जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपले सरकार सेवा केंद्रासह आधार केंद्राची तपासणी सुरू
जालना/प्रतिनिधी,दि.2
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार केंद्राची तपासणी सुरु करण्यात आली आहे. जालना शहरातील जुनी तहसील कार्यालयातील आधार केंद्र, शनी मंदिर जवळील आपले सरकार सेवा केंद्र, टाऊन हॉल येथील आधार केंद्र, गांधी चमन येथील पोस्ट ऑफिस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तपासणी करण्यात आली. तरी जिल्ह्यातील नागरिकांना चांगली सेवा वेळेत पुरविणे आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रासह आधार केंद्राची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा नागरिकांकडून काही केंद्र चालक जास्त शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. केंद्रांवरील ऑपरेटरचे नागरिकांशी असभ्य किंवा अशोभनीय वर्तन आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना आदरपूर्वक आणि सन्मानाने सेवा देणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व केंद्रांनी दर फलक दर्शनीय भागावर लावलेली असावी तसेच नागरिकांना मागणी करता सहजपणे उपलब्ध करून द्यावी. दर फलक अनुपलब्धतेबाबत तक्रारी आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सेवा केंद्रांनी त्यांच्या मुळ ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रावर कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


