अतिरिक्त शिक्षकांचा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
मुंबई/प्रतिनिधी,दि.13
मुंबईमधील अतिरिक्त शिक्षकांचे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये केलेले अन्यायकारक समायोजन रद्द करून त्यांचे मुंबईमध्येच समायोजन करण्यात यावे आणि त्यांचे बंद केलेले वेतन तातडीने सुरू करावे यासाठी पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आणि पुढाकाराने भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू बंडगर यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले. त्यानिमित्त अतिरिक्त शिक्षकांनी पालकमंत्री श्री.आशिष शेलार यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव आणि आघाडी समन्वयक श्री. प्रतीक कर्पे यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत भारतीय जनता पार्टी नेहमीच गंभीर आणि संवेदनशील असून यापुढील काळातही शिक्षकांना न्याय देण्यासाठी सक्षम आहे, असे मत व्यक्त केले.
भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू बंडगर यांनी मागील चार महिन्यांत अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. सर्व अतिरिक्त शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेतील शाळांमध्ये समायोजन झाले. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे बंद केलेले वेतनही सुरू झाले, याबद्दल त्यांनी श्री. आशिष शेलार यांचे आभार मानले. मुंबईमधील अतिरिक्त शिक्षकांना यापुढील काळातही प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडी कटीबद्ध असल्याचे डाॅ. राजू बंडगर यांनी सांगितले.
भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे यांनी भाजपा शिक्षक आघाडीच्या राज्यभरातील संघटनबांधणी आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत केलेल्या कार्याचा आढावा घेतानाच अतिरिक्त शिक्षकांना भविष्यातही कोणती अडचण येणार नाही याबाबत आश्वस्त केले.
भाजपा शिक्षक आघाडीचे कोकण अध्यक्ष श्री. किशोर पाटील यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांमधली संवेदनशीलता मांडत असतानाच त्यांचे मुंबईमध्ये समायोजन करण्यात यश आल्याबद्दल श्री. आशिष शेलार यांचे आभार मानले.
अतिरिक्त शिक्षकांच्या वतीने माजी नगरसेविका आणि अतिरिक्त शिक्षिका असणार्या श्रीमती सुरेखाताई पाटील, श्रीमती सीमा अलास्कर आणि श्री. शैलेंद्र वाघ यांनी अतिरिक्त शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाने केलेल्या अन्यायाबाबत सविस्तर विवेचन करतानाच भाजपा शिक्षक आघाडीने पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्व अतिरिक्त शिक्षक भाजपा शिक्षक आघाडीसोबत एकत्र आणि एकनिष्ठ राहतील,अशी भावना व्यक्त केली.
सदर सोहळ्यास भाजपा शिक्षक आघाडीचे पुणे अध्यक्ष श्री. मोरे; भटक्या विमुक्त आघाडीचे मुंबई अध्यक्ष श्री. आनंद कुर्हाडे; भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई सरचिटणीस श्री. शरद वाबळे, श्री. सोपान मोरे, श्रीम. सोनल पालवे; मुंबई सचिव श्री. विरेंद्र नेवरेकर, श्री. संदीप खेडकर; जिल्हाध्यक्ष श्री. राजेश मोरे, श्री. उमेश जागडे; तालुका अध्यक्ष श्री. अनिल यादव, श्री. पंकज सिंग आणि मोठ्या संख्येने अतिरिक्त शिक्षक उपस्थित होते.


