात झालेली पांढरी दाढी, किंचित पिवळा पडलेला फुल बाह्यांचा सदरा आणि पांढरं धोतर !, २ खुर्च्या आणि मध्ये एक टी -पॉय , पलंगाशेजारी घरघरत असलेला एक टेबल फॅन , तिथेच एका स्टूल वर छोटं तबक – अशाप्रकारची एकूण मांडणी !
“आम्ही बाहेरची पाटी पहिली आणि थांबलो . इथे जेवायला …” . “हो , मिळेल. बसा”.
“अरे , दादा , ए दादा “. “आलो”. “अरे यांच जेवायचं बघ ” . ” बरं का , शाकाहारीच मिळेल “. “हो काका , चालेल आम्हाला “. “जा , मग त्या तिकडे नळ आहे , तिथे हात पाय धुवून घ्या”. आम्ही बाहेर एकीकडे असलेल्या नळावर हातपाय धुतले . चेहऱ्यावर थंड पाणी घेतलं .
” या साहेब , बस तुम्ही इथे . थोडा वेळ लागेल .” आम्ही पडवीच्या शेजारीच लागून असलेल्या एका खोलीच्या दारातून आत गेलो . ती मोठी खोली होती. २-३ टेबल एकला एक असे लावले होते . खुर्च्या पण लावलेल्या होत्या . आम्ही बसलो . ” साहेब करतो आम्ही भर भर , तोवर जरा बसा .
माझं नाव दीघु आणि हि माझी बायको सावित्री.” त्या दोघांनी खरंच जास्त वेळ न लावता स्वयंपाक केला. पोळी, भाजी , आमटी , भात , २ चटण्या , कैरीचं लोणचं असं व्यवस्थित जेवण झालं .” तुम्ही इथे आहे का कामाला ?” . “हो साहेब, म्हणजे आम्ही इथेच राहतो , अप्पांसोबत. ” .
आम्ही परत पडवीत आलो . “काय कसं झालं जेवण?” . “हो , एकदम छान , मजा आली ” . “आता , जरा आमचा वाडा पाहून घ्या” अप्पासाहेब म्हणाले .
आता आम्हाला परत गुहागर ला जाण्याशिवाय काहीच काम नव्हतं आणि वाडा बघण्यातही रस होताच .रघूने आम्हाला वाडा दाखवला .
वाडा बराच जुना होता , बरीच पडझड झाली होती . काही खोल्यांची कौलं निघून ,छताला भोकही पडले होते . फक्त पडवी , आणि आतमधली एक खोली जरा बऱ्या अवस्थेत होती. “इथे पावसाळ्यात कसं ?” . “अहो साहेब हे नसतात इथे पावसाळ्यात . ४ महिने यांचा मुलगा यांना पुण्याला घेऊन जातो . इथे नाही राहू देत .” “अच्छा. पण हा वाडा तर दुरुस्तीला आला आहे , नाही?” . “हो साहेब. पण हे लय कंजूस . पैसे सुटत नाही हातातून . मुलगा म्हणतो विकून टाकू तर हे नाही म्हणतात . यांना इथेच राहायला आवडतं . “. मागे एक विहीर सुद्धा होती . बरीच मोठी . आजूबाजूला केळाचे झाडं , इकडे तिकडे वाढलेलं गवत . आम्ही काही फोटो काढले आणि मग परत निघालो . आम्ही पडवीत आलो . “काय , कसा वाटला आमचा वाडा ?” . हो काका, वाडा तर मस्त आहे , खूपच मोठा आहे “. इतक्यात रघूने बिल दिलं आणि मी त्याला पैसे दिले . ” ठीक आहे काका , छान वाटलं , निघतो आता”. ” हो, जाण्याआधी जरा या रजिस्टर मध्ये नाव लिहा , पत्ता , कंपीनीचा पत्ता लिहा. ” आणि त्यांनी एक रजिस्टर माझ्या पुढे केलं . मी पटपट जुजबी माहिती लिहिली आणि त्यांना परत दिलं .
” अहो , पूर्ण नाव लिहा . वडिलांचं नाव लिहायचं असतं स्वतःच्या नंतर , आहे न नाव वडलांना?” . मी जरा दचकलोच. मी मुकाट्याने नाव परत लिहिलं . “माझ्या मुलाचा फ्लॅट आहे पुण्यात – त्याने नाव लिहिलं आहे – तुम्ही लिहिलं तसंच .- बापाचं नाव गाळून . काय माहित इतकी काय लाज वाटते बापाचं नाव लिहायला “
. अप्पासाहेब परत म्हणाले , अहो या पत्त्यावर मी येऊ शकेन का ? तुमच्या कम्पनीचा पूर्ण पत्ता लिहा , तिथला नंबर लिहा . मी येईन कधी भेटायला तुम्हाला , काय?” . मी हो हो केलं . तसा दुसरा पर्यायही नव्हता. आणि त्यांना हवी त्याप्रमाणे मी माहिती लिहून दिली .
लोणचं आवडलं होतं म्हणून आम्ही राघूच्या बायको कडून थोडं वेगळं विकत घेतलं . कार थोड्या अंतरावर होती . रघु आमच्यासोबत कार पर्यंत आला .
“साहेब, याच्या बोलण्याचं मनावर घेऊ नका. इथे जो येईल , त्याला हे तेच म्हणतात कि मी येईल भेटायला वगैरे ! हे कुठे जाताहेत कोणालाभेटायला आता “. रघु हसला. चविष्ट जेवणाबद्दल रघु आणि त्याच्या बायकोचे आभार म्हणून आम्ही निघालो .
मुलाने फ्लॅट च्या नावाच्या पाटीत त्यांचं नाव नाही टाकलं – त्याची सल – मला अप्पासाहेबांच्या शब्दाशब्दांत जाणवत राहिली. एक जुनाट पडका वाडा – तेव्हढच काय ते त्यांचं अस्तित्व -कदाचित ! आणि ते टिकवण्याची त्यांची एकांत धडपड ! तिथे येऊन गेलेल्या लोकांना कधीतरी जाऊन भेटता येईल अशी भोळी आशा. – कशासाठी? ” ही अशी कोणती अगतिकता , कोणती गरज असते माणसाची?
एव्हाना, आमची कार मुख्य रस्त्याला लागली होती . ही आणि मुलगी मागच्या सीट वर काहीतरी बोलत होत्या . अन् , मी काहीसा अजून त्या वाड्यातच घुटमळत होतो…

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments