अंबाडा येथे मारहाणीत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू,
मोर्शी/प्रतिनिधि,दि.07
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील बारमध्ये क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. अमोल ताराचंद इंगळे रा. आष्टगाव असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अमोल इंगळे अंबाडा येथील एका बारमध्ये गेला होता. तेथे समीर शहा नजीर शहा व त्याचे दोन मित्र असे तिघे बसले होते. त्यापैकी समीरने अमोलला शिवीगाळ केली. दरम्यान अमोल काउंटरवर पैसे देण्यासाठी गेला असता, समीरने अमोलच्या चेहऱ्यावर काचेचा ग्लास फेकून मारला. तसेच खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात अमोलच्या पोटात गंभीर दुखापत झाली. त्याने घरी येऊन कुटुंबीयांना घटनाक्रम सांगत पोटात दुखत असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी त्याला अंबाडा येथील दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्याची गंभीर स्थिती पाहता मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी त्याला अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर तेथून सोमवारी त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी नेले असता, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मोर्शी पोलिसांनी दिली.


