संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना; भाड्याने इमारत देण्यासाठी अर्ज करावेत
जालना/प्रतिनिधी,दि.5
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाकरीता घनसावंगी, परतूर, बदनापूर, जालना, मंठा या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन इमारती भाड्याने घ्यावयाच्या आहेत. तरी संबंधित इमारत मालकांनी इमार भाड्याने देण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत घनसावंगी, परतूर, बदनापूर, जालना, मंठा या तालुक्याच्या मुख्यालयी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन इमारती (मुलां- मुलींसाठी स्वतंत्र इमारती) भाडे तत्वावर घ्यावयाच्या आहेत. संबंधित तालुक्याच्या ठिकाणी ज्या व्यक्तींकडे सर्व सुविधा असलेल्या इमारती उपलब्ध आहेत, अशा इमारत मालकांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी जालना कार्यालयासमोर, जालना या कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा. या इमारतींना सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दराने इमारत भाडे देय राहील. असेही कळविण्यात आले आहे.


