तिवसा येथे कुलरच्या शॉकने तरुणाचा मृत्यू:मोलमजुरीसाठी बहिणीकडे आलेल्या 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 8
तिवसा शहरातील आनंदवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. येथे एका २६ वर्षीय तरुणाचा कुलरच्या विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख मंगेश अशोक डरडे रा. घोगरा, ता. नरखेड, जि. नागपूर अशी झाली आहे.मंगेश गेल्या तीन महिन्यांपासून आनंदवाडी येथे त्याच्या बहिणीच्या घरी मोलमजुरी करत होता. रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता तो कामावरून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने कुलर चालू केला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.कुटुंबीयांनी त्वरित त्याला तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. मंगेश हा कुटुंबाचा कर्ता होता. त्याच्या अकाली निधनाने त्याच्या आई-वडिलांसह मोठ्या आप्त परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आनंदवाडी परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. मंगेश नेहमीप्रमाणे त्याच्या भावाजोबत ट्रॅक्टरवर मोलमजुरीसाठी जात असे. त्याच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


