संविधान म्हणजे जगण्याची हमीः संवाद समितीचे संविधान संवादक कांबळे यांचे प्रतिपादन
विरेगाव/ गणेश शिंदे, दि. 18
संविधान म्हणजे जगण्याची हमी आहे, असे प्रतिपादन संवाद समिती जालनाचे सदस्य संविधान संवादक जितेंद्र कांबळे यांनी केले आहे. जालना तालुक्यातील विरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान अमृत महोत्सव वर्ष या निमित्ताने व घर घर संविधान या उपक्रमांतर्गत संविधान संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.
या कार्यशाळेमध्ये संविधान संवाद समिती जालनाचे सदस्य संविधान संवादक जितेंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधाना विषयी गोडी निर्माण व्हावी, संविधानातील मुल्यांची ओळख व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजावित या उद्देशाने विद्यार्थ्यांसोबत विविध कृती व उपक्रमाव्दारे संवाद साधला, संविधान म्हणजे काय? त्याचे महत्वआपल्या दैनंदिन जीवनात किती अनमोल आहे याचे सोप्या, सहज व मुलांना समजेल अशा भाषेत समजून सांगितले. व संविधान आपल्या जगण्याची हमी कशी देते हे उदाहरणावरून स्पष्ट केले. या कार्यशाळेची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविका यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास म्हस्के, प्रमूख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे होते. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत बागल, सहशिक्षिका एम एम वाकडीकर, व्ही. एन. गायक वाड उपस्थित होते. सूत्रसंचालन पि. सी डहाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन के.डी खरात यांनी केले.


