Home Uncategorized शिक्षकांचा पक्ष

शिक्षकांचा पक्ष

 

:माधव पांडे

एक डिसेंबरला अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात होणारी निवडणुक राजकीय सारीपाटावर गाजत आहे.विधानसभेच्या निवडणुकीत दिसणारी धामधुम या निवडणुकीत वरवर दिसत नसली तरी अनेक राजकीय नेत्यांचे भविष्य या निवडणुकीच्या निकालावरून ठरल्या जाण्याची शक्यता आहे.शिक्षक आमदाराच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची हजेरी शिक्षकांना ‘घुसखोरी’ वाटत आहे.राजकीय पक्ष विरोधी वातावरणाचा फायदा शिक्षक संघटनांना जोरदार होत असल्याचे प्रचारादरम्यान समोर आले आहे.महाविकास आघाडी समर्थक शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे विरूद्ध सगळे उमेदवार अशी सुरूवातीची लढत आता एकास- एक होत चालली आहे. विधानपरिषदेत गेली सहा वर्षे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत देशपांडे यावेळी चमत्कारावर विश्वास ठेवून आहेत.या निवडणूकीत भाजपने उमेदवार दिला नसता तर श्रीकांत देशपांडे यांनी ही निवडणूक अगदी सहज जिंकली असती.मात्र भाजपने निवडणूकीत उमेदवार देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजयी रथ रोखला आहे.या खेळीचा थेट फायदा भाजपला होतांना दिसत नाही. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार प्रा. प्रकाश काळबांडे यांना राजकीय पक्षांच्या कुरघोडीचा विलक्षण लाभ होत असून श्रीकांत देशपांडे यांची थेट लढत प्रा.प्रकाश काळबांडें सोबत होत आहे.
अशी राजकीय वार्तापत्रातील सर्वांनाच सांभाळून घेणारी प्रचारकी थाटातली वरील विधानं वाचून तुम्हाला क्षणभर वाटलं असेल की,किती अभ्यासपूर्ण लिखाणं आहे.परंतु वास्तविकतेत वाचकांना दिलेली ही’ भूल ‘असते.हा पुढे -तो मागे..यांची सरशी होईल,यांना पराभवाचे तोंड बघावे लागेल,अश्या मथळ्यातून मतदार प्रभावित होतात.काहीचं फावतं.काहींना असंच मांडावं लागतं.काही ठिकाणी व्यवसाय, तर काही ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न असतो.काहींना कोणाला तरी खूश करायचे असते तर काही ठिकाणी हिशोब चुकते करण्याची ‘हीच ती वेळ ‘असते.राजकारण ‘गटार’ आहे म्हणतात…या गटारात अजून अशी चार घमिले घालून ही गटरगंगा दुथळी भरून वाहत जाते.तोवर निवडणूकींचा निकाल लागतो.
गेल्या पंधरा-सतरा वर्षापासून माझा वाचकांसोबत संवाद सुरू आहे.कधी भूमिका घेऊन, कधी भूमिका मांडून माझं बोलणं सुरू असतं. गेल्याच आठवड्यातलं मी निवडणूकीची मांडणी केली.तेव्हा भाजपचे नेते नाराज झालेत.डाॅ.नितीन धांडे यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला यावेळी चान्स नाही.असं मी थेट लिहलं.त्यामुळे काही जवळची मंडळी नाराज झाली.परंतू कोणी खुश व्हावं,म्हणून मी कुठं लिहतो?
आजही जे लिहणार,ते संपूर्ण सत्य असल्याचा ‘दावा’ नाही.मात्र असत्यही नाही,हा ‘वादा’!
राजकीय घडामोडीचं विश्लेषण नेहमीच तर्कावर आधारित असतं.कधी बरोबर तर कधी अगदीच फसलेलं!निवडणूकांचे निकाल आल्यानंतर मी स्वतःलाच एक प्रश्न विचारतो.मी कोणाचा प्रचार केला काय? उत्तर होय आलं तर मात्र मी स्वतःला माफ करीत नाही.मी काय मांडावं,याचं मला संपूर्ण स्वातंत्र्य आहे.त्यातूनच एका जबाबदारीचं दडपणही सतत मनावर असतं.कोणी चांगला आहे,हे सांगतांना दुसरा’ खळ’आहे,असं मी कधी सांगत नाही.मुळात लिखाण विवेकावर आधारित असतं.सगळ्यांनीच आपला ‘पोत’ सोडला तर ‘फाटलेलं आभाळ’ कुणी शिवायचं?
मित्रहो, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक आता रंगात आली आहे.उणापुरा एक आठवडाही शिल्लक नाही.दोन डझनाहून जास्त उमेदवार विद्यालये पालथी घालत आहेत.गुरूवर्यांना साकडं घातल्या जात आहे.आता सगळ्यांच्या मनात प्रश्न उभा झालाय. निवडून कोण येणार? शिवसेनेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले श्रीकांत देशपांडे यांना ही निवडणूक जड जात आहे.भारतीय जनता पक्षाने डाॅ.नितीन धांडे यांना अधिकृत उमेदवारी दिली नसती तर श्रीकांत देशपांडे यांनी ही निवडणूक एका हाती जिंकली असती.मात्र असं झालं नाही.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार निवडणूक रिंगणात असतांना भाजपने पक्षाचा उमेदवार दिला.आज आपण आपल्या चर्चेचा कॅमेरा अकोल्यात लावू.अकोल्यात दोन राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर या निवडणूकीला समजणे सोपे जाईल.आ.रणजित पाटील यांची स्थिती अत्यंत अवघड झाली आहे.आ.रणजित पाटील यांनी बी.टी.देशमुखांविरोधात निवडणुक लढविली तेव्हा शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रणजित पाटीलांना भरघोस मतदान केले.रणजित पाटील यांनी दुस-या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांचा पराभव केला.या दोन्ही निवडणुकीत शिक्षक परिषद रणजित पाटलांसोबत होती.आ.रणजित पाटील यांच्या दुसरी टर्म निवडणूकीत आमदार श्रीकांत देशपांडेंनी चांगली साथ दिली. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे मतदार ब-यापैकी ‘काॅमन’ आहेत.त्याचमुळे अमरावती शिक्षक मतदार संघ निर्माण झाला तेव्हा शिक्षक नेते आ.बाबासाहेब सोमवंशी आणि पदवीधर मतदार संघातून आ.बी.टी.देशमुख यांनी प्रतिनिधीत्व केले. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही निवडणूकींमध्ये एक सुक्ष्म फरक असून शिक्षक मतदार संघात माध्यमिक शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविद्यालयीन प्राध्यापकांना रस आहे.त्यातूनच हे दोन्ही मतदार संघ शिक्षकांच्याच ताब्यात राहत गेले.मात्र रणजित पाटील यांनी बी.टी.सरांचा केलेला पराभव ही घटना ख-या अर्थाने या निवडणूकीतील शिक्षकांची ‘हुकमत’संपविणारी ठरली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले रणजित पाटील यांनी आपला मतदार संघ मजबूत करण्यासाठी तब्बल बारा वर्षे शिक्षकांचे आमदार राहिलेले आ.वसंतराव खोटरे यांना भाजपमध्ये ओढले.आ.खोटरे यांनी भाजपचा मार्ग अनुसरला. माजी आ.वसंतराव खोटरे यांनी स्थापलेल्या पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून विकास सावरकर यांना या निवडणुकीत उभे केले आहे.आ.रणजित पाटील यांना शिक्षक परिषदेने मदत केल्याने आ.पाटील परिषदेचे,आ.खोटरेंना भाजपात त्यांनीच आणल्याने रणजित पाटील खोटरेंचे,भाजपने डाॅ.नितीन धांडे यांना उमेदवारी दिल्याने आता रणजित पाटील धांडेंचे सुद्धा!
भाजपने शिक्षक परिषदेला बाजूला सारून पक्षाचा उमेदवार दिल्याने शिक्षक परिषदेचे कधी नव्हे एवढे मोठे नुकसान झाले आहे.संघपरिवारील कार्यकर्त्यांनी आता कोणाला मत द्यावे असा प्रश्न स्वयंसेवकांसमोर उभा झाला आहे.भाजपने डाॅ.नितीन धांडे यांना उमेदवारी दिल्याबरोबर शिवसेनेत संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळलेले श्रीकांत देशपांडे यांनी तातडीने शिवसेनेकडे उमेदवारी मागितली.या घटनाक्रमात श्रीकांत देशपांडे फसले.मागिल निवडणुकीत त्यांनी ‘शिक्षक आघाडी ‘स्थापन करून निवडणुक लढविली आणि त्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले.मात्र यावेळी भाजपची व्युहरचना लक्षात न घेता श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली.स्वाभाविकच महाविकास आघाडीने पाठिंबा दिला.शिवसेनेची अधिकृत उमेदवारी घेणे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा यातूनच श्रीकांत देशपांडे अडचणीत आले आहेत.सध्या राज्यात भाजप- शिवसेनेचे चांगलेच फाटलेले.त्यातून श्रीकांत देशपांडे शिवसेनेचे!त्यामुळेच काहीही झालं तरी भाजप नेते शिवसेनेचा उमेदवार विजयी होऊ देणार नाहीत. राज्यातील जनता महाआघाडीतील ‘ सत्तेचा खेळ’ बघत आहे.परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यात रस असण्याचे काही कारण नाही.अश्या सर्व राजकीय समीकरणात आता वेगळाच ‘ठेवणीतला रंग’ वापरल्या जात आहे.श्रीकांत देशपांडे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांची भेट घेतली.या भेटीमागे श्री.शिवाजी शिक्षण संस्थेची व्होट बँक आहे.वास्तविक गेल्या निवडणुकीत श्रीकांत देशपांडे यांनी श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष अॅड. अरूण शेळके यांचा 4हजार 942 मतांनी पराभव केला होता.तिस-या क्रमांकावर माजी आमदार वसंतराव खोटरे राहिले.त्यामुळे श्री.शिवाजी शिक्षण संस्था आणि विमाशिसंघ एकत्र आल्यास ही निवडणूक श्रीकांत देशपांडे यांच्या हातात राहणार नाही.ही उघड गोष्ट आता श्री. शिवाजीच्या शिक्षकांमध्ये जोर धरत आहे.श्री.शिवाजीचे तत्कालिन अध्यक्ष अॅड.अरूण शेळके व्यवस्थापनाचे प्रमुख होते.त्यामुळे इतर संस्थांमधिल शिक्षकांनी अॅड.शेळकेंना मतदान केले नाही.अगदी हिच बाब डाॅ.नितीन धांडे यांना लागू पडत आहे.डाॅ.नितीन धांडे यांच्या ‘विदर्म युथ वेलफेअर’मध्ये सगळंच’ फेवर’ नाही.श्री.शिवाजीला ‘विदर्भ युथचे’ नेतृत्व मान्य असण्याचे काही कारण नाही.राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांना शिक्षण क्षेत्रात भाजपचा आमदार मान्य असणार नाही.तेव्हाच राष्ट्रवादीचा ‘विदर्भ विस्तार’ कार्यक्रम लक्षात घेता शिवसेनेच्या आमदारापेक्षा विमाशिचा आमदार श्री.शिवाजीला जवळचा असू शकतो.आ.वसंतराव खोटरे शिवपरिवारातील होते.या परिवाराच्या ताकदीवर खोटरेंना दोनदा आमदार होण्याची संधी मिळाली.अश्या राजकीय गुंतागुंतीत ही निवडणूक श्वास घेत आहे.विदर्भ शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष श्रावण बरडे यांचा 2015 पासून पाचही जिल्हयात अथक प्रवास सुरू आहे.शिक्षकांच्या प्रश्नांची नेमकी जाण असणारा शिक्षक नेता म्हणून श्रावण बरडे यांची विदर्भात ओळख आहे.विमाशिचे उमेदवार प्रा.प्रकाश काळबांडे यांच्या पाठिशी श्रावण बरडेंचे बळ आहे.येत्या आठवड्यात राजकीय सारीपाटात जोरदार घडामोडी घडणार असून काहीही झालं तरी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून द्यायची या इराद्याने पेटलेली ‘फडणवीस टीम’ श्रीकांत देशपांडे यांच्या पराभवासाठी काही तडजोडी करण्याची भूमिका घेऊ शकतात. भाजपच्या शिवसेना विरोधातून प्रा.प्रकाश काळबांडे यांना चांगलेच बळ मिळू शकते.म.रा.शिक्षक परिषद कायम भाजप समर्थक राहिली तर विदर्भ शिक्षक संघ नेहमीच काँग्रेस समर्थक !त्यामुळे काँग्रेस विचारधारा असणा-या शिक्षणसंस्था विमाशिच्या उमेदवाराकडे झुकतांना दिसत आहे.भाजपच्या प्रचाराचा जोर वाढल्यावर आपोआप शिवसेना विरोध उफाळून येईल.भाजपला निवडणूकीत डाॅ.नितीन धांडे यांना चांगली मते मिळाली पाहिजे,असं वाटत असतांनाच शिवसेनेचा उमेदवार नको,ही भूमिका जास्त तीव्र आहे.
राजकारण या टप्प्यावर आहे.श्रीकांत देशपांडे यांनी भाजपचा धसका घेऊन तातडीने शिवसेनेची उमेदवारी घेतली.महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहिर झाला.या घटनाक्रमानंतर या निवडणूकीचा नूर बदलला आहे.शिवसेना नको असं म्हणणारे भाजप नेते श्रीकांत देशपांडेंचा पराभव करण्यासाठी सिद्ध झाले आहेत.
असं सगळं असतांना आता श्रीकांत देशपांडे यांचा पराभव निश्चित आहे.असंही समजण्याचं काही कारण नाही.श्रीकांत देशपांडे शिक्षकांमध्ये ‘गारूडी’म्हणूनही प्रसिद्ध आहेत.शिक्षकांवर श्रीकांत देशपांडेंचे किती ‘गारूड’ आहे,हे तर तीन तारखेला निकालातून दिसेलच,मात्र या सगळ्या गुंतागुंतीत ‘शिक्षकांचा पक्ष’ कोणता ते अधिक स्पष्टपणे दिसेल.
अमरावती.
9823023003

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments