प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना; विद्यार्थ्यांच्या आहार खर्चामध्ये वाढ.
● प्राथमिकसाठी प्रति विद्यार्थी ६.७८ रु. तर उच्च प्राथमिकसाठी १०.१७ रु. मिळणार
जालना/प्रतिनिधी,दि.2
जालना : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवला जातो.
केंद्र शासनाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार ४ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिकसाठी ६.१९ रुपये आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ९.२९ रुपये याप्रमाणे निश्चित केली होती. सद्यस्थितीत केंद्र शासनाने २१ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात पुन्हा दरवाढ मंजूर केली आहे.
सदर सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सुधारित आहार खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये आता प्राथमिकसाठी ६ रुपये ७८ पैसे तर उच्च प्राथमिककरिता १० रुपये १७ पैसे इतकी वाढ केलेली आहे.


