तंबाखु सोडा कर्करोग टाळा !
जालना, दि.28
तंबाखु सोडा कर्करोग टाळा !
दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा केला जातो तंबाखु मिश्रीत धुम्रपान सेवनामुळे आरोग्याला हानिकारक असल्यामुळे जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तंबाखु विरोधी दिन साजरा करण्यांत येतो. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत ठरविण्यात आले की, 31 मे रोजी जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा करावा.
जगभरातील लोक बिडी, सिगारेट, गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करतात. सदरील व्यक्तीला मानसिक व शारीरिक त्रास होतो. यामुळे गंभीर आरोग्य समस्या होतात. फुफुसाचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, तोंडाचा कर्करोग याशिवाय ह्दयविकार, मधुमेह इत्यादी आजार होऊ शकतात. तंबाखुमध्ये निकोटिन नावाचे रसायन असते. ज्यामुळे शरीरातील अवयवावर परिणाम होऊन गंभीर आजार होतात. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. तंबाखुचे सेवन यासाठी कारणीभुत आहे. किशोरवयीन मुलींमध्ये (१०-१८) वयोगटात स्मोकिंगचे प्रमाण ६.२%, (दुप्पट) झालेले आहे. सर्व प्रकारच्या तंबाखु व्यसनामध्ये ४२.४% पुरुष व १४.२% महिला प्रभावित आहेत. त्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू तंबाखु सेवनामुळे होतो. जन्मतः कमी वजनाची बालके, अकाली प्रसुती, जन्मतः फुफुसाला इजा झालेली बालके, दिव्यांग बालक, प्रसुती दरम्यान अधिकचा रक्तस्त्राव. (पीपीएच), अकाली रजोनिवृत्ती येण्याचे प्रमाण ४३ टक्क्याने वाढणे. यामध्ये अकाली बाळांतपण रोखण्यासाठी अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण ‘तंबाखु व्यसनाबद्दल’ लाभार्थ्यांमध्ये जाणवी जागृती करुन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
१) तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन न करणे.
२) तंबाखुमुळे शरीरावर होणा-या परिणामाबाबत जनजागृती करणे.
3) तंबाखु पीकाचे उत्पादन ऐवजी दुसरे पीक घ्यावे.
४) तंबाखु/धुम्रपान करीत असलेल्या लोकांनी त्वरीत या सवयी सोडुन देणे.
५) शासकिय जिल्हा रुग्णालयांत व्यसन मुक्तीबाबत मार्गदर्शन केले जाते.
आरोग्य संदेश :
१) तंबाखु पासुन मुक्त राहणे.
२) आरोग्य शिक्षणाची अंमलबजावणी करणे.
३) आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करावे.
तंबाखु टाळा, आनंदी जगा…!.
-जिल्हा माहिती कार्यालय, जालना


