जालना : जालना गणेश फेस्टिवलतर्फे महाराष्ट्रातील निसर्ग कवी व मराठवाड्याचे भूमिपुत्र ना. धो. महानोर यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त त्यांना निमंत्रितांचे कवी संमेलनाचे आयोजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.
स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियमवर दि. 8 सप्टेंबरपासून जालना गणेश फेस्टिवल सुरू असून या फेस्टिव्हलअंतर्गत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. रसीक मंडळी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेत आहे. सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री या फेस्टिव्हलचा ’महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाने समारोप होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील निसर्ग कवी दिवंगत ना. धो. महानोर यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त सांयकाळी 5.30 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवयित्री सौ. रेखाताई बैजल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कवी संमलेनात जालना जिल्ह्यातील नामवंत कवी सहभागी होवून ना. धो. महानोर यांना आपल्या काव्यातून अभिवादन करणार आहेत. या कवी संमेलनाचा काव्यप्रेमी रसीक श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अध्यक्ष राजेंद्र गोरे व जालना गणेश फेस्टिवलच्या पदाधिकार्यांनी केले आहे.