देहूरोडमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याच्या विरोधात नागरिकांचा एल्गार; MSEB कडून सकारात्मक आश्वासने..

रयतनामा(प्रतिनिधी) देहूरोड दि. 3 मार्च : देहूरोड शहरात मागील काही दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर आज देहूरोडमधील नागरिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने एकत्र येत विद्युत विभागाविरोधात निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी सर्वानुमते देहूरोड विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता रत्नदीप काळे यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या या एकजुटीमुळे प्रशासनाला या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली असून अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिली आहेत.
दु चाकी रॅली दरम्यान नागरिकांनी वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या अडचणी मांडल्या. घरगुती तसेच व्यावसायिक कामांवर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. व्यापाऱ्यांनी विशेषतः वीज खंडित झाल्यामुळे व्यवसायावर होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा मुद्दा ठळकपणे मांडला.
यावेळी सहाय्यक अभियंता आणि MSEB अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील उपाययोजनांची हमी दिली.
मुख्य आश्वासने पुढीलप्रमाणे:
भविष्यात वीजपुरवठा अधिक सुरळीत, स्थिर आणि विश्वासार्ह ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले.
देहूरोड परिसरात नवीन फीडर स्टेशन उभारण्यात येणार असून त्यामुळे वीजपुरवठ्यावरील ताण कमी होणार आहे.
तक्रारींचे जलद निवारण व्हावे यासाठी मामुर्डी येथे नवीन MSEB कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांशी अधिक पारदर्शक, तत्पर आणि प्रभावी संवाद ठेवण्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.
ही आश्वासने देहूरोडकरांसाठी दिलासादायक ठरली असून नागरिकांच्या एकजुटीचा हा मोठा विजय मानला जात आहे. स्थानिक पातळीवर एकत्र येऊन प्रश्न मांडल्यास प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, याचे हे उदाहरण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या आंदोलनात देहूरोड व्यापारी असोसिएशनचे लहू मामा शेलार, मिकी कोचर, अरुण जगताप, रेनू रेड्डी, विशाल खंडेलवाल, राजू रावल, अमोल व्यवहारे, मनोज तेलगू यांच्यासह अनेक व्यापारी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देहूरोडमध्ये वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांनी दाखवलेली एकजूट आणि प्रशासनाने दिलेली आश्वासने यामुळे येत्या काळात परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
