जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना जर्मनी येथे रोजगाराची संधी
जालना/प्रतिनिधी,दि. 20
उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायिकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन-वूटेनबुर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 10 हजार कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत करार झाला आहे. महाराष्ट्रातील कुशल/अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे रोजगारासाठी अधिकृतरीत्या पाठविण्यासाठीची शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा जालना जिल्हयातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा.
जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हीसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आवश्यक जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी जालना जिल्ह्यातील तीन केंद्रांवर पाच वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, क्रीडा संकुल शेजारी, जालना. जि. प. प्रशाला मुलांची, स्टेशन रोड, जालना आणि जि.प. प्रशाला मुलींची जे.ई.एस.महाविद्यालय जवळ, जालना या ठिकाणी जर्मन भाषेचे वर्ग सुरु होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेऊन स्वतः मार्गदर्शक होण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेचा लाभ सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. आरोग्य सेवांमधील तंत्रज्ञ, आतिथ्य सेवांमधील तंत्रज्ञ, स्थापत्य सेवांमधील तंत्रज्ञ, विविध सेवांमधील तंत्रज्ञ यातील युवक-युवतींना जर्मनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ नोंदणी करावी. जालना जिल्ह्यातील युवक-युवती या योजनेत सामील झाल्यास त्यांना त्यांच्या उत्पनात भरघोस वाढ करून घेण्याची तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीवर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या लिंकवर माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मोतीबागेजवळ, जालना येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.


