ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भाडेकरूंची पोलीस पडताळणी करा; सुरक्षित समाज निर्मितीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आवाहन…

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

रयतनामा देहूरोड, दि. 8 : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत देहूरोड पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूंची पोलीस पडताळणी करण्याबाबत जनहितार्थ महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक सलोखा बैठकीदरम्यान देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी घरमालक, नागरिक व व्यापारी वर्गाला संबोधित करताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे म्हणाले की, सध्या शहरांमध्ये बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून अनेक जण भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करतात. अशा परिस्थितीत घरमालकांनी केवळ आर्थिक व्यवहार न पाहता संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी, ओळखपत्रे व आवश्यक माहिती तपासणे अत्यंत गरजेचे आहे. काही वेळा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी, इतर राज्यांतील फरार गुन्हेगार किंवा देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी इसम देखील बनावट माहितीच्या आधारे भाड्याने राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेकदा गंभीर गुन्हे करून आरोपी वेगवेगळ्या भागात जाऊन भाड्याने राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वेळी घरमालकांनी संबंधित भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा केली असल्यास आरोपींचा शोध घेणे पोलिसांना सुलभ होते. यामुळे गुन्हे प्रतिबंधास मदत होऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास हातभार लागतो.

देहूरोड पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना स्पष्ट करण्यात आले की, कोणतेही घर, दुकान, गाळा किंवा इमारत भाड्याने देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा ओळख पुरावा, कायमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, ओळखपत्रे तसेच आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भाडेकरूसोबत अधिकृत भाडेकरार (Rent Agreement) करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भाडेकरारामुळे संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती उपलब्ध होते व भविष्यात कोणताही वाद किंवा गुन्हेगारी प्रकार घडल्यास तपासासाठी मदत मिळते.

पोलीस प्रशासनाने घरमालकांना सूचना देताना सांगितले की, भाडेकरूची माहिती देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये त्वरीत जमा करावी. ही प्रक्रिया नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत असलेल्या तरतुदींचाही उल्लेख केला. घरमालकाने भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात न दिल्यास संबंधित घरमालकाविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सामाजिक सलोखा बैठकीत उपस्थित नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. शहरातील शांतता, सुरक्षितता आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

देहूरोड पोलीस स्टेशनच्या या जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होत असून सुरक्षित आणि गुन्हेमुक्त समाज उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे