ब्रेकिंगमहाराष्ट्र

 देहूरोडमध्ये वीज पुरवठ्याचा बोजवारा; नागरिक संतप्त – ३ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

रयतनामा देहूरोड (प्रतिनिधी – देहूरोड परिसरात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठ्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज येणे तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता तासन्‌तास वीज बंद ठेवणे या प्रकारांमुळे नागरिक व व्यापारी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे, देहूरोड येथील कनिष्ठ अभियंत्यांचे लक्ष रावेत परिसरातील उंच इमारती, गृहनिर्माण योजना व धनाढ्य भागांकडे अधिक असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तथाकथित “मलईदार” भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवला जात असताना देहूरोडसारख्या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र झाली आहे.

याउलट, मार्च महिन्याच्या अखेरीस थकबाकी वसुलीसाठी मात्र देहूरोडकरांवर कठोर कारवाई केली जात असून, वीज तोडणीसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. “वीज पुरवठा व्यवस्थित नाही, पण बिल वसुली मात्र कडक” या दुटप्पी धोरणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या अनियमित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. दुकाने, लघुउद्योग, सेवा व्यवसाय यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत आहेत.
“अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नाहीत. फोन केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस सहन करायचे?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, देहूरोडमधील नागरिक व व्यापारी संघटनांनी एकत्र येत संबंधित विद्युत विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे. येत्या तीन दिवसांत वीज पुरवठा नियमित व सुरळीत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये उपोषण, बाजार बंद, तसेच विद्युत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“आमच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा नागरिकांनी दिला असून, येत्या काही दिवसांत प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत तर देहूरोडमध्ये मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

आता संबंधित विद्युत विभाग या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन परिस्थिती सुधारतो का, की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे