नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार
• जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद
जालना/प्रतिनिधी,दि. 28
सर्वसामान्य जनतेच्या अडचणी तसेच तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी आज जनसंवाद कार्यक्रमातंर्गत अंबड तालूक्यातील बठाण या गावाला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी श्रीमती मैत्रेवार यांनी भेटीत गावकऱ्यांच्या रस्ते, पाणी, वीज, रॅशन, शिक्षण या मुलभूत अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासंबंधी येणारे अडथळे, तसेच स्थानिक विकासाशी संबंधीत विविध मागण्याची माहिती ही घेतली.
यावेळी सरपंच भगवान इंगळे, मंडळ अधिकारी, केंद्र प्रमुख, तलाठी, कृषी सहायक ग्रामविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाल्या की, बठाण गावातील नागरिकांनी विकासाच्या कामाबाबत आपल्या संकल्पना शासनास सुचवाव्यात, त्यानूसार प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल. आज येथे जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्रामस्तरावरील विविध विभागांचे अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित असून, प्रलंबित व अपेक्षित असलेली विविध कामे तात्काळ सोडविण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीमती मैत्रेवार यांनी नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले.
यावेळी शेत रस्ते विषयक प्रकरणे, स्वस्त धान्य दुकान, फेर-फार नोंदी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, पांदण रस्ता, शिवरस्ता मोकळा करणे, घरकुल योजना, ई-पीक पाहणी, अंगणवाडी, आरोग्य सेवा आदी योजनांची विषयी बठाण ग्रामस्थांना माहिती देवून त्यांच्या अडचणीचे निराकरण जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच जागेवर सोडवणूक होणाऱ्या प्रकरणांचे निराकरण करण्यात आले. तसेच तालुका, जिल्हा, विभागीय आणि शासन स्तरावरील प्रकरणे सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आली.
यावेळी बठाण येथील ग्रामस्थांनी गावाला जोडणारा मुख्य रस्ता करण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण करुन बंधाऱ्यावर गेट बसवून देणे, शाळेत शिक्षक उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटन योजनेअंतर्गत गावातील मंदीराचा विकास करुन देण्याची मागणी केली. यावर श्रीमती मैत्रेवार यांनी संबंधीत विभागास याबाबत पाठपूरावा करुन सदर मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. जनसंवाद कार्यक्रमास यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


